तक्रारदारातर्फे – वकील – एस. एस. महाजन.
सामनेवालातर्फे –वकील- आर. जी. जंजिरे.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात की, तक्रारदार हिचे पती उत्तर श्रीधरराव शिनगारे हे नौकरीस असतांना त्यांनी दिनांक 1 सप्टेंबर-2003 रोजी पोस्ट लाईफ इन्शुरन्स अन्वये रक्कम रु. 1,00,000/- ची स्वत:चे नावे विमा पॉलिसी काढली होती. सदर पॉलिसीचा हप्ता दरमहा रु. 795/- होता. सदर पॉलिसीचा क्रमांक एम.एच- 215400 – सी. एस. असा आहे. सदर पॉलिसी काढते वेळी उत्तर शिनगारे यांनी स्वत:ची पत्नी म्हणजेच तक्रारदार हिला नॉमिनी दाखवले होते.
तक्रारदाराच्या पतीने सदर पॉलिसीचे 52 हप्ते नियमित भरणा केले होते. त्याबाबत टपाल जीवन विमा निधी बुक सोबत जोडले आहे. त्यानुसार 52 गुणिले 795 म्हणजेच एकूण रु. 41,340/- रोख विमा स्वरुपात जमा झालेले होते. सदर पॉलिसीचा परिपक्व दिनांक 02/09/2014 आहे.
तक्रारदाराचे पतीचा म्हणजेच पॉलिसीधारक उत्तमराव शिनगारे यांचा दिनांक 14/06/2009 रोजी अपघाती मृत्यु झाला. सोबत मृत्यु प्रमाणपत्र तसेच लोहमार्ग औरंगाबादचा प्राथमिक अहवालाची प्रत जोडली आहे.
सामनेवाले नं. 1 हे भारतीय डाक मुख्य कार्यालय असून सामनेवाले नं. 2 हे बीड येथील पोस्ट कार्यालय आहे.
तक्रारदाराच्या पतीने सदर पॉलिसीचे नियमित 3 वर्षे 52 हप्ते भरलेले आहेत. तक्रारदार हिचा पती अपघाती मृत्यु पावल्यामुळे सदर पॉलिसीतील मुळ रक्कम, बोनस व त्यावरील व्याज इत्यादी मिळण्यास तक्रारदार पात्र आहे.
पत्र क्र. 12/2009 दि. 14/09/2009 पी. एल. आय. पॉलिसी क्रं. एम. एच. 2154000 सी. एस. बाबत तडजोड करण्यासाठी पत्र पाठवले आहे. तक्रारदार ही संबंधीत सामनेवाले नं. 2 कडे सदर पॉलिसीतील रक्कम विचारणा करण्यासाठी वारस या नात्याने गेली असता सामनेवाले नं. 2 ने पॉलिसीचे सर्व कागदपत्रे हे मुख्य कार्यालय सामनेवाले क्रं. 1 कडे पाठवले तेव्हा दि. 26/11/2009 रोजी तक्रारदारास सामनेवाले क्रं. 2 यांनी पत्रक दिले. सदर पत्रकात फेस व्हॉल्यु रु. 1,00,000/- आहे. परंतू सरेंडर व्हॅल्यु बोनससह या रकान्यासमोर रु. 30,475/- व त्यातून एक्सेस रु. 1499/- वजा करुन रु. 28,796/- हे तक्रारदारास देण्यात येतील असा उल्लेख केला आहे. सदर पत्रान्वये जमा रक्कम तक्रारदाराने उचललेली नसून सामनेवाले क्रं. 2 कडे सदर रक्कम आजपर्यंत जमा आहे.
सामनेवाले नं. 1 व 2 यांनी संगणमत करुन मुळ पॉलिसी रक्कम बोनस व व्याज देण्यास तक्रारदारास इन्कार केलेला आहे. सामनेवालेंची पॉलिसीतील मुळ रक्कम व बोनस देणे आवश्यक आहे. तक्रारदार खालील प्रमाणे सामनेवाले नं. 1 व 2 कडून नुकसान भरपाई मुळ पॉलिसी रक्कम मागत आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदाराचे पतीने (पॉलिसीधारकाने) भरणा केलेले
795/- रुपयाप्रमाणे एकूण 52 हाप्ते. रु. 41,340/-
2. मुळ पॉलिसी रक्कम. रु. 1,00,000/-
3. बोनस रु. 30,475/-
4. मानसिक व शारीरिक त्रासापोटी. रु. 20,000/-
5. तक्रारीचा खर्च. रु. 5,000/-
--------------------------------
एकूण रु. 1,96,815/-
तक्रारदार ही निराधार असून तिचे निरक्षरतेचा फायदा सामनेवाले नं. 1 व 2 हे घेत आहेत.
विनंती की, तक्रारदाराची तक्रार पूर्णत: मंजूर करावी. पोस्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसीतील परिच्छेद क्र. 8 मधील संपूर्ण रक्कम तक्रारदार हीस देण्यात यावी.
सामनेवालेंनी त्यांचा एकत्रित खुलासा तारीख 30/06/2010 रोजी दाखल केला. त्यांचा खुलासा थोडक्यात की, तक्रारीतील कलम- 1,2,3 व 4 मान्य आहेत, त्याबाबत विशेष स्पष्टीकरण नाही.
कलम- 5 बाबत हरकत की, विमेदार श्री उत्तम बी. शिनगारे यांनी पोस्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नं. एम. एच.25400-सीएस तारीख 02/09/2003 रोजी जोखीम रक्कम रु. 1,00,000/- ची दरमहा रु. 795/- हप्त्याची विकत घेतलेली होती. तिचे जानेवारी-2008 (सप्टेंबर-03 ते जानेवारी-2008) पर्यंत हप्ते भरलेले होते, परंतू माहे नोव्हेंबर-2003 चा हप्ता रिसीट पुस्तकात भरल्याचे दिसत नाही आणि त्यानंतर विमेदार फेब्रुवारी-08 ते जून-09 या कालावधीचे 17 महिन्याचे हप्ते भरलेले नाहीत, सदरचे त्यामुळे विमापत्र बंद पडले आणि ता. 14/06/2009 रोजी विमेदाराचा मृत्यु झालेला आहे. पी.ओ.आय.एफ. नियम नं. 39 (1) आणि 40 (1) नुसार सदर विमा पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यु रु. 28,976/- त्यातून रक्कम रु. 1499/- नोव्हेंबर-09 चा हप्ता कपात न झाल्याने वजा करुन विमेदाराची नॉमिनी श्रीमती मंगलबाई शिनगारे यांना दिलेली आहे. म्हणून तक्रारदार नॉमिनी यांना पॉलिसीचा पूर्ण लाभ मिळालेला असल्याने कायदयाने तक्रार चालू शकत नाही.
कलम- 6 कांही अंशी मान्य नाही. कलम- 7 मान्य नाही, कारण सामनेवालेने नियमाप्रमाणे रक्कम रु. 28,976/- मंजूर केलेली आहे.
कलम- 8 मान्य नाही. कलम- 9 पूर्णत: खोटा चुकीचा आहे. कलम- 10 बाबत काहीही माहिती नाही. कलम- 11 बाबत काहीही म्हणणे नाही. कलम- 12 विमापत्र बंद होते म्हणून पीओआयएफ नुसार श्री शिनगारे यांचा दावा मंजूर केला.
विनंती की, तक्रार खर्चासह रदृ करावी.
न्याय निर्णयासाठी मुद्दे उत्तरे
1. सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना
विमापत्रातील मृत्युच्या दाव्याची योग्य
रक्कम न देवून दयावयाच्या सेवेत कसूर
केल्याची बाब तक्रारदाराने सिध्द आहे काय 1 होय.
2. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहे काय 1 होय.
3. अंतिम आदेश 1 निकालाप्रमाणे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तिवाद, सामनेवाले नं. 1 व 2 चा एकत्रित खुलासा, सामनेवालेचे प्रतिनिधी श्री त्रिंबक दगडोजीराव काळे , अधिक्षक पोस्ट ऑफीस बीड यांचे शपथपत्र, सामनेवालेचा युक्तिवाद यांचे सखोल वाचन केले.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता श्री उत्तमराव श्रीधरराव शिनगारे विमेदार यांचा मृत्यु तारीख 14/06/2009 रोजी अपघाताने झालेला आहे. तक्रारदाराने विमापत्रातील विमा रक्कम मिळण्यासाठी सामनेवालेकडे योग्य त्या कागदपत्रासह दावा दाखल केला. सामनेवालेने तक्रारदारांना तारीख 26/11/2009 रोजी पत्र देवून रक्कम रु. 30,475/- मधून जादा रक्कम रु. 1499/- वजा करुन रक्कम रु. 28,796/- देण्याबाबत कळवलेले आहे परंतू तक्रारदाराने सदरची रक्कम घेतलेली नाही. ती रक्कम तक्रारदारांना मान्य नाही म्हणून तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
यासंदर्भात सामनेवालेचा खुलासा व युक्तिवाद पाहता विमापत्राची बाब त्यांना मान्य आहे परंतू विमेदाराने नोव्हेंबर-2003 चा मासीक हप्त्याची रक्कम रु. 795/- भरलेली नाही, त्यामुळे सदर हप्त्याची रक्कम व त्यावरील व्याज रु. 704/- असे एकूण रक्कम रु. 1499/- वजाजाता तक्रारदारांना एकूण भरलेल्या हप्त्याची रक्कम सामनेवालेंनी मंजूर केलेली आहे, त्यामुळे तक्रारदाराची तक्रार चालू शकत नाही. तसेच फेब्रुवारी-08 पासून जून-09 पर्यंत एकूण 17 हप्ते विमेदाराने भरलेले नाहीत, त्यामुळे सदर विमापत्राची स्थिती बंद अवस्थेत होती व आहे. त्यामुळे त्यांनी एकूण भरावयाची रक्कम त्यातून न भरलेल्या हप्त्याची रक्कम वजा करुन तक्रारदारांना रक्कम रु. 28,796/- विमेदारांना मंजूर केलेले आहेत. यात सामनेवालेने कोणताही सेवेत कसूर केलेला नाही.
यासंदर्भात तक्रारदाराने दाखल केलेली पोस्ट कार्यालयाची टपाल जीवन विमा निधी या पुस्तकाचे बारकाईने अवलोकन केले असता सदर पुस्तकानुसार जानेवारी-2008 पर्यंतचे हप्ते त्यातून नोव्हेंबर-03 चा हप्ता वजाजाता तक्रारदाराने भरल्याचे स्पष्ट होते. सप्टेंबर-03 ते जानेवारी-08 हा कालावधी पाहता एकूण 53 महिने होतो, परंतू सदरचा नोव्हेंबर-03 चा हप्ता भरलेला नसल्याने एकूण 52 हप्ते भरल्याची बाब सदर पुस्तकावरुन स्पष्ट होते. रु. 795/- दरमहा हप्ता गुणिले 52 हप्तेची एकूण रक्कम रु. 41,340/- तक्रारदाराने सामनेवालेकडे भरलेली आहे. अशा परिस्थितीत सामनेवालेने केवळ तक्रारदारांना वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदाराचा दावा रक्कम रु. 28,796/- चाच मंजूर केलेला आहे. ही बाब प्रथमदर्शनी सामनेवालेने योग्य त-हेने तक्रारदाराची दावा रक्कम मंजूर केल्याचे दिसत नाही. सामनेवालेने या संदर्भात त्यांच्याकडील कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. त्यामुळे तक्रारदाराच्या कागदपत्रावरुन वरील प्रमाणे 52 हप्ते भरल्याची बाब स्पष्ट होते. हप्ते भरलेले नाहीत त्यामुळे त्यांची रक्कम वजा जाण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे सामनेवालेने सदर हप्त्यांची रक्कम वजा करुन काढलेली रक्कम ही प्रथमदर्शनी चुकीची वाटते. नोव्हेंबर-03 ची रक्कम विमेदाराकडे बाकी असल्याबाबत सामनेवालेने विमेदाराला त्याच्या हयातीत कोणतीही नोटीस दिलेली नाही अथवा मागणीही केलेली नाही, त्यामुळे भरलेल्या हप्त्यातून सदर रक्कम सामनेवालेंना वजा करता येणार नाही.
तसेच इतर सर्व बाजुंनी विचार केला असता 52 हप्त्याची रक्कम रुपये 41,340/- होत असतांना सामनेवालेने तक्रारदारांना रक्कम रु. 30,475/- कशी मंजूर केली, याबाबतचा खुलासा सामनेवालेच्या खुलाशावरुन स्पष्ट होत नाही, त्यामुळे सामनेवालेने तक्रारदाराचा दावा योग्य त-हेने मंजूर न करुन तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते, असे न्याय मंचाचे मत आहे. त्यामुळे सामनेवालेने तक्रारदारांना एकूण 52 हप्त्याची रक्कम रु. 41,340/- अधिक त्यावर सदर कालावधीतील देय बोनसची रक्कम देणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदाराच्या पतीचे अपघाती निधन झालेले आहे, परंतू पोस्टल जीवन विमा याला अपघाताचे कोणतेही संरक्षण नाही. त्याबाबत तक्रारदाराने जरी सदर जोखीम रक्कमेची मागणी केलेली असली तरी त्यासंदर्भात तक्रारदाराचा कोणताही पुरावा नाही. तसेच सदरचे विमापत्र हे बंद अवस्थेत असल्याने त्याबाबतचा कोणताही लाभ तक्रारदारांना मिळू शकत नाही. नियमाप्रमाणे वर नमूद केलेली रक्कमच तक्रारदारांना देय होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदाराचा दावा योग्य त-हेने मंजूर न केल्याने तक्रारदारांना निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे, त्यामुळे मानसिक त्रासाची रक्कम रु. 3,000/-, तक्रारीचा खर्च रु. 2,000/- तक्रारदारांना देणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवालेंना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना मयत विमेदार उत्तम श्रीधरराव शिनगारे यांच्या विम्याच्या दाव्याची रक्कम रु. 41,340/- अधिक त्यावरील देय बोनसह होणारी रक्कम तक्रारदारांना एक महिन्याच्या आत अदा करावी.
3. सामनेवालेंना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) आदेश मिळाल्या पासून एक महिन्याच्या आत अदा करावी.
4. सामनेवालेंना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना तक्रारीचे खर्चाची रक्कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) आदेश मिळाल्या पासून एक महिन्याच्या आत अदा करावी.
5. सामनेवालेने वरील रक्कम विहीत मुदतीत तक्रारदारास अदा न केल्यास सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 7 टक्के प्रमाणे व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
6. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(सौ. एम. एस. विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, बीड.