नि.28 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 8/2011 नोंदणी तारीख - 17/1/2011 निकाल तारीख - 11/5/2011 निकाल कालावधी - 114 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री विश्वास विनायक फडके रा. श्री मंगेश-2 अपार्टमेंट, फलॅट नं.एस-2, प्लॉट नं.3, 4 स.नं. 331अ/ब, करंजे तर्फ सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री विजय शेट्टी) विरुध्द मे. सुविधा कन्स्ट्रक्शन तर्फे श्री रविंद्र विष्णू राऊत रा. मुक्ता, सि.स.नं. 441सी, मंगळवार पेठ, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री एच.एस.शिंदे) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांना स्वतःचे मालकीचा फलॅट घ्यावयाचा होता. जाबदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. जाबदार यांनी मंगेश-2 या संकुलाची उभारणी करंजे तर्फ सातारा येथे केली आहे. त्यातील एस-2 हा फलॅट जाबदार यांनी अर्जदार यांना खूषखरेदी दिला आहे. त्यानुसार जाबदार यांनी अर्जदार यांना साठेखत करुन दिले व फलॅटचा ताबा दिला. तसेच अर्जदार यांनी जाबदार यांना ठरलेली रक्कम अदा केली आहे. तसेच जादा सुविधेपोटी होणारी रक्कमही अर्जदार यांनी अदा केली आहे. सदनिकेचा ताबा मिळालेनंतर सदनिकेमधील अनेक त्रुटी समोर आल्या. सदनिकेमध्ये गळतीची समस्या दिसून आली. त्यामुळे सदनिकेच्या भिंती व रंग खराब झाला. म्हणून अर्जदार यांनी तज्ञ इंजिनिअर श्री उमेश भोसले यांचेकडून पाहणी करुन त्यांचा अहवाल घेतला आहे. त्रुटींचा सविस्तर तपशील तक्रारअर्जामध्ये अर्जदार यांनी नमूद केला आहे. सदरच्या त्रुटी दूर करुन द्याव्यात म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली परंतु जाबदार यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. सबब त्रुटी दूर करण्यासाठी होणा-या खर्चापोटी रु.2,63,050/- मिळावी, तसेच मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार यांनी नि. 11 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार अर्जदारने बांधकाम चालू बसताना सर्व सुविधा समाधानकारक असल्याचे सांगितले होते व तसे ताबापत्रात लिहूनही दिले आहे. जाबदार यांनी बांधकाम तज्ञाचे देखरेखीखाली बांधकाम पूर्ण केले आहे. स्लॅब् व बीमचे कास्टींग एकाच वेळी केले आहे त्यामुळे त्यात पाणी झिरपण्याचा प्रश्नच नाही. तसेच स्लॅबला वॉटरप्रूफिंग केले आहे. अर्जदार यांनी त्यांचे बाल्कनीमध्ये अनाधिकाराने पत्रयाचे शेड घातले ते घालताना भिंतीला मोठे खिळे ठोकले आहेत, त्यामुळे भिंतीस भेगा पडल्या. तसेच अर्जदारने हॉलला लागून असलेली बाल्कनी व मास्टर बेडरुम/हॉलच्या क्षेत्रात कव्हर केली, त्यामुळे पावसाचे पाणी आत येईल याची जाणीव जाबदार यांनी करुन दिली होती परंतु अर्जदारने त्याकडे दुर्लक्ष केले. खिडकीसुध्दा अर्जदारने मूळ प्लॅनमध्ये बदल करुन बसवून घेतली. अर्जदाराने पत्र पाठवि लेनंतर जाबदारने वॉटर प्रूफिंगचे काम केले आहे. श्री उमेश भोसले यांची भेट जाबदारचे अपरोक्ष झाली आहे. दुरुस्तीचे खर्चाचे इस्टीमेट जाबदार यांना मान्य नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. अर्जदार व जाबदारतर्फे युक्तिवाद ऐकणेत आला तसेच दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 4. अर्जदारची तक्रार पाहता जाबदार बांधकाम व्यावसायिक असून जाबदार कडून अर्जदारकडे करंजे तर्फ सातारा येथे बांधलेल्या मंगेश-2 या संकुलातील फलॅट क्र. एस-2 खेत्र 91.07 चौ.मी. खरेदी केला आहे. परंतु फलॅटचे बांधकामामध्ये अनेक त्रुटी आहेत. सबब त्या त्रुटी दूर करुन देणेचा आदेश व्हावा अथवा सर्व कामाचे खर्चाची रक्कम रु.2,63,050/- ही देववावी. तसेच मानसिक त्रासापोटी व तक्रारीचे खर्चासाठी रक्कम मिळावी अशी तक्रार दिसते. 5. जाबदार यांनी नि. 