न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार यांचे मुलीचे लग्न ठरले होते. सदर लग्नाची तारीख दि. 17/05/2020 अशी निश्चित केली होती. जाबदार यांचे मंगल कार्यालय आहे. तक्रारदारांनी जाबदार यांचेशी संपर्क साधून दि.17/5/2020 रोजी जाबदार यांचे मंगल कार्यालय आरक्षित केले. त्यासाठी रक्कम रु.1,35,000/- इतके भाडे ठरविण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी रक्कम रु.2,000/- आगाऊ रक्कम म्हणून जाबदार यांना दि. 18/2/20 रोजी अदा केली. तदनंतर दि. 21/2/20 रोजी तक्रारदार यांनी रक्कम रु.48,000/- जाबदार यांचेकडे हॉलचे भाडयापोटी जमा केली. सदर दोन्ही रकमांच्या पावत्या जाबदार यांनी तक्रारदार यांना दिल्या आहेत. परंतु दि. 23/3/2020 पासून कोवीड या साथीच्या रोगामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे तक्रारदाराचे मुलीचा विवाह दि.17/5/2020 रोजी जाबदार यांचे मंगल कार्यालयात होवू शकला नाही. म्हणून तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे त्यांनी दिलेल्या रक्कम रु. 50,000/- ची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत करणेस असमर्थतता दर्शविली. सबब, तक्रारदार यांनी जाबदार यांना वकीलामार्फत दि. 27/6/2023 रोजी नोटीस पाठविली. परंतु तरीही जाबदार यांनी रक्कम परत केली नाही. अशा प्रकारे जाबदार यांनी रक्कम रु.50,000/- परत न करुन तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून रक्कम रु.50,000/- परत मिळावेत, सदर रकमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळावे, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- व अर्जाचा खर्च जाबदारकडून मिळावेत अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत तक्रारदारांनी जाबदारांकडे जमा केलेल्या रकमांच्या पावत्या, जिल्हाधिकारी सातारा यांनी निर्बंध लागू केल्याबाबतचे आदेश, तक्रारदारांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस व सदर नोटीसची पोचपावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्रही दाखल केले आहे.
4. प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस जाबदार यांना मिळूनही जाबदार हे याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, जाबदार यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे, तसेच तक्रारदाराचा युक्तिवाद यांचे अवलोकन करुन खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदारने तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार जाबदार यांचेकडून रक्कम रु.50,000/- परत मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
6. तक्रारदार यांचे कथनानुसार, तक्रारदार यांचे मुलीचे लग्न ठरले होते. सदर लग्नाची तारीख दि. 17/05/2020 अशी निश्चित केली होती. जाबदार यांचे मंगल कार्यालय आहे. तक्रारदारांनी जाबदार यांचेशी संपर्क साधून दि.17/5/2020 रोजी जाबदार यांचे मंगल कार्यालय आरक्षित केले. त्यासाठी रक्कम रु.1,35,000/- इतके भाडे ठरविण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी रक्कम रु.2,000/- आगाऊ रक्कम म्हणून जाबदार यांना दि. 18/2/20 रोजी अदा केली. तदनंतर दि. 21/2/20 रोजी तक्रारदार यांनी रक्कम रु.48,000/- जाबदार यांचेकडे हॉलचे भाडयापोटी जमा केली. सदर दोन्ही रकमांच्या पावत्या अनुक्रमे पावती क्र.605 व 606 जाबदार यांनी तक्रारदार यांना दिल्या आहेत. सदरच्या पावत्या याकामी तक्रारदाराने दाखल केल्या आहेत. जाबदार यांनी याकामी सदरची बाब हजर होवून नाकारलेली नाही. या बाबीचा विचार करता तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे.
मुद्दा क्र.2
7. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात असे कथन केले आहे की, दि. 23/3/2020 पासून कोवीड या साथीच्या रोगामुळे संपूर्ण देशात संचारबंदी व निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे तक्रारदाराचे मुलीचा विवाह दि.17/5/2020 रोजी जाबदार यांचे मंगल कार्यालयात होवू शकला नाही. म्हणून तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे त्यांनी दिलेल्या रक्कम रु. 50,000/- ची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत करणेस असमर्थतता दर्शविली. सबब, तक्रारदार यांनी जाबदार यांना वकीलामार्फत दि. 27/6/2023 रोजी नोटीस पाठविली. परंतु तरीही जाबदार यांनी रक्कम परत केली नाही. अशा प्रकारे जाबदार यांनी रक्कम रु.50,000/- परत न करुन तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे.
8. तक्रारदाराची सदरची कथने जाबदार यांनी याकामी हजर राहून नाकारलेली नाही. जाबदार यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होवूनही जाबदार हे याकामी हजर झाले नाहीत. सबब, जाबदार यांचेविरुध्द दि.2/11/2023 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आला. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदार यांनी जाबदार यांना वकीलामार्फत दि. 27/6/2023 रोजी नोटीस पाठविली. परंतु तरीही जाबदार यांनी रक्कम परत केलेली नाही. तक्रारदारांनी आपले तक्रारअर्जातील कथनांचे शाबीतीसाठी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराचे शपथेवरील कथनांचा विचार करता तक्रारदाराने आपली तक्रार शाबीत केली आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, जाबदार यांनी तक्रारदार यांना मंगल कार्यालयाचे बुकींगपोटी अदा केलेली रक्कम रु.50,000/- अदा न करुन तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
मुद्दा क्र.3
9. सबब, तक्रारदार हे सदरची रक्कम रु.50,000/- जाबदार यांचेकडून परत मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे दि. 17/05/2020 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच जाबदारांनी तक्रारदारास सदोष सेवा दिल्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच या आयोगात तक्रारअर्ज दाखल करावा लागला. या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु. 5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार यांनी तक्रारदारास रक्कम रु.50,000/- अदा करावी तसेच सदर रकमेवर दि. 17/05/2020 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
- जाबदार यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी निकाल तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.