नि. 23 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 185/2010 नोंदणी तारीख – 7/8/2010 निकाल तारीख – 26/11/2010 निकाल कालावधी – 109 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री भानुदास राजाराम कोळी, रा.शाहूनगर, सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री एस.बी.रुपनवर) विरुध्द 1. सैफी मोबाईल तर्फे प्रोप्रा. इद्रीस सैफी ब्लड बँकेसमोर, पाटस रोड, बारामती – 413 102 ----- जाबदार क्र.1 (एकतर्फा) 2. नोकिया केअर तर्फे मॅनेजर श्री उदय परांजपे व्हिजन इलेक्ट्रॉनिक्स, शॉप नं.13, बालाजी ट्रेड सेंटर, एस.टी.स्टँडजवळ, सातारा ----- जाबदार क्र.2 (अभियोक्ता श्री युवराज घोरपडे) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार क्र.1 यांचे दुकानातून नोकिया कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट दि.19/4/2008 रोजी खरेदी केला. परंतु सदरच्या हॅण्डसेटमध्ये तक्रारी येवू लागल्यामुळे त्यांनी तो जाबदार क्र.2 यांचेकडे दि.3/4/2009 रोजी दुरुस्तीसाठी दिला. परंतु जाबदार क्र.2 यांनी आजअखेर तो दुरुस्त करुन दिलेला नाही. त्यामुळे अर्जदार यांचे मोठया प्रमाणावर व्यावसायिक नुकसान झाले. जाबदार क्र.2 यांनी शेवटी दि.4/2/2010 रोजी सोमवारी हॅण्डसेट मिळेल असे लिहून दिलेले आहे. अर्जदार यांनी जाबदार क्र.2 यांना दि.9/7/2009 रोजी नोटीस पाठवून मोबाईलची मागणी केली व त्यानंतरही समक्ष भेट घेतली परंतु जाबदार यांनी मोबाईल दुरुस्त करुन देण्यास टाळाटाळ केली. सबब सदरचा हॅण्डसेट दुरुस्त करुन द्यावा अथवा मोबाईल बदलून मिळावा किंवा त्याची किंमत रु.15,000/- परत मिळावी, तसेच मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. जाबदार क्र.2 यांनी नि. 14 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार हॅण्डसेटमध्ये कोणता दोष आहे याची स्पष्ट कल्पना अर्जदार यांना दिलेली होती व त्याची नोंद सर्व्हिस जॉबशीटवर केलेली होती. तसेच हॅण्डसेट दुरुस्त करुन दिला जाईल, तो बदलून दिला जाणार नाही, तो दिल्ली येथील सर्व्हिस सेंटरला पाठवावा लागेल, दिल्लीहून तो एक महिन्यात परत येईल याची पूर्ण कल्पना अर्जदार यांना दिलेली होती. सदरचा मोबाईल दुरुस्त होऊन आलेनंतर तो घेवून जावा असे अर्जदार यांना कळविलेले होते. परंतु अर्जदार पुन्हा एक वर्षाची वॉरंटी मागू लागला व त्याचा हॅण्डसेट घेण्यास नकार देवू लागला. वॉरंटी कालावधी वाढवून देण्याचे अधिकार जाबदार क्र.2 यांना नसल्याने तसे त्यांनी अर्जदारला कळविले परंतु तो मोबाईल घेणेसाठी आजअखेर आलेला नाही. जाबदारने अर्जदारास सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 4. अर्जदार व जाबदार क्र.2 तर्फे युक्तिवाद ऐकला तसेच अर्जदार व जाबदार यांची दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 5. अर्जदारची तक्रार पाहता अर्जदारने जाबदार क्र.2 कडून मोबाईल दि.19/4/2008 रोजी खरेदी केला. हॅण्डसेट मधील बॅटरीमध्ये तसेच फोनमध्ये अडचणी येवू लागल्या. सबब दि.3/4/2009 रोजी जाबदार क्र.2 नोकिया केअर सेंटरकडे दुरुस्तीस दिला व अद्यापही त्यांनी तो दुरुस्त करुन दिला नाही. शेवटी दि.4/2/10 रोजी जाबदार क्र.2 यांनी हॅण्डसेट सोमवारी मिळेल असे लिहून दिले आहे. सबब मोबाईलची रक्कम रु.15,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- तसेच खर्च रु.5,000/- मिळावा अशी तक्रार दिसते. 6. जाबदार क्र.2 यांनी नि.14 कडे म्हणणे तसेच नि.15 कडे शपथपत्र दाखल केले आहे. जाबदारचे कथनानुसार हॅण्डसेट दिल्ली येथे पाठवला व तेथून एक महिन्यात येईल असे अर्जदारास सांगितले, हॅण्डसेट दुरुस्त होवून त्याचवेळेस आला आहे. अर्जदारास अनेक वेळा घेवून जा असे सांगितले पण अर्जदार नेत नाही. गॅरंटी वाढवून मागत आहे. अर्जदारचा मोबाईल वॉरंटी काळात आहे, दुरुस्त करुन दिला जाईल, बदलून दिला जाणार नाही असे सांगितले होते. हॅण्डसेटची वॉरंटी दि.19/4/2009 रोजीच संपली आहे. अर्जदारने दि.9/7/09 रोजी चुकीची नोटीस पाठविली आहे, ती बेकायदेशीर आहे, जाबदारने सदोष सेवा दिली नाही असे कथन केले आहे. 7. अर्जदारची दाखल कागदपत्रे पाहता नि. 5/4 कडे मोबाईलची मूळ पावती असून त्यामध्ये हॅण्डसेटी रक्कम रु.13,000/- आहे हे स्पष्ट आहे. तसेच हॅण्डसेट अद्यापही जाबदार क्र.2 कडे आहे हे स्पष्ट आहे. हॅण्डसेट दि.19/4/2008 रोजी घेतला आहे हे स्पष्ट आहे. नि.5/2 कडील जॉबशीट नुसार दि. 13/4/2008 रोजी हॅण्डसेट दुरुस्तीस दिला आहे हेही स्पष्ट आहे. परंतु अर्जदारची कथने पाहता दि.19/4/08 रोजी हॅण्डसेट दुरुस्तीसाठी दिला व त्यानंतर एकदम दि.9/6/09 रोजी अर्जदारने रजिस्टर्ड नोटीस पाठवून हॅण्डसेट अद्याप का दुरुस्त करुन दिला नाही याबाबत नोटीस पाठविली असे दिसते. म्हणजे जवळजवळ दीड वर्षे रु.13,000/- चा हॅण्डसेट देवून अर्जदार स्वस्थ बसले होते हे पटण्यासारखे नाही. तसेच जाबदार क्र.2 चे कथन पाहता हॅण्डसेट दिल्ली येथे दुरुस्तीसाठी पाठविला पाहिजे व एक महिन्यात तो परत येईल हे कथन विश्वासार्ह वाटत नाही कारण नोकिया कंपनीचे जाबदार क्र.2 हे केअर सेंटर आहे. सबब मोबाईल दुरुस्तीसाठी दिल्लीला पाठविला पाहिजे हे खरे वाटत नाही. त्याचबरोबर हॅण्डसेट दुरुस्त करुन दिला जाईल, तो बदलून दिला जाणार नाही याची पूर्वकल्पना अर्जदारला दिली होती हे जाबदार क्र.2 चे कथन बरोबर वाटत नाही कारण हॅण्डसेट बदलून द्यायचा किंवा नाही हे ठरविण्याचा जाबदार क्र.2 यांना अधिकार नाही. त्यांना फक्त मोबाईल दुरुस्त होतो किंवा नाही एवढेच सांगण्याचा अधिकार आहे. जाबदार क्र.2 यांनी मोबाईल हॅण्डसेट दुरुस्त झाल्याबरोबर घेवून जावे असे अनेकवेळा फोनवरुन कळविलेले होते या कथनाचे पृष्ठयर्थ त्यांचे स्वतःचे कथनाशिवाय कोणताही पुरावा दिसून येत नही. तसेच दि.9/7/09 रोजी अर्जदारने नोटीस पाठविल्यानंतर जाबदार क्र.2 ने नोटीसीस उत्तर न पाठविता केवळ फोनवरुन संपर्क साधला हे कथन विश्वासार्ह वाटत नाही व जानेवारी 2010 अखेर तक्रारदार मोबाईल घेण्यासाठी आलेच नव्हते हेही कथन विश्वासार्ह वाटत नाही. तसेच अर्जदारने दि.3/4/2009 रोजी हॅण्डसेट दुरुस्तीसाठी दिलेनंतर दि.4/2/2010 रोजी दु.4.00 वाजता हॅण्डसेट मिळेल असे जाबदार क्र.2 ने लिहून दिले होते हेही विश्वासार्ह वाटत नाही. कारण 2008 मध्ये दुरुस्तीसाठी घेतलेला मोबाईल 2 वर्षानंतर मिळेल असे कोणी लिहून दिले असेल हे खरे वाटत नाही. निर्विवादीतपणे रक्कम रु.13,000/- चा मोबाईल अर्जदारने जाबदार क्र.1 यांचेकडून विकत घेतलेला आहे व अद्यापही जाबदार क्र.2 कडे आहे हे स्पष्ट आहे. 8. अर्जदारने हॅण्डसेट बदलून मागितला आहे परंतु अर्जदारने हॅण्डसेटचे उत्पादक कंपनीला याकामी पक्षकार म्हणून सामील केलेचे दिसून येत नाही. 9. अर्जदारने वॉरंटी कालावधीमध्ये हॅण्डसेट दुरुस्तीसाठी जाबदार क्र.2 कडे दिलेला होता हे स्पष्ट आहे. परंतु अर्जदार व जाबदार क्र.2 यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता अर्जदार व जाबदार क्र.2 हे स्वच्छ हाताने मे.मंचासमोर आलेले नाहीत हे स्पष्ट आहे. सबब केवळ हॅण्डसेट व्यवस्थित चालेल याप्रमाणे दुरुस्त करुन मिळण्यास अर्जदार हे पात्र आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 10. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांचा मोबाईल नोकिया एन-73 व्यवस्थित चालू होईल याप्रमाणे विनामूल्य दुरुस्त करुन द्यावा. 3. तसेच सदर मोबाईल नोकिया एन-73 आजपासून एक वर्षापर्यंत पुन्हा बिघडल्यास पुन्हा विनामूल्य दुरुस्त करुन द्यावा. 4. जाबदार क्र.1 व 2 यांनी या तक्रारीचा खर्च तसेच मानसिक त्रासासाठी अर्जदार यांना रक्कम रु. 3,000/- (तीन हजार) द्यावेत. 5. जाबदार क्र.1 व 2 यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 26/11/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |