( पारीत दिनांक : 20/03/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्त्यास चारचाकी वाहन घ्यावयाचे असल्याने, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडे चौकशी केली असता, त्यांनी तक्रारकर्त्यास शोअरेलेट या कंपनीची इन्जॉय एलटीझेड 1.3 किंमत रु. 9,48,620/- चे कोटेशन दिले. तक्रारकर्त्यास सदर वाहनावर 85 फायनान्स पाहीजे असल्याचे विरुध्दपक्ष क्र. 1 ला तक्रारकर्त्याने सांगितले व विरुध्दपक्षाने फायनान्सर पाठवितो व रु. 6,80,000/- फायनान्स करुन, 5 वर्षाकरिता 14,613/- प्रमाणे दरमहा किस्त द्यावी लागेल व रु. 2,88,673/- डाऊन पेमेंट द्यावे लागेल, असे सागितले. त्यापैकी तक्रारकर्त्याने रु. 2,25,000/- चेकद्वारे दिले. तसेच दि. 25/5/2013 रोजी रु. 25,000/- चेकद्वारे दिले. दि. 06/09/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 चे प्रतिनिधी तक्रारकर्त्याकडे आले व त्यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन घेऊन तक्रारकर्त्याच्या करारनाम्यावर सह्या घेतल्या तसेच 5 कोरे धनादेश घेतले. तक्रारकर्त्याने दि. 7/9/2013 रोजी गाडीची अनामत रक्कम भरण्यासाठी त्याचे खाते असलेल्या बँकेत रक्कम उचलण्याकरिता धनादेश सादर केला असता, त्यांचे खात्यात रु. 10,000/- शिल्लक असल्याचे सांगण्यात आले व विरुध्दपक्ष क्र. 2 चे प्रतिनिधी श्री. विनोद पाटील यांनी अनामत धनोदश क्र. 065357 ते 065361 मधील धनादेश क्र. 065358 नुसार रु. 2,25,000/- उचललेले असल्याचे सांगण्यात आले. तक्रारकर्त्याचे बँक खात्यातून रु. 2,25,000/- विरुध्दपक्ष क्र. 1 मॅनेजर स्टार मोटर्स अकोला यांनी घेतल्यानंतर तक्रारकर्त्याने सदर वाहन मिळण्याबाबत विरुध्दपक्ष यांचेसोबत दुरध्वनीद्वारे व प्रत्यक्ष भेटून चौकशी केल्यानंतरही विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास उडवाउडवीची उत्तरे दिली व वाहन न देऊन फसवणुक केली. तक्रारकर्त्याने या घटनेचा रिपोर्ट दि. 6/9/2013 रोजी पोलीस स्टेशनला दिला असून त्यांचेवर अपराध क्र. 165/13 कलम 420 + 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. विरुध्दपक्षाचे सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्त्यास मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास झाला व म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, विरुध्दपक्षाकडून रु. 2,25,000/- एवढी रक्कम व मानसिक शारीरिक त्रासापोटी रु. 1,00,000/- तसेच रु. 50,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रु. 10,000/- देण्याचे आदेश व्हावे, तसेच वाहन देण्याचे आदेश व्हावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 10 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष 1 व 3 यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी आपला लेखीजवाब, शपथेवर दाखल केला त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन असे नमुद केले आहे की,…
तक्रारकर्त्याने सदर वाहन हे आगाऊ राखून ठेवले व त्या करिता त्यांनी दि. 25/05/2013 चा धनादेश रु. 25,000/- दिला व त्यास त्याची पावती दिली. वाहनास आर्थिक पुरवठा करण्याकरिता तक्रारकर्त्यास रु. 2,88,673/- आगाऊ रक्कम विरुध्दपक्षाकडे जमा करणे आवश्यक हाते. तक्रारकर्त्याने अकोला नागरी बँकवर काढलेला धनादेश क्र. 65351 रक्कम रु. 2,00,000/- दिला, परतु सदर धनादेश कोरा होता व हा धनादेश तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 यास दिला. विरुध्दपक्ष क्र.1 व 3 यांचा विरुध्दपक्ष क्र. 2 शी कोणताही संबंध नाही. वर नमुद केलेली रक्कम विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी उचललेली असल्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 चा त्याच्याशी संबंध येत नाही. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी धनादेश क्र. 065351 रु. 2,25,000/- विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांना दाखविला होता व त्या करिता विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी दि. 27/08/2013 रोजी पावती निर्गमित केली. तथापी सदर धनादेश वटवल्या गेला कारण तो अकाऊंट पेयी नव्हता तर तो कोरा धनादेश होता व धनादेश विरुध्दपक्ष क्र. 2 ला सुपुर्द करण्यात आला व अतिरक्त धनादेश तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 च्या नावे दि. 6/9/2013 रोजी धनादेश क्र. 065358 निर्गमित केला. विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी रक्कम रु. 25,000/- दि. 14/03/2014 रोजी परत केली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांचे विरुध्द जे आरोप केलेले आहे ते अमान्य करुन विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी सदर लेखी जवाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला आहे.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी मुदतीत लेखी जवाब दाखल न केल्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द लेखी जवाबाशिवाय पुढे चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
3. त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे प्रतिउत्तर दाखल करण्यात आले व तोंडी युक्तीवाद करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांचा लेखी जवाब, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर, तक्रारकर्ते यांचा तोंडी युक्तीवाद व विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांची युक्तीवादाबद्दलची पुरसीस यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून पारित केला तो येणे प्रमाणे
तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांच्या कडून शोअरेलेट या कंपनीची इनजॉय एलटीझेड 1.3 मॉडेल गाडी घेण्याचे ठरविले व तसे कोटेशन रु. 9,48,620/- या रकमेचे प्राप्त करुन घेतले. ही गाडी घेण्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून फायनान्स रु. 6,80,000/- ची व्यवस्था करुन देण्याचे कबुल केले. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 यांना दि. 25/5/2013 रोजी रु. 25,000/- चा धनादेश दिला होता व तशी पावती घेतली होती. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी फायनान्सची व्यवस्था झाल्याचे दि. 27/8/2013 रोजी सांगितले, म्हणून तक्रारकर्ते यांनी अकोला अर्बन बँकेच्या खात्याचा धनादेश क्र. 65351 रु. 2,00,000/- चा पार्टपेमेंट म्हणून दिला. दि. 6/9/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्याचे घरी येवून, त्यांनी तक्रारकर्त्याकडून फायनान्स देणेसाठीचा करारनामा करुन घेतला व आवश्यक ते दस्तऐवज तसेच अकोला अर्बन बँकेचे शाखा गौरक्षण चे 5 कोरे धनादेश स्वाक्षरी करुन घेवून, तक्रारकर्त्याकडून घेवून गेले. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी राष्ट्रीय बँन्केचे धनादेश देण्याचे तक्रारकर्त्याला सांगितले व तो पर्यंत अर्बन बँकेचे धनादेश ते त्यांच्या जवळ ठेवतील, असे सुध्दा सांगितले. तक्रारकर्ते दि. 7/9/2013 रोजी बॅकेत गेले असता, त्यांना असे कळाले की, विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याने दिलेल्या अनामत धनादेश क्र. 065357 ते 065361 मधील धनादेश क्र. 065358 नुसार रु. 2,25,000/- उचललेले आहेत. ही रक्कम घेतल्यानंतर देखील विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी गाडी देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी अधिक चौकशी केली असता त्यांची विरुध्दपक्षाकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले, म्हणून त्यांनी पोलिस स्टेशन खदान येथे विरुध्दपक्षाविरुध्द रिपोर्ट देवून, नंतर ही तक्रार मंचात दाखल केली.
या प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी मुदतीत लेखी जवाब दाखल केला नाही, त्यामुळे प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 2 चे विरुध्द लेखी जवाबाशिवाय पुढे चालविण्यात येईल, असे आदेश मंचाने पारीत केले आहेत.
तक्रारकर्त्याच्या या युक्तीवादावर विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी पुरसीस देवून, त्यांचा लेखी जवाब हाच युक्तीवाद समजावा असे मंचाला कळविले. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांच्या लेखी जवाबातील काही मुद्दे मंचाने तक्रारकर्त्याच्या युक्तीवादानुसार तपासले ते असे की, “ नमुद करण्यात येते की, सदर वाहन हे तक्रारदाराने आगावू राखून ठेवले व त्या करिता त्यांनी दि. 25/5/2013 चा धनादेश रु. 25,000/- दिला व त्यास त्याची पावती दिली, सदर पावती प्रस्तुत विरुध्दपक्षाने त्याला धनादेशाच्या बदल्यात दिली, तथापी सदर वाहनास रु. 2,88,673/- ही रक्कम तक्रारकर्त्यास अजुन भरणे होती, म्हणून तक्रारकर्त्याने नागरी बँकवर काढलेला धनादेश क्र. 65351 रु. 2,00,000/- चा धनादेश ( कोरा ) विरुध्दपक्ष क्र. 2 यास दिला. विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांचे विरुध्दपक्ष क्र. 2 शी कोणत्याही प्रकारचे संबंध नाहीत. प्रस्तुत विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी वर नमुद रक्कम रु. 2,25,000/- उपयोगात आणली व त्याचा वापर केला.” पुढे असे नमुद करण्यात येते की, “विरुध्दपक्ष क्र. 2 यानी धनादेश क्र. 065351 रु. 2,25,000/- चा विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांना दाखविला होता, त्या करिता विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी तक्रारकर्त्याला दि. 27/8/2013 रोजीची पावती निर्गमित केली होती, तथापी हा धनादेश विरुध्दपक्ष क्र. 2 ला सुपुर्द करण्यात आला. रक्कम रु. 25,000/- जी तक्रारकर्त्याने आरक्षीत रक्कम म्हणून दिली होती, ती विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी तक्रारकर्त्यास धनादेशाद्वारे परत केलेली आहे ”.
