निकालपत्र मिलिंद सा.सोनवणे, अध्यक्ष, यांनी पारीत केले
नि का ल प त्र
पारित दिनांकः 30/3/2015
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986(यापुढे संक्षेपासाठी “ग्रा.सं.का.1986”) च्या कलम 12 नुसार सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की सामनेवाला ही इन्व्हेस्टमेंट कंपनी असून ठेव रकमा स्विकारुन ठराविक कालावधीसाठी ठराविक व्याजदराने पैसे परत करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. तक्रारदारांनी सामनेवाल्यांकडे खालीलप्रमाणे रकमा गुंतविल्या.
अ.क्र. | तक्रारदाराचे नाव | अॅग्रीमेंट नंबर | अॅग्रीमेंट दिनाक | मुळ रक्कम |
1 | संगिता संधानशिव | एजीएस 206377 | 8/9/2011 | 50,000 |
2 | संगिता सोनवणे | एजीआर 004203 | 4/3/2011 | 1,20,000 |
3 | भाग्यश्री जगताप | एजीआर 005658 | 3/6/2011 | 3,00,000 |
3. तक्रारदारांचे असेही म्हणणे आहे की, सामनेवाला यांनी ठेव रक्कम स्विकारतांना इन्व्हेस्टमेंट अॅग्रीमेंट लिहून देवून सदर रकमा ठरावीक काळानंतर व्याजासह देण्याचे कबूल केले होते. त्यानुसार सामनेवाला यांनी डिसेंबर 2011 पावेतो वेळवर व्याज दिलेले आहे. त्यानंतर काही तांत्रीक अडचणीमुळे सामनेवाला यांनी मुळ अॅग्रीमेंट जमा करुन नवीन अंडरटेकींग लिहून देवून त्यानुसार व्याज देण्याचे कबूल करुनही अंडरटेकींगनुसार व्याज दिलेले नाही. सामनेवाला यांनी करारानुसार रक्कम न देवून तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे सामनेवाल्यांकडे गुंतवलेली रक्कम व्याजासह मिळावी. आर्थीक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व अर्जाचा खर्च मिळावा, अशा मागण्या तक्रारदाराने मंचाकडे केलेल्या आहेत.
3. तक्रारदार यांनी तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ दस्तऐवज यादी नि.3 लगत प्रॉमिसरी नोट, अंडरटेकींग, समरी ऑफ ट्रँझॅक्शन इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. न्यायमंचाची नोटीस लागून सामनेवाले हजर झाले. परंतु त्यांनी जबाब दाखल न केल्यामुळे प्रस्तूत तक्रार अर्ज त्यांच्या जबाबा विना चालविण्याचा आला.
5. तक्रारदारांचे वकील अॅड.वैष्णव यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
6. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
- सामनेवाला यांनी तक्रारदार यांना
अॅग्रीमेंट प्रमाणे रक्कमा न देवून
सेवा देण्यात कमतरता केली काय? होय.
- आदेशाबाबत काय? अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
7. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे अॅग्रीमेंट नं.एजीआर 005658 नुसार दि.03/06/2011 रोजी रक्कम रु.3,00,000/-, अॅग्रीमेंट नं.एजीएस 206377 नुसार दि.08/09/2011 रोजी रक्कम रु.50,000/- व अॅग्रीमेंट नं.एजीआर 004203 नुसार दि.04/03/2011 रोजी रक्कम रु.1,20,000/- असे एकूण रक्कम रु.4,70,000/- गुंतवलेले आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 ते 3 यांच्याकडे मुळ रक्कम व व्याजाची मागणी केली असता सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, असे तक्रारदारांनी शपथेवर कथन केलेले आहे. तक्रारदार यांनी गुंतवलेली रक्कम व त्यावरील व्याजाची मागणी करुनही ती न देवून सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
8. मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांची गुंतवलेली रक्कम व त्यावरील व्याज यांची मागणी करुनही न देवून तक्रारदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 ते 3 यांच्याकडून वैयक्तीक व संयुक्तीकरित्या अॅग्रीमेंट नं.एजीआर 005658 नुसार रक्कम रु.3,00,000/-, अॅग्रीमेंट नं.एजीएस 206377 नुसार रक्कम रु.50,000/- व अॅग्रीमेंट नं.एजीआर 004203 नुसार रक्कम रु.1,20,000/- व त्यावर दि.01/01/2012 पासून प्रत्यक्षात रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.9% प्रमाणे व्याज मिळण्यास पात्र आहेत. तसेच सामनेवाला क्र.1 ते 3 यांच्याकडून वैय्यक्तीक व संयुक्तीक रित्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.6000/- व अर्ज खर्च रु.3000/- मिळण्यासही तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
- सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तकारदार यांना खालीलप्रमाणे रकमा दि.01/01/2012 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.9% व्याजासह अदा कराव्यात.
अ.क्र. | तक्रारदाराचे नाव | अॅग्रीमेंट नंबर | मुळ रक्कम |
1 | संगिता संधानशिव | एजीएस 206377 | 50,000 |
2 | संगिता सोनवणे | एजीआर 004203 | 1,20,000 |
3 | भाग्यश्री जगताप | एजीआर 005658 | 3,00,000 |
- सामनेवाला क्र.1 ते 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.6,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- अदा करावेत.
- निकालपत्राची प्रत उभय पक्षास विनामुल्य देण्यात यावी.
नाशिक.
दिनांकः30/03/2015