जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ३२/२०११
तक्रार दाखल दिनांक – ११/०२/२०११
तक्रार निकाली दिनांक – २४/११/२०१४
अशपाक अब्बास खाटीक
उ.व.-३३, कामधंदा – नोकरी,
राहणार – नाहळोद, ता.जि.धुळे . तक्रारदार
विरुध्द
साई इलेक्ट्रॉनिक्स
१-२ राधाकृष्ण कॉम्प्लेक्स, राजवाडे बॅंकेसमोर,
- , ता.जि. धुळे . सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्ष – श्री.व्ही.आर. लोंढे)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.एम.एस. शाह)
(सामनेवालातर्फे – अॅड.श्री.ए.आर. साळे)
निकालपत्र
(द्वारा मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. सामनेवाले यांनी नादुरूस्त फ्रिज बदलून द्यावा या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी सामनेवाले यांच्याकडून दि.२३/०९/२००८ रोजी केलव्हीनेटर कंपनीचा फ्रिज खरेदी केला होता. त्याचा मॉडेल क्र. के.बी.१८५ एस.आर.नंबर ११०४०८२६१३/१२३००७५ असा आहे. सामनेवाले यांनी फ्रिज सोबतपाच वर्षांचे वॉरंटी कार्ड दिले होते. फ्रिज खरेदीपासूनच त्याला थंड होण्याची समस्या होती. त्याबाबत दि.२४/०५/२०१० रोजी ग्राहक केंद्राकडे तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर सेवा केंद्रातील कर्मचारी घरी आला व त्याने कॉम्प्रेसर बदलावे लागेल असे सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार रूपये १,०५०/- देवून कॉम्प्रेसर बदलण्यात आले. त्यानंतरही फ्रिजमधील दोष दूर झाला नाही. दि.१६/१०/२०१०, दि.१८/१२/२०१० आणि दि.२३/१२/२०१० रोजी सामनेवाले यांच्याकडे तक्रार करण्यात आली मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. सामनेवाले यांना वकिलामार्फत नोटीस पाठवूनही त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे या मंचात तक्रार दाखल करावी लागली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून फ्रिज बदलून मिळावा, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रूपये १०,०००/- मिळावे आणि तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- मिळावे अशी मागणी केली आहे.
३. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत फ्रिज खरेदी केल्याचे बिल, वॉरंटी कार्ड, टेक केअर इंडिया प्रा.लि. यांची रूपये १,०५०/- ची पावती, सामनेवाले यांना दि.०५/०१/२०११ रोजी पाठविलेली तक्रार, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, पुराव्याचे शपथपत्र आदी कागदपत्रांच्या प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले यांनी हजर होवून आपला खुलासा दाखल केला, त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे. तक्रारदार यांच्या फ्रिजबाबतच्या तक्रारीनंतर तंत्रज्ञ पाठवून त्यांच्या तक्रारीचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी कोणत्याही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या दुकानातून फ्रिज खरेदी केला आहे. सामनेवाले हे फक्त विक्रेता आहे. सदर फ्रिजची वॉरंटी कंपनीकडून देण्यात येत असते. तक्रारदार यांनी तक्रारीत कंपनीला पक्षकार केलेले नाही. तक्रारदार यांचा स्वभाव सुरूवातीपासून तक्रारी करण्याचाच आहे. तक्रारदार यांनी विक्रेत्याकडे किंवा कंपनीच्या सेवा केंद्राकडे लेखी तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे त्यांची तक्रार रद्द करावी अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
५. सामनेवाले यांनी खुलाशासोबत मेघराज ग्यानराज लुंडाणी यांचे शपथपत्र दाखल केले आहे.
६. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांचा खुलासा, शपथपत्र याचे मंचाने बारकाईने अवलोकन केले. तक्रारदार आणि सामनेवाले यांनी या प्रकरणात युक्तिवाद केलेला नाही. तक्रारदार हे दि.१५/०३/२०१३ पासून वेळोवेळी १७ तारखांना गैरहजर आहेत. या कालावधित त्यांना युक्तिवादासाठी आणि पुढील पाउल उचलण्यासाठी संधी देण्यात आली. मात्र त्यांनी कोणतेही पाउल उचलले नाही. तक्रारदार यांनी दि.२६/०७/२०१२ रोजी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. त्यानंतर त्यांनी या प्रकरणात कोणतेही पाउल उचलले नाही अथवा पुरावा दाखल केला नाही.
७. सामनेवाले यांनी नादुरूस्त फ्रिज व्यवस्थितपणे दुरूस्त करून दिला नाही व बदलून दिला नाही अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे. तथापि, त्यासाठी त्यांनी कोणताही ठोस पुरावा मंचासमोर आणलेला नाही. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत फ्रिज खरेदी केल्याचे बिल, वॉरंटी कार्ड आणि टेक केअर इंडिया प्रा.लि. यांची रूपये १,०५०/- एवढया रकमेची पावती आदी कागदपत्रे दाखल केली आहेत. त्या कागदपत्रांवरून तक्रारदार यांना सामनेवाले यांनी विकलेला फ्रिज सदोष होता, तो सामनेवाले यांनी दुरूस्त करून दिला नाही, तक्रारदार यांनी वेळोवेळी तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही, सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला हे तक्रारदार यांनी उपस्थित केलेले मुद्दे सिध्द होत नाही असे या मंचाचे मत बनले आहे.
८. तक्रारदार यांना त्यांची तक्रार सिध्द करण्यासाठी, आवश्यक ते पुरावे समोर आणण्यासाठी आणि युक्तिवाद करण्यासाठी निरनिराळ्या तारखांना पुरेशी संधी देण्यात आली आहे. मात्र त्या कालावधित त्यांनी कोणतेही पाउल उचलले नाही. यामुळे तक्रारदार यांना त्यांची तक्रार चालविण्यात स्वारस्य नाही असे आम्हाला वाटते.
९. वरील विवेचनावरून तक्रारदार यांना त्यांची तक्रार चालविण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. त्याशिवाय त्यांनी तक्रार सिध्द करण्यासाठी आवश्यक ते पुरावे समोर आणलेले नाही हेही स्प्ष्ट होते. याच कारणांमुळे तक्रारदार यांची तक्रार मंजूर करणे योग्य होणार नाही या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
२. खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः २४/११/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (श्री.व्ही.आर. लोंढे)
अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.