निकालपत्र :- (दि.17/11/2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व सामनेवाला क्र. 1 यांचे वकिलांनी युक्तीवाद केला. सामनेवाला क्र. 2 यांना नोटीस बजावणी झाली परंतु ते प्रस्तुत कामी हजर झालेले नाहीत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला क्र.1 व 2 हे बांधकाम व्यावसायिक आहेत. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील बी वॉर्ड रि.स.नं. 596 अ, प्लॉट नं. 1 + 2/2 ही मिळकत चंद्रकात शामराव जाधव तसेच शामराव जाधव, सुरेश जाधव, शिरीष जाधव रणजित जाधव यांचे मालकीची होती. सदर मिळकत विकसित करणेकरिता सामनेवाला यांना दिली. तसेच सदर मिळकत विकसित झालेनंतर त्यातील सदनिका विकणेकरिता सामनेवाला क्र. 2 यांचे नावे कधीही रद्द न होणारे वटमुखत्यारपत्र करुन दिलेले आहे. व सदर मिळकतीवर सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी साई श्रध्दा रेसिडन्सी हे अपार्टमेंट बांधले आहे. सदर इमारतीमध्ये तक्रारदारांनी फलॅट खरेदी करण्याचे सामनेवाला यांचेकडे फलॅट नं. 2, क्षेत्र 72.36 चौ.मी. रक्कम रु. 9,87,800/- ठरविले. व तसे तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये नोंद खरेदीपत्र दि. 2/03/2010 रोजी झालेले आहे. सदर रक्कमेपैकी रक्कम रु. 1,62,800/- तक्रारदारांनी सामनेवाला यांना करारापूर्वी अदा केलेले आहेत. व तसे त्यांनी करारामध्ये मान्य केलेले आहे. व उर्वरीत रक्कम फलॅटचा ताबा देतेवेळी सामनेवाला यांनी कळविलेनंतर खरेदीपत्राचेवेळी देण्याचे ठरले होते. व तशी पूर्व नोटीस सामनेवाला यांनी देणेचे ठरलेले होते. सामनेवाला यांनी मागणी केलेप्रमाणे रक्कम रु. 1,22,800/- दि. 11/05/2010 रोजी चेकने दिलेले आहेत. अशाप्रकारे एकूण रक्कम रु. 2,85,600/- सामनेवाला यांना अदा केलेले आहेत. तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे सांगतात, कराराप्रमाणे सामनेवाला यांनी कोल्हापूर महानगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र घेऊन कायदेशीररित्या सर्व बाबी पूर्ण करुन ताबा देणे आवश्यक होते. कराराप्रमाणे उर्वरीत रक्कम देण्याची तक्रारदारांची तयारी होती. परंतु याबाबत सामनेवाला यांना विचारणा केली असता वेळोवेळी व खोटी, चुकीची कारणे दाखवून खरेदीपत्र करुन देण्यास टाळाटाळ केली आहे. सामनेवाला हे जाणूनबूजून खरेदीपत्र करुन देण्याचे टाळीत असल्याने दि. 21/03/2011 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून खरेदीपत्राची उर्वरीत रक्कम स्विकारुन खरेदीपत्र पूर्ण करुन द्यावे असे कळविले. त्यास सामनेवाला यांनी त्यांचे वकिलामार्फत दि. 7/04/2011 रोजी चुकीची कारणे देऊन उत्तरे पाठविली आहेत त्यामुळे तक्रारदारांनी पुन्हा दि. 16/05/2011 रोजी नोटीसीला उत्तर पाठवून खरेदीपत्राची उर्वरीत रक्कम रु. 7,02,200/- दि. 16/05/2011 या तारखेचा चेक सामनेवाला यांना पाठवून दिला. सदर नोटीस व चेक सामनेवाला यांनी स्विकारला परंतु तो चेक त्यांनी वटविला नाही व खरेदीपत्र पूर्ण करुन दिलेले नाही. अशा प्रकारे सामनेवाला यांनी त्यांची सेवा त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे सांगतात, सर्व सोयी-सुविधांची पूर्तता करुन भोगवटा प्रमाणपत्र मिळणे आवश्यक होते. सामनेवाला यांनी खरेदीपत्र पूर्ण करुन न दिलेने रक्कम रु. 2,85,600/- इतकी रक्कम वापरली आहे. सबब, खरेदीपत्र पूर्ण करुन दिलेले नसलेमुळे दि. 11/05/2010 पासून द.सा.द.शे. 21 टक्के व्याज देण्याचा आदेश व्हावा. तसेच सामनेवाला यांना रक्कम रु. 7,02,200/- स्विकारुन फलॅटचे सर्व सोयी-सुविधेसह खरेदीपत्र पूर्ण करुन द्यावे व भोगवटा प्रमाणपत्र व कंम्प्लीशन सर्टीफीकेट पूर्ण करुन देणेचा आदेश व्हावा. व झालेल्या त्रासापोटी व नुकसानीपोटी रक्कम रु. 50,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 20,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी लिहून दिलेले करारपत्र दि. 2/03/2010, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दिलेली नोटीस दि. 21/03/2011, सामनेवाला यांची उत्तरी नोटीस दि. 7/04/2011 व तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दिलेली नोटीस दि. 16/05/2011 इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.1 यांनी म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्याअन्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये फलॅट घेणेबाबत करारपत्र झालेले होते. परंतु करारपत्राप्रमाणे रक्कम रु. 8,25,000/- इतकी रक्कम तक्रारदारांनी दि. 2/05/2010 पूर्वी देणे आवश्यक होते. व सदर कराराची मुख्य अट “ time is the essence of contract” अशी होती परंतु तक्रारदारांनी करारापत्राचा भंग कलेला आहे. व काहीतरी रक्कम दिल्यासारखी दिसावी व सदरचा करार रद्द होऊन नये म्हणून दि. 11/05/2010 रोजी रक्कम रु. 1,22,800/- सामनेवाला यांना दिलेले आहेत व उर्वरीत रक्कम 8 दिवसामध्ये देण्याचे कबूल केले. तसेच तक्रारदारांनी करारपत्र करतेवेळी त्यांचा पत्ता कृष्णकुंज बंगलो, शिवाजीनगर, ता. सिन्नर, जि. नाशिक असा दिलेला होता. तक्रारदारांनी त्यांचा पत्ता बदलून तो प्लॉट नं. 3, गट नं. 187, गुरुपुष्प अपार्टमेंटजवळ, सुर्यनगरी, एम.आय. डी.सी. बारामती असा बदललेला आहे. सामनेवाला क्र. 1 यांनी दि. 21/03/2011 रोजी वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीसीमध्ये सदर पत्ता समजला. तक्रारदाराने त्यांचा बदललेला पत्ता सामनेवाला यांना कळविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी त्याची माहिती कधीही दिलेली नाही. तसेच सामनेवाला क्र. 1 यांनी नाशिक येथील पत्यावर मे-2010 पासून तक्रारदारांचे फलॅटचे काम करारपत्रानुसार काम व करारात नमूद केलेल्या सोयी-सुविधा करुन देणेस तयार आहेत व उर्वरीत रक्कम देऊन सदनिका ताब्यात घ्यावी असे कळविले परंतु तक्रारदारांनी दि. 11/05/2010 रोजी पाठविलेला चेक रक्कम रु. 1,22,800/- च्या पेमेंटनंतर सामनेवाला क्र.1 यांना व त्यांचे साईट ऑफीसवर मार्च 2011 नंतर कधीही संपर्क केलेला नव्हता व नाही. दि. 21/03/2011 रोजी खोटया मजकुराची नोटीस पाठविली. त्यास खुलासेवार उत्तर बारामती येथील पत्त्यावर पाठविले असता तोही पत्ता नाशिक येथील पत्त्याप्रमाणे बनावट निघाला. मे-2010 मध्येच कराराप्रमाणे सर्व सोयीसुविधा असलेली उर्वरीत रक्कम देऊन सदनिका ताब्यात घ्यावी अशी सुचना सामनेवाला यांनी केलेली होती. तसेच पत्रव्यवहारही केलेला आहे. त्यास तक्रारदारांनी समाधानकारक प्रतिसाद दिलेला नाही. तक्रारदारांनी उर्वरीत रक्कम देण्याचे टाळून ताबा घेण्याचे टाळत आहेत. प्रस्तुत सामनेवाला यांनी सद्यस्थितीत सदनिका तयार असल्याने त्याचा ताबा घ्यावा व त्याबाबतचे खरेदीपत्र हे महानगरपालिकेकडून कंम्प्लीशन सर्टीफीकेट प्राप्त होताच करुन देऊ असे सांगितले होते. परंतु त्यासदेखील तक्रारदारांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. करारात मान्य केलेप्रमाणे देय रक्कम व त्यावर मे-2010 पासून मासिक द.सा.द.शे. 21 टक्के प्रमाणे व्याज दराने रक्कम आकारणी करुन रक्कम द्यावी असे कळविले असता तक्रारदारांनी तशी रक्कम न पाठविता रक्कम रु. 7,02,200/- चा धनादेश पाठवून दिला. व रक्कमेमध्ये तफावत असल्याने सामनेवाला यांनी सदरचा चेक बँक खात्यामध्ये जमा केला नाही. कराराचे काटेकोरपणे पालन केले असता तक्रारदारांनी कराराचा भंग केलेला आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी कोणतीही सेवा त्रुटी केलेली नाही. सदर मिळकतीचे बांधकाम सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे प्रारंभ प्रमाणपत्र हे यातील सामनेवाला क्र. 2 श्रध्दा कन्स्ट्रक्शनस तर्फे प्रशांत गजानन पवार यांच्या नावे दिलेले असल्याने कंम्प्लीशन सर्टीफीकेट देखील सामनेवाला क्र. 2 यांच्याच नावे मिळणार आहे व ते प्राप्त करण्याची जबाबदारी सामनेवाला क्र. 2 यांच्यावर आहे. व ही वस्तुस्थिती तक्रारदार यांना माहिती आहे. सबब, सामनेवाला क्र. 2 यांना सदर मिळकतीबाबत कोल्हापूर महानगरपालिका यांचेकडून कंम्प्लीशन सर्टीफीकेट प्राप्त करुन घेणे विषयी योग्य ते आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. तसेच दि. 2/05/2010 रोजीपासून उर्वरीत देय रक्कमेवर मासिक 21 टक्के व्याज दराने व्याज आकारणी करुन रक्कम देऊन ताबा घेणेविषयी आदेश व्हावेत. तसेच कॉम्पेनसेटरी कॉस्ट म्हणून रक्कम रु. 25,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 1 यांना दिलेला चेक क्र. 827042 आय.सी.आय.सी. बँकेकडे रक्कम रु. 7,02,200/-, सामनेवाला क्र. 1 तर्फे तक्रारदारांना पाठविलेली उत्तरी नोटीस व त्याचा लखोटा, अ.क्र. 2 कडील नोटीस परत आलेनंतर सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदार यांचे वकिलांना पाठविलेली नोटीस पोहोच इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे व उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी विकसित केलेली आहे. तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे साईश्रध्दा रेसिडेन्सी, सदनिका क्र. 2 खरेदी घेणेबाबतचा करार तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेला आहे. सदर करारपत्राचे अवलोकन केले असता सदरचा एकूण मोबदला रक्कम रु.9,87,800/- देण्याचे आहे त्यापैकी कराराच्या वेळी रक्कम रु. 1,22,800/- तक्रारदारांनी दिलेले आहेत. व एकूण उर्वरीत रक्कम रु. 8,25,000/- दि. 2/05/2010 रोजी तक्रारदारांनी देणे आहे. त्यामध्ये सदर कराराची मुख्य अट “ time is the essence of contract” असा उल्लेख केलेला आहे. सामनेवाला क्र. 1 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये करारात उल्लेख केलेली सदनिका नं. 2 चे बांधकाम पूर्ण झालेले होते. व तक्रारदारांनी कराराप्रमाणे रक्कम दिलेली नाही व कराराचा भंग केलेला आहे या मुद्दयांकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. तसेच करारपत्रामध्ये तक्रारदार यांनी नमूद केलेला पत्ता हा नाशिक मधील आहे. व तक्रारीमध्ये नमूद केलेला पत्ता हा बारामतीतील आहे. तक्रारदारांनी बारामती येथील उल्लेख केलेल्या पत्यावर सामनेवाला क्र. 1 यांनी नोंद पोच डाकेने नोटीस पाठविली आहे व सदर लिफाफयावर “सदर इसमाचा तपास लागत नाही सबब, पाठविणा-यास परत ” असा शेरा मारुन सदर लिफाफा परत आलेला आहे ही वस्तुस्थिती या मंचचे निदर्शनास आणून दिलेली आहे. तक्रारदारांनी करारात उल्लेख केलेप्रमाणे दि. 20/05/2010 किंवा तत्पुर्वी उर्वरीत रक्कम रु. 8,25,000/- देण्यास तयार होते याबाबत कोणतीही वस्तुस्थिती दिसून येत नाही. परंतु तक्रारदारांनी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी अद्याप बांधकाम परिपूर्ती प्रमाणपत्र घेतलेले नाही त्यामुळे मिळकतीचा वापर नियमाप्रमाणे करता येणार नाही या मुद्दयांकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी अद्यापपर्यंत मिळकत कोल्हापूर महानगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही. कराराची परिपूर्ती करण्यास कराराप्रमाणे दोन्ही बाजू जबाबदार आहेत. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी भोगवटा प्रमाणपत्र अद्यापपर्यंत घेतलेला नसल्यामुळे त्यांना व्याज मागता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. उपरोक्त वस्तुस्थिती तसेच नैसर्गिक न्यायतत्व व इक्वीटीचा विचार करता सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांकडून रक्कम रु. 7,02,200/- स्विकारुन बांधकाम परिपूर्ती प्रमाणपत्र व भोगवटा प्रमाणपत्र घेऊन नोंद खरेदीपत्र करुन द्यावे. बांधकाम व्यावसायिक यांनी करारात उल्लेख केलेल्या सदनिकेचा ताबा तक्रारदारांना द्यावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. उपरोक्त विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी तसेच तक्रार अर्जाचा खर्च मिळण्यास पात्र नाहीत. सबब, आदेश. आ दे श 1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला क्र.1 व 2 बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांकडून उर्वरीत रक्कम रु. 7,02,200/-(अक्षरी रुपये सात लाख दोन हजार दोनशे फक्त) स्विकारुन करारातील उल्लेख केलेल्या सदनिकेचा कोल्हापूर महानगरपालिकेकडून बांधकाम परिपूर्ती प्रमाणपत्र घेऊन तक्रारदारांना सदनिकेचा ताबा द्यावा व नोंद खरेदीपत्र करुन द्यावे. 4. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |