न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून वि.प.क्र.2 यांनी उत्पादित केलेली चारचाकी वाहनासाठी बॅटरी दि. 1/3/2018 रोजी खरेदी केली असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे -
कंपनीचे नाव – अॅमरॉन
बॅटरी सि.नं. एएबी 0506 एस 318743, एएएम जीओ-00038बी 20एल
सदर बॅटरीची वॉरंटी वि.प.क्र.1 यांना 1 वर्षाची असलेचे सांगितले होते. तक्रारदारांनी सदरची बॅटरी त्यांचे मारुती अल्टो या कारमध्ये बसविली. परंतु ती योग्य प्रकारे काम करु लागली नाही. म्हणून तक्रारदार यांनी सदरची गाडी स्थानिक मेकॅनिककडे दाखविली असता त्यांनी बॅटरीमध्ये मॅन्युफॅक्चरींग डिफेक्ट असलेचे सांगितले. सदर बॅटरीचा पॉझिटीव्ह करंट सिंबॉल हा निगेटीव्ह असून निगेटीव्ह करंट सिंबॉल हा पॉझिटीव्ह आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे गाडीचे अंतर्गत वायरिंग, अल्टरनेटर व ऑडिओ टेपरेकॉर्डर हे सदर बॅटरीच्या दोषामुळे जळून गेली आहेत. त्यामुळे तक्रारदार यांना अल्टरनेटर दुरुस्तीसाठी रु.1,530/- इतका मजुरीचा खर्च व अल्टनरेटन नव्याने बसविणेस रु.8,500/- इतका खर्च झाला आहे. तसेच साधारण रु.10,000/- ऑडिओ टेपरेकॉर्डर जळाल्यामुळे नुकसान झाले आहे. याबाबत तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी बॅटरी बदलून देणेस टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदार यांना नव्याने दुसरी बॅटरी खरेदी करुन ती बसविणे भाग पडले. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारांनी बॅटरीची किंमत रु.3,200/-, दुरुस्तीचा खर्चाची रक्कम रु.1,530/- व रु. 8,500/-, ऑडीओ टेपरेकॉर्डरची किंमत रु.10,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु. 2,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत बॅटरी खरेदीचे बिल, अल्टरनेटर खरेदीचे बिल, अल्टरनेटर बसविणेचे मजुरी बिल, वि.प. यांना पाठविलेली नोटीस, नोटीसची पोहोच इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 व 2 यांनी याकामी आपले म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. बॅटरी खरेदीवेळी सदर तक्रारदार यांना बॅटरी कशा पध्दतीने वापरायची त्याचप्रमाणे बॅटरी तक्रारीबाबत अटी व शर्ती पूर्णपणे समजावून सांगितल्या होत्या व त्याप्रमाणे वि.प.क्र.1 यानी तक्रारदार यांना गाडी घेवून या, आम्ही बॅटरी बसवून देतो असे सांगितले होते. त्यावेळी सदर तक्रारदार यांनी आम्ही बॅटरी बसवून घेतो असे सांगितले. त्यावेळी सदर वि.प.क्र.1 यांनी जर आपण स्वतः अगर त्रयस्थ इसमाकडून बॅटरी बसवून घेताना काही डिफॉल्ट झालेस आम्ही जबाबदार राहणार नाही असे सांगितले होते. परंतु त्यावेळी सदर तक्रारदार यांनी डिफॉल्ट होणार नाही, मी चांगले इलेक्ट्रीशीयनकडून बॅटरी बसवून घेतो असे सांगितले व ते बॅटरी घेवून गेले. तदनंतर 10 ते 15 दिवसांनी तक्रारदार वि.प.क्र.2 कडे आले असता वि.प. यांनी तुम्ही गाडी घेवून या, आपण बॅटरी तपासून पाहू, असे सांगितले. परंतु त्यानंतर आजतागायत सदर तक्रारदार कधीही वि.प.क्र.1 यांचेकडे आले नाहीत. तक्रारदार हे गॅरंटी कार्डप्रमाणे वागलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदार हे स्वतः नुकसानीस जबाबदार आहेत. सबब, तक्रारअर्ज नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प यांनी केली आहे.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
5. प्रस्तुतकामी वि.प.क्र.2 ही दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनांसाठी आवश्यक असणारी बॅटरी उत्पादन करणारी कंपनी आहे. वि.प.क्र.1 हे वि.प.क्र.2 चे बॅटरीचे उत्पादन विकणारे स्टोअर आहे. तक्रारदार यांनी ता.1/3/2018 रोजी वि.प.क्र.1 यांचेकडून त्यांच्या चारचाकी वाहनासाठी बॅटरी खरेदी केलली होती. त्याअनुषंगाने तक्रारदाराने तक्रारीसोबत अ.क्र.1 ला सदरची बॅटरी रक्कम रु.3,200/- ने खरेदी केलेची पावती दाखल केलेली असून सदर पावतीवर वि.प. यांचे नाव नमूद आहे. सदरची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
6. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून अॅमॅरान कंपनीची खालील वर्णनाची बॅटरी खरेदी केलेली होती.
कंपनीचे नाव – अॅमरॉन
बॅटरी सि.नं. एएबी 0506 एस 318743, एएएम जीओ-00038बी 20एल
सदर बॅटरीची वॉरंटी एक वर्ष असलेबाबत व बॅटरीचा परफॉर्मन्स उत्कृष्ट असलेबाबत वि.प. क्र.1 यांनी तक्रारदारांना सांगितले होते. सदरची बॅटरी तक्रारदार यांनी मारुती अल्टो या चारचाकी गाडीमध्ये बसविली. तथापि गाडी सुरु होणेस तक्रारी निर्माण होवू लागल्या. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरचे वाहन मेकॅनिक यांना दाखविले. त्यांनी गाडी सुरु करणेचा प्रयत्न केला. परंतु गाडी सुरु झाली नाही. गाडीची संपूर्ण तपासणी केली असता वि.प.क्र.1 यांनी दिलेल्या बॅटरीमध्ये उत्पदित दोष असलेचे तक्रारदार यांचे निदर्शनास आले. सदर बॅटरीमध्ये सदर बॅटरीचा पॉझिटीव्ह करंट सिंबॉल हा निगेटीव्ह असून निगेटीव्ह करंट सिंबॉल हा पॉझिटीव्ह आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे गाडीचे अंतर्गत वायरिंग, अल्टरनेटर व ऑडिओ टेपरेकॉर्डर हे सदर बॅटरीच्या दोषामुळे जळून गेली आहेत. सबब, वि.प. यानी तक्रारदार यांना सदरची सदोष बॅटरी देवून तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. प्रस्तुत मुद्याचे अनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी अ.क्र.2 ला बॅटरीचे ता.1/3/18 रोजीचे वॉरंटी कार्ड दाखल केलेले आहे. सदर वॉरंटी कार्डवरुन बॅटरीला एक वर्षाची वॉरंटी होती ही बाब सिध्द होते. वि.प.क्र.1 व 2 यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन करता सदर वि.प. यांनी तक्रारदार यांची तक्रार नाकारली आहे. अॅमॅरॉन कंपनीची बॅटरी खरेदी केलेबाबत वि.प. यांचा कोणताही वाद नाही. तथापि सदर बॅटरी खरेदीवेळी तक्रारदार यांना बॅटरी कशा पध्दतीने वापरायची, त्याचप्रमाणे बॅटरच्या तक्रारीबाबत अटी व शर्ती पूर्णपणे समजावून सांगितल्या होत्या. वि.प. क्र.1 हे तक्रारदार यांना गाडी घेवून या, आम्ही बॅटरी बसवून देतो, असे म्हणाले होते. त्यावेळी तक्रारदार यांनी आम्ही बॅटरी बसवून घेतो असे सांगितले. तक्रारदार हे 10 ते 15 दिवसानंतर वि.प. यांचे बॅटरी खरेदीमधील उर्वरीत देय रक्कम देणेसाठी वि.प.क्र.2 यांचेकडे आले. त्यावेळी तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडे गाडी सुरु होणेस तक्रार होत आहे असे सांगितले. त्यावेळी वि.प.क्र.1 यांनी तुम्ही गाडी घेवून या, बॅटरी तपासून पाहू, असे म्हणाले. त्यानंतर तक्रारदार हे कधीही वि.प.क्र.1 यांचेकडे कधीही आले नाहीत. सबब, तक्रारदार हे स्वतःच नुकसानीस जबाबदार आहेत असे वि.प. यांनी म्हणणे दाखल केले आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी ता. 24/11/21 रोजी दाखल केलेल्या पुरावा शपथपत्राचे अवलोकन करता बॅटरीचे डिफेक्टमुळे जळून गेलेल्या अल्टनरेटरमुळे तक्रारदार यांना अल्टो अल्टरनेटर नव्याने बसविण्यासाठी तो खरेदी करावा लागला असे कथन कले असून त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सदरचा अल्टरनेटर ता. 21/3/18 रोजी खरेदी केल्याची पावती तक्रारीसोबत दाखल केली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी ता. 5/4/19 रोजी सदरचे बॅटरीमध्ये मॅन्युफॅक्चरींग डिफेक्ट आहे ही बाब तपासणेसाठी तज्ञ व्यक्तीकडून तपासणी होवून त्याचा अहवाल येणे आवश्यक असलेने तज्ञांचे मत मागविण्यात यावे असा अर्ज दिला. प्रस्तुतचा अर्ज मंजूर करणेत आला व त्यानुसार सागर अॅटो इलेक्ट्रॉनिक यांचेकडील ता. 7/1/19 रोजीचा अहवाल आयोगामध्ये दाखल करण्यात आला. सदर तपासणी अहवालाचे अवलोकन करता,
सदर बॅटरी तपासणी केली असता सदर बॅटरीमध्ये पॉझिटीव्ह करंट हा निगेटीव्ह आहे आणि निगेटीव्ह करंट हा पॉझिटीव्ह आहे असे मला दिसून आले. सदरचा पॉझिटीव्ह करंट हा निगेटीव्ह असणे आणि निगेटीव्ह करंट हा पॉझिटीव्ह हा बॅटरीचे उत्पादनातील दोष आहे.
सदर अहवालावर सागर मोहन रा. माळी यांची सही आहे.
7. सदरचा तज्ञांचा अहवाल वि.प. यांनी नाकारलेला नाही. तसेच प्रस्तुतकामी वि.प. यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब, तज्ञांच्या अहवालातील कथनांचा विचार करता वादातील बॅटरीमध्ये मॅन्युफॅक्चरींग दोष होता ही बाब सिध्द होते. त्याकारणाने सदर बॅटरीतील दोषांमुळे तक्रारदार यांच्या गाडीचे अंतर्गत वायरिंग अल्टरनेटर व ऑडिओ टेपरेकाडॅरसह सदर डिफेक्टमुळे जळून गेले आहेत ही बाब सिध्द होते. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. यांना ता. 7/4/2018 रोजी नोटीस पाठविलेली असून सदरची नोटीस वि.प. यांना लागू झालेची पोहोच दाखल केली आहे. तथापि वि.प. यांनी तक्रारदार यांना सदर नोटीसीस कोणतेही उत्तर दिलेले नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष बॅटरी देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयेाग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
8. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत अ.क्र.4 ला धर्मराज अॅटो इलेक्ट्रॉनिक यांचेकडे वि.प. यांच्या बॅटरीच्या डिफेक्टमुळे जळून गेलेल्या अल्टरनेटर दुरुस्तीसाठी आलेल्या रक्कम रु.1,530/- मजूरीच्या खर्चाचे बिल दाखल केले आहे. प्रस्तुतचे बिल वि.प. यांनी नाकारलेले नाही. तसेच महाराष्ट्र स्क्रॅप ट्रेडर यांचेकडील अल्टो एस.एम.बॉक्स व अल्टो अल्टरनेटर रक्कम रु.8,500/- खरेदी केलेची पावती दाखल केलेली आहे. तसेच वि.प. यांचेकडून रक्कम रु. 3,200/- ची बॅटरी खरेदी केलेची पावती दाखल केली आहे. सदरच्या पावत्या वि.प. यांनी नाकारलेल्या नाहीत. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी ऑडीओ टेपरेकॉर्डर जळाल्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी साधारण रु.10,000/- ची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तथापि त्याअनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून संयुक्तिकरित्या एकूण रक्कम रु.13,230/- इतकी रक्कम नुकसान भरपाईपोटी मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
9. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.4 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना डिफेक्टीव्ह बॅटरीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी एकूण रक्कम रु.13,230/- अदा करावी.
-
- वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|