Maharashtra

Bhandara

CC/16/4

Suresh Bakaram Gahane - Complainant(s)

Versus

Sales Manager, Augusta Motors Pvt. Ltd. Old Name Mahindra Nevi Star Automotive Ltd. - Opp.Party(s)

Adv. A.H. Barsagade

20 Oct 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/16/4
( Date of Filing : 11 Jan 2016 )
 
1. Suresh Bakaram Gahane
R/o. Gandhi Chowk, Jambhora, Tah. Mohadi, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sales Manager, Augusta Motors Pvt. Ltd. Old Name Mahindra Nevi Star Automotive Ltd.
18 K.M. Mile Stone, Near Deshonnati Press, Amravati Road, Gondkhairi, Post. Gondkhairi, Dist. Nagpur
Nagpur
2. Mahindra & Mahindra Financial Serivce Ltd.
Savera, Plot No. L-1, 1st floor, Sai Mandir Road, Bhandara
Bhandara
Maharashtra
3. Shri Haroon Sheikh, R.T.O.Agent
Lakhani, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
4. Pradeshik Parivahan Adhikari, Bhandara
Regional Transport office, Bhandara
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 20 Oct 2018
Final Order / Judgement

:: निकालपत्र ::

 (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष)

 (पारीत दिनांक–20 ऑक्‍टोंबर, 2018)

01.   तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्षां  विरुध्‍द त्‍याने खरेदी केलेल्‍या वाहनाची नोंदणी न झाल्‍याने दोषपूर्ण सेवे संबधाने मंचा समक्ष दाखल केली.

02.   तक्रारीतील थोडक्‍यात आशय पुढील प्रमाणे-

      यातील विरुध्‍दपक्ष क्रं-1) अगस्‍ता मोटर्स प्रा.लिमिटेड वाहन विक्रेता असून, विरुध्‍दपक्ष क्रं-2) महिन्‍द्रा अॅन्‍ड महिन्‍द्रा फॉयनान्शियल सर्व्‍हीस लिमिटेड ही एक वाहनास कर्ज पुरवठा करणारी कंपनी आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 3 हा आर.टी.ओ.चे काम करणारा खाजगी एजंट आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-4 वाहनाची नोंदणी करुन देणारे संबधित प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत.

    तक्रारकर्ता हा जय संतोषी मॉ विद्दालय जांभोरा या शैक्षणिक संस्‍थेत सचिव असून त्‍याने शाळेतील विद्दार्थ्‍यांनां ने-आण करण्‍यासाठी  विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता याचे कडून महिंद्रा टुरिस्‍टर 25 सीटर हे वाहन दिनांक-23.06.2010 रोजी एकूण रुपये-9,02,425/- मध्‍ये विकत घेतले. सदर बसचा इंजिन क्रं-BGA.-4-F-21975 व चेसीस क्रं-MA-1-GF-2-BGDA-3F-15792 असा आहे. वाहन खरेदी करताना त्‍याने रुपये-3,00,000/- नगदी विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याला दिले व उर्वरीत रकमेचे वित्‍तीय सहाय्य विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनी कडून घेतले. तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, सदर वाहन त्‍याचे ताब्‍यात देण्‍यात आले परंतु त्‍याला आर.सी.बुक, खरेदी बिल व इतर दस्‍तऐवज देण्‍यात आले नाही, त्‍यावेळी त्‍याने चौकशी केली असता, विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याने, विरुध्‍दपक्ष क्रं 3 आरटीओ एजंटचे मार्फतीने वाहनाचे आरटीओ कडून पासिंग करुन देण्‍यात येईल असे सांगितले.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की,  ठरलेल्‍या तारखेस विरुध्‍दपक्ष क्रं-4) प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे वाहन पासिंग करीता नेले असता वाहनाच्‍या खिडक्‍यांना जाळया, रेडीयम पट्टया, स्‍टीलचे उभे रॉड आणि अग्‍नीशमन यंत्र लावण्‍यास सुचित केले, त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने स्‍वतः ते साहित्‍य लावण्‍यासाठी एकूण रुपये-27,000/- चा खर्च केला. विरुध्‍दपक्षाने वाहन पासींग करुन देण्‍यासाठी दिनांक-13/12/2010 रोजी तक्रारकर्त्‍याकडून रुपये-36,000/- घेतलेत परंतु त्‍याला आज पर्यंत वाहन पासींग करुन दिलेले नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 3 आरटीओ एजंटला विचारणा केली असता त्‍याने वाहनाचे आर.सी.बुक, विमा व इतर दस्‍तऐवज उपलब्‍ध नसल्‍याने आरटीओ पासिंग होऊ शकले नाही असे सांगितले. वस्‍तुतः विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याने, विरुध्‍दपक्ष क्रं 3 आरटीओ एजंटला वाहनाचे संपूर्ण दस्‍तऐवज देऊन पासिंग करुन दिल्‍या जाईल असे सांगितले होते. तक्रारकर्त्‍याने वाहन कर्जाची रक्‍कम नियमित भरलेली असून वाहनाचे विम्‍यापोटी सन-2013 व सन-2014-15 करीता रक्‍कम सुध्‍दा भरलेली आहे. वाहनाचे पासिंग व नोंदणी न झाल्‍याने तक्रारकर्ता हा स्‍कुलबसचा वापर करु शकत नाही त्‍यामुळे प्रतीमाह रुपये-25,000/- भाडयाने दुसरी स्‍कुलबस घेतलेली आहे. तक्रारकर्त्‍याला असेही समजले आहे की, त्‍याला विक्री केलेल्‍या वाहनाला (BSII) परिवहन आयुक्‍त, मुंबई यांचे कडून विक्री करण्‍याचा परवाना नव्‍हता. अशाप्रकारे त्‍याची फसवणूक केल्‍यामुळे त्‍याला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांना भेटून वेळोवेळी दस्‍तऐवजाची मागणी केली परंतु उडवा-उडवीची उत्‍तरे देण्‍यात आली. त्‍याने दिनांक-16 जानेवारी, 2013 रोजी विरुध्‍दपक्षांना कायदेशीर नोटीस पाठवून वाहनाचे दस्‍तऐवजाची मागणी केली परंतु नोटीस मिळूनही उत्‍तर दिले नाही वा कोणताही  प्रतिसाद मिळाला नाही. एप्रिल-2014 मध्‍ये वाहन विक्रेत्‍याने वाहनाची पासिंग करुन देण्‍याचे आश्‍वासन देऊन वाहनाचे विम्‍याची रक्‍कम भरावी असे सुचित केल्‍याने तक्रारकर्त्‍याने विम्‍याची रक्‍कम सन-2014-2015 करीता भरली होती परंतु आज पर्यंत वाहनाचे दस्‍तऐवज न दिल्‍याने वाहनाचे पासिंग होऊ शकले नाही.

       म्‍हणून त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष यांना वाहनाची किम्‍मत रुपये-9,50,000/-, अन्‍य वाहन भाडयाने घेतल्‍याने आलेला खर्च रुपये-6,00,000/-, वाहनाचे विम्‍याचा खर्च रुपये-52,747/-, वाहन पासिंगसाठी वाहनात साहित्‍य बसविण्‍यासाठी आलेला खर्च रुपये-28,000/-, विरुध्‍दपक्ष क्रं 3 आरटीओ एजंटने वाहन पासिंग करीता घेतलेली रक्‍कम रुपये-36,000/- असे मिळून एकूण रुपये-16,66,747/- वार्षिक-18% व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला परत करण्‍याचे आदेशित व्‍हावे. तसेच त्‍याला झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्‍दपक्षा कडून  मिळावा अशा मागण्‍या केल्‍यात. 

 

03.    विरुध्‍दपक्ष क्रं-1 वाहन विक्रेता तर्फे श्री शरद जनार्दन लिखार, सेल्‍स मॅनेजर याने पान क्रं 49 ते 56 वर लेखी उत्‍तर दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याने प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्‍याने दिनांक-23.06.2010 रोजी वाहन विकत घेतले आणि वाहनाचे पासिंग संबधात ग्राहक मंचा समक्ष तक्रार ही सन-2016 मध्‍ये दाखल केलेली असल्‍याने ती ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार मुदतबाहय असल्‍याने खारीज होण्‍यास पात्र असल्‍याचे तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता हा भंडारा जिल्‍हा मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्‍याने भंडारा मंचाला तक्रार चालविण्‍याचे कार्यक्षेत्र येत नसल्‍याचे नमुद केले.

    विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याने, विरुध्‍दपक्ष क्रं 3 हा त्‍याचा अधिकृत एजंट असल्‍याची बाब नामंजूर केली. विरुध्‍दपक्ष क्रं 4 प्रादेशिक परिवहन अधिका-याने तक्रारकर्त्‍याला बसमध्‍ये खिडक्‍यांना जाळया, रेडीयम पट्टया, स्‍टीलचे उभे रॉड, अग्‍नीशमन यंत्र लावण्‍यास सुचित केले होते ही बाब मान्‍य केली परंतु ते साहित्‍य लावण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याची असल्‍याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्‍याला वाहन विकले त्‍यावेळी विरुध्‍दपक्ष क्रं 1 कडे परिवहन आयुक्‍त, मुंबई यांचा वाहन विक्रीचा परवाना नव्‍हता ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्‍याने वाहनाचे दस्‍तऐवज देण्‍या बाबत वारंवार विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याची भेट घेतली तसेच दिनांक-16/01/2013 रोजी नोटीस पाठवून दस्‍तऐवजाची मागणी केली होती या बाबी नामंजूर केल्‍यात.

     विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याने विशेष कथनात असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याने वाहनाचे संपूर्ण किमतीचे कर्ज घेतले असून विरुध्‍दपक्ष क्रं-2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनीने, विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याला वाहनाची संपूर्ण किम्‍मत दिनांक-22.07.2010 रोजी दिली, त्‍यावेळी वाहनाचे पासिंगची रक्‍कम रुपये-31,000/- सुध्‍दा विरुध्‍दपक्ष क्रं-1 वाहन विक्रेत्‍याने घेतली होती. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे की, त्‍याने नगदी रुपये-3,00,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याला दिलेत हे खोटे व चुकीचे आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याने असेही नमुद केले की, वाहन विक्रीच्‍या वेळी पासिंगसाठी लागणारे संपूर्ण कागदपत्रे तक्रारकर्त्‍याला दिलेली होती. तक्रारकर्त्‍याने शाळेतील विद्दार्थ्‍यांना ने-आण करण्‍यासाठी स्‍कुल बस घेतली असल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 4 प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी त्‍यास अग्‍नीशमन यंत्र, स्‍टील रॉड, जाळया इत्‍यादी बसविण्‍यास सुचित केले होते परंतु त्‍याने सदर साहित्‍य बसमध्‍ये न बसविल्‍याने बसचे पासिंग होऊ शकले नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 ची माहे फेब्रुवारी-2011 मध्‍ये भेट घेतली होती व कळविले होते की, तो स्‍वतः आर.टी.ओ.पासिंगचे काम करणार असल्‍याने त्‍याने पासिंगची रक्‍कम परत मागितली म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याने तक्रारकर्त्‍याला आयसीआयसीआय बँकेचा दिनांक-25 फेब्रुवारी, 2011 रोजीचा रुपये-31,000/- चा चेक दिला त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याची वाहनाचे पासिंग करुन देण्‍याची जबाबदारी आता येत नसल्‍याचे नमुद केले. विरुध्‍दपक्ष क्रं 3 आरटीओ एजंटशी विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याचा कोणताही संबध नाही. वाहन विक्रीच्‍या वेळी तक्रारकर्त्‍याला वाहनाचे संपूर्ण दस्‍तऐवज दिलेत ज्‍यामध्‍ये परिवहन आयुक्‍त, मुंबई यांचेव्‍दारे वाहन विक्रीचा परवाना सुध्‍दा दिला होता. तक्रारकर्त्‍याने स्‍वतःचा बस पासिंगची जबाबदारी स्विकारली होती व आता त्‍याचे कडून संपूर्ण दस्‍तऐवज हरविल्‍यामुळे त्‍याचे वाहनाचे पासिंग होऊ शकले नाही. महिन्‍द्रा अॅन्‍ड महिन्‍द्रा कंपनीने BS-II हया मॉडेलची बस बनविणे सन-2011 मध्‍ये बंद केली असल्‍याने आता त्‍याचा परवाना किंवा कागदपत्र विरुध्‍दपक्ष क्रं 1  विक्रेत्‍या जवळ नाहीत. सबब तक्रारकर्त्‍याची संपूर्ण तक्रार ही खोटी, बनावट व चुकीची असल्‍याने ती खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याने केली.

 

04.    विरुध्‍दपक्ष क्रं-2) महिन्‍द्रा अॅन्‍ड महिन्‍द्रा फॉयनान्शियल सर्व्‍हीस लि. या वाहन कर्ज पुरवठा करणा-या कंपनी तर्फे आरीफ अब्‍दुल वहिद खान याने पान क्रं 65 ते 71 वर लेखी उत्‍तर दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनी तर्फे दिलेल्‍या उत्‍तरात करारामध्‍ये मुंबई येथील लवादालाच वाद सोडविण्‍याची तरतुद केलेली असल्‍याने मंचाला तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र येत नसल्‍याचे नमुद केले. विरुध्‍दपक्ष क्रं-2) कर्ज पुरवठा  करणा-या कंपनीने  असे नमुद केले की, त्‍यांच्‍यात आणि तक्रारकर्त्‍या मध्‍ये वाहन कर्जाचे संबधात झालेला करार क्रं-1250568 करार दिनांक-23.07.2010 मधील कलम 26 आणि 27 अनुसार त्‍यांनी तक्रारकर्त्‍या विरुध्‍द मुंबई येथील लवाद अधिकारी श्रीमती अमिता छेडा यांचे समोर प्रकरण दाखल केले होते, त्‍यामध्‍ये तक्रारकर्ता व इतरांना त्‍यांचे म्‍हणणे मांडण्‍याची संधी देण्‍यात आली होती परंतु तक्रारकर्ता हा लवादा समक्ष उपस्थित झाला नाही आणि तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द लवादा समोर आदेश पारीत झालेला आहे, लवादा समोरील आदेशाची तक्रारकर्त्‍याला  माहिती असूनही त्‍याने त्‍या आदेशाची अमलबजावणी न करता ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी तक्रारकर्त्‍याला कर्ज दिलेले असल्‍याने तो ग्राहक होऊ शकत नाही. तक्रारकर्त्‍याने वाहनाचे कर्जाचे हप्‍ते नियमित भरल्‍याची बाब नामंजूर केली तक्रारकर्त्‍याने  20 मे, 2014 पर्यंत प्रतीमाह रुपये-18,532/- प्रमाणे एकूण रुपये-8,89,000/- भरल्‍याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्‍याने दिनांक-16/01/2013 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 2 ला नोटीस पाठविली असल्‍याची बाब नामंजूर केली. आपल्‍या विशेष कथनात असे नमुद केले की, कर्ज करारा प्रमाणे रुपये-18,532/- प्रतीमाह प्रमाणे एकूण 47 मासिक हत्‍यांमध्‍ये कर्जाची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला फेडावयाची होती परंतु तक्रारकर्त्‍याने नियमित हप्‍त्‍याच्‍या रकमा  भरल्‍या नसल्‍याने त्‍याचेवर काही दंड सुध्‍दा बसविला होता. दिनांक-31.07.2014 पर्यंत तक्रारकर्त्‍या कडून विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या वित्‍तीय कंपनीला रुपये-24,684/- घेणे बाकी होते, त्‍यापैकी त्‍याने फक्‍त रुपये-4805/- जमा केलेत त्‍यामुळे त्‍याचेकडून रुपये-19,879/- आणि करारा नुसार व्‍याज व दंड असे मिळून दिनांक-11/02/2016 पर्यंत रुपये-32,404/- एवढी रककम विरुध्‍दपक्ष क्रं 2 ला घेणे आहे. तक्रारकर्त्‍या कडे सदर रकमेची मागणी केली असता त्‍याने नकार दिला आणि ही खोटी तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनी विरुध्‍द दाखल केलेली असल्‍याने ती खारीज करण्‍याची विनंती केली.  

05.   विरुध्‍दपक्ष क्रं-3) हारुन शेख, आरटीओ एजन्‍ट  याला मंचाची रजिस्‍टर पोस्‍टाची नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 3 विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने पारीत केला.

