नि. 32 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 189/2010 नोंदणी तारीख – 11/8/2010 निकाल तारीख – 2/2/2011 निकाल कालावधी - 171 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ दत्तात्रय लक्ष्मण शिंदे मु.पो.पाटखळ ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री आनंद कदम) विरुध्द 1. व्यवस्थापक विशाल प्रकाश पाटील सहयाद्री मोटार्स प्रा.लि. सातारा विभाग बॉम्बे रेस्टॉरंटजवळ, पुणे-बंगलोर हायवे, सातारा 2. व्यवस्थापक, श्री एस.एस.देशमुख न्यू इंडिया ऍश्युरन्स कं.लि. शाखा कार्यालय सातारा (151701) सांगळे सदन, 403, गुरुवार पेठ, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री कालिदास माने) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे वरील पत्त्यावरील कायमचे रहिवासी आहेत. अर्जदार यांचा शेती हा व्यवसाय असून ते मुख्यतः भाजीपाला व फुलांचे उत्पादन घेण्याचा व्यवसाय करतात. सदरचे उत्पादन ते त्यांच्या महिंद्रा बोलेरो पिकअप मधून बाजारपेठेत पाठवित असतात. सदरचे वाहनाचा विमा त्यांनी जाबदार क्र.2 यांचेकडे उतरविलेला आहे. दि.1/6/2010 रोजी अर्जदार हे त्यांचे सदरे वाहन म्हसवड भागात घेवून गेले असता ते एका छोटया खडडयात आदळल्याने त्याचा चासीसचा पार्ट निकामी झाला. सदरचे बाब त्यांनी जाबदार क्र.1 यांना कळविली असता त्यांनी वाहन जमा करणेस सांगितले. त्यानुसार अर्जदार यांनी सदरचे वाहन जाबदार क्र.1 यांचेकडे दुरुस्तीसाठी नेले. जाबदार क्र.1 यांनी रु.88,815/- चे वाहनाचे दुरुस्तीचे अंदाजपत्रक अर्जदार यांना दिले. तदनंतर जाबदार क्र.2 यांनी त्यांचे राजहंस सर्व्हेअर यांचेमार्फत वाहनाची पाहणी करुन घेतली. परंतु त्याचा रिपोर्ट अर्जदार यांना पाठविला नाही. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली परंतु जाबदार क्र.2 यांनी त्यास खोटया मजकूराचे उत्तर दिले. अशा प्रकारे गाडीची नुकसान भरपाई देण्याचे नाकारुन जाबदार यांनी सेवेत त्रुटी केली आहे. सबब जाबदार क्र.2 यांनी दुरुस्तीचे अंदाजपत्रकानुसार विमादावा मंजूर करुन त्याची रक्कम जाबदार क्र.1 यांना द्यावी, नुकसान भरपाईपोटी रु.25,000/-, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार क्र.1 यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 24 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. जाबदार क्र.1 यांनी अर्जदारचे वाहनास 180 दिवसांची वॉरंटी दिली होती. सदरचा कालावधी संपलेला आहे. सदरचा कालावधी संपलेनंतर अर्जदार व जाबदार यांचेमधील ग्राहक व व सेवा देणारे हे नाते संपुष्टात आले आहे. अर्जदारने वाहन जाबदार क्र.1 यांचेकडे दुरुस्तीस दि.2/6/10 रोजी आणलेनंतर लगेचच दि.11/6/10 रोजी नोटीस पाठविली आहे. सदरची नोटीस अवकाळी आहे. जाबदार क्र.1 यांचे तज्ञांनी वाहनाची पाहणी केल्यानंतर त्यांचे असे निदर्शनास आले की, अर्जदाराने वाहनाच्या मूळ ढाचामध्ये अनाधिकाराने मोठया प्रमाणावर बदल केलेले आहेत. वाहनामध्ये त्याने एक जादा लिफ स्प्रींग बसविल्यामुळे वाहनाचे संबंधीत भागामध्ये आवश्यक ते सस्पेन्शन राहिले नाही व त्यामुळे चासीस तुटली. वाहनाचे हौद्याची उंचीही मोठया प्रमाणावर वाढविल्याचे दिसून आले. वाहनामध्ये निर्माण झालेला दोष हा उत्पादित दोषामुळे झालेला नसून तो वाहनाच्या अयोग्य वापरामुळे व अयोग्य फेरबदलांमुळे झाला आहे. अर्जदारने दुरुस्तीपोटी कोणतीही रक्कम जाबदार यांना दिलेली नाही त्यामुळे वाहन जाबदारकडेच पडून आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. जाबदार क्र.2 यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 12 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार यांनी क्लेमफॉर्म सादर केल्यानंतर जाबदार यांनी श्री राजहंस या सर्व्हेअरची नेमणूक केली. त्यांनी वाहनाची पाहणी करुन सामनेवालास त्यांचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार वाहनाचे चासीसची उजवी बाजू वेल्डींग केल्याचे दिसून आले. वारंवार झालेल्या झीजेमुळे व वाहनाचा वापर जास्त वजनाच्या मालवाहतुकीसाठी केल्याने वाहनाचे चासीसवर बोजा आला व त्यामुळे चासीसला तडे गेले. सदरचे नुकसान व वाहनास झालेला अपघात यामध्ये सुसंगती नसल्याने सदरचे नुकसान हे पॉलिसीचे अखत्यारीत येत नाही, असे स्पष्ट मत सर्व्हेअर यांनी दिले आहे. सदरचा अहवाल विचारात घेवून जाबदार यांनी अर्जदार यांचा विमादावा नाकारलेला आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.2 यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 4. अर्जदारतर्फे अभियोक्ता श्री आनंद कदम व जाबदारतर्फे अभियोक्ता श्री कालिदास माने यांचा युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 5. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 6. या प्रस्तुतचे अर्जप्रकरणात काही निर्विवाद गोष्टींची पाहणी करणे जरुरीचे आहे. अर्जदार यांनी संबंधीत मोटार वाहन महिंद्रा बोलेरो पिकअप नोंदणी क्र. एमएच 11/एजी 2899 या वाहनाची खरेदी जाबदार क्र.1 यांचेकडून दि. 23/6/09 रोजी केलेली आहे. सदरचे वाहन हे कमर्शियल वापराचे वाहन आहे. त्यामुळे त्याचा वॉरंटी कालावधी हा 180 दिवसांचा आहे. सदरचे वॉरंटी बाबत जाबदार यांनी ओनर्स मॅन्युअल दाखल केले असून त्याचे अवलोकन केले असता वॉरंटी कालावधी हा 180 दिवसांचा दिसून येतो. अशाप्रकारे सदरचे वाहनाचा वॉरंटी कालावधी हा दि. 23/12/2009 रोजीच संपलेला आहे. अर्जदार यांनी सदरचे वाहनाचा विमा जाबदार क्र.2 या विमा कंपनीकडे दि. 23/6/2009 ते 22/6/2010 या कालावधीसाठी उतरविलेला होता. तक्रारअर्जदार याचे तक्रारअर्जातील, शपथपत्रातील व युक्तिवादातील कथनानुसार संबंधीत मोटार वाहन महिंद्रा बोलेरो पिकअप हे वाहन दि.1/6/2010 रोजी पहाटे म्हसवड जि. सातारा येथील एस.टी.स्टँडजवळ अपघातग्रस्त झाले आहे. सदरचे वाहन हे रस्त्यावरील खड्डयात आदळून अपघात झाला आहे व वाहनाचे नुकसान झाले आहे. तथापि महत्वाची बाब अशी आहे की, सदरचे अपघाताबाबत म्हसवड येथील अगर अन्य कोणत्याही पोलिस स्टेशनला त्याची नोंद झालेली नाही. सदरचे मोटार वाहन अर्जदार यांनी दुरुस्तीसाठी जाबदार क्र.1 यांचे कार्यशाळेत सातारा येथे आणले. त्यावेळी सदरहू वाहनाची सविस्तर तपासणी जाबदार क्र.2 विमा कंपनीचे शासनमान्य सर्वेक्षण करणारे श्री एम.जी.राजहंस यांनी दि. 9/6/2010 रोजी केली आहे. तसेच जाबदार क्र.1 यांचे कार्यशाळेतील तज्ञ इसम श्री प्रमोद तेलवेकर यांनीही सदरचे वाहनाची तपासणी केली आहे. श्री तेलवेकर यांनी याकामी शपथपत्र दाखल केले असून त्यानुसार सदरचे वाहनाचे रनिंग हे 146534 किमी इतके झालेले होते. म्हणजे वाहनाचा अर्जदार यांनी वाहनाचा प्रतिदिन 444 किमी इतका प्रचंड वापर केलेला आहे. श्री राजहंस यांनी त्यांचे अहवालाचे समर्थनार्थ नि. 27/1 कडे शपथपत्र दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी असे स्पष्ट कथन केले आहे की सदरचे वाहनाचे चासीसची उजवी बाजू वेल्डींग केली असून वारंवार झालेल्या झीजेमुळे आणि वाहनाचा वापर क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या मालाच्या वाहतुकीसाठी केल्याने, वाहनाचे संबंधीत भागामध्ये सस्पेन्शन राहिले नाही. त्यामुळे वाहनाचा संपूर्ण बोजा हा चासीसवर आला व त्यामुळे चासीसला तडे गेले आणि चासीसचे नुकसान झाले. 7. तक्रारअर्जदार यांनी दाखल केलेल्या तक्रारअर्जातील कथने व त्याचे समर्थनार्थ सादर केलेले शपथपत्र, तसेच तक्रारअर्जदार यांनी जाबदार यांचे कैफियतीस दाखल केलेले प्रतिउत्तर या सर्वातील मजकूर पाहिला असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी संबंधीत वाहनाचा वापर हा भाजीपाला व फुले वाहतुकीसाठी केला आहे. तथापि, सदरचे कथनाचे समर्थनार्थ अर्जदार यांनी कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. उदा. बाजार समितीची पावती, आडत पावती, कोणत्या स्वरुपाच्या भाजीपाल्याची व फुलांची वाहतूक केली जात होती इ.बाबत काहीही दाखल केलेले नाही. 8. जाबदार क्र.1 व 2 यांनी सादर केलेला कागदोपत्री पुरावा उदा. वाहनाचे फोटो, सर्व्हेअरचा अहवाल व शपथपत्र, तज्ञ इसमांची शपथपत्रे या सर्वांची पाहणी केली असता असे स्पष्टपणे दिसून येते की, सदरचे वाहनातून माल वाहतुक करणेसाठी अर्जदार यांनी वाहनाचे हौद्याची उंची ही 650 मीमी वरुन 2300 मीमीपर्यंत वाढवून घेतली आहे. तक्रारअर्जदार यांनी संबंधीत मोटारवाहनाचे हौद्याचे उंचीमध्ये फेरबदल केलेला आहे. तसेच उत्पादन करतेवेळी वाहनामध्ये सात लिफ स्प्रींग बसविलेल्या होत्या. त्यामध्ये अर्जदारने आणखी एक जादा लिफ स्प्रींग बसविली. अशा प्रकारे वाहनाचे मूळ ढाच्यामध्ये अर्जदार यांनी मूलभूत स्वरुपाचे फेरबदल केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तसेच सदरचे वाहनाचा वापर अर्जदार यांनी ऊस अगर अन्य स्वरुपाच्या अवजड वस्तूंच्या वाहतुकीसाठी केल्याचेही दिसून येत आहे. अशाप्रकारच्या अवजड वस्तूंच्या वाहतुकीमुळेच सदरचे वाहन हे अपघातग्रस्त झाले आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की, सदरचे वाहनाची तपासणी जाबदार क्र.2 तर्फे सर्व्हेअर व जाबदार क्र.1 तर्फे कार्यशाळेतील तज्ञ व्यक्तीने करुन तसेच शपथपत्र त्यांनी याकामी दाखल केलेले आहे. त्यांचे कथनानुसार चासीसला अगोदरच वेल्डींग केलेले आहे. या सर्व बाबी असे स्पष्ट दर्शवितात की, अर्जदार यांनी संबंधीत वाहनाचा उपयोग हा नियमास अनुसरुन केलेला नाही. उलटपक्षी अर्जदार यांनी जाबदार क्र.2 विमा कंपनी मार्फत उतरविलेल्या विमा पॉलिसीमधील अटी व शर्तींचा भंग करुन संबंधीत मोटार वाहनाचा वापर केलेला आहे. सबब, जाबदार क्र.2 हे अर्जदार यांना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही स्वरुपाची नुकसान भरपाई देणेस जबाबदार नाहीत. 9. वर नमूद केलेल्या सर्व निर्विवाद बाबी पाहिल्या असता असे स्पष्टपणे दिसून येते की, तक्रारअर्जदार यांनी दाखल केलेला प्रस्तुतचा अर्ज हा कोणत्याही प्रकारे जाबदार क्र. 1 वा 2 यांचेविरुध्द मंजूर करता येणार नाही, तो सकृतदर्शनीच फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत झाले आहे. 10. जर अर्जदार यांचे वाहनास खरोखरच खड्डयात पडून अपघात झाला असता व त्याचे नुकसान झाले असते तर अर्जदार यांनी त्याबाबत पोलिस स्टेशनला नोंद करणे जरुर होते. तशी नोंद झाली असती तर पोलिसांमार्फत त्रयस्थांमार्फत घटनास्थळाचा पंचनामा झाला असता. परंतु तक्रारदार यांनी या सर्व बाबी जाणुनबुजून केलेल्या नाही, सबब वाहनास अपघात झाला असे मोघमपणे कथन करुन दाखल केलेला तक्रारअर्ज योग्य प्रकारे दाखल केलेला नाही असे या मंचाचे मत आहे. 11. तक्रारअर्जदारतर्फे असे आग्रही प्रतिपादन करण्यात आले आहे की, वाहन निर्माण करणारी कंपनी वा जाबदार क्र.1 यांना ग्राहकाने वाहनाचा दररोजचा वापर किती करावा याबाबत बंधने घालता येणार नाहीत परंतु वाहनाचा वापर कशा स्वरुपात करावा व कशा प्रकारे करावा याबाबत सर्वसामान्य माणसाच्या बुध्दीस पटेल असे तारतम्य बाळगून अर्जदारने वाहनाचा वापर करणे जरुर होते. परंतु अर्जदार यांनी तसे तारतम्य न बाळगता वाहनाचा वापर केलेला आहे व जाबदार क्र.1 व 2 यांचेविरुध्द प्रस्तुतची खोटी तक्रार दाखल केली आहे. 12. प्रस्तुत प्रकरणी अर्जदारचे मोटार वाहनाचे विमा दाव्याबाबत घडलेला घटनाक्रम पाहणे जरुर आहे. अर्जदारचे तक्रारअर्जातील कथनानुसार अर्जदारचे वाहनास दि. 