नि. 21
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 431/2010
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 10/08/2010
तक्रार दाखल तारीख : 12/08/2010
निकाल तारीख : 22/03/2012
----------------------------------------------------------------
श्री अनिल नामदेव जाधव,
व.व.37, धंदा – नोकरी
रा.अशोक फॅब्रिकेटर्स शेजारी,
वसंतदादा औद्योगिक वसाहत,
साखर कारखाना गट नं.2, सांगली
ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
1. मे.साहील शॉपी,
जी-1, जी-2, भगवान लिला
कॉम्प्लेक्स, हरभट रोड, सांगली
2. रिलायन्स कम्युनिकेशन्स लि.
बिझनेस हेड क्वार्टर, धीरुभाई अंबानी
नॉलेज सिटी, ठाणे-बेलापूर रोड,
कोपरखेर्डे, नवी मुंबई – 400 710 .....जाबदार
तक्रारदारतर्फे: अॅड श्री.डी.एम.धावते
जाबदार क्र.1 तर्फे : अॅड. श्री एस.के.केळकर
जाबदार क्र.2 : एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
1. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज जाबदार यांचेकडून घेतलेल्या टीव्ही डीशबाबत दाखल केला आहे.
2. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी जाबदार क्र.2 यांनी उत्पादित केलेली बिग टीव्ही डीश जाबदार क्र.1 यांचेकडून दि.20/1/2009 रोजी रक्कम रु.1,790/- ला खरेदी केली. सदर डीश खरेदी केल्यानंतर पहिले दोन महिनेच सदर डीशचे सेटबॉक्स व्यवस्थित चालले व त्यानंतर सदरचे सेट बॉक्स वारंवार बंद पडू लागले. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे डीशबाबत तक्रार केल्यानंतर जाबदार यांनी त्यांच्या मेकॅनिकला पाठवून सेटबॉक्स बदलून दिला. सदर बदलून दिलेला सेट बॉक्सही व्यवस्थित चालला नाही. त्यानंतर कंपनीने तक्रारदार यांना त्यांची डीश पाच वेळेला बदलून देवूनही ती व्यवस्थित चालली नाही त्याबाबत तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 व 2 यांना रजि.पोस्टाने तक्रार देवूनही जाबदार यांनी दखल घेतली नाही त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज सदर डीशची किंमत रु.1,790/- व्याजासह परत मिळावी या प्रमुख मागणीसाठी व इतर तदानुषंगिक मागण्यांसाठी दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने 4 कागद दाखल केले आहेत.
3. जाबदार क्र.१ यांनी नि.10 वर आपले म्हणणे शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून दि.20/1/2009 रोजी रक्कम रु.1,790/- ला टीव्ही डीश खरेदी केल्याचे मान्य केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांची डीश पाच वेळा बदलून दिल्याचे मान्य केले आहे. परंतु पाच वेळा बदलून देवूनही सदरची डीश नीट चालली नाही हे कथन अमान्य केले आहे. तक्रारदार यांनी तक्रार केल्यानंतर तक्रारदार यांना प्रत्येक वेळी डीश बदलून दिली आहे. तक्रारदार यांची डीश तिस-यांदा बंद पडल्यावर जाबदार यांनी तक्रारदार यांना घरातील वायरींग व अर्थिंग तपासून घेण्याचा सल्ला दिला होता परंतु त्यापैकी तक्रारदार यांनी काही केले नाही. तरीदेखील जाबदार यांनी पुढील दोन वेळा सर्व्हिस सेंटरला विनंती करुन डीश बदलून दिली आहे. टीव्हीच्या डीशच्या बाबतीत काही तक्रार आली तर सदरची तक्रार सर्व्हिस सेंटरमार्फत दूर करुन दिली जाते. जाबदार यांचा त्याच्याशी काही संबंध नसतो. जाबदार यांनी रिलायन्स बिग टीव्हीचे 1000 ते 1200 सेटटॉप बॉक्स विकले आहेत. परंतु त्याबाबत कोणतीही तक्रार आली नाही त्यामुळे तक्रारदार यांच्या घरातील अर्थिंग वायरिंगमध्ये काहीतरी दोष आहे हे स्पष्ट होते. तक्रारदार यांचे घरातील वायरिंगमधील दोषाबाबत सदरचे जाबदार यांना जबाबदार धरता येणार नाही. प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. यास्तव तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे.
4. जाबदार क्र.2 यांना नोटीस लागूनही ते याकामी हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर करण्यात आला.
5. तक्रारदार यांनी नि.14 ला पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे व नि.15 ला ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार क्र.1 यांनी नि.16 ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.17 चे यादीने काही निवाडे दाखल केले आहेत तसेच नि.20 च्या यादीने 1 कागद दाखल केला आहे.
6. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे व दाखल कागदपत्रे, दाखल लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. दोन्ही विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. जाबदार क्र.1 यांचेकडून तक्रारदार यांनी रक्कम रु.1,790/- ला दि.20/1/2009 रोजी टीव्ही डीश खरेदी केली ही बाब उभयपक्षी मान्य आहे. सदरची डीश पाच वेळा बदलून देण्यात आली ही बाबही दोन्ही बाजूंस मान्य आहे. सदरची डीश पाचवेळा बदलून दिली तरीही नीट चालत नाही त्यामुळे तक्रारदार यांचे अर्थिंग व वायरिंगमध्ये काही दोष असला पाहिजे असे जाबदार यांनी कथन केले आहे. सदरची डीश ही केवळ वायरिंग व अर्थिंगमधील दोषामुळे बंद पडत आहे अथवा नीट चालत नाही हे दाखविण्यासाठी जाबदार यांनी कोणताही पुरावा आणलेला नाही. याउलट तक्रारदार यांनी जाबदार यांना पाठविलेले पत्र नि.5/3 वर दाखल केलेले आहे. सदरचे पत्र हे दि.18/7/2009 रोजीचे आहे. त्यामध्ये तक्रारदार यांनी डीश पाचवेळा बदलून दिली तरीही अजून बंद पडत आहे, तुमच्या माणसांनी व्होल्टेज कंट्रोलर बसविण्यास सांगितले तेही रु.350/- खर्च करुन बसविले तरीही डीश बंद पडत आहे असे नमूद केले आहे. एकूण दोन्ही बाजूंचा झालेला पत्रव्यवहार पाहता तक्रारदार यांची डीश व्यवस्थित चालत नाही ही बाब स्पष्ट होते. जाबदार यांनी जरी डीश पाच वेळा बदलून दिली असली तरी सदरची डीश तक्रारदार यांचे घरामध्ये व्यवस्थित चालत नाही व सदरची डीश का व्यवस्थित चालत नाही या पाठीमागचे कारण शोधून काढण्यास व त्याप्रमाणे तक्रारदार यांना सेवा देण्यास जाबदार हे असमर्थ ठरले आहेत. सन्मा.राष्ट्रीय आयोग यांनी M/s Sony Ericsson Vs. Shri Ashish Agrawal 2008(1) CPR 47 या निवाडयाचे कामी पुढील निष्कर्ष काढला आहे. Where replaced mobile was also defective, State commission rightly accepted the appeal for refund of the complainant rather than further replacement त्यामुळे तक्रारदार यांनी मागणी केल्याप्रमाणे सदर डीशची रक्कम परत करणेबाबत आदेश करणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे.
7. तक्रारदार यांना सदरची रक्कम देण्यास नेमके कोण जबाबदार ठरते ? हे प्रस्तुत प्रकरणी ठरविणे गरजेचे आहे. जाबदार क्र.1 हे जाबदार क्र.2 यांचे अधिकृत विक्रेते आहेत. सदरची डीश ही जाबदार क्र.2 यांनी उत्पादित केलेली आहे. सदरच्या डीशमध्ये कोणताही मूलभूत दोष आहे असे म्हणता येणार नाही परंतु प्रत्येक वेळी बदलून दिलेली डीश तक्रारदार यांच्या घरी व्यवस्थित चालत नाही व त्यामागचे नेमके कारण शोधून काढून सदरचा दोष दूर करुन देण्यास जाबदार असमर्थ ठरले आहेत. रक्कम जाबदार क्र.1 यांनी स्वीकारली आहे त्यामुळे सदरची रक्कम तक्रारदार यांना परत करण्यास जाबदार क्र.1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार धरण्यात येत आहे.
8. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. नवीन खरेदी केलेली वस्तू सातत्याने बंद पडणे व ती दुरुस्त करण्यासाठी सातत्याने जाबदार यांचेकडे जावे लागणे ही बाब तक्रारदार यांना नक्कीच मानसिक त्रास देणारी आहे व त्यासाठी तक्रारदार यांना या न्यायमंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना जाबदार नं.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या रक्कम रुपये
1,790/-(अक्षरी रुपये एक हजार सातशे नव्वद माञ) अदा करावेत असा जाबदार यांना
आदेश करण्यात येतो.
3. जाबदार यांनी सदरची रक्कम दि.7/5/2012 पर्यंत परत करणेची आहे अन्यथा जाबदार
यांना सदर रकमेवर तक्रारअर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे.9% दराने व्याज द्यावे लागेल.
4. तक्रारदार यांना जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या शारीरिक मानसिक
ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक
हजार माञ) अदा करावेत असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
5. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.1 व 2 यांनी दिनांक 7/5/2012 पर्यंत करणेची आहे.
6. जाबदार नं.1 व 2 यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दिनांक: 22/3/2012
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.