श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 25 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणारांबरोबर सि.सर्व्हे नं. 99 ब, मंगळवार पेठ, पुणे येथील बी विंग, 3रा मजला सदनिका क्र.5, क्षेत्रफळ 550 चौ.फुट मालकी हक्काने खरेदी करण्यासाठी दिनांक 17/4/2001 रोजी नोंदणीकृत करारनामा केला. या सदनिकेची किंमत रुपये 5,60,000/- इतकी ठरली होती. तक्रारदारांनी जाबदेणार यांना वेळोवेळी रुपये 5,54,000/- दिले. परंतू जाबदेणार यांनी सदनिकेचे बांधकाम अपुर्ण ठेवले, खरेदीखत/डिड ऑफ अपार्टमेंट/डिड ऑफ ट्रान्सफर करुन दिलेले नाही. सप्टेंबर 2005 मध्ये जाबदेणार बांधकाम अपूर्ण सोडून निघून गेले. सदनिकेमध्ये ति-हाईत इसम घुसलेले होते, त्यांना बाहेर काढून तक्रारदारांनी सदनिकेचे अपुर्ण बांधकाम पुर्ण करुन घेतले. त्यासाठी तक्रारदारांना रुपये 92,320/- खर्च आला. जाबदेणार यांनी वीज पुरवठा दिलेला नाही, कर भरलेला नाही. वीज पुरवठयासाठी जाबदेणार यांनी रुपये 25,000/- तक्रारदारांकडून घेतलेले आहे. सदनिकेचे अर्धवट बांधकाम, वीज मिटर, पुणे म.न.पा चा कर, पाणी, नळ कनेक्शन यासाठी एकूण रुपये 25,000/- तक्रारदारांना खर्च आलेला आहे. तक्रारदारांनी सदनिकेची किंमत रुपये 5,54,000/- अधिक एम.एस.ई.बी चार्जेस व इतर रक्कम रुपये 46,000/- अशी एकूण रक्कम रुपये 6,50,000/- जाबदेणार यांनी घेतलेले आहे. करारनाम्याप्रमाणे सदनिकेचे बांधकाम केलेले नाही. सदनिकेचे ताबा पत्र, पुणे म.न.पा. चा पूर्णत्वाचा दाखल दिलेला नाही. सदनिकेचे खरेदीखत/डिड ऑफ अपार्टमेंट/डिड ऑफ ट्रान्सफर करुन दिलेले नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून सदनिकेचे अंतर्गत बांधकाम पूर्ण करुन घेण्याबाबतचा खर्च रुपये 92,320/-, वीज मिटर खर्च व सोसायटी स्थापन करणेबाब बिल्डरला दिलेली रक्कम रुपये 25,000/-, सदनिकेतील ति-हाईत इसमांचे सामान काढण्यासाठी आलेला खर्च रुपये 15,000/-, पाणी खर्च रुपये 10,000/-, पुणे म.न.पा कडून ऑक्युपायर दाखला मिळविण्यासाठी आलेला खर्च रुपये 5,000/-, सदनिकेतील अंतर्गत लाईट, पंखे बाबतचा खर्च रुपये 10,115/-, रुपये 5,54,000/- जाबदेणार यांनी 2001 पासून वापरली त्यावर 10 टक्के प्रमाणे व्याज रुपये 4,98,600/-, मुदतीत ताबा न दिल्यामुळे नुकसान भरपाई रुपये 1,00,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रुपये 1000/- एकूण रुपये 7,61,035/- 10 टक्के व्याजासह, सदनिकेचे ताबा पत्र / पुणे म.न.पा चा पूर्णत्वाचा दाखला, सदनिकेचे खरेदीखत/डिड ऑफ अपार्टमेंट/डिड ऑफ ट्रान्सफर करुन मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द मंचाने दिनांक 28/9/2010 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यामध्ये दिनांक 17/4/2001 रोजी नोंदणीकृत करारनामा झाल्याचे दिसून येते. तसेच जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 5,54,000/- मिळाल्याच्या पावत्या दिल्याचे दिसून येते. जाबदेणार यांनी सदनिकेचे बांधकाम पुर्ण केले नाही. अपुर्ण बांधकाम पुर्ण करुन घेण्यासाठी तक्रारदारांना रुपये 92,320/- खर्च आला यासदंर्भात तक्रारदारांनी पी.व्ही.जवळकर यांचे दिनांक 1/9/2008 चे एस्टिमेट दाखल केलेले आहे. तक्रारदारांनी लाईट पॉईन्ट व इतर किरकोळ कामांचे बील दाखल केलेले आहे. तक्रारदारांनी पुणे म.न.पा कर भरल्याचे दिसून येते. जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून सदनिकेची 99 टक्के रक्कम घेऊनही कराराप्रमाणे बांधकाम पूर्ण केले नाही, ताबा दिला नाही, खरेदी खत, पुर्णत्वाचा दाखला दिला नाही, नळ, पाणी, वीज या सोई दिल्या नाहीत. ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब आहे. तक्रारदारांना स्वत:ला सोई करुन घ्याव्या लागल्या. तक्रारदार कॅन्सर पेशंट आहेत. यासर्वांमुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल. म्हणून तक्रारदार नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 50,000/- मिळणेस पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी जरी अंतर्गत बांधकाम करुन घेतले याबाबत पी.व्ही.जवळकर यांचे दिनांक 1/9/2008 चे एस्टिमेट दाखल केलेले असले तरीही श्री. जवळकर यांचे शपथपत्र, रक्कम मिळाल्याचा पुरावा व अन्य ठोस पुरावा दाखल केलेला नाही. म्हणून ती रक्कम मंच विचारात घेत नाही.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना सदनिकेचे ताबा पत्र व पुणे महानगर पालिकेचा पूर्णत्वाचा दाखला आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावा.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 50,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. जाबदेणार यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावा.
5. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.