2/6/2010 रोजी अपघात झाला. त्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंद न करता अर्जदार यांनी सदरची बाब जाबदार क्र.1 व 2 यांना प्रथम कळविली. त्यानंतर जाबदार क्र.2 यांनी सर्व्हेअरमार्फत सदरचे वाहनाची पाहणी लगेचच दुस-या दिवशी म्हणजे दि.3/6/2010 रोजी केली. सदरचे सर्व्हेअर यांनी दि.9/6/2010 रोजी जाबदार क्र.2 यांना त्यांचा अहवाल सादर केला. सदरचा अहवाल सादर केल्यानंतर अर्जदार यांनी लगेचच दोन दिवसांनी म्हणजे दि.11/6/2010 रोजी जाबदार यांना नोटीस पाठविली आहे व प्रस्तुतचा तक्रारअर्ज दि.11/8/2010 रोजी म्हणजे दोन महिन्यानंतर दाखल केला आहे. सदरचा संपूर्ण घटनाक्रम पाहता अर्जदार यांनी अत्यंत घाईगडबडीने जाबदार यांना नोटीस पाठवून प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. सदरची घाई ही अनावश्यक घाई आहे. तसेच संबंधीत मोटार वाहनाची दुरुस्ती न करताच अर्जदार यांनी जाबदार क्र.2 यांचेकडे विमारकमेची मागणी केली आहे. वास्तविक पाहता, वाहनाची दुरुस्ती करुन घेवून वाहनास जोडण्यात आलेले सुटे भाग, दुरुस्तीचा मजूरी खर्च इ. च्या पावत्या अर्जदार यांनी जाबदार क्र.2 यांचेकडे सादर करुन विमारकमेची मागणी करणे आवश्यक होते. परंतु अर्जदार यांनी अशा प्रकारची प्रक्रिया पूर्ण न करताच जाबदार क्र.1 व 2 यांचेविरुध्द प्रस्तुतचे मंचामध्ये तक्रारअर्ज दाखला केला आहे. अर्जदार यांची सदरची कृती म्हणजे स्वतःचे चुकीवर पांघरुन घालून जाबदारकडून येनकेनप्रकारे देय नसलेली रक्कम मिळविण्याचा केलेला अनाठायी प्रयत्न आहे असे या मंचाचे मत आहे. सबब अर्जदार यांनी रु.2,000/- भरपाईपोटी मे.मंचाकडे जमा करणेचा आदेश करणे योग्य व संयुक्तिक ठरणारे आहे. 13. जाबदार क्र.1 यांचे कैफियतीतील मजकूर पाहता अर्जदार यांचे मोटार वाहन हे आजरोजी जाबदार क्र.1 यांचे कार्यशाळेत दुरुस्तीविना पडून आहे. जर तक्रारदार यांना सदरचे वाहन जाबदार क्र.1 यांचेकडून दुरुस्त करुन पाहिजे असेल तर संबंधीत मोटार वाहनाचा 180 दिवसांचा वॉरंटी कालावधी संपलेला आहे ही बाब विचारात घेवून, जाबदार क्र.1 यांचेशी यथोचित चर्चा करुन सामोपचाराने जाबदार क्र.1 यांचेकडून परस्पर दुरुस्त करुन, त्याचे होणारे बिल जाबदार क्र.1 यांना अदा करुन स्वतःचे ताब्यात घ्यावे. सदरचे वाहन जाबदार क्र.1 यांनी अर्जदार यांना देण्याचा आदेश याकामी मंचास करता येणार नाही. 14. सदरकामी जाबदार यांनी खालील वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे याकामी दाखल केलेले आहेत. 1) 2010 (IV) CPJ 155 Rajasthan State commission 2) 2010 (IV) CPJ 143 Punjab State Commission 3) 2010 (IV) CPJ 53 National Commission 4) 2010 (IV) CPJ 143 Tamil Nadu State commission 5) 2010 (III) CPJ 401 National Commission सदरचे निवाडयांचा विचार करता अर्जदार हे जाबदारकडून कोणतीही रक्कम मिळणेस पात्र नाहीत असे या मंचाचे मत आहे. 15. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत अर्जदार यांनी या मंचाचे लिगल एड खात्यामध्ये जमा करणेसाठी रक्कम रु.2,000/- मंचामध्ये जमा करावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 2/2/2011 (श्री सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |