(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक :14.03.2011) 1. अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 सह 14 अन्वये गै.अ.चे विरुध्द सेवेतील न्युनते बाबत दाखल केली आहे. तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 2. अर्जदार सुशिक्षीत बेरोजगार योजने अंतर्गत बँक ऑफ इंडिया, शाखा गुंजेवाही यांचेकडे अर्ज केला. बँकेने खाञीकरुन रुपये 95000 कर्ज आटा चक्की टाकण्याकरीता मंजूर केले. अर्जदाराने, स्वतःचे व कुंटूंबाचे उपजिवीकेचे साधन मिळावे म्हणून व रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आटा चक्की टाकण्याचे ठरवून गै.अ.क्र.1 दि.1.6.09 रोजी मशीन खरेदी केले. गै.अ.क्र.1 ने सांगितले की, मशीन गॅरंटी 1 वर्षाची व वॉरंटी 7 वर्षाची आहे, अशी माहिती दिल्यानंतर मशीन खरेदी केल्यावर मशीनचे पार्टसहीत रुपये 88000 चे बिल, तसेच बंद लिफाफ्यात कागदपञ दिले. कागदपञाचा बंद लिफापा अर्जदाराने बँकेकडे सपूर्द केला. गै.अ.क्र. 1 ने मशीन जोडणीचे सर्व सामान अर्जदारास दिले. परंतू, मशीन जोडणीसाठी तब्बल 5 महिन्याचा कालावधी लावला. अर्जदाराची आटा चक्की 25.11.09 ला प्रत्यक्षात सुरु झाले. मशीन सुरु झाल्यानंतर 7 दिवस चांगली चालली आणि 1.12.09 ला ऑईल इंजीनमधून आईल बाहेर निघण्यास सुरुवात झाली. दि.2.12.09 ला गै.अ.क्र.1 ला फोनव्दारे सुचना दिली. परंतू, गै.अ.क्र.1 ने दखल घेतली नाही. घेतलेल्या मशीनची 1 वर्षाची वॉरंटी असल्याने कुठलाही बिघाड झाला तर दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी विक्रेत्याची असते, परंतु गै.अ.क्र.1 ने सेवा देण्यास सुरुवातीपासून टाळाटाळ केली आहे. बँक मॅनेजरने फोन व्दारे गै.अ.क्र.1 ला मशीन दुरुस्त करुन देण्यास कळविले, तरी गै.अ.क्र.1 नी दखल घेतली नाही. बँक मॅनेजर गै.अ.क्र.1 च्या दुकानात आल्यानंतर दोन महिन्याचे नंतर मिस्ञी पाठवीले. गै.अ.क्र.1 यांनी मिस्ञी पाठविल्यानंतर मशीन चेक केल्यावर सांगीतले की, ओरीजनल सामान खराब आहे. त्यानुसार, नोजल व पंप, आईडल गिअर 3, केमसाप्ट गिअर 2, पिस्टल व रिंग, वॉल लाईट, टेपेड टूल, पूश रॉड, गास्केट पॅकींग, एवढे सामान टाकले, परंतु मशीन मधून आईल निघणे व वारंवार आटा चक्की बंद पडणे सुरुच होते. अर्जदाराचे धंद्यावर परिणाम झाला. बँकेचे हप्ते भरणे सुध्दा कठीण होऊन बसले. गै.अ.क्र.1 ला आईल इंजीन दुरुस्तीची तोंडी तक्रार देवून योग्य ती दखल न घेतल्याने दि.18.3.10, 22.3.10 व 31.3.10 या दिवशी लेखी पञ दिले. परंतु, काहीच उपयोग झाला नाही, म्हणून शेवटी अधि.मंजुश्री खनके मार्फत 19.9.10 रोजी नोटीस पाठविला. गै.अ.क्र.1 यांनी अर्जदाराची उघड उघड फसवणूक केली. आटा चक्कीचे इंजीन फाल्टी असल्याने 7 दिवसातच बिघडले. त्यानंतर वारंवार दुरुस्त करावे लागले. मिस्ञीने सांगितल्याप्रमाणे सुटे भाग खराब असल्याने नवीन आणून टाकणे इत्यादीचा खर्च अर्जदारास करावा लागला. अर्जदाराने, सामानाची खरेदी 12.5.10 ते 7.9.10 पर्यंत बिल अर्जदाराकडे आहेत. अर्जदारास 5 ते 6 हजार रुपये अतिरिक्त करावा लागला. सुटे भाग खरेदी करण्याकरीता वेळोवेळी चंद्रपूर जाणे-येणे करावे लागले. तसेच, बँकेचे कर्जाचे हप्ते नियमितपणे भरु न शकल्याने बँकेचे कर्जाचा बोजा आहे. बँकेने वसूलीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे, अर्जदाराला मानसिक ताण पडले आहे. 3. गै.अ.क्र.2 हा मशीनचा निर्माता आहे. 1 वर्षाचे आंत मशीनला काही झाल्यास दुरुस्त करुन सेवा देण्याचे निर्मात्याचे प्रथम कर्तव्य आहे. गै.अ.क्र.1 नी सरळ-सरळ नकार दिला. गै.अ.क्र.1 व 2 यांचा फाल्टी मशीन विकणे व दुरुस्त करुन न देणे ही अर्जदाराची फसवणूक आहे. 4. अर्जदाराने, गै.अ.क्र.1 यांनी खराब झालेली आटा चक्की मशीन त्वरीत बदलून द्यावी. अर्जदाराने, घेतलेल्या कर्जाचे नियमित हप्ते न भरल्यामुळे लागलेल्या व्याजाचे 12 टक्के प्रमाणे नुकसान भरपाई गै.अ.क्र.1 व 2 यांनी देण्याचा आदेश व्हावा. आर्थिक नुकसानी पोटी रुपये 1,00,000/- व मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 50,000/- नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. 5. अर्जदाराने नि.5 नुसार 19 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गै.अ.ना नोटीस काढण्यात आले. गै.अ.क्र.1 ने हजर होऊन नि.6 नुसार लेखी उत्तर व नि.9 नुसार 2 दस्ताऐवज दाखल केले. गै.अ.क्र.2 ने नि.19 नुसार लेखी उत्तर व नि.20 नुसार 2 दस्ताऐवज दाखल केले. 6. गै.अ.क्र.1 ने लेखी उत्तर नि.6 मध्ये नमूद केले की, गै.अ.क्र.1 ने हे अमान्य केले की, अर्जदार हा सुशिक्षीत बेरोजगार आहे. वास्तविक, अर्जदार हा ठेकेदारी व शेतीचा व्यवसाय करतो व बेरोजगार नसतांनाही बँकेची फसवणूक करुन स्वतःला सुशिक्षीत बेरोजगार दाखवून चुकीच्या मार्गाचा अवलंब करुन बँकेकडून कर्ज उचल केल्याचे दिसते. यात वाद नाही की, अर्जदाराने, गैरअर्जदारापासून दि.1.6.09 रोजी काही मशीन खरेदी केल्या आहेत. परंतु, हे म्हणणे खोट असल्यामुळे अमान्य की, गै.अ.क्र.1 ने अर्जदारास 1 वर्षाची गॅरंटी व 7 वर्षाची वॉरंटी सांगीतली. हे म्हणणे अमान्य की, कागदपञाचा बंद लिफाफा गै.अ.क्र.1 ने अर्जदारास बँकेला देण्याकरीता दिला. वास्तविक, बँकेच्या व्यवहाराशी गै.अ.क्र.1 चा संबंध नाही. सामान खरेदी केले तेंव्हा गै.अ.क्र.1 ने अर्जदारास बिल दिलेले आहे. आटा मशिनचे इंजिनची कोणतीही वॉरंटी अथवा गॅरंटी इंजिनच्या निर्मात्याने गै.अ.क्र.1 ला दिलेली नाही. यामुळे, मशिनची वॉरंटी अथवा गॅरंटी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यात वाद नाही की, गै.अ.क्र.2 हा मशिनचे निर्माते आहेत. परंतु, मशिनचे सर्व भाग त्यांनी निर्माण केले असे गृहीत धरता येत नाही. गै.अ.ने वेळोवेळी अर्जदारास त्याच्याकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर विनामुल्य सेवा दिली आहे. मंचास फसवणूकीची केस चालविण्याचे अधिकार नसल्यामुळे अर्जदाराची ही केस प्राथमिक दृष्ट्या खारीज होण्यास पाञ आहे. 7. गै.अ.क्र.1 ने मॅक्यॉनिक पाठवून अर्जदारास सेवा दिलेली आहे व अर्जदाराची मशीन अत्यंत सुस्थितीत सुरु असून, त्याच्याकडे ग्राहक येत नसल्यामुळे अर्जदाराचा व्यवसाय डबघाईस आला. आटा चक्की व ऑईल इंजिन या दोन वेगवेगळ्या मशिन असून दोन्ही मशीनचे निर्माते वेगवेगळे आहेत. गै.अ.क्र.2 हा आटा चक्कीचे निर्माते नसून अर्जदाराने आटा चक्कीबाबत कोणतीही तक्रार आजपर्यंत केलेली नाही. आटा चक्की चालविण्याकरीता इलेक्ट्रीक किंवा आईल इंजिनची आवश्यकता असते. अर्जदाराने, आटा चक्की बदलून देण्याची मागणी केलेली आहे. यावरुन अर्जदार स्वच्छ हाताने कोर्टात आला नाही. अशा परिस्थितीत अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे. 8. गै.अ.क्र.2 ने लेखी उत्तर नि.19 मध्ये म्हटले आहे की, अर्जदाराने दि.18.3.10, 22.3.10 व 31.3.10 रोजी गै.अ.क्र.1 यांना नुकसानीबाबत लेखी पञ दिल्याचा मजकूर माहिती अभावी नाकबूल केला. अर्जदाराने दि.19..9.10 रोजी अधि.मंजुरी खनके, चंद्रपूर यांचे मार्फत गै.अ.क्र.2 ला नोटीस पाठविला, ही बाब मान्य केली. सदर नोटीस गै.अ.क्र.2 यांनी अधि.परेश आर.ञिवेदी, राजकोट यांचे मार्फत दि.14.10.10 रोजी रितसर उत्तर पाठविले. अर्जदाराच्या कथीत नोटीस मध्ये ‘भारत इंजिन मॅन्युफॅक्चरर, ओरिएंट लिस्टर (10 एचपी) इंजिन क्र.1147 हे आटा चक्कीचे मशीन खरेदी केले.’असे विधान केले होते. त्यामुळे, गै.अ.क्र.2 यांनी ओरिएंट लिस्टर (10 एचपी) इंजिन क्र.1147 बाबत ते नेमके कोणाला विक्री करण्यात आले याबाब चौकशी केली असता, सदर इंजिन गै.अ.क्र.1 यांना विकले नसल्याचे निष्पन्न झाले. गै.अ.क्र.2 चा गै.अ.क्र.1 सोबत आज पावेतो कोणताही व्यावसायीक व्यवहार झालेला नाही. सदर नोटीसचे उत्तरात गै.अ.क्र.2 यांनी अर्जदाराला संबंधीत मशीन बाबत कायदेशीर माहिती, कागदोपञी पुरावा असल्यास त्याची प्रत पाठवावी असे कळविले होते. 9. गै.अ.क्र.2 यांनी, गै.अ.क्र.1 मार्फत किंवा अन्य मार्गाने अर्जदाराला विक्री केलेली नसल्याने अर्जदार हा गै.अ.क्र.2 चा ग्राहक ठरत नाही. त्यामुळे, गै.अ.क्र.2 विरुध्द प्रस्तूत मंचापुढे दाद मागण्याचा अर्जदाराला कोणताही कायदेशीर अधिकार नाही. अर्जदाराने, गै.अ.क्र.2 यांना प्रकरणात नाहक गोवले आहे. 10. गै.अ.क्र.2 हे ऑईल इंजिनचे निर्माता आहेत हे मान्य. परंतु, गै.अ.क्र.1 हे गै.अ.क्र.2 यांनी निर्माण केलेल्या ऑईल इंजिनचे अधिकृत डिलर असल्याबाबत विधान निखालस खोटे असल्याने नाकबूल आहे. त्यामुळे, कथीत सेवेच्या गैरसोयीबाबत कर्जाचे अतिरिक्त व्याज 12 % प्रमाणे नुकसान भरपाईची मागणी देखील अमान्य करुन, उर्वरीत संपूर्ण प्रार्थना अमान्य केली आहे. 11. गै.अ.क्र.2 ने लेखी उत्तरातील विशेष कथनात म्हटले आहे की, सदर क्रमांकाचे डिझेल इंजिन ज्याचा क्र.1146 व 1147 (दोन नग) दि.2.12.08 चे बिल क्र. टी-24 प्रमाणे मे.इंडिया मशिनरी स्टोअर्स, मेन रोड, पोसिना (गुजरात) यांना विक्री केले आहे आणि सदरचे दोन्ही इंजिन श्री उमिया रोडवेज, राजकोट यांचे मार्फतीने थेट सदर खरेदी कर्त्याला पाठविण्यात आले आहे. गै.अ.क्र.1 हा गै.अ.क्र.2 चा अधिकृत विक्रेता किंवा अधिकृत वितरक किंवा इतर कोणत्याही व्यवहारात संबंधीत नाही. तसेच, उभयंतामध्ये आजपावेतो कोणताही व्यापारीक व्यवहार झालेला नाही. अर्जदाराने खरेदी केलेले ‘भारत इंजिन मॅन्युफॅक्चरर, ओरिएंट लिस्टर (10 एचपी) इंजिन क्र.1147’ या कथीत आटा चक्की मशिन हे बनावटी असून, अर्जदाराने गै.अ.क्र.1 यांचेकडून खरेदी केली असल्यास त्याचा गै.अ.क्र.2 शी काहीही संबंध नाही. उलट, गै.अ.क्र.2 च्या नांवाचा दुरुपयोग करुन गै.अ.क्र.1 यांनी अर्जदाराची फसवणूक केली असल्याचे स्पष्ट होते. तसेच, गै.अ.क्र.2 चे निशाणीचिन्ह वापरुन अर्जदाराला कथीत मशिन विक्री केली असल्यास गै.अ.क्र.1 वर मंचाने फौजदारी कारवाई करावी. अर्जदाराने, गै.अ.क्र.2 ला अकारण गोवले असल्याने अर्जदारावर रुपये 50,000/- खर्च बसवून गै.अ.क्र.2 ला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. 12. अर्जदाराने नि.21 नुसार शपथपञ व नि.23 नुसार 2 दस्ताऐवज दाखल केले. गै.अ.क्र.1 ने नि.23 व नि.24 नुसार साक्षदाराचे शपथपञ दाखल केले. तसेच, गै.अ.क्र.1 ने नि.25 नुसार शपथपञ दाखल केले. गै.अ.क्र.2 ने नि.27 नुसार शपथपञ व नि.20 नुसार 1 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदार व गै.अ.क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ व उभय पक्षांच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होता. मुद्दे : उत्तर
1) गै.अ.क्र.1 व 2 यांनी सेवा देण्यात न्युनता करुन अनुचीत : विवेचनानुसार. व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? 2) तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे काय ? : होय. 3) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? :अंतिम आदेशा प्रमाणे @@ कारण मिमांसा @@ मुद्दा क्र. 1 व 2 :- 13. अर्जदाराने स्वयंरोजगाराकरीता बँक ऑफ इंडिया शाखा गुंजेवाही यांचेकडून कर्ज, आटा चक्की लावण्याकरीता घेतले. गै.अ.क्र.1 ने आटा चककीचे साहित्य व डिझल इंजीन पुरविले याबाबत वाद नाही. अर्जदाराने, गै.अ.क्र.1 कडून विकत घेतलेल्या डिझेल इंजीन मधून ऑईल लिकीज झाल्यामुळे त्यात नेहमीच दोष निर्माण होत असल्यामुळे वारंवार त्यातील पार्ट बदलवून नवीन पार्ट लावावे लागले. गै.अ.क्र.1 ला सांगूनही आपला मेक्यॉनीकल पाठविला नाही. त्यामुळे, अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाले, तसेच वारंवार ऑईल इंजीनमध्ये बिघाड येत असल्यामुळे त्यात निर्मीती दोष असल्याने खराब झालेली आटा चक्कीची मशीन बदलवून मिळण्याची मागणी अर्जदाराने केली आहे. 14. अर्जदाराचे तक्रारीनुसार आटा मशीन ही वेगळी आहे आणि इंजीन हा वेगळा भाग आहे. तक्रारीनुसार आटा मशीनच्या कोणत्या भागात बिघाड आहे हे अर्जदार सिध्द करु शकला नाही. परंतू, ऑईल इंजीनमध्ये बिघाड आला व त्यात गै.अ.क्र.1 चा मॅक्यॉनिकल विठ्ठल गावतुरे यांनी दुरुस्त करुन दिले. त्याचा मोबदला समर्थ ईलेक्ट्रीकल यांनी दिला असे मान्य केले आहे. गै.अ.क्र.1 च्या वतीने नि.23 नुसार विठ्ठल गावतुरे यांनी शपथपञ सादर केला. सदर शपथपञात ऑईल इंजीनमध्ये बिघाड आला होता हे मान्य केले आहे. त्यानंतर पुन्हा दि.2.4.10 रोजी जयवंत समर्थ यांनी भगवान दुर्गे यांनी पाठवीले होते असे मान्य केले आहे. विठ्ठल गावतुरे अर्जदाराकडे पाहणी करीता गेला असता नोझलमध्ये कचरा होता. नोझल साफ करुन इंजीन चालु केले असता, इंजीन सुरु झाले असे शपथपञात कथन केले आहे. यावरुन अर्जदाराकडे गै.अ.यांनी मेक्यानीकल विठ्ठल गावतुरे यांना दि.4.12.09, व 2.4.10 रोजी पाठविले ही बाब सिध्द होते. दि.4.12.09 च्या तपासणीत ऑईल सील खराब झाले होते, व त्यातून ऑईल गळत होते असे मान्य केले, ऑईल पाईप बदलून दिला व ऑईल सील बदलून दिली हे मान्य केले आहे. यावरुन, ऑईल इंजीनमध्ये बिघाड आला होता, ही बाब सिध्द होते. अर्जदाराने, ऑईल इंजीन मध्ये बिघाडाबाबत गै.अ.क्र.1 ला 22.3.10 ला लेखी पञ दिले. त्याची प्रत बँकेला सुध्द दिली. दि.31.3.10, 18.3.10 ला सुध्दा लेखी तक्रार दिली. परंतू, गै.अ.क्र.1 यांनी त्याची दखल घेतली नाही आणि शेवटी दि.2.4.10 ला विठ्ठल गावतुरे यांना पाठवून नोझल दुरुस्त करुन दिला. यावरुन, गै.अ.क्र.1 ला आलेल्या बिघाडाबाबत वारंवार कळवूनही तत्पर सेवा पुरविली नाही. ही त्याचे सेवेतील न्युनता असल्याची बाब दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होतो. 15. गै.अ.क्र.1 ने, लेखी बयानात दि.1.6.09 रोजी अर्जदाराने मशीन खरेदी केल्या याबाबत वाद नाही असे म्हटले आहे. परंतू, 1 वर्षाची गॅरंटी व 7 वर्षाची वॉरंटी आहे हे म्हणणे नाकारले आहे. वास्तविक, दि.1.6.09 ला मशीन खरेदी केल्याचे मान्य केले, त्याचप्रमाणे आपल्या वतीने विठ्ठल गावतुरे यांनी दिलेल्या शपथपञानुसार दि.4.12.09 रोजी इंजीन दुरुस्त/पाहणीकरीता पाठविले होते. म्हणजेच, अवघ्या अल्पावधीतच इंजीन ऑईल मध्ये बिघाड आला होता हे अप्रत्यक्षपणे गै.अ.क्र.1 ने मान्य केले आहे. अर्जदाराने, केलेल्या कथनानुसार गै.अ.क्र.1 ने आटा मशीन फिटींग करुन देण्यास 5 महिन्याचा विलंब लावला. अर्जदाराने, दि.25.11.09 ला प्रत्यक्ष आटा चक्की सुरु झाल्याचे कथन केले, परंतू ते गै.अ.ने अमान्य केले. त्याचबरोबर दि.1.12.09 रोजी बिघाड आल्याचे अमान्य केले आहे. जेंव्हा की, गावतुरे मिस्ञी कडून दि. 4.12.09 ला दुरुस्त करुन देवून सेवा पुरविली असे कथन स्वतः गै.अ.क्र.1 करीत आहे. यावरुन, एकीकडे नाकारुन दुसरीकडे सेवा पुरविल्याचे विसंगत कथन करीत असल्याचे गै.अ.च्या कथनावरुन सिध्द होतो. ही गै.अ.क्र.1 ने आपली बाजू सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत असल्याचे निष्कर्ष निघतो. 16. अर्जदाराने, तक्रारीत ऑईल इंजीन करीता लागणारे साहित्य चंद्रपूर मधून खरेदी करुन लावले. गै.अ.क्र.1 ला वारंवार सांगूनही बिघाड दुरुस्त करुन दिला नाही. त्यामुळे, स्वतः नवीन पार्टस् खरेदी करण्याकरीता 5-6 हजार रुपये खर्च करुन लावले. गै.अ.ने अर्जदाराचे हे म्हणणे खोटे ठरविण्याकरीता रमजान शेख अब्दुल नमीद शेख याचा शपथपञ नि.24 नुसार दाखल केला. सदर शपथपञाचे अवलोकन केले असता, शपथकर्ता हा मजुरीचे काम करीत असल्याचे नमूद केले आहे. शपथकर्ता 7 ते 8 वर्षापासून मेक्यॉनिकलचे काम करतो, स्वतःचे कोणतेही काम नसून गाडी दुरुस्तीचे काम गाडीवर जावून करतो असे कथन केले आहे. जेंव्हा की, या शपथपञाच्या कथना पृष्ठयार्थ वैनगंगा क्षेञीय ग्रामीण बँक, बंगाली कॅम्प एरिया, शाखा कार्यालयाच्या बचत बँक खाता क्र.496 च्या पहिल्या पानाची प्रत सोबत जोडली आहे. त्याचे अवलोकन केले असता, रमजान शेख शेख नबी म्हणजेच शपथकर्ता हा मेडिकल व्यवसाय करीत असून भिवापूर वॉर्ड, महादेव मंदीर, चंद्रपूर येथे राहात असल्याचा पत्ता नमूद केला आहे. जेंव्हा की, शपथपञामध्ये मजुरीचे काम नमूद करुन गाडी दुरुस्तीचे काम करतो आणि पासबुकानुसार मेडिकलचा व्यवसाय करतो, यावरुन रमजान शेख अब्दुल नबी याचा शपथपञ हा खोटा असून पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास पाञ नाही, त्याचे शपथपञातील कथनात सत्यता नाही. उलट, गै.अ.क्र.1 यांनी स्वतः असे खोटे व बनावटी साक्षदाराचे बयान सादर करुन आपले सेवेत न्युनता दिल्याचे सिध्द करतो. गै.अ.यांनी अ-12 नुसार प्रोप्रायटर शेख रमजान मिस्ञी यांनी दिलेल्या बिलाला खोटे ठरविण्याकरीता असे खोटे शपथपञ दाखल केल्याचा निष्कर्ष वरील कथनावरुन निघतो. 17. गै.अ.क्र.1 ने नि.6 नुसार दाखल केलेल्या लेखी बयानातील पॅरा 5 मध्ये असे म्हटले आहे की, “ यात वाद नाही की, गै.अ.क्र. 2 हे मशीनचे निर्माते आहे, परंतू मशीनचे सर्व भाग त्याने निर्माण केले असे गृहीत धरता येत नाही.” यावरुन ऑईल इंजीन निर्माता गै.अ.क्र.2 हाच आहे, हे स्पष्टपणे सांगीत नाही. जेंव्हा की, गै.अ.क्र.1 ला आटा चक्कीची मशीन व ऑईल इंजीन, अर्जदारास विक्री केलेले, साहित्य/मशीन हे त्यांनी कोणाकडून घेतली किंवा आणले हे दाखविण्याची जबाबदारी गै.अ.क्र.1 ची आहे. परंतू, सरळ-सरळ मोघमपणे कथन केले आहे. वास्तविक, गै.अ.क्र.2 यांनी नि.19 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात गै.अ.क्र.1 हा त्याचा डिलर नाही, तसेच त्याचेशी कोणताही व्यवहारीक संबंध नाही. भारत इंजीन मॅन्युफ्क्चरर ओरिएंट लिस्टर 10 एच.पी. इंजीन क्र.1146 व 1147 या क्रमांकाचे डिझेल इंजीन मे.इंडिया मशीनरी स्टोअर्स, पोसीना (गुजरात) यांना विक्री केल्याचे मान्य केले आहे. याबाबत, गै.अ.क्र.2 ने श्री उमिया रोडवेजची पावती नि.20 वर, तसेच टॅक्स इनवॉईस नि.20 ब-1 वर दाखल केलेली आहे. सदर टॅक्स इनवॉईस गै.अ.क्र.1 चे नावाने नाही. यावरुन, गै.अ.क्र.1 यांनी गै.अ.क्र.2 कडून इंजीन ऑईल खरेदी न करता, त्याचे नावानी बनावटी डिझेल इंजीन विक्री केल्याचाच निष्कर्ष निघतो. वास्तविक, गै.अ.क्र.2 कडूनच घेतल्याचे सिध्द करण्याची जबाबदारी गै.अ.क्र.1 ची आहे. अर्जदाराने, गै.अ.क्र.2 ला नोटीस पाठविला असता, त्याने आपले वकीला मार्फत पाठविलेल्या उत्तरात कागदपञ पुरविल्याची मागणी केली. गै.अ.क्र.2 यांनी अर्जदारास सेवा देण्यात न्युनता केलेली नाही, तर उलट गै.अ.क्र.1 ने त्याचा नावाचा दुरुपयोग केला. गै.अ.क्र.1 नी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1) (आर) नुसार अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब करुन सेवेत न्युनता केली असे या न्यायमंचाचे ठाम मत आहे. गै.अ.क्र.2 ला उत्पादक म्हणून जोडून त्याचा गैरफायदा घेवून, निर्माता असल्याचे स्टीकर लावलेला इंजीन दिले. त्यामुळे, उत्पादक या नात्याने अर्जदाराने आवश्यक पक्ष म्हणून केले असल्याने विनाकारण त्यास खर्चात पडावे लागले. गै.अ.क्र.1 नी गै.अ.क्र.2 शी व्यवसायीक संबंध असल्याचे ठामपणे सांगीतले नाही, तसेच त्याचा डिलर असल्याचाही ठोसपणे सांगीतले नाही. गै.अ.क्र.1 नी ही बाब लेखी बयानातही गै.अ.क्र.2 कडूनच ऑईल इंजीन घेतल्याबाबतचा बिल दाखल केलेला नाही. अश्या परिस्थितीत, अनावश्यकपणे गै.अ.क्र.2 ला खर्चात पडावे लागल्यामुळे त्याच्या खर्चाची नुकसान भरपाई करुन देण्यास गै.अ.क्र.1 जबाबदार आहे. तसेच, अवलंबलेल्या अनुचीत व्यापार पध्दतीमुळे आणि दिलेल्या न्युनतापूर्ण सेवेमुळे अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे. तसेच, डिझेल ऑईल इंजीन दुरुस्ती करीता लागलेल्या पार्टसचे खर्चाची रक्कम रुपये 6000/- देण्यास जबाबदार आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आलेले आहे. 18. अर्जदाराने तक्रारीतील प्रार्थना क्र.1 मध्ये अशी मागणी केलेली आहे की, खराब झालेली आटा चक्कीची मशीन त्वरीत बदलवून द्यावी. परंतू, आटा मशीन मध्ये खराब असल्याचे अर्जदार सिध्द करु शकला नाही. परंतू, इंजीन ऑईलमध्ये बिघाड येवून दुरुस्त केल्याची बाब दाखल दस्तऐवजावरुन सिध्द केल्यामुळे, तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने मुद्दा क्र.1 चे उत्तर विवेचनानुसार व मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र. 3 :- 19. वरील मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचने वरुन, तक्रार अंशतः मंजूर करुन, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास डिझेल ऑईल इंजीन दुरुस्तीचा खर्च रुपये 6000/-, तसेच झालेल्या मानसिक, शारीरीक ञासापोटी आणि व्यवसायाच्या नुकसानीपोटी रुपये 15,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे. (2) गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारास तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे. (3) गैरअर्जदार क्र.2 चा खर्च रुपये 1000/- गैरअर्जदार क्र.1 ने द्यावे. (4) गैरअर्जदार क्र.2 विरुध्द तक्रार खारीज. (5) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |