सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.34/2010
तक्रार दाखल झाल्याचा दि. 25/03/2010
तक्रार निकाल झाल्याचा दि. 30/08/2010
श्री जगन्नाथ देवदत्त नाडकर्णी
रा.मु.पो.लक्ष्मी निवास,
जिजामाता चौक, ता.कुडाळ,
जिल्हा सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) सेल्स मॅनेजर,
सहयाद्री ऑटोमोटीव्ह प्रा.लि.
शिरोली, जि. कोल्हापूर.
2) चेअरमन व मॅनेजींग डायरेक्टर,
फोर्स मोटर्स लिमिटेड,
पुणे-मुंबई रोड,
आकुर्डी, पुणे – 35. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फे - विधिज्ञ श्री व्ही.व्ही. मडव
विरुद्ध पक्ष क्र.1 तर्फे - विधिज्ञ श्री एन.पी. गांधी
विरुद्ध पक्ष क्र.2 तर्फे – व्यक्तीशः
(मंचाच्या निर्णयाद्वारे श्री महेंद्र म. गोस्वामी, अध्यक्ष)
निकालपत्र
(दि.30/08/2010)
1) विरुध्द पक्षाकडून तक्रारदाराने खरेदी केलेली वाहने तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त झाल्यामुळे दोन्ही वाहनांची किंमत व्याजासह आपणांस परत मिळावी व नुकसान भरपाई मिळावी यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तक्रारदारांचा आईस्क्रीम, दूध व मिनरल वॉटर विक्रीचा व्यवसाय आहे. सदरचा व्यवसाय हा त्यांच्या उपजिविकेचे साधन असून माल नाशवंत स्वरुपाचा असल्यामुळे मालाची ने-आण करणेकरीता तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून विरुध्द पक्ष क्र.2 यांनी निर्मित केलेल्या M-4 Force या मॉडेलच्या दोन गाडया दिनांक 14/11/2007 रोजी खरेदी केल्या. या दोन्ही वाहनांपैकी चेस क्र.T 19002282 J 07, इंजिन नं.D 30002339 या क्रमांकाचे वाहन सिंधुदुर्ग जिल्हा आर.टी.ओ. कार्यालयाकडे नोंदणीकृत केले असून त्याचा रजिस्ट्रेशन क्रमांक MH07 – 5186 आहे. तर चेस नं. T19002292 J 07 इंजिन नं.D 30002502 हे वाहन खरेदी नंतर वारंवार बंद पडत असल्याने विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडे जमा केले असून त्याचे रजिस्ट्रेशन करण्यात आले नाही.
2) सदरच्या दोन्ही गाडया खरेदी केल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदारांना या दोन्ही गाडया घरपोच आणून दिल्या होत्या. सदरच्या गाडयांचा वापर आपल्या व्यवसायात मालाची ने-आण करण्यासाठी सुरु केल्यावर या वाहनात तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. कंपनीने सांगीतलेल्या मायलेजपेक्षा कमी मायलेज सदर गाडया देत असून इंधनावर जास्त खर्च होतो. त्याचप्रमाणे सदरच्या गाडया, मालाची वाहतूक करतांना रस्त्यातच बंद पडत होत्या. याबाबत विरुध्द पक्ष क्र.1 यांना कळविले असता, त्यांचे अधिकृत एंजट कशाळीकर गॅरेज, सावंतवाडी यांचेकडून दुरुस्ती करुन घेणेबाबत तक्रारदारास सांगणेत आले. त्यानुसार तक्रारदाराने कशाळीकर गॅरेजकडे गाडया दुरुस्तीसाठी पाठविल्या. या दरम्यान गाडया त्यांचेकडे बंद स्थितीत राहिल्याने तक्रारदारांना योग्य वेळेत आपले गि-हाईकांना माल पुरवणे शक्य झाले नाही व माल खराब होऊन फार मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच गि-हाईक कमी होऊन बाजारातील पत कमी झाली त्यामुळे मानसिक त्रासही झाला. त्यामुळे तक्रारदाराने त्रस्त होऊन चेस नं. T 19002292 J 07 इंजिन नं. D30002502 हे वाहन विरुध्द पक्ष क्र.1 ला परत केले व दुसरे वाहन चेस क्र.T 19002282 J 07, इंजिन नं.D 30002339 MH07 – 5186 तांत्रिक बिघाडामुळे गाडी परत घेऊन पैसे परत देण्यासाठी पत्र पाठविले. या पत्राला विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दि.11/8/2008 रोजी उत्तर पाठवून कोणताही तांत्रिक बिघाड असल्यास विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडे संपर्क साधणेची सूचना केली. त्यामुळे तक्रारदाराने दि.18/8/2008 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांना पत्रव्यवहार करुन गाडी परत घेऊन वाहनाची किंमत परत करणेची सूचना केली; परंतु कोणतीही कार्यवाही करणेत आली नाही.
3) सदरच्या दोन्ही गाडया श्रीराम फायनान्स कंपनी यांचेकडून कर्ज काढून खरेदी केल्या आहेत; परंतु वाहनात तांत्रिक दोष होऊन वाहन बंद स्थितीत राहिल्यामुळे व्यवसायात तोटा झाला व त्यामुळे योग्य वेळेत कर्जाच्या हप्त्याची परतफेड करणे अडचणीचे झाले. त्यामुळे कर्जाचा भरणा करु शकले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराने वाहनातील तांत्रिक दोष दूर करुन मिळावेत किंवा वाहनाची किंमत परत करावी अशी नोटीस विरुध्द पक्षाला दि.15/11/2008 रोजी पाठविली; परंतु त्यांनी जबाबदारी नाकारली. त्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्यात आली असून विरुध्द पक्षाकडून खरेदी केलेल्या दोन्ही वाहनांची प्रत्येकी किंमत रु.2,20,000/- असे एकूण रु.4,40,000/-, 12 टक्के व्याजासह वसूल होऊन मिळावेत तसेच व्यवसायात झालेले नुकसान रु.4,00,000/- आपणांस मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने त्याच्या तक्रारीत केली आहे.
4) तक्रारदाराने सदर तक्रारीसोबत नि.3 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार वाहन खरेदीची पावती, विरुध्द पक्षास पाठविलेले नोटीस, विरुध्द पक्षाने नोटीसीस दिलेले उत्तर, तक्रारदाराच्या वाहनाच्या आर.सी. बुकची प्रत इ. कागदपत्रे दाखल केली. सदर तक्रारीचे नोटीस विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना बजावण्यात आले. त्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 हे मंचासमोर हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.6 वर दाखल केले. तसेच मंचाच्या Territorial Jurisdiction बाबत प्राथमिक मुद्दा काढणेसाठीचा अर्ज नि.9 वर दाखल केला. त्याचप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.2 हे मंचासमोर हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.15 वर दाखल केले. तसेच नि.16 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार वाहनाचे सेल सर्टीफिकेट, टॅक्स इन्व्हॉईसची प्रत व वाहनाचे फोटोग्राफ व सर्व्हीस बुकाची प्रत दाखल केली. तसेच नि.19 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार टॅक्स इन्व्हॉईससह वाहनाच्या दुरुस्तीबाबतची जॉबकार्डची कागदपत्रे व केलेला पत्रव्यवहार इ. कागदपत्रे दाखल केली.
5) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यात वाहनाची खरेदी कोल्हापूर येथे केली असल्याकारणाने सिंधुदुर्ग ग्राहक मंचास तक्रार चालवण्याचा अधिकार नाही, त्यामुळे प्राथमिक मुद्दा काढून प्रकरण निकाली करावे अशी विनंती केली. तसेच वादातील वाहनांची दुरुस्ती कशाळीकर गॅरेज सावंतवाडी यांचेकडून दुरुस्त करण्यासंबंधाने कधीही सांगण्यात आले नव्हते व वाहन खरेदी केल्यानंतर गाडयांच्याबाबत वेळोवेळी सेवा दिली आहे, तसेच वाहनामध्ये कोणताही तांत्रिक दोष नसून वेळोवेळी वाहनाची दुरुस्ती करुन देण्यात आल्याचे स्पष्ट करुन तक्रार नामंजूर करणेची विनंती केली. तर दुसरीकडे विरुध्द पक्ष क्र.2 यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यात तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदयातील ग्राहक या व्याखेत बसत नसून त्यांने वाणिज्य हेतूसाठी वाहनाची खरेदी केली असल्यामुळे तक्रार नामंजूर करणेची विनंती केली. तसेच वाहनाची खरेदी कोल्हापूर येथे झाली असल्याकारणाने सिंधुदुर्ग मंचाला Territorial Jurisdiction नाही असा मुद्दा उपस्थित करुन तक्रार नामंजूर करणेची विनंती केली.
6) दरम्यान तक्रारदाराने कशाळीकर गॅरेज, सावंतवाडी यांना विरुध्द पक्ष क्र.3 म्हणून प्रकरणात जोडावे यासाठी नि.21 वर अर्ज दाखल केला. या अर्जावर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी आक्षेप घेतला तर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दाखल केलेल्या नि.9 वरील प्राथमिक मुद्दा काढणेच्या अर्जावर तक्रारदाराने आक्षेप घेऊन त्यांचे म्हणणे नि.14 वर दाखल केले. या अर्जावर उभय पक्षकारांच्या वकीलांचे तोंडी युक्तीवाद ऐकून घेतले तर विरुध्द पक्ष क्र.2 यांनी या अर्जावर लेखी युक्तीवाद नि.22 वर दाखल केले. मंचाने नि.9 व नि.21 वर दि.5/7/2010 ला आदेश पारीत करुन दोन्ही अर्ज फेटाळले. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी नि.31 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार जॉबकार्डच्या मुळ प्रती प्रकरणात दाखल केल्या. सदर प्रकरणात तक्रारदारातर्फे कोणताही शपथपत्रावरील पुरावा देण्यात आला नाही तसेच विरुध्द पक्षातर्फे देखील शपथपत्रावरील पुरावा देण्यात आला नाही. त्यामुळे प्रकरण अंतीम युक्तीवादासाठी घेण्यात आले; परंतु सदर प्रकरणातील तक्रारदाराचे वकीलांचे वडीलांचे निधन झाल्यामुळे तक्रारदाराचे वकील मंचासमोर हजर होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांचेतर्फे मुदतवाढीचे अर्ज दाखल करण्यात आले तर दुसरीकडे विरुध्द पक्ष क्र.1 चे वकील देखील गैरहजर राहिल्यामुळे मुदतीचे अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान प्रकरण युक्तीवादासाठी ठेवले असतांना विरुध्द पक्ष क्र.2 तर्फे त्यांचे लेखी म्हणण्यात बदल करणेसाठी नि.40 वर अर्ज दाखल करण्यात आला. बदलाच्या अर्जातील मागणी Territorial Jurisdiction च्या संबंधाने असल्यामुळे अर्ज रु.1000/- च्या कॉस्टवर मंजूर करणेत आला. त्यानुसार विरुध्द पक्ष क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यात बदल केला.
7) तक्रारदाराचे वकीलांनी नि.43 वर लेखी युक्तीवाद दाखल केला असून त्यांनी व विरुध्द पक्ष क्र.2 यांनी विस्तृत स्वरुपात तोंडी युक्तीवाद देखील केला; परंतु नियोजित पेशीवर विरुध्द पक्ष क्र.1 यांचे वकील गैरहजर असल्यामुळे प्रकरण दि.17/08/2010 ला ठेवण्यात आले; परंतु 17/8/2010 व त्यानंतर 24/8/2010 ला त्यांचे वकील हजर न झाल्यामुळे प्रकरण 27/8/2010 ला अंतीम युक्तीवादासाठी ठेवण्यात आले. दरम्यान विरुध्द पक्ष क्र.1 चे वकील श्री गांधी हे नियोजित तिथीच्या अगोदर दि.26/8/2010 ला मंचासमोर हजर होऊन प्रकरण बोर्डवर घेण्याची विनंती केली व विस्तृत स्वरुपात तोंडी युक्तीवाद केला. त्यानुसार खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | सदरची तक्रार चालविण्याचे Territorial Jurisdiction सिंधुदुर्ग ग्राहक मंचास आहे काय ? | होय |
2 | तक्रारदाराने वाहनांची खरेदी ‘वाणिज्य’ हेतूने केली असल्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयातील ‘ग्राहक’ या व्याखेनुसार विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चे ‘ग्राहक’ होतात काय ? | नाही |
3 | तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय ? | नाही |
-का र ण मि मां सा-
8)मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.2 फोर्स मोटर्स लि. यांनी उत्पादित केलेले वाहन त्यांचे अधिकृत विक्रेते विरुध्द पक्ष क्र.1 सहयाद्री ऑटोमोटीव्ह प्रा.लि. शिरोली, जिल्हा कोल्हापूर यांचेकडून दि.14/11/2007 रोजी खरेदी केले. सदरचे वाहनाची डिलिव्हरी विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदाराचे निवासस्थानी कुडाळ येथे दिली. तसेच तक्रारदाराने खरेदी केलेले वाहन क्र.MH07– 5186 हे सिंधुदुर्ग परिवहन कार्यालयात नोंदणीकृत झाले असल्यामुळे व सदरचे वाहन सिंधुदुर्ग जिल्हयात वापरले जात असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 11 (सी) मध्ये नमूद केल्यानुसार सिंधुदुर्ग ग्राहक मंचाला सदरची तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र आहे. Territorial Jurisdiction च्या संबंधाने विरुध्द पक्षाने आक्षेप घेतला असून कोल्हापूर येथून वाहनाची खरेदी केली असल्यामुळे सिंधुदुर्ग मंचाला Territorial Jurisdiction नाही असा मुद्दा उपस्थित केला आहे; परंतु ज्या जिल्हयात वाहन रजिस्टर्ड करण्यात येते व ज्या जिल्हयात वाहन चालविले जाते त्या जिल्हयातील ग्राहक मंचाला तक्रार चालविण्याचे अधिकार असल्याचा निर्वाळा मा.राज्य आयोग, सिमला यांनी Tata Motors Ltd V/s Chunilal Varma (2009 (4) CPR 392) या प्रकरणात दिला आहे. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.
“Consumer Protection Act, 1986 – Section 11 – Territorial Jurisdiction – Consumer Forum within whose Territorial Jurisdiction the vehicle is registered and plied has got the jurisdiction to try and entertain the complaint”
तसेच मा.राज्य आयोग, हिमाचल प्रदेशने M/s Ashok Leyland Finance Ltd. V/s Pitambar Raj (2009 (4) CPR 177) या प्रकरणात निर्वाळा देतांना ज्या ठिकाणी वाहनाची नोंदणी करण्यात आली व ज्या ठिकाणी वाहन प्रत्यक्ष चालविले जाते, त्या ठिकाणी अर्थात त्या जिल्हयात तक्रार दाखल करता येते असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाने उपस्थित केलेला सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचाचे Territorial Jurisdiction बाबतचा आक्षेप फेटाळण्यात येतो.
9) मुद्दा क्रमांक 2 - तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल करतांना परिच्छेद क्र.1 मध्ये वर्णन केल्यानुसार त्यांचा आईस्क्रिम, दूध व मिनरल वॉटर विक्रीचा व्यवसाय असल्याचे मान्य केले आहे. तसेच त्यांनी मालाची ने-आण करण्याकरीता 2 वाहनांची खरेदी केल्याचे देखील मान्य केले आहे. त्यामुळे तक्रारदाराने वाणिज्य हेतूने वाहनाची खरेदी केली हे स्पष्ट होते. तक्रारदाराने 2 वाहने खरेदी केली असल्यामुळे तो स्वतः दोनपैकी कोणतेही वाहन चालवित नसल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले आहे.त्यामुळे तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 2)(1) (d) मध्ये नमूद ‘ग्राहक’ या व्याखेत मोडत नसून त्यांने ‘वाणिज्य’ कारणासाठी वाहनाची खरेदी केली असल्यामुळे तो ‘ग्राहक’ ठरत नाही.
मा.सर्वोच्च न्यायालयाने Laxmi Engineering V/s P.S.G. Industrial Institute (II) (995) CPJ 1 (Supreme Court) या गाजलेल्या प्रकरणात निर्वाळा देतांना ‘वाणिज्य’ हेतूने वाहनाची खरेदी व वाहनाचा वापर केल्यास तो ग्राहक संरक्षण कायदयानुसार ‘ग्राहक’ ठरत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
10) मुद्दा क्रमांक 3 - निकालपत्रातील परिच्छेद क्र.9 मधील मुद्दा क्र.2 मध्ये विश्लेषण केल्यानुसार तक्रारदाराने वादग्रस्त वाहनांची खरेदी ‘वाणिज्य’ हेतूने केली असल्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायदयानुसार ‘ग्राहक’ ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही सदर प्रकरणाच्या गुणदोषावर कोणताही निर्णय न देता तक्रारदाराने सक्षम दिवाणी न्यायालयात नव्याने तक्रार दाखल करण्याची सूचना करीत आहोत व त्या दृष्टीकोनातून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करुन खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2) तक्रारदाराने सक्षम दिवाणी न्यायालयात नव्याने प्रकरण दाखल करण्याची सूचना करण्यात येते.
3) त्यासाठी मुदतीच्या कायदयाच्या (The Limitation Act) च्या कलम 14 ची मुभा तक्रारदारास देण्यात येते.
4) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 30/08/2010
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-