Exh.No.21
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 41/2014
तक्रार दाखल झाल्याचा दि. 18/10/2014
तक्रार निकाल झाल्याचा दि.17/01/2015
श्री प्रसाद चंद्रकांत दाभोलकर
वय 31 वर्षे, व्यवसाय- शेती,
मु.पो.कोचरा, (रवळनाथवाडी), ता.वेंगुर्ला,
जिल्हा– सिंधुदुर्ग- 416522
मोबाईल क्र.9404747048 ... तक्रारदार
विरुध्द
1) साहिल मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्सतर्फे
श्री साहिल संतोष शिरसाट
मारुती मंदीर नजिक,
बाजारपेठ कुडाळ, ता.कुडाळ,
जि.सिंधुदुर्ग
2) विश्वकर्मा मोबाईल सर्व्हीसेस,
तर्फे श्री प्रसाद पांचाळ
मॅक्स सर्व्हीस सेंटर,
एस.एम. हायस्कुलसमोर,
कणकवली, जि. सिंधुदुर्ग
पिन- 416 602
3) सिध्दीविनायक मोबाईल सर्व्हीसेस,
जी-4, स्वानंद कॉम्प्लेक्स, चर्च रोड,
प्रभाकर प्लाझाच्या मागे, नवी शाहुपूरी,
कोल्हापूर पिन- 416 001
4) मॅनेजर,
कार्बन क्लिनीक,
कार्बन कस्टमर केअर सर्व्हीस,
डी-170, ओखला इंडस्ट्रीयल, एरिया,
फेज-1, नवी दिल्ली – 110 020
इंडिया. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष.
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्य.
तक्रारदारतर्फे – स्वतः
विरुद्ध पक्ष क्र.1 तर्फे विधिज्ञ – श्री सुनिल लोट
विरुद्ध पक्ष क्र.2 स्वतः
विरुध्द पक्ष क्र.3 व 4 – एकतर्फा गैरहजर.
निकालपत्र
(दि 17/01/2015)
द्वारा : मा.सदस्या, श्रीमती वफा जमशीद खान.
1) विरुध्द पक्ष 1 यांचेकडून खरेदी केलेला कार्बन A 29 हँडसेट नादुरुस्त झाल्यानंतर वॉरंटी कालावधीत सुस्थितीत करुन न देऊन विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली म्हणून तक्रार दाखल केली आहे.
2) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष 1 यांचे दुकानातून दि.13/06/2014 रोजी कार्बन A 29 हँडसेट रक्कम रु.7,000/- किमतीस खरेदी केला. खरेदीनंतर 2 महिन्यातच मोबाईलला टच पॅडचा दोष सुरु झाला म्हणून तक्रारदारने तो विरुध्द पक्ष 1 यांचेकडे नेला. विरुध्द पक्ष 1 ने त्यास तो हॅंडसेट विरुध्द पक्ष 2 यांचेकडे घेऊन जाणेस सांगितले. दि.21/8/2014 रोजी विरुध्द पक्ष 2 ने हँडसेटची तक्रार रजिस्टर करुन घेतली व 20-25 दिवसानंतर टचपॅड आल्यावर कळवितो असे सांगितले. तसेच हँडसेट घेऊन जाणेस सांगितले. 20 दिवसानंतर तकारदार यांनी विरुध्द पक्ष 2 यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की, अजून टच पॅड आलेले नाही. कार्बन मोबाईलचे पार्टस लवकर येत नाहीत म्हणून त्यांनी नवीन हँडसेट रिपेरिंग बंद केले आहे.
