श्रीमती गौरी मा.कापसे, मा.सदस्या यांचेद्वारे
1) तक्रारदार हे सामनेवाले संस्थेचे सभासद असून, ते नियमितपणे सामनेवाले संस्थेला देखभाल खर्च अदा करतात. सामनेवाले क्र.2 व 3 हे सामनेवाले संस्थेचे अनुक्रमे अध्यक्ष व सचिव असून, सामनेवाले क्र.4 हे देखील सामनेवाले संस्थेचे सभासद आहेत. तक्रारदाराने सदरची तक्रार ही सामनेवाले क्र.1 ते 4 यांनी दिलेल्या दोषयुक्त सेवेबाबत दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे ः-
अ) तक्रारदार हे सामनेवाले संस्थेच्या इमारतीमधील सातव्या मजल्यावरील सदनिका क्र.707 चे रहीवाशी असून, सामनेवाले क्र.4 हे आठव्या मजल्यावरील सदनिका क्र.807 चे रहीवाशी आहेत. मागील दोन वर्षांपासून सामनेवाले क्र.4 यांच्या सदनिकच्या बाथरुममधुन तक्रारदाराच्या बेडरुम व किचनमध्ये पाण्याची गळती होत असल्याने, तक्रारदाराचे जवळपास रक्कम रु.3,00,000/- इतके आंतरीक सजावटीचे नुकसान झाले. याबाबत, त्यांनी सामनेवाले क्र.4 यांना कळविले असता, त्यांनी प्रथम त्यांचे सदनिकेमधुन गळती होत नसल्याचे सांगितले; परंतू, तक्रारदाराने विनंती केल्यानंतर सामनेवाले क्र.4 यांनी त्यांचे बाथरुम व नळ वापरणे काही दिवस बंद केले. त्यानंतर तक्रारदाराच्या सदनिकेत गळती होत नव्हती; परंतू, सामनेवाले क्र.4 यांनी पुन्हा सदर बाथरुम व नळ वापरण्यास सुरुवात केल्यानंतर तक्रारदाराच्या सदनिकेत पुन्हा गळती सुरु झाली. सबब, तक्रारदाराने सामनेवाले क्र.4 यांना सदर बाथरुमची दुरुस्ती करण्यास सांगितले; परंतू, त्यास त्यांनी नकार दिला. सदरची बाब तक्रारदाराने सामनेवाले क्र.1 ते 3 यांना देखील कळविली. परंतू, त्यांनी त्यास कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही.
ब) तक्रारदाराने त्यांच्या किचनची जवळपास दोनवेळा दुरुस्ती केली असून, त्यास त्यांना रक्कम रु.24,000/- खर्च आला. सदर गळतीमुळे तक्रारदाराच्या आंतरीक सजावटीचे नुकसान झाले तर शॉर्टसर्कीट होण्यापासून देखील तक्रारदाराने थांबवले. सबब, तक्रारदाराने सामनेवाले क्र.1 ते 4 यांना नोटीस देखील पाठविली. परंतू, तरीही त्यांनी दुरुस्ती करण्यास नकार दिला.
क) अशाप्रकारे सामनेवाले क्र.1 ते 4 यांनी तक्रारदारास दोषयुक्त सेवा दिल्याने, तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल करुन, सामनेवाले क्र.1 ते 4 यांनी तक्रारदारास दुरुस्ती खर्च रक्कम रु.3,00,000/-, झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.50,000/- इ. मागण्या पूर्ण होऊन मिळण्याची विनंती केली आहे.