06.   विरुध्‍दपक्ष क्रं-4 प्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा यांनी पान क्रं 37 वर लेखी निवेदन सादर केले, त्‍यांनी लेखी निवेदनामध्‍ये तक्रारकर्त्‍याने केंद्रीय मोटर वाहन नियम-1989 चे नियम-47 नुसार वाहनाचे दस्‍तऐवज आरटीओ कार्यालयात सादर केलेले नाहीत. त्‍यांनी लेखी उत्‍तरात पुढे असे नमुद केले की, मा.राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई यांनी अपिल क्रं-757/1999, आदेश पारीत दिनांक-18/10/2005  “उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे-विरुध्‍-सुनिल किसन पाटील” या प्रकरणात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्‍या नियमातील तरतुदी नुसार होणारे कार्य हे ग्राहक संरक्षण कायदा-1986 नुसार सेवा या तत्‍वात बसत नसल्‍याचे नमुद करुन त्‍यांना या तक्रारीतून वगळण्‍याची विनंती केलेली आहे.

07   तक्रारकर्त्‍याने पान क्रं-13 वरील दस्‍तऐवज यादी नुसार एकूण 06 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्षांना दिनांक-28/10/2015 रोजी पाठविलेली नोटीस, वाहनाचे पेमेंट शेडयुल, वाहनाचा सन-2014-15 मध्‍ये काढलेला विमा, नोटीसच्‍या पोच अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने पान क्रं 59 ते 63 वर शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं-88 ते 92 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तक्रारकर्त्‍याने पान क्रं 96 वरील दस्‍तऐवज यादी नुसार बसचा फोटो, अप्रुव्‍हल ऑफ रजिस्‍ट्रेशन, परिपत्रक, टॅक्‍स इन्‍व्‍हाईस, सेल सर्टिफीकेट, दिनांक-16/01/2013 रोजीची रजि.पोस्‍टाव्‍दारे पाठविलेल्‍या नोटीसची प्रत, पोचच्‍या प्रती अशा दस्‍तऐवजाचा समावेश आहे.

08.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍या तर्फे विक्री व्‍यवस्‍थापक श्री शरद जर्नादन लिखार यांनी पान क्रं 72 ते 76 वर शपथपत्र दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनीने पान क्रं-77 ते 79 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला. विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याने पान क्रं 80 ते 84 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

09.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 4 प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची साक्ष घेण्‍या करीता दिनांक-09/06/2017 रोजी अर्ज केला होता त्‍याअनुसार त्‍यांना दिनांक-04/07/2017 रोजी मंचा समक्ष उपस्थित राहण्‍या बाबत दिनांक-14/06/2017 रोजी नोटीस काढली होती, ती पान क्रं 87 वर उपलबध आहे परंतु अशी नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्ष क्रं 4 मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत.

10.   तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री बारसाकडे यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकला. विरुध्‍दपक्षा तर्फे मौखीक युक्‍तीवादाचे वेळी कोणीही उपस्थित नव्‍हते.

11.  तक्रारकर्त्‍याची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 व क्रं-4 यांचे लेखी उत्‍तर, तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज यांचे अवलोकन करण्‍यात आले. तसेच तक्रारकर्त्‍याचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे-

                                                                                      ::निष्‍कर्ष::

12.   प्रकरणातील वादातील मुद्दांचा विचार करण्‍यापूर्वी, विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) कर्ज पुरवठा करणा-या वित्‍तीय कंपनीने त्‍यांचे-त्‍यांचे उत्‍तरातून घेतलेल्‍या प्राथमिक आक्षेपांचा प्रथम विचार करणे योग्‍य होईल.  विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेत्‍याने आपल्‍या लेखी उत्‍तरात तक्रारकर्त्‍याने दिनांक-23.06.2010 रोजी वाहन विकत घेतले आणि वाहनाचे पासिंग संबधात ग्राहक मंचा समक्ष तक्रार ही सन-2016 मध्‍ये दाखल केलेली असल्‍याने तक्रार ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार मुदतबाहय असल्‍याने खारीज होण्‍यास पात्र आहे. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता हा भंडारा जिल्‍हा मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्‍याने भंडारा मंचाला तक्रार चालविण्‍याचे कार्यक्षेत्र येत नाही.

     या संदर्भात मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेत्‍या कडून घेतलेल्‍या स्‍कुलबसचे अद्दापही आर.टी.ओ.कडून पासिंग झाले नसल्‍याचे व त्‍यासाठी विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेता जबाबदार असल्‍याचे म्‍हणणे आहे कारण विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेत्‍याने त्‍याला वाहनाचे रजिस्‍ट्रेशनसाठी आवश्‍यक असणारे दस्‍तऐवज पुरविले नसल्‍याने स्‍कुलबसचे रजिस्‍ट्रेशन होऊ शकले नसल्‍याचे म्‍हणणे आहे.  या संदर्भात विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेत्‍याचे असे म्‍हणणे आहे की, त्‍याने ते सर्व दस्‍तऐवज तक्रारकर्त्‍याला पुरविलेत परंतु ते त्‍याने हरविले.

       मंचाचे असे मत आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेत्‍याने वाहनाचे पासिंग आणि रजिस्‍ट्रेशनसाठी आवश्‍यक दस्‍तऐवज तक्रारकर्त्‍याला पुरविल्‍या बाबत त्‍याची “लेखी पोच” पुरावा म्‍हणून दाखल केलेली नसल्‍याने जो पर्यंत तक्रारकर्त्‍याचे स्‍कुल बसचे पासिंग व रजिस्‍ट्रेशन होत नाही, तो पर्यंत तक्रारीचे कारण हे सतत घडत असल्‍याने तक्रार मुदतीत असल्‍याचे मंचाचे मत आहे त्‍यामुळे तक्रार मुदतबाहय असल्‍याचे जे विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेत्‍याचे म्‍हणणे आहे ते तथ्‍यहिन असल्‍याचे मंचाचे मत आहे.

      विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेत्‍याचा असाही आक्षेप आहे की, त्‍याचे कार्यालय भंडारा येथे नसल्‍याने भंडारा जिल्‍हा मंचाला तक्रार चालविण्‍याचे कार्यक्षेत्र येत नाही.  या संदर्भात मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेल्‍या वाहनाचे पासिंग व रजिस्‍ट्रेशनची प्रक्रिया ही भंडारा आर.टी.ओ. मध्‍ये सुरु झालेली असल्‍याने तक्रारीचे अंशतः कारण (Cause of action partly arises at Bhandara) हे भंडारा जिल्‍हया मध्‍ये घडले असल्‍याने ग्राहक सरंक्षण कायद्दा-1986 मधील तरतुदी प्रमाणे जिल्‍हा ग्राहक मंच भंडारा यांना प्रस्‍तुत तक्रार चालविण्‍याचे  स्‍थानीय कार्यक्षेत्र (Territorial Jurisdiction) येते त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याचे या आक्षेपा मध्‍ये मंचाला कोणतेही तथ्‍य दिसून येत नाही.

13.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनीने मुंबई येथील लवादालाच (Arbitrator) वाद सोडविण्‍याची तरतुद केलेली असल्‍याने मंचाला तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र येत नसल्‍याचे नमुद केले.  तसेच त्‍यांच्‍यात आणि तक्रारकर्त्‍या मध्‍ये वाहन कर्जाचे संबधात झालेला करार क्रं-1250568 करार दिनांक-23.07.2010 अनुसार त्‍यातील कलम 26 आणि 27 अनुसार तक्रारकर्त्‍या विरुध्‍द मुंबई येथील लवाद अधिकारी श्रीमती अमिता छेडा यांचे समोर प्रकरण दाखल केले होते, त्‍यामध्‍ये तक्रारकर्ता व इतरांना त्‍यांचे म्‍हणणे मांडण्‍याची संधी दिली होती परंतु तक्रारकर्ता हा लवादा समक्ष उपस्थित झाला नाही आणि तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द लवादा समोर आदेश पारीत झालेला आहे, लवादा समोरील आदेशाची तक्रारकर्त्‍याला माहिती असूनही त्‍याने त्‍या आदेशाची अमलबजावणी न करता ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.

     या आक्षेपाचे संदर्भात मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, कर्ज करारा मध्‍ये जरी लवादा (Arbitrator) व्‍दारे वाद सोडविण्‍याचे आणि तो वाद फक्‍त मुंबई येथे सोडविण्‍याची अट टाकलेली असली तरी करारातील अशा अटीव्‍दारे ग्राहक मंचाचे तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र हिरावून  घेता येणार नाही अशा आशयाचे मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे अनेक निवाडे वेळोवेळी पारीत झालेले आहेत. तसेही कायद्दाव्‍दारे  वाद सोडविण्‍यासाठी ज्‍या काही सोयी निर्माण केलेल्‍या आहेत त्‍यापैकी ग्राहक मंचाची निर्मिती ही जास्‍तीची सोय (In addition to) म्‍हणून निर्माण केलेली आहे आणि कोठे जाऊन दाद मागावी हा त्‍या ग्राहकाचा हक्‍क व अधिकार आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या वित्‍तीय कंपनीने लेखी उत्‍तरात तक्रारकर्त्‍या विरुध्‍द लवादा समोरील प्रकरणात आदेश पारीत केल्‍याचे नमुद केलेले असले तरी त्‍या प्रकरणाचा क्रमांक, आदेश दिनांक तसेच त्‍या आदेशाची प्रत पुराव्‍यार्थ ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली नसल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2) कर्ज पुरवठा करणा-या वित्‍तीय कंपनीने घेतलेल्‍या या आक्षेपात योग्‍य त्‍या पुराव्‍या अभावी मंचाला कोणतेही तथ्‍य दिसून येत नाही.

14.   तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारीतील परिच्‍छेद क्रं 6 मध्‍ये असे नमुद केले की,  तो विरुध्‍दपक्ष क्रं 4 आरटीओ भंडारा यांचे कार्यालयात, विरुध्‍दपक्ष क्रं 1 कडून विकत घेतलेल्‍या स्‍कुलबसच्‍या पासिंग करीता गेला असता, आरटीओ यांनी त्‍याला गाडीच्‍या खिडक्‍यांना जाळया, रेडीयम पट्टया, स्‍टीलचे उभे रॉड आणि अग्‍नीशमन यंत्र लावण्‍यास सांगितले वस्‍तुतः ते काम विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याचे होते असे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे आणि त्‍यासाठी त्‍याला जाळया करीता रुपये-15,000/-, रेडीयम पट्टया करीता रुपये-3000/-, स्‍टील रॉडसाठी रुपये-3000/- आणि 02 अग्‍नीशमन यंत्रा करीता रुपये-6000/- असे मिळून एकूण रुपये-27,000/- खर्च आला व तो त्‍याने स्‍वतः केला असल्‍याने तो विरुध्‍दपक्ष क्रं 1) ने परत करावा अशी त्‍याने मागणी केली.

    या संदर्भात मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍या कडून विकत घेतलेल्‍या वाहनाचा उपयोग हा स्‍कुलबसमधील विद्दार्थ्‍यांना ने-आण करण्‍यासाठी करणार असल्‍याचे आरटीओ यांना सांगितल्‍याने जास्‍तीची खबरदारी म्‍हणून त्‍यांनी स्‍कुलबस मध्‍ये अग्‍नीशमन यंत्र, स्‍टील रॉड आणि इतर साहित्‍य बसविण्‍याच्‍या सुचना तक्रारकर्त्‍याला केल्‍यात, वाहनामध्‍ये अग्‍नीशमन यंत्र लावणे, खिडक्‍यांना जाळया बसविणे हे वाहन विक्रेत्‍याचे काम नसून त्‍या जास्‍तीच्‍या अतिरिक्‍त सोयी आहेत व त्‍या सोयींसाठी लागणारा खर्च हा वाहन मालकाने करणे अभिप्रेत आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या या मागणी मध्‍ये मंचाला कोणतेही तथ्‍य दिसून येत नाही.

15.   तक्रारकर्त्‍याची अशीही मागणी आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेत्‍या कडून घेतलेल्‍या स्‍कुल बसचे पासिंग व रजिस्‍ट्रेशन हे विरुध्‍दपक्ष क्रं 1 ने त्‍याला दस्‍तऐवज पुरविले नसल्‍याने होऊ शकले नाही म्‍हणून त्‍याने दुसरी कडून अन्‍य वाहन भाडयाने घेतले व त्‍यासाठी त्‍याला एकूण रुपये-6,00,000/- खर्च आला व तो परत मिळावा अशी त्‍याची मागणी आहे.

      मंचाचे मते तक्रारकर्त्‍याने दुसरी कडून वाहन भाडयाने घेतले होते त्‍या संबधी कोणताही पुरावा मंचा समक्ष दाखल केलेला नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे या मागणी मध्‍ये सुध्‍दा मंचाला पुराव्‍या अभावी कोणतेही तथ्‍य दिसून येत नाही.

16.   तक्रारकर्त्‍याची अशीही मागणी आहे की, त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याचे सांगण्‍या नुसार वाहनाचा विमा काढला आणि त्‍यासाठी त्‍याला रुपये-52,747/- एवढा खर्च आला परंतु वाहनाचे पासिंग व रजिस्‍ट्रेशन न झाल्‍याने विम्‍याचा खर्च वाया गेला. या संदर्भात मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की,  वाहनाचा विमा हा विरुध्‍दपक्ष क्रं 1 ने त्‍याला काढावयास सांगितला होता.

     या संबधी कोणताही पुरावा मंचा समक्ष आलेला नाही. वाहनाचा विमा तक्रारकर्त्‍याने स्‍वतः काढला त्‍यामुळे त्‍याची ही मागणी सुध्‍दा मान्‍य करता येणार नाही.

17.    तक्रारकर्त्‍याने वाहन पासिंग करीता त्‍याचे कडून घेतलेली रक्‍कम रुपये-36,000/- परत मिळण्‍याची मागणी केलेली आहे. तक्रारकर्त्‍या कडून वाहनाचे पासिंगपोटी रुपये-31,000/- मिळाल्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं-1 वाहन विक्रेत्‍याने लेखी उत्‍तरात मान्‍य करुन पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 ची माहे फेब्रुवारी-2011 मध्‍ये भेट घेतली होती व कळविले होते की, तो स्‍वतः आर.टी.ओ.पासिंगचे काम करणार असल्‍याने पासिंगची रक्‍कम परत मागितली म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याने तक्रारकर्त्‍याला आयसीआयसीआय बँकेचा दिनांक-25 फेब्रुवारी, 2011 रोजीचा रुपये-31,000/- चा चेक दिला त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याची वाहनाचे पासिंग करुन देण्‍याची जबाबदारी आता येत नाही.

       या संदर्भात मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, विरुध्‍दपक्ष क्रं 1) विक्रेत्‍याने तक्रारकर्त्‍याला दिनांक-25 फेब्रुवारी, 2011 रोजीचा चेक दिला होता व तो पुढे वटण्‍यात येऊन त्‍याची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला प्राप्‍त झाली होती या संबधी कोणताही पुरावा मंचा समक्ष दाखल केलेला नाही, त्‍यामुळे अशा परिस्थितीत वाहन पासिंग करीता घेतलेली रक्‍कम व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला परत करण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याची आहे असे मंचाचे मत आहे.

18.  तक्रारकर्त्‍याने तक्रारीतील परिच्‍छेद क्रं-15 मध्‍ये वाहनाचे संपूर्ण कागदपत्र जसे आर.सी.बुक, खरेदी बिल व इतर दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याने उपलब्‍ध करुन न दिल्‍याने स्‍कुल बसचे आरटीओ कडून पासिंग होऊ शकली नसल्‍याचे नमुद केले.

      या संदर्भात विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेत्‍याने त्‍याचे लेखी उत्‍तरातील परिच्‍छेद क्रं 18 मध्‍ये त्‍याने तक्रारकर्त्‍याला वाहन देते वेळी संपूर्ण कागदपत्र दिली होती ज्‍यामध्‍ये परिवहन आयुक्‍त मुंबई यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 याला वादातीत वाहन विक्री करण्‍यासाठी दिलेला परवाना सुध्‍दा होता असे नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे शपथपत्रात या बाबी नाकारलेल्‍या आहेत.

    या संदर्भात मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याने स्‍वतःच पान क्रं 99 वर Approval for registration model  Mahindra Tourister  25 W BS III 26 seater  (Minibus) या संबधात डेप्‍युटी ट्रान्‍सपोर्ट कमीश्‍नर महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई यांनी एप्रिल 2012 मध्‍ये जारी केलेल्‍या आदेशाची प्रत दाखल केली. परंतु तक्रारकर्त्‍याला वाहनाचे आर.सी.बुक व इतर दस्‍तऐवज वाहन विक्रीचे वेळी विरुध्‍दपक्ष क्रं- 1 वाहन विक्रेत्‍याने पुरविले होते या संबधी कोणताही पुरावा जसे तक्रारकर्त्‍याला ते दस्‍तऐवज मिळाल्‍या बाबत त्‍याची “लेखी पोच” या प्रकरणात दाखल केलेली नाही.

      मंचा तर्फे पुढे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, सर्वसाधारण व्‍यवहारात जेंव्‍हा वाहनाची विक्री ग्राहकास केली जाते त्‍यावेळी त्‍याला दिल्‍या जाणा-या वाहनाच्‍या अॅसेसरीज तसेच वाहनाचे दस्‍तऐवज मिळाल्‍या बाबत त्‍याचे कडून “लेखी पोच” घेण्‍यात येते परंतु या प्रकरणात तक्रारकर्त्‍याला असे वाहनाचे दस्‍तऐवज पुरविले होते या संबधी कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याने दाखल केलेला नाही त्‍यामुळे योग्‍य त्‍या दस्‍तऐवजाच्‍या अभावी तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेल्‍या स्‍कुलबसचे आरटीओ पासिंग व रजिस्‍ट्रेशन होऊ शकले नाही या तक्रारकर्त्‍याचे आरोपात मंचास तथ्‍य दिसून येते.

19.    विरुध्‍दपक्ष क्रं-2) वाहनास कर्ज पुरवठा करणा-या कंपनीने तक्रारकर्त्‍या कडून वाहनाचे कर्जापोटी त्‍यांना अद्दापही रुपये-19,879/- आणि करारा नुसार व्‍याज व दंड असे मिळून दिनांक-11/02/2016 पर्यंत रुपये-32,404/- एवढी रककम घेणे असल्‍याचे नमुद केले परंतु या तक्रारीमध्‍ये वाहन कर्जा संबधात कोणताही वाद उपस्थित झालेला नसल्‍याने तसेच वाहन कर्जा संबधी संपूर्ण दस्‍तऐवज पुराव्‍या दाखल उपलब्‍ध नसल्‍याने त्‍या संबधाने कोणताही आदेश मंचाला देता येणार नाही.

20.  मंचाव्‍दारे आणखी काही बाबी येथे स्‍पष्‍ट करण्‍यात येतात की,  तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेल्‍या वाहनाचे रजिस्‍ट्रेशन न होण्‍यामागे विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या वित्‍तीय कंपनी जबाबदार आहे असे दर्शविणारा कोणताही पुरावा मंचा समक्ष दाखल नसल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 ला मुक्‍त करणे योग्‍य राहिल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं-3) हारुन शेख, आरटीओ एजंट याने तक्रारकर्त्‍याला कशाप्रकारे दोषपूर्ण सेवा दिली या संबधी कोणताही पुरावा तक्रारकर्त्‍याने दाखल न केल्‍यामुंळे विरुध्‍दपक्ष   क्रं- 3 आरटीओ एजंट हारुन शेख याला मुक्‍त करणे योग्‍य राहिल असे मंचाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-4) प्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा यांना सुध्‍दा कोणत्‍या कारणामुळे या तक्रारीत तक्रारकर्त्‍याने प्रतिपक्ष केले हे सुध्‍दा मंचाला समजून येत नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 4 यांनी तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तसेच त्‍यांनी पासिंगचे वेळी स्‍कुलबस असल्‍याने सुरक्षेच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक अग्‍नीशमन यंत्र लावण्‍यास तक्रारकर्त्‍याला सुचित केले यात त्‍यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यप्रकारे पार पाडले असल्‍याने त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही करीता विरुध्‍दपक्ष क्रं 4 यांना मुक्‍त करणे योग्‍य राहिल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

21.  वरील सर्व वस्‍तुस्थिती आणि पुराव्‍याचे आधारावर दिनांक-23/06/2010 रोजी तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेल्‍या  महिन्‍द्रा आणि महिन्‍द्रा कंपनी निर्मित MAHINDRA TOURISTER-25 BSII SCHOOL BUS ज्‍याचा इंजिन क्रं-BGA.-4-F-21975 व चेसीस क्रं-MA-1-GF-2-BGDA-3F-15792 असा आहे या वाहनाचे आरटीओ पासिंग व रजिस्‍ट्रेशनसाठी योग्‍य ते दस्‍तऐवज जसे आर.सी.बुक. व ईतर आवश्‍यक असलेले संपूर्ण दस्‍तऐवज विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याने पुरविले नसल्‍याची बाब सिध्‍द झालेली असल्‍याने तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेल्‍या स्‍कुलबसचे आरटीओ पासिंग व रजिस्‍ट्रेशन आज पर्यंत होऊ शकले नाही व त्‍याला शेवटी मंचा समक्ष तक्रार दाखल करावी लागली. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याने वाहनाचे पासिंगची रक्‍कम स्विकारुनही तक्रारकर्त्‍याला शेवट पर्यंत योग्‍य ते दस्‍तऐवज न पुरवून दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते, त्‍यामुळे तक्रारकर्ता  विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍या कडून त्‍याने विकत घेतलेल्‍या स्‍कुल बसचा विद्दार्थ्‍यांना ने-आण करण्‍या करीता वापर करु शकलेला नाही व ती स्‍कुलबस “आहे त्‍या स्थितीत” आजपर्यंत तशीच वापराविना पडून आहे या तक्रारकर्त्‍याच्‍या  आरोपात मंचाला तथ्‍य दिसून येते, तसेच तक्रारकर्त्‍याने दिनांक-23.06.2010 रोजी वाहन विकत घेतल्‍या नंतर आज पर्यंत म्‍हणजे ऑक्‍टोंबर, 2018 पर्यंत जवळपास 08 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला असल्‍याने आणि स्‍कुलबस खरेदी दिनांका पासून ते आज पर्यंत तशीच बंद पडलेली असल्‍याने तिचे जागेवरच उभी राहिल्‍याने नुकसान झाल्‍याची बाब नाकारता येणार नाही तसेच तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेल्‍या स्‍कुलबस वाहनाचे आयुष्‍य सुध्‍दा जवळपास संपल्‍या सारखे आहे आणि   Model Mahindra Tourister  25 W BS III  चे मानकानुसार आता या वाहनाची नोंद पण होऊ शकत नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने स्‍कुलबससाठी केलेला संपूर्ण खर्च वाया गेलेला आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेत्‍याने वाहन विक्री करताना तक्रारकर्त्‍यास योग्‍य ते दस्‍तऐवज न पुरविल्‍याने खरेदी केलेल्‍या स्‍कुलबसचे आरटीओ पासिंग आणि रजिस्‍ट्रेशन होऊ शकले नाही त्‍यामुळे अशापरिस्थितीत विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेत्‍या कडून, तक्रारकर्ता त्‍या वाहनाची विक्री किम्‍मत खरेदी केल्‍याचे दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह परत मिळण्‍यास पात्र आहे, विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेत्‍याने तक्रारकर्त्‍याला आदेशित‍ रक्‍कम व्‍याजासह दिल्‍या नंतर त्‍याचे जवळील वादातील वाहन “आहे त्‍या स्थितीत” आपले ताब्‍यात घ्‍यावे व तक्रारकर्त्‍याने ते वाहन त्‍यांना परत करावे. तसेच तक्रारकर्ता विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेत्‍या कडून त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच वाहनाचे पासिंगपोटी विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेत्‍याने  घेतलेली रक्‍कम व्‍याजासह परत मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 

22.   वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे- 

                                       :: आदेश ::

 

1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2)    विरुध्‍दपक्ष क्रं-1) अगस्‍ता मोटर्स प्रायव्‍हेट लिमिटेड या वाहन विक्रेत्‍यास आदेशित करण्‍यात येते की, त्‍याने दिनांक-23/07/2010 रोजी तक्रारकर्त्‍याला विक्री केलेल्‍या महिन्‍द्रा आणि महिन्‍द्रा कंपनी निर्मित MAHINDRA TOURISTER-25 BSII SCHOOL BUS ज्‍याचा इंजिन क्रं-BGA.-4-F-21975 व चेसीस क्रं-MA-1-GF-2-BGDA-3F-15792 असा आहे, या वाहनापोटी तक्रारकर्त्‍या कडून दिनांक-23/07/2010 रोजी स्विकारलेली रक्‍कम टॅक्‍स इन्‍व्‍हाईस प्रमाणे रुपये-8,57,435/- (अक्षरी रुपये आठ लक्ष सत्‍तावन्‍न हजार चारशे पस्‍तीस फक्‍त) दिनांक-23/07/2010 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला परत करावी. विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेत्‍याने तक्रारकर्त्‍याला आदेशित‍ रक्‍कम व्‍याजासह दिल्‍यानंतर तक्रारकर्त्‍या जवळील वादातील वाहन “आहे त्‍या स्थितीत” आपले ताब्‍यात घ्‍यावे व तक्रारकर्त्‍याने वाहन त्‍यांना परत करावे व वाहन मिळाल्‍याबाबत विरुध्‍दपक्ष क्रं-1 ने तक्रारकर्त्‍याला पोच द्यावी.                                                                                                                                                                                                                         3)    विरुध्‍दपक्ष क्रं-1) अगस्‍ता मोटर्स प्रायव्‍हेट लिमिटेड या वाहन विक्रेत्‍यास  असेही आदेशित करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याकडून वाहनाचे पासिंगपोटी दिनांक-22/07/2010 रोजी मिळालेली रक्‍कम रुपये-31,000/- (अक्षरी रुपये एकतीस हजार फक्‍त) तक्रारकर्त्‍याला दिनांक-22/07/2010 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% व्‍याजासह परत करावी.

4)    तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-14 प्रमाणे रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेत्‍याने तक्रारकर्त्‍याला द्यावेत.

5)    तक्रारकर्त्‍याच्‍या अन्‍य मागण्‍या या योग्‍य त्‍या पुराव्‍या अभावी नामंजूर करण्‍यात येतात.

6)    विरुध्‍दपक्ष क्रं-2) कर्ज पुरवठा करणारी कंपनी महिन्‍द्रा अॅन्‍ड महिन्‍द्रा फायनॉन्शियल लिमिटेड, भंडारा तसेच विरुध्‍दपक्ष क्रं-3) श्री हारुन शेख, आरटीओ एजन्‍ट आणि विरुध्‍दपक्ष क्रं-4) प्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

7)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेत्‍याने  निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे. अन्‍यथा अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(2), (3) आणि (4) मध्‍ये नमुद आदेशित रकमा मुदत संपल्‍याचे दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं-1) जबाबदार राहिल.

8)   निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

9)    तक्रारकर्त्‍याला  “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.