3) त्यानंतर तक्रारदार यांनी तो हँडसेट विरुध्द पक्ष 1 यांचेकडे नेला. तो त्यांनी दि.9/9/2014 रोजी बॅटरी व पॅनलसहित घेऊन विरुध्द पक्ष 3 कडे पाठवितो असे सांगितले. मोबाईल विरुध्द पक्ष 1 यांनी उशीराने म्हणजे दि.25/09/2014 रोजी विरुध्द पक्ष 3 कडे पाठविल्याचे विरुध्द पक्ष 3 यांनी तक्रारदार यांना सांगितले. तसेच अजून 25 दिवस दुरुस्तीस लागतील असे सांगितले. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष 3 यांस दि.16/10/2014 रोजी पुन्हा फोन केला असता अजून 20-25 दिवस लागतील असे सांगितले. तसेच त्यांचेकडे कार्बन A 29 हँडसेट मार्च पासूनचे असून त्यांचाही हाच दोष आहे. तक्रारदार यांनी पुढे काय करावे असे विचारता विरुध्द पक्ष 3 यांनी तक्रारदारास विरुध्द पक्ष क्र.4 चा फोन नंबर 01146604646 दिला. विरुध्द पक्ष 4 ही कार्बन कस्टमर केअर सर्व्हीस असून तक्रारदाराने त्यांना 10 ते 15 कॉल केले. परंतू विरुध्द पक्ष 4 यांचेकडून फोन रिसिव्ह केला नाही असे तक्रारदाराचे कथन आहे.
4) तक्रारदाराचे पुढे असे कथन आहे की, विरुध्द पक्ष 2 यांचेकडे नोंदणी रजिस्टर तक्रारीची झेरॉक्सची मागणी केली परंतु त्यांनी तो ID काढून काढला असे उत्तर दिले. विरुध्द पक्ष 1 कडे जॉब कार्डची विचारणा केली परंतु त्यांनी व्हॉटस अॅपवर मेसेज पाठविला असे सांगितले, परंतु तक्रारदारकडे ती सेवा उपलब्ध नसल्याने मेसेज मिळाला नाही. तक्रारदार यांने रोख स्वरुपात रक्कम देऊनही नादुरुस्त झालेला कार्बन A 29 हा हँडसेट विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी दुरुस्त करुन दिला नाही. त्यामुळे सदोष हँडसेटपोटी स्वीकारलेली रक्क्म रु.7,000/- दि.13/06/2014 पासून द.सा.द.शे.10% व्याजदराने परत मिळावे; तक्रारदारास झालेल्या शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- नुकसान भरपाई मिळावी; तक्रार प्रकरणापोटी झालेला खर्च रु.5,000/- मिळावा आणि विरुध्द पक्ष 4 यांनी सदोष हँडसेट पुरविले असल्याने त्यांचेवर दंडात्मक कारवाई व्हावी, अशी विनंती केली आहे.
5) तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्ष 1 ते 4 यांस नोटीस पाठविणेत आल्या. विरुध्द पक्ष 1 ते 4 यांना नोटीसा प्राप्त झाल्या. विरुध्द पक्ष 3 व 4 यांना नोटीस मुदतीत प्राप्त होऊनही ते तारखेदिवशी गैरहजर राहिल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आले. विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे अनुक्रमे नि.12 व 15 वर दाखल केले आहेत. विरुध्द पक्ष 2 यांनी तक्रारीतील मजकूर नाकारलेला नाही. फक्त नियमानुसार विरुध्द पक्ष 2 यानी सेवा देण्यास कोणतीही दिरंगाई केलेली नाही. त्यामुळे तकार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हणणे मांडले आहे.
6) विरुध्द पक्ष 1 यांनी त्यांचे दुकानातून तक्रारदाराने मोबाईल खरेदी केल्याचे, तसेच त्यामध्ये दोष निर्माण झाल्याने कार्बन कंपनीचे सर्व्हीस सेंटर, कणकवली येथील विश्वकर्मा मोबाईल सर्व्हीसेस, कणकवली येथे पाठविला हे मान्य केले आहे. तक्रारदार आठच दिवसात तेथून मोबाईल घेऊन आले. विरुध्द पक्ष 1 यांच्या मोबाईल खरेदी विक्री दुकानाव्यतिरिक्त त्यांचे मोबाईल दुरुस्तीचे अधिकृत सेटर नाही. परंतु ओळखीखातर तक्रारदार यांचा मोबाईल सदर मोबाईल कंपनीने ऑथोराईज्ड सेंटर, कोल्हापूर म्हणजेच विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकडे पाठविले. त्याचेकडे देखील मोबाईलचा गेलेला पार्ट उपलब्ध नसल्याने त्यांनी विरुध्द पक्ष क्र.4 कडे मोबाईलच्या पार्टसची मागणी केली. परंतु सदरचा पार्ट दिल्ली येथून येण्यास वेळ लागणारा असल्याने विरुध्द पक्ष क्र.1 यांनी कंपनीशी सल्लामसलत करुन तकारदार यांना सदर कार्बन कंपनीचा नवीन मोबाईल कंपनीकडून मंजूर करुन घेतला. कंपनीने मोबाईल मंजूर केल्यानंतर त्यांना जुन्या मोबाईलचा बॉक्स व इतर साहित्य परत करणे आवश्यक असते. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अर्जदार यांना वेळोवेळी सदरच्या दुरुस्तीकरीता पाठविलेल्या मोबाईलचा बॉक्स परत करण्याची विनंती केली. परंतु तक्रारदार यांनी सदरचा बॉक्स परत केलेला नाही. त्यामुळे कंपनीला नवीन मोबाईल तक्रारदाराला हस्तांतरीत करणे अडचणीचे झालेले आहे. विरुध्द पक्ष यांनी कोणत्याही प्रकारची सर्व्हीसची जबाबदारी नसतांना तक्रारदार हे आपले गि-हाईक असल्याच्या एकमेव कारणासाठी जी आवश्यक सेवा देता येईल ती सेवा वेळोवेळी दिलेली आहे. कोणतीही दिरंगाई केलेली नाही. तक्रारदार यांनी जुना मोबाईलचा बॉक्स परत केल्यास विरुध्द पक्ष क्र.1 हे विरुध्द पक्ष क्र.4 यांच्याकडून मंजूर मोबाईलची मागणी करुन अर्जदार यांना नवीन मोबाईल हस्तांतरीत करण्यास तयार आहेत असेही म्हणणे मांडले. विरुध्द पक्ष यांना नाहक त्रासात टाकण्याकरीता खोडसाळ तक्रार अर्ज दाखल केला असल्याने विरुध्द पक्षास तक्रारदाराकडून रु.10,000/- नुकसान भरपाई देण्याचे आदेश व्हावेत असे म्हणणे मांडले.
7) तक्रारदार यांनी नि.16 वर त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले तर विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी अनुक्रमे नि.18 व 19 वर प्रतिज्ञापत्रे दाखल केली. तक्रारदार व विरुध्द पक्ष क्र.2 यांनी स्वतः तर विरुध्द पक्ष क्र.1 तर्फे वकील श्री सुनिल लोट यांनी तोंडी युक्तीवाद केला. तक्रारदार यांची तक्रार, प्रतिज्ञापत्र व दाखल कागदोपत्री पुरावा, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रे तसेच उभय पक्षांतर्फे करणेत आलेला तोंडी युक्तीवाद विचारात घेता पुढीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार या ग्राहकाला सेवा देण्यात विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
2 | तक्रार मंजूर करणेस पात्र आहे काय ? | होय |
3 | आदेश काय ? | खाली नमूद केलेप्रमाणे |
8) मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदार यांनी कार्बन A 29 मोबाईल हँडसेट विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून खरेदी केला त्याची खरेदीची पावती नि.3/1 वर आहे. विरुध्द पक्ष क्र.2 ते 4 हे सदर मोबाईलच्या कंपनीचे सर्व्हीस सेंटर आहेत. तक्रारदार यांनी खरेदी केलेला व वॉरंटी कालावधीत नादुरुस्त झालेला मोबाईल हँडसेट दुरुस्त करुन देण्याची कायदेशीर जबाबदारी विरुध्द पक्षाची असतांनाही नादुरुस्त पार्ट उपलब्ध नसल्याचे कारणास्तव तक्रारदार यांना मोबाईल हँडसेट सुस्थितीत करुन दिला नाही. विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांची ही कृती तक्रारदार या ग्राहकाला देण्यात येणारे सेवेतील त्रुटी आहे. सबब आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
9) मुद्दा क्रमांक 2- i) तक्रारदार यांनी दि.13/06/2014 रोजी खरेदी केलेला कार्बन A 29 हा नवीन मोबाईल हँडसेट टच पॅडचा दोष निर्माण झाल्याने नादुरुस्त झाला. तक्रारदार यांनी सदर हँडसेट प्रथम विरुध्द पक्ष 1, त्यानंतर विरुध्द पक्ष 1 च्याच सांगण्यावरुन विरुध्द पक्ष क्र.2 कडे नेला. त्यानंतर आठ दिवसांनी विरुध्द पक्ष 2 यांनी तक्रारदार यांची तक्रार रजिस्टर करुन घेतली, परंतु मोबाईल तक्रारदार यांचेकडेच ठेवणेस सांगितले. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष 2 यांस पुन्हा फोन करुन विचारले असता पार्ट दिल्लीवरुन येत असल्याने दुरुस्त करुन देण्यास विलंब होणार असेही सांगितले, ही बाब तक्रारदार यांने तक्रारीत नमूद केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार मोबाईल परत घेऊन आले म्हणजे तो मोबाईल चांगल्या स्थितीत होता हा विरुध्द पक्षातर्फे केलेला युक्तीवाद मान्य करता येणार नाही.
ii) विरुध्द पक्ष क्र.2 तसेच विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी दुरुस्तीसाठी दिलेला मोबाईल हँडसेट आठच दिवसांत परत घेऊन गेले. तसे झाले नसते तर विरुध्द पक्ष यांनी तो मोबाईल हँडसेट दुरुस्त करुन दिला असता. विरुध्द पक्षाकडून पैसे उकळणेसाठी तक्रारदाराने खोटी तक्रार केली आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी गॅरेंटी दिलेली नाही तर वॉरंटी दिलेली आहे. वॉरंटी कालावधीत बिघाड झाल्यास वस्तुची दुरुस्ती करुन दिली जाते. मोबाईल हँडसेटची रक्कम अथवा नुकसान भरपाई तक्रारदाराचे मागणीप्रमाणे मिळणारी नाही. विरुध्द पक्षाचे जरी हे मत असले तरी विरुध्द पक्ष 2 हे केअर सेंटर आहे. तेथे जर पार्टस नसतील तर तो हँडसेट पार्टस येईपर्यंत उशीर होणारच होता. सदयस्थितीत मोबाईल ही प्रत्येकासाठी अत्यावश्यक बाब झालेली आहे. त्यामुळे मोबाईल हँडसेट शक्य तितक्या लवकर दुरुस्त होऊन मिळणे आवश्यकच होते. त्यामुळेच विरुध्द पक्ष क्र.2 यांनी विलंब होणार हे सांगितल्यावर तक्रारदार यांनी तो हँडसेट स्वतःकडे न ठेवता विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडे जमा केलेला आहे. विरुध्द पक्ष 1 यांनीच तो हँडसेट विरुध्द पक्ष क्र.3 अधिकृत केअर सेंटरकडे पाठविला; तो मोबाईल हँडसेट विरुध्द पक्ष यांच्याच ताब्यात आहे आणि तो तक्रारदार यांस दुरुस्त होऊन मिळालेला नाही. वॉरंटी कालावधीत खरेदीनंतर लगेचच जर बिघाड होत असेल, दोष उत्पन्न होत असतील तर ती सदोष वस्तु दुरुस्त करुन देणेची जबाबदारी ही त्या वस्तुची उत्पादनकर्ता व त्यांनी विक्री व देखभाल यासाठी नेमलेल्या व्यक्तींचीच असते. त्यामुळे तक्रारदार यांचा सदोष मोबाईल हँडसेट दुरुस्त करुन योग्य सेवा देणेची वैयक्तिक व संयुक्तीक जबाबदारी ही विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांची होती असे मंचाचे स्पष्ट मत आहे
iii) सदर मोबाईल हँडसेटच्या पार्टसची उपलब्धता नसल्यामुळेच त्यांनी तो आजपर्यंत दुरुस्त करुन तक्रारदार यांस दिलेला नाही. विरुध्द पक्ष क्र.3 व 4 हे हजर होऊन त्यांनी प्रकरणात त्यांचे लेखी म्हणणे दिलेले नाही; म्हणजे तक्रारदार यांची तक्रार त्यांनी मान्य आहे असेच म्हणावे लागेल. विरुध्द पक्ष 1 यांनी लेखी म्हणण्यात आपण तक्रारदारास नवीन मोबाईल देण्यास तयार होतो व तसे त्यास कळविले होते; परंतु त्यांनी जुन्या मोबाईलचा बॉक्स दिला नसल्याने नवीन मोबाईल हस्तांतरीत करता आला नाही. परंतु तक्रारदार यांस त्यांनी ही बाब कोणत्या तारखांना कळविली यासंबंधाने कोणताही पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. तक्रारदाराने त्यांचे शपथपत्राचे परिच्छेद 3 मध्ये म्हटले आहे की, त्याने ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर विरुध्द पक्षांना नोटीसा गेल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी कपील राऊळ यांना घरी पाठविले, परंतु ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली असल्याने मोबाईलचा बॉक्स देऊ शकणार नाही असे सांगितले. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करता विरुध्द पक्ष जरी या क्षणी तक्रारदार यांस नवीन हँडसेट देण्यास तयार असले तरी जर दिल्लीवरुन पार्टस यायलाच जर इतका विलंब लागत असेल तर विरुध्द पक्षाकडून तक्रारदाराला देऊ केलेला नवीन मोबाईलचा त्याला उपभोगच घेता येणारा नाही. कारण तक्रारदाराने नवीन खरेदी केलेला त्याच कंपनीचा मोबाईल हँडसेट दि.09/09/2014 पासून आजपर्यंत म्हणजे पाच महिने विरुध्द पक्ष यांच्याच ताब्यात आहे.
10) मुद्दा क्रमांक 3 – उपरोक्त विषद केलेल्या बाबी आणि पुरावा विचारात घेता विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी तक्रारदार या ग्राहकाला सेवा देण्यात त्रुटी ठेवल्याचे सिध्द झाले असल्याने तक्रारदार यांचेकडून मोबाईल हँडसेट पोटी स्वीकारलेली रक्कम रु.7,000/- विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच नवीन मोबाईल खरेदी करुन देखील तक्रारदारास त्याचा उपभोग घेता आला नाही. विरुध्द पक्ष यांचे सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदार यांना जो मानसिक व शारीरिक त्रास झाला त्यापोटी रक्कम रु.5,000/- व प्रकरण खर्चापोटी रक्कम रु.3,000/- विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 कडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत, असे मंचाचे मत आहे. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी कार्बन A-29 मोबाईल हँडसेटपोटी स्वीकारलेली रक्कम रु.7,000/- (रुपये सात हजार मात्र) तक्रारदार यांना दयावेत.
3) तक्रारदार यांनी सदर आदेश प्राप्त झालेपासून 8 दिवसांचे आत वर नमूद हँडसेटचा बॉक्स विरुध्द पक्ष क्र.1 यांचे ताब्यात देऊन पोच घ्यावी.
4) विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी संयुक्त अथवा विभक्तपणे मानसिक त्रासापोटी भरपाई म्हणून रक्कम रु.5,000/-(रुपये पाच हजार मात्र) व प्रकरण खर्चापोटी रक्कम रु.3,000/-(रुपये तीन हजार मात्र) तक्रारदार यांस अदा करावेत.
5) वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी 45 दिवसांत करावी. तशी अंमलबजावणी न केल्यास तक्रारदार हे उपरोक्त रक्कमेवर या अर्जाचे तारखेपासून 9% व्याज मिळणेस तसेच ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 25 व 27 खाली दाद मिळणेस पात्र राहतील.
6) मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.27/02/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 17/01/2015
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्य, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.