जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –165/2010 तक्रार दाखल तारीख –06/12/2010
सोपान पि. सर्जेराव साबळे
वय 35 वर्षे,धंदा शेती ..तक्रारदार
रा.साबळेवाडी तहत अंमळनेर (भांडयाचे)
ता.पाटोदा, जि.बीड
विरुध्द
सहायक अभिंयता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड
उपविभागीय कार्यालय, पाटोदा ता.पाटोदा जि.बीड. ...सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ऐ.जी.काकडे
सामनेवाले तर्फे :- अँड.डी.बी.बागल
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची मौजे कोतन ता. पाटोदा येथे शेत जमिन आहे. कूटूंबाची उपजिविका शेतीवरच अवलंबून आहे.सदर शेत जमिन गट नंबर 1089 मध्ये आहे. जमिन बागायत करण्यासाठी विहीरीवर विज पंप बसवण्यासाठी विज कनेक्शनची मागणी सामनेवालाकडे केलेली आहे. त्यासाठी कोटेशन रक्कम रु.7700/- दि.11.10.2009 रोजी अ.क्र.1106-5 एच.पी.चे कोटेशन नंबर 8493816 ने सामनेवाला यांनी जमा करुन घेतलेले आहेत. त्या बाबत पावती दिलेली आहे.
रक्कम भरल्यानंतरही विज जोडणी करुन देण्याची अनेक वेळी मागणी करुनही सामनेवाला यांनी तक्रारदारास विज जोडणी दिली नाही. तक्रारदारांचा विज ग्राहक क्र.8493816 देण्यात आलेला आहे. सामनेवाला हे विज जोडणी देण्या बाबत टाळाटाळ करीत आहेत. तक्रारदारांनी दि.12.4.2010 रोजी सामनेवाला यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विज जोडणी देण्याबाबत मागणी केली. रक्कम आमच्याकडे जमा नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे तक्रारदारांना शारीरिक,मानसिक,आर्थिक त्रासास विनाकारण सामोरे जावे लागले.
विज जोडणी न मिळाल्याने तक्रारदाराचे शेत बागायत होण्यापासून वंचित होऊन शेतीच्या उत्पन्नात घट आलेली आहे. त्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी तक्रारदार सामनेवालाकडून रक्कम रु.1,00,000/- मागण्यास हक्कदार आहेत.नूकसान भरपाई खालील प्रमाणे,
1. गैरअर्जदाराने विद्युत कोटेशन भरुन घेऊनही विद्युत
कनेक्शन न दिल्यामुळे शेतीच्या उत्पन्नातील झालेले नूकसान रु.85,000/-
2. मानसिक,आर्थिक व शारिरीक त्रासापोटी रु.10,000/-
3. नोटीसचा खर्च रु.1,000/-
4. तक्रारीचा खर्च रु.3,000/-
एकूण रु.98,000/-
सामनेवाला यांनी तक्रारदारांना तात्काळ कोटेशनप्रमाणे विज जोडणी देण्याबाबत आदेश व्हावेत, तसेच तक्रारदारांना सामनेवालेकडून कायदयाचे तरतुदीनुसार सेवा देण्यास विलंब केल्याने प्रतिदिन रु.1,000/-दंड देण्याचे आदेश व्हावेत.
दि.28.6.2010 रोजी सामनेवाला यांना नोटीस दिली परंतु सामनेवाला यांनी नोटीस उत्तर दिले नाही. विनंती की, तक्रारदारास सामनेवाला यांनी तात्काळ विज जोडणी देण्याबाबत आदेश व्हावेत. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे नूकसान भरपाई रु.98,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याज दराने सामनेवाला यांना देण्याबाबत आदेश व्हावेत,तसेच सेवा देण्यास विलंब केल्याने प्रतिदिन रु.1,000/- दंड भरण्याबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावेत.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.30.3.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील कलम 2 व 3 बरोबर आहे.विज जोडणीसाठी जेष्ठता यादी पाहणी आवश्यक आहे. शिवाय जोडणी साठी लागणारे साहित्य उपलब्ध होणे महत्वाची बाब आहे. सामनेवाला यांनी वेळोवेळी ही बाब तक्रारदारास समजावून सांगितली.त्यामुळे सामनेवाला यांनी विज जोडणी देण्यासाठी टाळाटाळ केली असे म्हणता येणार नाही.सामनेवाला यांनी तक्रारदारास ग्राहक नंबर दिलेला नाही, कोटेशन दिलेले नाही. तक्रारदारास खरी परिस्थिती वेळोवेळी सांगूनही त्यांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे सामनेवाला यांचे कृतीने तक्रारदारांना शारीरिक मानसिक त्रास झाला हे म्हणणे चूकीचे आहे.
सामनेवाले स्वतःविज कंपनी कार्यरत आहेत,विजकंपनी वेळोवेळी विज आकारणी बाबत परिपत्रक काढतात त्यानुसार आवश्यक असणारी वाढीव रक्कम कोटेशन विरहित भरले. त्यामुळे मोघम स्वरुपात वाढीव रक्कम मागितली हे चूकीचे आहे.तक्रारदारांना नियमाप्रमाणे विज जोडणीदेणे क्रमप्राप्त आहे.तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा
खुलासा, दाखल कागदपत्र, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्ववान वकील श्री. ऐ.जी.काकडे व सामनवाले यांचे विद्ववान वकील श्री.डी.बी.बागल यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराचे मौजे कोतन ता.पाटोदा शिवारात गट नंबर 1089 मध्ये शेत जमिन असल्याची बाब 7/12 उता-यावरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारदारांनी सामनेवालाकडे शेत पंपाच्या कोटेशनसाठी सव्हे नंबर 1106 5 एच.पी.चे कोटेशन व रक्कम रु.7700/- दि.11.10.2009 रोजी पावती नंबर 8493816 अन्वये भरलेले आहेत.ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे.
सामनेवाला यांनी जेष्ठता यादी दाखल करण्यासाठी यूक्तीवादानंतर ब-याच तारखा घेतल्या, त्यानंतर दि.2.9.2011 रोजी सामनेवाला यांनी दिलेला खुलासा पाहता दि.11.10.2009रोजी नंतर विज पोल उभे केले,सामनेवाला यांनी दि.2.12.2010 रोजी विज जोडणी जोडली, विज तारा उपलब्ध नसल्याने विज जोडणी जोडण्यात आलेली नाही. दि.11.10.2009 ते दि.20.12.2010 पर्यत तक्रारदार विज पूरवठा डायरेक्ट घेत होते हे सामनेवाला यांना माहीत असूनही कोटेशन असल्यामूळे कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचे नूकसान झाले असे म्हणता येणार नाही. या बाबत सामनेवाला यांनी जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदाराकडे रक्कम रु.1650/- जून 2011अखेर आहेत. त्यासंबंधी संबंधीत सहायक अभिंयता श्री. विजय भास्करराव भांरबे यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता दि.11.10.2009 रोजी कोटेशन भरल्यानंतर दि.2.12.2010 रोजी तक्रारदाराला विज जोडणी देण्यात आलेली आहे. त्या बाबतचे विज देयक दाखल सामनेवाला यांनी केलेले आहे. त्यापूर्वी कोटेशन भरल्यानंतर तक्रारदार हे विज वापरत होते असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. या संदर्भात तक्रारदाराकडून कोणताही प्रतिवाद नाही. यासर्व पार्श्वभूमी वर विज जोडणीन देऊन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होत नाही. तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदारांना तारा उपलब्ध नसल्याकारणाने केबल द्वारे विज जोडणी दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सदरची विज जोडणी तारा उपलब्ध झाल्यानंतर जोडणी करुन देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तारा उपलब्ध झाल्यानंतर
तक्रारदारांना केबल काढून तारांनी विज जोडणी करुन देण्यात यावी.विज
जोडणी कोणतेही शुल्क न आकारता करुन दयावी.
4. खर्च आपआपला सोसावा.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3)
प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड