::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 03.03.2017 )
आदरणीय अध्यक्षा श्रीमती एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार
1. तक्रारदार यांनी सदरहु तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये, विरुध्दपक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद व उभय पक्षाने दाखल केलेले सर्व न्यायनिवाडे यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निर्णय पारीत केला.
तक्रारकर्ते यांची तक्रार अशी आहे की, तक्रारकर्ते यांनी दि. 20/2/2011 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 निर्मित एअर कंडीशनर नमुद मॉडेल नंबरचा रक्कम रु. 29500/- या किंमतीत विरुध्दपक्ष क्र. 2 कडून खरेदी केला हेाता, त्या सोबत वॉरंटी कार्ड पुरविण्यात आले होते. फेब्रुवारी 2015 पासून सदरहु एसी ने काम करणे बंद केले. तक्रारकर्त्याने याची माहीती विरुध्दपक्ष क्र. 2 ला दिली, त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे तक्रार करण्यास सांगीतले, त्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 शी फोनवर संपर्क साधला, परंतु फेब्रुवारी पासून मे 2015 अखेर पर्यंत केवळ आश्वासन विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी दिले. विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्याशी ईमेल द्वारे तक्रारींचा पाठपुरावा केला. एसी नादुरुस्त असल्यामुळे तक्रारकर्ते यांच्या पत्नीला जास्त शारीरिक त्रास झाला. विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या तर्फे मोहसिन नावाचा टेक्नीशिअन येवून त्यांनी पाहणी केली व असे सांगितले की, सदरहु एसीचे कॉम्प्रेसर बदलणे आवश्यक आहे. सदर वॉरंटी कार्डनुसार कॉम्प्रेसरची वॉरंटी 60 महिन्यांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे विरुध्दपक्षातर्फे दुरुस्ती विनामुल्य होणे आवश्यक होते, परंतु तक्रारकर्त्याने आवश्यक लागणारा खर्च देण्याची तयारी दर्शवून देखील विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी प्रतिसाद दिला नाही. दि. 6 जुलै 2015 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी असे कळविले की, हा एसी अत्यंत जुना झाला आहे, त्याचे स्पेअर पार्टस् आता निर्माण केल्या जात नाही. सदरहु युनिट दुरुस्तीच्या पलीकडे आहे, तुम्हास दिलेली उपयोगीता पुर्ण झाली असून, प्रत्येक वस्तुला जिवीत मर्यादा असते, ती पुर्ण झाली आहे. त्यामुळे एसी दुरुस्ती न करता कंपनीची, एसीच्या मुळ किंमतीच्या 10 टक्के किंमतीत परत घेण्याची तयारी आहे. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 चे हे कथन बेकायदेशिर व सेवा न्युनता आहे. त्यामुळे प्रार्थनेनुसार तक्रार मंजुर करावी.
तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर खालील न्यायनिवाडे दाखल केले.
- I (2017) CPJ 17 (NC)
Ashish Oberai Vs. Emaar Mgf Land Limited
- III (1996) CPJ 1 (SC)
Fair Air Engineers Pvt Ltd.& Anr. Vs. N.K. Modi
- I (1996) CPJ 324 (NC)
Amtrex Ambience Ltd. Vs. M/s. Alpha Radios & Anr
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा युक्तीवाद असा आहे की, एसीच्या वॉरंटी कार्ड मधील अट शर्तीनुसार विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द कोणताही वाद हा फक्त दिल्ली येथील कोर्टात किंवा मंचात चालु शकतो, त्यामुळे तक्रार प्रतिपालनीय नाही. सदर एसी हा सन 2011 मध्ये विकत घेतला होता व तो फेब्रुवारी 2015 पर्यंत कसलाही बिघाड न होता चालला, त्यामुळे यात निर्मिती दोष नाही. एसी जेंव्हा दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सर्व्हीस सेंटरला दाखविला होता, त्यावेळेस इंजिनिअरने त्वरीत सांगीतले की, सदर एसी हा तक्रारकर्त्याने अनधिकृतपणे दुस-या इंजिनिअरकडून तपासला आहे, हे वॉरंटी अटी शर्तीचा भंग आहे. सदर एसीची वॉरंटी फक्त 12 महिन्यांची आहे व फक्त कॉंप्रेसरची वॉरंटी 60 महिन्यांची आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 च्या इंजिनिअरने असे सांगितले की, एसीच्या कॉम्प्रेसर मध्ये कसलाही बिघाड झालेला नाही, त्याच्या कंडेंसर कॉईल मध्ये बिघाड झाला होता. वॉरंटी कार्ड च्या अट- शर्तीनुसार एखाद्या मॉडेलचे पार्टस्, विरुध्दपक्ष क्र. 1 कडे उपलब्ध नसतील किंवा सदर मॉडेलचे प्रॉडक्शन बंद झाले असेल तर विरुध्दपक्ष क्र. 1 हा त्या मॉडेलची डिप्रीसिएशन किंमत मुळ किंमतीमधुन वजा करुन राहीलेल्या किंमतीत सदर मॉडेल तक्रारकर्त्याकडून घेण्यास तयार राहील. म्हणून तक्रारकर्त्यास तसे पत्र पाठविले होते. वास्तविक वॉरंटी कालावधी संपलेला आहे. त्यामुळे यात सेवा न्युनता नाही. तक्रारकर्त्याने कोणत्याही तज्ञाचा अहवाल, त्याची तक्रार सिध्द करण्याकरिता दाखल केलेला नाही. एसी बंद पडल्यामुळे, तक्रारकर्ते यांच्या पत्नीवर हृदय शस्त्रक्रिया करावी लागली, असे सिध्द हेात नाही, त्यामुळे तक्रार खारीज करावी.
विरुध्दपक्ष यांनी खालील न्यायनिवाडे दाखल केले.
1) 2016 (2) CPR 514 (NC)
Om Prakash Kulshrestha Vs. Prop. Madhu Radios & Ors.
2) 2013 (1) All MR ( Journal) 13
Kamaldeep Singh Vs. The Chief L.G.Electronics India
Pvt. Ltd & Anr.
विरुध्दपक्ष क्र. 2 चा युक्तीवाद असा आहे की, विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्ते यांना स्वतः एसी सोबत कोणतीही वॉरंटी दिली नाही, ती विरुध्दपक्ष क्र. 1 ची आहे. तक्रारकर्त्याच्या कायदेशिर नोटीसला विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी उत्तर दिले आहे. तक्रारकर्त्याने सदर एसी विकत घेतांना, तो पाहुन सर्व जाणुन, पसंतीनेच खरेदी केला होता व विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सर्व्हीस सेंटरची माहीती दिली होती, त्यामुळे यात विरुध्दपक्ष क्र. 2 ची सेवा न्युनता नाही. विक्री नंतर उत्पादनासंबंधी कोणतीही जबाबदारी या विरुध्दपक्ष क्र. 1 ची येत नाही.
अशा प्रकारे उभय पक्षांच्या युक्तीवादावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून, विरुध्दपक्ष क्र. 1 निर्मीत एसी स्वतःच्या उपयोगाकरिता खरेदी केला होता, त्यामुळे तक्रारकर्ते, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. सदर एसीच्या वॉरंटी कार्डवरील अट-शर्त नुसार वाद हा फक्त दिल्ली येथील मंचात चालु शकेल, हा विरुध्दपक्ष क्र. 1 चा आक्षेप प्रतिपालनीय नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी असा आक्षेप घेतला की, प्रकरणात तक्रारकर्त्याने सदर एसीमध्ये निर्मिती दोष आहे, हे दर्शविण्याकरिता कुठल्याही तज्ञाचा अहवाल दाखल केला नाही. मात्र विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी स्वतःच असे कबुल केले की, ( लेखी जबाबात ) सदर एसी जेंव्हा दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्र. 1 च्या इंजिनिअरला दाखवला, तेंव्हा त्यांने असे सांगितले होते की, सदर एसीच्या कंडेंसर कॉईल मध्ये बिघाड झाला होता, म्हणून हा आक्षेप तथ्यहीन आहे व यावरुन सदर बिघाड हा एसीच्या कॉम्प्रेसर मधीलच होता, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 यांना कबुल असलेल्या बाबीनुसार व दाखल दस्तांनुसार, सदर एसीच्या वॉरंटी कार्डच्या अट शर्तीनुसार, एसी कॉम्प्रेसरची वॉरंटी ही 60 महिन्यांची आहे, त्यामुळे या प्रकरणात एसी कॉम्प्रेसरचा वॉरंटी कालावधी अजुन संपलेला नव्हता, कारण एसी हा फेब्रुवारी 2011 मध्ये खरेदी केला होता व फेबुवारी 2015 मध्ये त्यात सदर बिघाड आला होता, म्हणून त्यात बिघाड झाल्यास संबंधीत पार्ट निःशुल्क बदलुन तो दुरुस्त करण्याची जबाबदारी, वॉरंटी अट प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 वर होती, परंतु त्यावेळेस तक्रारकर्ते आवश्यक लागणारा खर्च देण्यास तयार असतांना देखील, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारींकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले होते व दिरंगाईने त्यानंतर दुरुस्तीसाठी नकार देवून, एसी कमी किंमतीत विकुन टाकण्याचा सल्ला दिला होता, असे दाखल तक्रारकर्त्याच्या ई-मेल तक्रारीवरुन दिसून येते. म्हणून यात विरुध्दपक्ष क्र. 1 ची सेवा न्युनता सिध्द होते, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 च्या युक्तीवादावरुन असे समजते की, सदर एसीच्या मॉडेलचे पार्टस् विरुध्दपक्ष क्र. 1 कडे उपलब्ध नसावे किंवा सदर एसी मॉडेलचे प्रॉडक्शन बंद झाले असावे, परंतु तरीही विरुध्दपक्ष क्र. 1 ची सेवा न्युनता सिध्द झाल्यामुळे, त्यापोटीची नुकसान भरपाई आर्थिक स्वरुपात देणे, विरुध्दपक्ष क्र. 1 चे काम आहे, असे मंचाला वाटते. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी दाखल केलेल्या न्यायनिवाड्यातील तथ्ये, प्रकरणात लागु पडत नाही, या उलट तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या न्यायनिवाड्यांमधील निर्देशांनुसार सदर आदेश पारीत केला. सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2 ची सेवा न्युनता, तक्रारकर्ते यांनी सिध्द न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द तक्रारकर्ते यांच्या हितात कोणताही आदेश पारीत करता येणार नाही. तसेच तक्रारकर्ते यांच्या पत्नीबाबतच्या वैद्यकीय दस्तांचा विचार करता येणार नाही, असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारकर्ते यांची तक्रार, त्यांच्या प्रार्थनेतील क्लॉज क्र. 4 नुसार विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द अंशतः खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करुन, मंजुर केली.
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याचा नादुरुस्त एसी परत घेवून सेवा न्युनतेपोटी सर्व प्रकारची नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 15,000/- ( रुपये पंधरा हजार फकत ) तक्रारकर्ते यांना द्यावी, तसेच प्रकरणाचा न्यायिक खर्च म्हणून रु. 3000/- ( रुपये तिन हजार फक्त ) द्यावे.
- सदर आदेशाची पुर्तता, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावी. अन्यथा वरील आदेशीत रकमेवर दि. 8/2/2016 ( प्रकरण दाखल तारीख ) पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदाई पर्यंत द.सा.द.शे. 10 टक्के व्याज दराने, व्याजासहीत रक्कम देय राहील, याची नोंद घ्यावी.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.