मंचाचे निर्णयान्वये - श्री. रामलाल सोमाणी, अध्यक्ष //- आदेश -// (पारित दिनांक – 08/09/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय असा आहे की, गैरअर्जदार क्र. 1 ही भागीदारी संस्था असून इतर गैरअर्जदार त्यांचे भागीदार आहेत. गैरअर्जदार क्र. 5 हा जमीन मालक आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी गैरअर्जदार क्र. 5 सोबत जमीन खरेदीचा सौदा केला व त्या जमिनीमध्ये तक्रारकर्तीचे व तिच्या पतीच्या नावाने 15000 चौ.फु. प्रती रु.111/- प्रमाणे खरेदी करण्याचा करार 21.04.2007 मध्ये करण्यात आला. त्यापोटी रु.6,51,000/- दिले व उर्वरित रक्कम विक्रीपत्राचेवेळी देण्याचे ठरले. करारनाम्यानुसार विक्रीची मुदत 8 महिने होती. गैरअर्जदार सेवा प्रदान करणारे म्हणून तक्रारकर्ती ग्राहक आहे. तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र. 1 ते 4 कडे पाठपुरावा केला. परंतू तक्रारकर्तीला विक्रीपत्र करुन दिले नाही किंवा तिची रक्कम परत केली नाही. तक्रारकर्ती सदैव विक्रीपत्र करुन घेण्यास तयार होती व आहे. परंतू गैरअर्जदाराने कोणतीही कारवाई केली नाही. कराराचे गैरअर्जदाराने भंग केले त्याकरीता सर्व गैरअर्जदार सारखेच जबाबदार आहे. गैरअर्जदाराने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. गैरअर्जदार करारनामा पूर्ण करण्यास असमर्थ आहे असे आढळल्यास संपूर्ण दिलेली रक्कम 18 टक्के व्याजासह, नुकसान भरपाई म्हणून रु.5,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रारीचा खर्च व इतर अनुतोष मिळण्याची प्रार्थना केलेली आहे. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दोन दस्तऐवज दाखल केलेले आहेत. तक्रारकर्ती व गैरअर्जदार क्र. 1 ते 4 सोबत झालेला करारनामा आणि गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांच्यामध्ये झालेला करारनामा आहे. 2. गैरअर्जदार क्र. 1,2 आणि 4 (यापुढे तीनही गैरअर्जदारांना गैरअर्जदार म्हणून संबोधण्यात येईल.) ने हजर होऊन नि.क्र.10 वर लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 1 भागीदारी संस्था असल्याचे मान्य केले आणि झालेले दोन्ही करार याबद्दल वाद उपस्थित केलेला नाही. परंतू गैरअर्जदाराने नमूद केले की, तक्रारकर्तीने एकूण रक्कम रु.16,65,000/- द्यावयाचे होती. परंतू गैरअर्जदारांना फक्त रु.51,000/- धनादेश तक्रारकर्तीने दिला आणि उर्वरित रक्कम 21.07.2007 ला देण्यात येईल. तक्रारकर्तीने स्वतः दि.21.04.2007 रोजी करारनामा करुन आणला व त्यावर गैरअर्जदारांच्या सह्या घेतल्या व रु.6,00,000/- पोहोचवून देतो असे आश्वासन दिले. गैरअर्जदार व तक्रारकर्तीचे पतीचे चांगले संबंध असल्याने त्यांनी त्यावर विश्वास ठेवला. परंतू त्यांनी विश्वासघात केला आणि उर्वरित रक्कम न देता खोटी तक्रार दाखल केलेली आहे. 3. तक्रारकर्तीने प्रस्तुत वाद व्यावसायिक दृष्टीकोनातून केलेला आहे म्हणून ती ग्राहक नाही. तक्रारकर्त्याने कोणताही पाठपुरावा केलेला नाही. तक्रारकर्तीने दाखविलेली तयारी खोटी व चूकीची आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांना वेळीच रक्कम न मिळाल्याने गैरअर्जदार क्र. 5 ने सदर जमिन 17.05.2008 ला सदर जमिन नरेश खंडवानी यांना विक्रीपत्राद्वारे विकलेली आहे. गैरअर्जदारांनी त्यांची चूक नाकबुल केलेली आहे. तक्रारकर्तीची प्रार्थना खोटी असून तक्रार खारीज करावी. 4. गैरअर्जदार क्र. 5 ने लेखी उत्तर दाखल करुन त्यांचेविरुध्दचे आक्षेप फेटाळले व तक्रारकर्तीशी कोणताही संबंध नसल्याचे कथन केले. या गैरअर्जदाराला जाणून बुजून समाविष्ट करण्यात आले आहे, म्हणून तक्रार दंडासह खारीज करावी. 5. तक्रारकर्तीने नि.क्र.14 आपले प्रतिउत्तर दाखल करुन नमूद केले की, तिने रु.6,51,000/- दिलेले आहे आणि गैरअर्जदार खोटी केस मांडत आहे. गैरअर्जदाराने खरेदीपत्राद्वारे जमिन विकल्याचे कोणताही कागद/दस्तऐवज दाखल केलेले नाही, अशारीतीने खोटी केस मांडत आहे. 6. गैरअर्जदार क्र. 3 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश मंचाने पारित केलेले आहे. 6. 7. उभय पक्षाचे शपथेवरील लेखी कथन, दाखल कागदपत्रांचे सुक्ष्म वाचन केले असता व दोन्ही पक्षांचे युक्तीवाद काळजीपूर्वक ऐकले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. 7. -निष्कर्ष- 8. तक्रारकर्ती ही ग्राहक नाही आणि तिने व्यावसायिक कारणास्तव प्लॉट खरेदी केलेले आहे. परंतू गैरअर्जदाराने स्वतः मान्य केले आहे की, गैरअर्जदार ही भागीदारी संस्था आहे आणि इतर गैरअर्जदार हे त्यांचे भागधारक आहेत. गैरअर्जदारांनी स्वतःच्या नावांनी जमिन खरेदी करुन विकण्याचा व्यवसाय केलेला आहे असे कागदपत्रावरुन स्पष्ट होते. म्हणून मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांची ग्राहक आहे. 9. तक्रारकर्ती व गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांचेतील झालेला करार मंचाने तपासला असता प्रस्तुत तक्रार सदर करारानुसार. आणि यामध्ये भरण्यापोटी रु.6,51,000/- मिळाल्याची नोंद आहे. सदर करारनाम्यानुसार तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना रक्कम दिलेली आहे असे तक्रारकर्तीचे शपथेवर कथन आहे. गैरअर्जदाराने सदर करारनाम्याबद्दल आक्षेप घेत नमूद केले की, सदर दिवशी तक्रारकर्तीने फक्त रु.51,000/- दिलेले आहे आणि उर्वरित रक्कम दिलेली नाही. असे जर असते दि.21.04.2007 पासून गैरअर्जदाराने कधीही कोणताही आक्षेप तक्रारकर्तीकडे नोंदविला नाही. याउलट यादी नि.क्र.21 सोबत दाखल दस्तऐवज क्र. 2 पृष्ठ क्र. 58 वर असे नमूद केले आहे की, तक्रारकर्तीने करारानुसार उर्वरित रक्कम त्वरित जमा करावी अन्यथा गैरअर्जदार क्र. 5 सदर जमिन इतर व्यक्तीला विकतील. सदर दस्तऐवज गैरअर्जदाराने दाखल केलेले आहे. यावरुन मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीकडून रु.6,51,000/- घेतलेले आहेत व ते त्यांना मिळालेले आहेत. 10 मंचासमक्ष दुसरा मुद्दा असा उपस्थित होतो की, प्रकरणात करारानुसार विक्रीपत्र न होण्यास तक्रारकर्ते किंवा गैरअर्जदार यापैकी कोण जबाबदार आहेत. गैरअर्जदाराने मंचासमक्ष तक्रारकर्तीवर कमी पैसे दिल्याचे खोटे आक्षेप लावलेले आहेत. तसेच गैरअर्जदाराने करारभंग केल्याचे तक्रारकर्तीचे आक्षेप आहे. सदर करार हा 21.04.2007 पासून तक्रारकर्तीनुसार 21.12.2007 ला तक्रारीला कारण घडलेले नाही. तक्रारकर्तीने कोणतीही नोटीस गैरअर्जदारांना दिलेली दिसून येत नाही. गैरअर्जदाराने दिलेले पत्र फक्त पैसे मागणारे आहे. गैरअर्जदार स्वतः विक्रीपत्रांतर्गत मालमत्तेचे प्रत्यक्ष मालक नव्हते. त्यांनीसुध्दा करारांतर्गत गैरअर्जदार क्र. 5 सोबत शेतजमीन खरेदी करण्याचा सौदा केला होता व त्या करारातून अपेक्षीत खरेदी होणारी जमिन गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला विकलेली आहे. मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, गैरअर्जदार क्र. 1 ते 4 ने स्वतः कराराचा भंग केलेला आहे, कारण ते स्वतः जमिनीचे मालक नव्हते आणि त्यांनी जमिनीचे मालकी हक्क स्वतःकडे करुन घेतलेले नव्हते. अशा स्थितीत मंचाचे स्पष्ट मत आहे की, गैरअर्जदार हे दोषी आहेत आणि त्यांनी तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 11. तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र. 5 विरुध्द कोणतेही आक्षेप सिध्द केलेले नाही आणि ती प्रत्यक्ष गैरअर्जदार क्र. 5 ची ग्राहक नसून त्यांनी कशी दोषपूर्ण सेवा दिलेली आहे हे सिध्द होत नाही, म्हणून गैरअर्जदार क्र. 5 विरुध्द तक्रार खारीज करणे कायदेशीर व न्यायोचित राहील. 12. तक्रारकर्तीने गैरअर्जदाराकडून सदर मालमत्तेचे विक्रीपत्र करुन मिळावे किंवा दिलेली रक्कम परत मिळावी व इतर अनुतोष मागितलेला आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांचेतील व्यवहाराबद्दल उभय गैरअर्जदार शांत आहेत. अशा स्थितीत तक्रारकर्तीला तिची रक्कम परत करण्याचे आदेशीत करणे कायदेशीर व न्यायोचित राहील. तक्रारकर्तीला या प्रकरणात नक्कीच मानसिक त्रास झालेला आहे. परंतू तिनेसुध्दा बराच कालावधी कधीही कोणताही लेखी पाठपुरावा गैरअर्जदारांकडे केलेला नाही असे स्पष्ट होते आणि गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला करारनामा पूर्ण करण्याचे पत्र पाठविले आहे असे जरीही असले तरीहीदेखील ती काही अंशी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्ती तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे. करीता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. 12. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) तक्रारकर्ती गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांची ग्राहक असून त्यांनी तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 3) गैरअर्जदार क्र. 1 ते 4 ने तक्रारकर्तीला तिच्याकडून घेतलेले रु.6,51,000/- तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम चुकती होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह देय करावी. 4) गैरअर्जदार क्र. 1 ते 4 ने तक्रारकर्तीला नुकसान भरपाईदाखल रु.10,000/- देय करावे. 5) गैरअर्जदार क्र. 1 ते 4 ने तक्रारकर्तीला तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- देय करावे. 6) गैरअर्जदार क्र. 5 विरुध्द तक्रार खारीज करण्यात येते. 7) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे. 8) तक्रारकर्त्याने दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे.
| [HONABLE MR. Mr. Milind R. Kedar] Member[HONABLE MR. Ramlal Somani] PRESIDENT | |