11 कडे म्हणणे तसेच नि.12 कडे शपथपत्र देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. 6. तक्रारअर्जातील कथन तसेच दाखल कागदपत्रे पाहता निर्विवाद गोष्ट अशी आहे की, अर्जदार व जाबदार मध्ये सेवा करार झालेला नाही. बांधून तयार असलेल्या फलॅटचे दि.9/4/2009 रोजी साठेखत केले आहे व लगेच 5 महिन्यात दि.19/9/2009 रोजी अर्जदारने फलॅटचा ताबा घेतला आहे. तथापि एका वर्षातच फलॅटमध्ये किचन, डायनिंग हॉल, बेडरुम, मास्टर बेडरुम हॉल या सर्वच ठिकाणी गळतीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे असे अर्जदारचे कथन आहे. सदर कथनाचे पृष्ठयर्थ अर्जदारने नि.5/4 कडे उमेश भोसले यांचा अहवाल दाखल केला आहे. 7. जाबदारने उमेश भोसले यांचा अहवाल नाकारला आहे. तसेच नि.24 कडे मंगेश-2 या इमारतीचे फोटोग्राफस तसेच नि.18/1 कडे अविनाश काळी, सरकारमान्य व्हॅल्युअर यांचे शपथपत्र असून त्यामध्ये इमारतीसाठी वापरलेल्या साहित्याचा दर्जा उत्तम प्रतिचा आहे असे नमूद आहे. तसेच नि.18/2 कडे मयुर गांधी आर्किटेक्ट यांचे शपथपत्र असून त्यामध्येही त्यांनी इमारतीसाठी वापरलेल्या साहित्याचा दर्जा उत्तम प्रतिचा आहे असे कथन केले आहे. जाबदारचे कैफियतीमधील पुढील कथन पाहता अर्जदारचे गळतीबाबतचे पत्र दि.22/8/2010 चे मिळाले नंतर जाबदारने मे. जवळे वॉटर प्रुफींग कंपनी यांचेकडून वॉटर प्रूफिंगचे काम करुन दिले आहे. निर्विवादीतपणे अर्जदारही काम करुन दिलेचे मान्य करतात. परंतु जावळे यांची पावती तसेच रक्कम नाकारत आहेत. निर्विवादीतपणे जाबदारने नि.24 सोबत दाखल केलेले फोटोग्राफस वरुन स्लॅबवरती वॉटर प्रुफिंग केलेचे दिसते. तसेच फोटो क्र.12 वरुन पश्चिम बाजूवर केमिकल ट्रीटमेंट केलेचे दिसते. तसेच फोटो क्र. 9, 10, 11 वरुन खिडकी व भिंत यांमध्ये फट आहे असे दिसत नाही. निर्विवादीतपणे उमेश भोसले यांचे अहवालातीलच फोटोग्राफसवरुन गळतीच्या खूणा दिसून येत आहेत. तथापि जाबदारचे विधित्याने युक्तिवादामध्ये तसेच कैफियत पान नं.6 वरती जाबदार पुन्हा एकवेळ तक्रारी दूर करुन देणेची जबाबदारी पत्करत आहेत असे कथन करतात. 8. निर्विवादीतपणे अर्जदारने नमूद केलेल्या त्रुटी म्हणजे पाणी झिरपणे, भेगा पडणे, बुरशे येणे, रंग फिका होणे या सर्व बाबी गळतीमुळेच होत आहेत. सबब गळती बंद केलेस म्हणजे वॉटर प्रुफिंग केलेस सर्व तक्रारी दूर होणार आहेत असे मंचास वाटते. सबब केवळ वॉटर प्रुफिंगचा विचार करता अर्जदारचे दाखल केलेल्या उमेश भोसले यांचे अहवालानुसार वॉटर प्रुफ्रिंगसाठी अंदाजे रु.53,500/- एवढा खर्च येणार आहे. तसेच जाबदारने अर्जदारचे गळतीबाबतचे पत्र मिळाल्यानंतर केलेल्या वॉटर प्रुफिंगसाठी खर्च रु. 18,600/- एवढा झाला आहे असे पावतीवरुन दिसते. परंतु अर्जदार जाबदारची रक्कम नाकारत आहेत व जाबदार अर्जदारची इस्टीमेटची रक्कम नाकारत आहे. सबब मे. मंच खर्चाची रक्कम रक्कम रु.20,000/- (वीस हजार) ग्राहय धरत आहे व अर्जदार सदोष सेवेपोटी जाबदारकडुन रु.20,000/- (वीस हजार) मिळणेस पात्र आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 9. अर्जदारचे तक्रारअर्जात असेही कथन आहे की, बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे परंतु इमारतीमधील इतर कोणाचीही तशी तक्रार नाही हे स्पष्ट आहे. सबब केवळ अर्जदार म्हणतात म्हणून बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे असे ग्राहय धरणे योग्य होणार नाही. 10. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदारने अर्जदार यास रक्कम रु.20,000/- (वीस हजार) द्यावेत. 3. जाबदारने अर्जदार यास मानसिक त्रास व खर्चासाठी रक्कम रु.5,000/- (पाच हजार) द्यावेत. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 11/5/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |