::: न्यायनिर्णय :::
मंचाचे निर्णयान्वये, मा. अध्यक्ष उमेश वि.जावळीकर
१. गैरअर्जदार यांनी वार्षिक वर्गणी भरून देखील कराराप्रमाणे मासिक अंक वेळेत अर्जदाराला न पाठविल्याने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार हे चंद्रपूरचे कायमचे रहिवासी असून वैद्यकीय व्यवसाय करतात. गैरअर्जदार हे प्रकाशन कंपनी असून गैरअर्जदार काढीत असलेले केशव प्रकाश मासिकाचे ते संपादक आहेत. अर्जदार हे मासिक चालू झाल्यापासून त्याचे वाचक असल्यामुळे गैरअर्जदारचे ग्राहक आहेत. अर्जदाराची वार्षिक वर्गणी संपली असल्याने अर्जदारांनी दि.१३.०६.२०१६ रोजी गैरअर्जदारांना रक्कम रु. १८० ची मनीऑर्डर पाठविली. सदर रक्कम गैरअर्जदारांना मिळाली असून त्याबद्दलची पोचपावती तक्रारीत दाखल आहे. तरीसुद्धा अर्जदाराला गैरअर्जदाराने मासिक अंक वेळेत न पाठविल्यामुळे अर्जदाराने दि.१२.१२.२०१७ रोजी पंजीबद्ध डाकेने गैरअर्जदाराला नोटीस पाठविली. सदर नोटीस घेण्यास नकार दिल्यामुळे नोटीस अर्जदाराला परत आली. सबब, गैरअर्जदाराने मासिकाची वार्षिक वर्गणी रक्कम स्विकारूनही अर्जदाराला कराराप्रमाणे मासिक अंक न पाठवून अर्जदाराप्रती सेवेत न्यूनता दिली असून त्यामुळे अर्जदारास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी गैरअर्जदार अर्जदारास नुकसानभरपाई अदा करण्यास पात्र असून गैरअर्जदाराने रक्कम रु. १०,०००/- नुकसानभरपाई रक्कम अर्ज दाखल केल्यापासून तक्रार निकाली निघेपर्यंत १८% व्याजासह तसेच तक्रार दाखल करण्याकरिता आलेला खर्च रु. ४८०/- अर्जदारास द्यावा, अशी विनंती अर्जदाराने केली आहे.
३. अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदार यांना ईमेल द्वारे नोटीस पाठविण्यात आली. ईमेल द्वारे नोटीस प्राप्त होऊन सुद्धा गैरअर्जदार मंचात उपस्थित न झाल्यामुळे गैरअर्जदार विरुद्ध तक्रार एकतर्फा चालविण्याचे आदेश पारित करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
४. अर्जदारांची तक्रार, दस्ताऐवज, शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवादावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
अर्जदार सिद्ध करतात काय ? होय
२. गैरअर्जदार अर्जदारास नुकसानभरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशतः मान्य
कारणमीमांसा
मुद्दा क्र. १ व २ बाबत -
५. अर्जदार हे, गैरअर्जदार नियमितपणे प्रकाशित करीत असलेल्या ‘केशव प्रकाश’ मासिकाचे वाचक आहेत. अर्जदार यांची सदर मासिकाची वार्षिक वर्गणी संपल्यामुळे त्यांनी दि. १३.०६.२०१६ रोजी रु. १८०/- ची मनीऑर्डर गैरअर्जदार यांना पाठवली असून सदर मनीऑर्डर गैरअर्जदार यांना दि. २०.०६.२०१६ रोजी प्राप्त झाली. त्याबद्दल अर्जदाराने दस्त दाखल केले असून त्यावर मनीऑर्डर प्राप्त झाल्याबाबत गैरअर्जदाराची सही आहे. मासिकासाठी रक्कम प्राप्त होऊनसुद्धा गैरअर्जदराने कराराप्रमाणे मासिके अर्जदाराला वेळेत पाठविले नाहीत, हि बाब दस्तावेजावरून सिद्ध होते. मंचातर्फे गैरअर्जदाराला नोटीस प्राप्त होऊनसुद्धा गैरअर्जदार यांनी तक्रारीतील अर्जदाराचे म्हणणे खोडून काढलेले नाही. सबब, गैरअर्जदाराविरुद्ध एकतर्फा प्रकरण चालविण्याचे आदेश पारित करण्यात आले. दरम्यान दि. १६.०२.२०१८ रोजी प्रकरण प्रलंबित असताना गैरअर्जदारांनी अर्जदाराला काही मासिकाचे अंक पाठविले. परंतु सदर अंक हे अर्जदाराने पाठविलेल्या वार्षिक वर्गणी प्रमाणे संपूर्ण न पाठवल्याची बाब दस्तावेज पडताळणीवरून सिद्ध होते. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे वार्षिक वर्गणी पाठविल्यानंतर, गैरअर्जदार यांनी विहित कालावधी मध्ये, अर्जदाराच्या मागणीप्रमाणे, मासिक अंक न पाठवून, अर्जदारास कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यास कसूर केल्याची बाब सिद्ध होत असल्यामुळे, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे कडून नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहेत, असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर होकरार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र. ३ बाबत :-
६. मुद्दा क्र. १ ते २ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- ग्राहक तक्रार क्र. १२/२०१८ अंशत: मान्य करण्यात येते.
२. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक, शारीरिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. ५०००/- या आदेश प्राप्ती दिनाकापासून ३० दिवसात अदा करावे.
३. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
कल्पना जांगडे(कुटे) किर्ती वैद्य (गाडगीळ) उमेश वि. जावळीकर
सदस्या सदस्या अध्यक्ष