( पारीत दिनांक : 25/03/2015 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्याकडून सॅम्संग कंपनीचा एस.ए.एम. आय 8552 (GQTR) ज्याचा आयएमईआय क्र. 356575050169243 असा असून तो दि. 17/5/2013 रोजी रु. 16,900/- ला विकत घेतला. सदर मोबाईलला एक वर्षाची वारंटी आहे. सदर मोबाईल घेतल्यानंतर एक महिन्यामध्ये सदर मोबाईल हा आपोआप हँग होत होता तसेच बंद पडून पुन्हा लवकर स्टार्ट होत नव्हता. त्यावरुन सदर मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्याकडे दाखविला असता विरुध्दपक्षाने काही वेळात स्टार्ट करुन परत दिला. त्यानंतर काही दिवस सदर फोन व्यवस्थीतरित्या सुरु होता, परंतु त्यामध्ये बरेच दोष निर्माण होते जसे की, मोबाईलची बॅटरी गरम होणे, मोबाईल मधून बरोबर आवाज न येणे, मोबाईल आपोआप बंद होणे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या सांगण्यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या अधिकृत सर्व्हीस सेंटरकडे सदर मोबाईल दि. 02/04/2014 रोजी दिला. परंतु आज रोजी सदर मोबाईल हा नादुरुस्त असून कुठल्याच प्रकारे तक्रारकर्त्याच्या वापरात नाही. त्यानंतर परत सदर मोबाईल वरील दोष दुर करण्याकरिता दि. 17/4/2014 रोजी सॅम्संग केअर सेंटरकडे दिला. त्यावर सॅम्संग केअर सेंटर यांनी सदर मोबाईल हा दुरुस्त करुन तक्रारकर्त्याला परत दिला. आज रोजी सदर मोबाईल हा नादुरुस्त असून तक्रारकर्त्याच्या कुठल्याही वापरात नाही. सदर मोबाईल फोन वापरता येत नसल्यामुळे तक्रारकर्त्याला दुसरा फोन घ्यावा लागला. या बाबत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना दि. 06/05/2014 रोजी नोटीस पाठविली व मोबाईल बदलून देण्यात यावा किंवा त्याची किंमत परत करावी असे सुचित केले, विरुध्दपक्षाचे सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्त्यास आर्थिक, शारीरीक व मानसिक त्रास झाला व म्हणून तक्रारकर्त्याने सदरची तक्रार वि. मंचासमक्ष दाखल करुन त्याद्वारे विनंती केली आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसानापोटी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून प्रत्येकी रु. 25,000/- देण्यात यावे, तसेच नोटीसचा खर्च रु. 1000/- व मोबाईल फोनची मुळ किंमत रु. 16,900/- व त्यावर 18 टक्के प्रमाणे व्याज तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षांकडून देण्यात यावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 08 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष 1 यांनी आपला लेखीजवाब, शपथेवर दाखल केला त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन असे नमुद केले आहे की,…
सदर मोबाईल दि. 17/5/2013 रोजी विकत घेतला होता व त्या तारखेपासून दि. 2/4/2014 पर्यंत कसलाही बिघाड झाला नाही व दि. 2/4/2014 रोजी सदर मोबाईल सर्व्हीस सेंटर कडे आला, त्यावेळेस सदर मोबाईल वारंटी कार्डप्रमाणे विनामुल्य दुरुस्त करुन दिला, सदर बाब रिर्टन मेमोवरुन दिसून येते व त्यावर तक्रारकर्त्याच्या सह्या आहेत. दि. 17/4/2014 ला सदर मोबाईलमध्ये बिघाड झाला, त्यावेळीही विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांचा मोबाईल त्वरीत विनामुल्य दुरुस्त करुन दिला. सदर मोबाईलची वारंटी दि. 17/5/2014 रोजी संपली आहे व अर्जदाराने सदर तक्रार ही दि. 19/6/2014 ला दाखल केली. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा मोबाईल दि. 2/4/2014 व दि. 17/4/2014 रोजी व्यवस्थीत दुरुस्त करुन दिला व त्यामध्ये कसलाही बिघाड झाला नाही व त्या संबंधीची तक्रारकर्त्याची तक्रार नाही. सदर मोबाईल मध्ये निर्मिती दोष आहे, हे दाखविण्यासाठी तक्रारकर्त्याने कोणत्याही तज्ञांचा अहवाल आणला नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी वारंटी कालावधीमध्ये तक्रारकर्त्यास योग्य सेवा वेळेवर व विनामुल्य दिली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
सदर लेखी जवाब विरुध्दपक्षाने प्रतिज्ञालेखावर दाखल केला
प्रस्तुत प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2 यांना प्रकरणाची नोटीस बजावल्यानंतरही विरुध्दपक्ष क्र. 2 हे प्रकरणात गैरहजर असल्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 2 चे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
3. त्यानंतर तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात तक्रारकर्ता यांची तक्रार, उभय पक्षांनी दाखल केलेले दस्त, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी दाखल केलेला लेखी जबाब व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचा सखोल अभ्यास करुन मंचाने खालील प्रमाणे निष्कर्ष काढला तो येणे प्रमाणे…
सदर प्रकरणात तक्रारकर्ता यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने दि. 17/05/2013 रोजी सॅम्संग कंपनीचा एस.ए.एम. 8552 (GQTR) हा मोबाईल फोन ज्याचा आयएमइआय क्र. 356575050169243, रु. 16,900/- नगदी देवून हुसैनी ट्रेडर्स ( विरुध्दपक्ष क्र. 2 ) यांच्याकडून विकत घेतला, हे दस्त क्र. 09 वरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा “ ग्राहक ” आहे, हे सिध्द होते. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे सदर मोबाईल विकत घेतल्यानंतर सदर मोबाईल एका महिन्यामध्ये हँग होत होता, बंद पडत होता, लवकर स्टार्ट होत नव्हता. यावर विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे असे म्हणणे आहे की, सदर मोबाईल तक्रारकर्त्याने दि. 17/5/2013 ला विकत घेतला होता व त्या तारखेपासून दि. 2/4/2014 पर्यंत म्हणजे जवळपास 10 महिनेपर्यंत त्यात कसलाही बिघाड झाला नाही व त्या संबंधी तक्रारकर्त्याची कसलीही तक्रार नाही.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्त्याला दैनंदिन कामाकरिता मोबाईलची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे सदर फोन खराब असल्यामुळे तक्रारकर्त्याला दुसरा फोन घ्यावा लागला. विरुध्दपक्षाचे म्हणण्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारकर्त्याचा मोबाईल वेळेवर व विनामुल्य दुरुस्त करुन दिला व त्या गोष्टीची पुर्तता तक्रारकर्त्याने रिटन मेमोवर स्वत: सह्या करुन दिली आहे. यावर मंचाचे असे म्हणणे आहे की, सदरचा मोबाईल नादुरुस्त असल्याने तक्रारकर्त्याने नविन मोबाईल विकत घेतला, याचा कोणताही पुरावा किंवा दस्तऐवज दाखल केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षामुळे नविन मोबाईल घ्यावा लागला, या तक्रारकर्त्याच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य मंचाला दिसून येत नाही.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार सदर मोबाईल मध्ये निर्मिती दोष आहे. त्यामुळे मोबाईलची पुर्ण रक्कम परत करावी. यावर विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, सदर मोबाईल तक्रारकर्त्याने दि. 17/5/2013 ला विकत घेतला आहे व पहीली दुरुस्ती दि. 2/4/2014 ला केलेली आहे. यावरुन मंचाच्या असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने जवळपास 10 महिने मोबाईलचा वापर केलेला आहे, त्यामुळे त्यात निर्मिती दोष नाही, हे सिध्द होते.
उभय पक्षांचा युक्तीवाद व दाखल दस्तांचे अवलोकन केल्यावर मंचाच्या असे निदर्शनास आले की, सदर मोबाईल विकत घेतल्यानंतर 10 महिन्यापर्यंत व्यवस्थीत सुरु होता व 10 महिन्यानंतर प्रथमच दि. 2/4/2014 ला सदर मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 1 कडे दुरुस्तीकरिता दिला, त्यामुळे सदर मोबाईल मध्ये निर्मिती दोष नव्हता, या निष्कर्षाप्रत सदर मंच आलेले आहे. तक्रारकर्त्याने ज्यावेळी मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे वारंटी पिरेड मध्ये, म्हणजेच दि. 2/4/2014 व दि. 17/4/2014 ला दुरुस्ती करिता दिल्यानंतर विरुध्दपक्षाने तो ताबडतोब त्याच दिवशी दुरुस्त करुन दिला आहे व तशा प्रकारच्या सह्या रिटन मेमोवर तक्रारकर्त्याने केल्या आहेत. तसेच तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याला दुसरा मोबाईल विकत घ्यावा लागला, परंतु त्या संबंधीचा पुरावा किंवा त्या बद्दलची खरेदी पावती प्रकरणात दाखल केलेली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या या म्हणण्यामध्ये तथ्य नाही. सदर मोबाईलची वारंटी एक वर्षाची असल्यामुळे वारंटी पिरेड संपल्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 ची मोबाईल विनामुल्य दुरुस्त करुन देण्याची जबाबादारी राहत नाही व विरुध्दपक्षाने कोणताही निष्काळजीपणा व सेवा देण्यामध्ये त्रुटी केलेली आहे, असे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या तक्रारीत कोणत्याही प्रकारचे तथ्य मंचाला आढळून येत नाही. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करणे न्यायोचित होईल, असे मंचाचे मत आहे.
सबब अंतीम आदेश पारीत करण्यात येतो तो खालील प्रमाणे
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.