2) तक्रारदारांची तक्रार आयोगाने दाखल केल्यानंतर सामनेवाले क्र.1 ते 4 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला व त्याद्वारे तक्रारदारांच्या तक्रारीतील आरोप फेटाळले आहेत. सामनेवाले क्र.1 ते 3 यांच्या जबाबानुसार, सामनेवाले संस्था ही उपविधीप्रमाणे कामकाज करत असून, उपविधी नियमावलीच्या बाहेर जाऊन संस्था कामकाज करत नाही. सदनिकेतील आंतरीक गळती हा विषय संस्थेच्या अखत्यारीत येत नसला तरी, तक्रारदाराची समस्या दुर करणेकामी सामनेवाले संस्थेने पुरेशी मदत केलेली आहे. सामनेवाले क्र.4 यांचे जबाबानुसार तक्रारदार व सामनेवाले क्र.4 यांचेमध्ये ग्राहक व सेवा पुरवठादार अगर सेवा देणारे असे नाते तयार होत नाही. सबब, सामनेवाले क्र.4 यांनी तक्रारदारास कोणतीही दोषयुक्त सेवा दिलेली नाही. सामनेवाले क्र.1 ते 4 यांनी तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
3) तक्रारदार व सामनेवाले क्र.4 यांनी त्यांचे पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला असून तोंडी युक्तिवादाबाबत पुरसिस दाखल केली आहे. सामनेवाले क्र.1 ते 3 यांना पुरेशी संधी देऊनही त्यांनी त्यांचे पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला नाही. तसेच तोंडी युक्तिवादासाठीसुध्दा ते गैरहजर होते. सबब, आयोगाद्वारे सदर तक्रारीच्या निवारार्थ खालील मुद्यांवर विचार करुन निष्कर्ष नोंदविण्यात आले.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1. | ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रारदार हे सामनेवाले क्र.4 यांचे ग्राहक आहेत काय ? | नाही |
2. | तक्रारदार यांनी सबळ पुराव्यानिशी सामनेवाले यांनी त्यांना दोषयुक्त सेवा दिल्याचे सिध्द केले आहे काय ? | नाही |
3. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 व 2
4) सामनेवाले क्र.4 हे देखील तक्रारदाराप्रमाणे सामनेवाले संस्थेचे सभासद असून, सामनेवाले क्र.4 हे तक्रारदार यांना कोणत्याही प्रकारची सेवा देत नाही. तसेच तक्रारदार हे संस्थेकडून घ्यावयाच्या सेवांसाठी सामनेवाले क्र.4 यांना कोणताही मोबदला देत नाहीत. सबब, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रारदार व सामनेवाले क्र.4 यांचेमध्ये ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते प्रस्थापित होत नाही.
5) तक्रारदाराच्या तोंडी पुराव्यानुसार त्यांच्या सदनिका क्र.707 च्या किचन व बाथरुमध्ये सामनेवाले क्र.4 यांच्या सदनिका क्र.807 च्या बाथरुम मधुन गळती होत असून, सदर गळतीमुळे त्यांच्या आंतरीक सजावटीवर परिणाम होऊन जवळपास रक्कम रु.3,00,000/- इतके नुकसान झाले व त्यांना जवळपास रक्कम रु.24,000/- इतका दुरुस्ती खर्च आला.
6) सदर गळतीमुळे तक्रारदारास रक्कम रु.3,00,000/- व रक्कम रु.24,000/- हे अनुक्रमे आंतरीक सजावटीकरीता तसेच दुरुस्ती करणेकामी खर्च केल्याबाबतचा पुरावा तक्रारदाराने दाखल केला नाही. सदर खर्चाबाबतचे कोटेशन, बिल अगर दुरुस्ती करणा-याचे प्रतिज्ञापत्र इ.बाबींचा अभाव असल्याने, तक्रारदारांच्या फक्त तोंडी पुराव्यावर विश्वास ठेवता येत नाही. सामनेवाले संस्थेशी पत्रव्यवहार केला किंवा त्यांचेपर्यंत सदर दुरुस्तीची बाब पोहोचवली, याबाबत देखील तक्रारदाराने कोणताही पुरावा दाखल केला नाही.
7) तक्रारदाराने तोंडी पुराव्याव्यतिरीक्त कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री पुरावा अगर प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही. अभिलेखावर फक्त गळती झालेल्या भागाचे छायाचित्र दाखल केले आहे. सदर छायाचित्र हे वेळ, जागा किंवा ठिकाण तसेच सदरचे फोटो/छायाचित्र कधी काढलेले आहे तसेच फोटोग्राफरचे प्रतिज्ञापत्र इ. महत्वाच्या घटकांअभावी तक्रारदाराचा फक्त दाखल केलेल्या छायाचित्रांचा पुरावा नाकारण्याशिवाय पर्याय नसल्याने तसे केले आहे. सबब, तक्रारदाराची सदरची तक्रार ही पुराव्याच्या अभावामुळे सिध्द होत नसल्याने, ती खारीज करण्याशिवाय पर्याय नसल्याने तसे केले आहे. परिणामी, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक CC/83/2019 खारीज करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
3. या आदेशाची प्रत उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात यावी.