अशा प्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकूण व दाखल दस्तांचे अवलोकन करुन व त्या नंतरचे तक्रारकर्त्याचे प्रतीउत्तर वाचून मंचाचे असे मत झाले आहे की, तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांचेकडील सदर वाहन रु. 25,000/- रक्कम भरुन आरक्षीत केले होते व उर्वरित रकमेपैकी काही रक्कम डाऊन पेमेंट म्हणून तक्रारकर्त्याने भरावयाचे होते व काही रक्कम ही विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी, विरुध्दपक्ष क्र. 2 कडून फायनान्सद्वारे तक्रारकर्त्याला उपलब्ध करुन देण्याचे ठरले होते, असे विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांच्या लेखी जवाबावरुन समजते, म्हणजे विरुध्दपक्ष क्र. 2 ची ओळख ही विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांच्याच माध्यमातुन तक्रारकर्त्याशी झाली होती. तक्रारकर्ते हे अशा रितीने विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 चे ग्राहक आहे. तक्रारकर्ते यांनी रेकार्डवर दाखल केलेल्या दस्तात दोन पावत्या ह्या विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी तक्रारकर्त्याला दिलेल्या आहेत. एक पावती दि. 22/5/2013 ची असून ती रु. 25,000/- इतकी रक्कम तक्रारकर्त्याकडून त्यांना प्राप्त झाल्याची आहे. त्या बद्दलची कबुली विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात दिली आहे. तसेच ती रक्कम त्यांनी तक्रारकर्त्याला पुन्हा परत केली, असे विधान केले आहे व ते तक्रारकर्त्याने देखील मान्य केले आहे. दुसरी पावती ही दि. 27/8/2013 ची विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी तक्रारकर्त्याला रु. 2,00,000/- चेक क्र. 065351 द्वारे तक्रारकर्त्याकडून त्यांना मिळाल्याची दिली आहे व ह्या पावतीबद्दल विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 चे कथन असे आहे की, ही रक्कम तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 ला या चेकनंबरद्वारे दिली होती. ही बाब विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी सिध्द केली नाही, परंतु ह्या बद्दल तक्रारकर्त्याची प्रतीउत्तरात अशी कबुली आहे की, तक्रारकर्त्याने क्र. 065351 चा चेक विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 कडून वापस घेतला होता व दुसरा 065358 क्रमांकाचा चेक विरुध्दपक्षालाच दिला होता. त्या चेकची झेरॉक्स प्रत रेकॉर्डवर दाखल आहे, व तक्रारकर्त्याची ही रक्कम विरुध्दपक्ष क्र.2 यांनी उपयोगात आणली व वापरली, असे त्यांच्या लेखी जबाबात देखील नमुद आहे. म्हणजे तक्रारकर्त्याने हे सिध्द केले आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी तक्रारकर्त्याची गाडी आरक्षीत रक्कम रु. 25,000/- ही तक्रारकर्त्याला वापस केली, परंतु गाडीच्या नावाने रु. 2,25,000/- इतकी रक्कम विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याकडून घेवून त्याची फसवणूक केली आहे. त्यामुळे ही त्यांच्या सेवेतील न्युनता आहे. सबब तक्रारकर्ते रु. 2,25,000/- ही रक्कम विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांच्याकडून सव्याज मिळण्यास पात्र आहे, तसेच या व्यवहारात झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास देखील पात्र ठरले आहे, असे मंचाचे मत आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे….
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे
- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी संयुक्तपणे किवा वेगवेगळेपणे तक्रारकर्त्यास सदर गाडीच्या व्यवहारात घेतलेली रक्कम रु. 2,25,000/- ( रुपये दोन लाख पंचविस हजार फक्त ) द.सा.द.शे. 8 टक्के व्याज दराने दि. 27/3/2014 ( प्रकरण दाखल तारीख ) पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदाई पर्यंत व्याजासह द्यावी
- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी संयुक्तपणे किंवा वेगवेगळेपणे तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई व प्रकरणाचा खर्च मिळून एकत्रित रक्कम रु. 10,000/- ( रुपये दहा हजार फक्त ) द्यावी.
- उपरोक्त आदेशाचे पालन विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आंत करावे.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.