जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 204/2009
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 10/02/2009
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 16/04/2009
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 13/08/2009
सैफी स्टोअर्स, अंमळनेर, जि.जळगांवचे
प्रोप्रा.कलीमउद्यीन इनायतअली,
रा.अंमळनेर, ता.अंमळनेर, जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. श्री साई ट्रान्सपोर्ट आणि कुरीयर प्रा.लि.,
पत्ता 1, कुशल नगर, कुशल मंगल कार्यालय बिल्डींग,
जालना रोड, औरंगाबाद, ता.जि.औरंगाबाद.
2. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे
आगार प्रमुख, अंमळनेर एस.टी.स्टॅण्ड आवार,
मु.पो.अंमळनेर, ता.अंमळनेर, जि.जळगांव. ....... सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 13/08/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री.दिलीप बी.मंडोरे वकील हजर
सामनेवाला क्र. 1 तर्फे श्री.अनिल पी.मालनी वकील हजर.
सामनेवाला क्र. 2 एकतर्फा.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. तक्रारदार यांचा बि-बियाणे, खते व किटकनाशक औषधी विक्रीचा व्यवसाय असुन तक्रारदार यांनी अंमळनेर येथे दि.24/6/2008 रोजी पावती क्रमांक 2339181 प्रमाणे कापुस बियाणे 900 ग्रॅम वजनाचे प्रत्येकी 16 नग पॅकेटस असे मिळुन एक पेटी एकुण रक्कम रु.20,800/- चा माल मे.संघवी कृषी सेवा केंद्र, गांधी चौक, पाचोरा, ता.पाचोरा, जि.जळगांव या पत्यावर पोहोच करण्यासाठी सामनेवाला क्र. 1 यांचेकडे पार्सल बुक केलेले होते. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराकडुन त्यापोटी रु.25/- एवढी रक्कम आकारणी करुन त्याबाबत तक्रारदारास दि.24/6/2008 रोजीची पावती क्र.2339181 दिलेली आहे. तथापी सामनेवाला क्र. 1 यांनी इच्छित स्थळी माल न पोहचविल्याने तक्रारदाराने समक्ष चौकशी केली असता सदरचा माल हा बस क्रमांक एम.एच.20/6109 मेमो नंबर 2550650 प्रमाणे पाचोरा येथे गेला व सामनेवाला क्र. 1 चे पाचोरा येथील कार्यालयातील कैलास नामक व्यक्तीने सदर माल पार्टीला पोहचविलेचे सांगीतले तथापी उपरोक्त माल हा मे.संघवी कृषी सेवा केंद्र, गांधी चौक, पाचोरा, ता.पाचोरा,जि.जळगांव यांना अद्याप मिळालेला नाही. तक्रारदार व मे.संघवी कृषी सेवा केंद्र यांनी त्यानंतर सामनेवाला क्र. 1 चे मुख्य कार्यालय व शाखा कार्यालय, अंमळनेर व पाचोरा येथे दि.15/7/2008 , दि.7/7/2008 रोजी व दि.29/10/2008 रोजी तक्रार अर्ज देऊन देखील सामनेवाला यांचेकडुन कुठलाही ठोस खुलासा व माल मिळाल्याबाबत पोहोच दिलेली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे दिलेला माल इच्छीत स्थही न पोहचविल्यामुळे तसेच सामनेवाला यांचे दिरंगाईमुळे सदरचा माल मुदतबाहय झाल्याने व तक्रारदाराची व्यापाराची पत कमी झाल्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झालेले आहे. सबब तक्रारदारास मालाचे नुकसानीपोटी रु.20,800/- , शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारदाराची व्यापाराची पत कमी झाल्याबाबत रक्कम रु.30,000/- अशी नुकसानी सामनेवाला यांचेकडुन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
2. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांची तक्रार नाकारली आहे. तक्रारदार हे स्वच्छ हाताने मंचासमोर आलेले नाहीत. तक्रारदाराने पार्सल रिसीटची पाठीमागील बाजुकडील छापलेली नोट शिट मंचापासुन लपवुन ठेवलेली आहे. याचाच अर्थ तक्रारदाराने त्याचे स्वार्थासाठी अर्धवट कागदपत्रे सादर केली आहेत. तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 2(डी)(1) नुसार ग्राहक नसल्याने प्रस्तुत तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. तक्रारदाराने पार्सल पावतीचे पाठीमागे नमुद अटी व शर्ती मान्य करुनच सामनेवाला यांचेशी व्यवहार केलेला होता. सबब नमुद अटी व शर्ती तक्रारदारावर बंधनकारक आहेत. तक्रारदाराने दि.24/6/2008 रोजी सामनेवाला यांचेकडे पार्सल अंमळनेर येथुन पाचोरा येथे पोहोच करणेसाठी देतेवेळेस त्याने पार्सलची किंमत घोषीत केलेली नव्हती तसेच त्याने पार्सलचा विमा देखील उतरविलेला नव्हता अगर विमा प्रिमीयमपोटी रक्कम देखील दिलेली नव्हती. जर पार्सलची किंमत ही रक्कम रु.1,000/- पेक्षा जास्त असले तर त्याचा विमा उतरविणे पार्सल पाठवणा-यावर बंधनकारक असतो. पार्सल ची किंमत रक्कम रु.20,800/- असल्याचे कथन सामनेवाला यांना मान्य व कबुल नाही. तक्रारदाराने कापसाचे बियाणे सन 2008 चा हंगाम संपल्यानंतर पाठविले. कपाशी बियाणे विक्रीचा कालावधी एप्रिल ते 15 जुन,2008 असा असतांना तक्रारदाराने सन 2008 चा हंगाम संपल्यानंतर पाठविलेले बियाणे हे पेरणीस निरुपयोगी असुन अशा परिस्थितीत तक्रारदाराचे झालेल्या तथाकथीत नुकसानीची जबाबदारी सामनेवाला यांचेवर येणार नाही. सबब वरील सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी व तक्रारदाराकडुन सामनेवाला क्र. 1 यांना कॉम्पेनसेटरी कॉस्ट रक्कम रु.1,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती सामनेवाला क्र. 1 यांनी केली आहे.
3. सामनेवाला क्र. 2 यांना या मंचामार्फत रजिस्ट्रर ए.डी.नोटीस पाठविली तथापी सामनेवाला क्र. 2 हे प्रस्तुत प्रकरणी हजर न झाल्याने सामनेवाला क्र. 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले.
3. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला क्र. 1 यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयंतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
5. मुद्या क्रमांक 1 सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांचे तक्रारीकडे व त्यात दाखल कागदपत्राकडे वेधले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेमार्फत त्यांचा माल कुरीयने पाठविलेला आहे. परंतु विम्याचे अटी व शर्तीप्रमाणे सदरील मालाचा विमा करावयास पाहिजे तो त्यांनी केल्याबाबत तक्रारदार यांनी कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही.
तक्रारदार यांनी त्यांचे पार्सल पाठविलेले आहे त्याबाबत सामनेवाला यांनी तक्रारदार यांना पावती दिलेली आहे सदरील पावतीची मागील बाजू पाहिली असता त्यात काही नियम उल्लेखीत केलेले आहे. त्यात नियम क्रमाक 2 मध्ये उल्लेख केलेला आहे की, रुपये 1000/- चे मालासाठी रक्कम रुपये 2/- चा विमा करावा लागेल, तसेच नियम क्रमांक 3 मध्ये उल्लेख केलेला आहे की, जर पार्टीने विमा काढलेला असेल तर सामनेवाला यांची जबाबदारी रक्कम रुपये 50/- ते 500/- पर्यंत सिमीत राहील. तक्रारदार यांनी कुरीयर पाठविल्याची पावती दाखल केलेली आहे परंतु सदरील पावतीची मागील बाजुची झेरॉक्स तक्रारदार यांनी दाखल केलेली नसून ती सामनेवाला यांनी तक्रारीत दाखल केलेली आहे.
तक्रारदार यांचे वादग्रस्त पार्सल सामनेवाला यांनी इच्छीत स्थळी पोहोचते केल्याबाबत सामनेवाला यांनी तक्रारीत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही म्हणजेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे पार्सल गहाळ केल्याचे सिध्द होते. परंतु तक्रारदार यांनी त्यांचे पार्सलचा विमा काढलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार हे नियमाप्रमाणे प्रती पार्सलसाठी सामनेवाला यांचेकडून रक्कम रुपये 500/- मागणेस हक्कदार आहेत. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं. 1 व 2 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांचे पार्सलचे नुकसानीपोटी तक्रारदार यांना रक्कम रुपये 500/- द.सा.द.शे . 9 टक्के व्याजासह तक्रार दाखल तारखेपासून तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( क ) सामनेवाला क्रं. 1 व 2 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 500/- देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं. 1 व 2 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( इ ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 13/08/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव