तक्रारदारातर्फे – वकील – एस.एस.देशमुख,
सामनेवालेतर्फे – वकिल – ए. एस. पाटील.
।। निकालपत्र ।।
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार वरील ठिकाणचे रहिवाशी असुन त्यांचा विद्युत ग्राहक क्र.576010170175 असा आहे. सदरची जोडणी व्यापारी वापराकरीता घेतलेली आहे.
तक्रारदाराने नियमित विज देयक भरलेले आहे. तक्रारदाराने ता. 22/6/2009 ते दि. 22/07/2009 पर्यंतचे विदयुत देयक रक्कम रु. 9,650/- चे ता. 24/08/09 रोजी भरलेले आहे. तारीख 22/07/2009 पर्यंतच्या देयकाची तक्रारदाराकडे थकबाकी राहिलेली आहे.
सामनेवालेंनी तक्रारदारास खालील प्रमाणे चुकीची देयके दिलेली आहेत.
अ. क्र. | विदयुत बिल कालावधी | चालू बिल | मागील दर्शविलेली थकबाकी | दर्शविलेले व्याज |
1. 2. 3. 4. 5. 6. | 22/7/2009 ते 22/8/09 22/8/2009 ते 22/9/09 22/9/2009 ते 22/10/09 22/10/2009 ते 22/11/09 22/11/2009 ते 22/12/09 22/12/2009 ते 22/01/10 | 485.95 894.68 678.91 730.98 702.77 687.50 | 9086.73 9463.01 10251.15 10820.88 11438.76 11998.70 | 575.90 612.95 814.94 962.07 1087.29 1241.10 |
तक्रारदाराने तारीख 22/7/2009 ते दि. 22/8/2009 चे रक्कम रु.10,150/- चे विदयुत देयक आल्यानंतर सामनेवाले यांचे कार्यालयात जाऊन सदर विदयुत बिल चुकीचे व बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणून दिले. सदर देयकात दर्शविलेली थकबाकी रु. 9086.73 पै व व्याजाची रक्कम रु. 575.90 पै. अशी एकूण थकबाकी रु. 9,662.63 पै ही कमी करुन देण्याबाबत विनंती केली. तारीख 28/8/09 रोजी भरणा केलेली विदयुत देयकाची पावती दाखवली परंतू सामनेवालेने त्याबाबत गांभीर्याने न घेता तक्रारदारास पुढील देयकात दुरुस्ती करुन देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे तक्रारदाराने सदरचे देयक दुरुस्ती करुन येईल या आशेवर भरणा केले नाही.
तारीख 22/8/09 ते 22/9/09 पर्यंतचे वरील प्रमाणे व्याज व मागील थकबाकी दर्शविलेली रक्कम रु. 11,050/- चे देयक सामनेवालेंनी तक्रारदारास दिले. त्यानंतर तारीख 22/9/09 ते 22/10/09 पर्यंतचे रु.11,770/- व त्यानंतर तारीख 22/10/09 ते दि. 22/11/09 पर्यंतचे विदयुत देयक रक्कम रु.12,510/- चे तक्रारदारास सामनेवालेकडून देण्यात आले.
मागील थकबाकी व व्याजाची रक्कम चालू बिलात दर्शविल्यामुळे शेवटी कंटाळून तक्रारदार व सामनेवाले यांचे कार्यालयात गेला असता तेथील अभियंत्याने तक्रारदारास सदरील दि. 22/10/2009 ते 22/11/2009 चे विदयुत बिलावर हातानेच दुरुस्ती करुन रु. 3,000/- चे देयक भरण्यास सांगितले व पुढील देयकात दुरुस्ती करण्यात येईल असे सांगितले. तक्रारदाराने समाधान न झाल्याने तक्रारदाराने देयकाचा भरणा केलेला नाही.
त्यानंतर तारीख 22/11/2009 ते ता. 22/12/2009 या कालावधीचे विदयुत देयक रक्कम रु. 13,230/- सामनेवालेंनी तक्रारदारास दिले. सदर विज देयकात मागील थकबाकी व व्याज पुन्हा दर्शविण्यात आले. तक्रारदार परत सामनेवालेंच्या कार्यालयात गेला असता तक्रारदारांना पुन्हा सांगण्यात आले की, हाताने दुरुस्त केलेले देयक रक्कम रु. 3,580/- तुम्ही भरा व यापुढे तुम्हास प्रत्येक विदयुत देयक हाताने दुरुस्ती केल्यानंतरच विदयुत देयक भरावे लागेल. तक्रारदार हे 65 वर्षीय जेष्ठ नागरिक असून प्रत्येक बिलाची दुरुस्ती कार्यालयात जाऊन करुन घेणे त्यांना अशक्यप्राय आहे. तक्रारदारास त्याने वापर केलेल्या युनिटप्रमाणे विदयुत देयक देणे सामनेवालेवर बंधनकारक आहे. अशा त-हेने सामनेवालेने तक्रारदारास देयक दुरुस्ती करुन न देवून दयावयाच्या सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक, शारिरिक त्रास झालेला आहे. त्यापोटी रक्कम रु. 25,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत.
विनंती की, तक्रारदारास दिलेले दुकीचे विज देयक रु. 13,930/- रद्द करुन सदर तारखेपर्यंत नियमाप्रमाणे संगणकीय दुरुस्ती देयक देण्याबाबत सामनेवालेस आदेश दयावा, देयकात दर्शविलेली चुकीची थकबाकी व त्यावरील व्याज रद्द करण्यात यावे. नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 30,000/- सामनेवालेंनी तक्रारदारास दयावेत.
सामनेवालेंनी त्यांचा खुलासा तारीख 10/7/2010 रोजी दाखल केला. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवालेने तक्रारदारास चुकीची देयके दिलेली नाहीत, त्यामुळे देयके रद्द करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारदारास देण्यात येणा-या विदयुत देयकामध्ये चुकीची थकबाकी व व्याज दर्शविलेले नाही. तक्रारदारास नियमप्रमाणे व कायदयाप्रमाणे देयके देण्यात आलेली आहेत.
तक्रारदाराने त्यास दिलेले विदयुत देयक हे सहायक अभियंता, म.रा.वि.वि. कं. (ग्रामीण) उपविभाग, बीड यांच्या खात्यामध्ये भरलेली असल्यामुळे ते सामनेवालेकडे अदयाप जमा झालेली नाहीत. सदरील विज देयके सामनेवालेकडे जमा झाल्यानंतर ते विदयुत देयक आपोआप संगणकीय देयकामध्ये दुरुस्त होवून विदयुत देयक कमी होईल व तसे सामनेवालेंनी तक्रारदारास सांगितले होते. तरी तक्रारदाराने सामनेवाले विरुध्द सदरची खोटी तक्रार दाखल केलेली आहे.
तक्रारदाराने विज देयकासंबंधी दाखल केलेली तक्रार न्याय मंचात चालू शकत नाही. विदयुत कायदा 2003 चे कलम 42(5) च्या अनुरोधाने ग्राहकासाठी विज कंपनी कायदया अंतर्गत न्याय मंच स्थापन केलेले आहेत व त्यांच्याकडेच विदयुत ग्राहकांनी तक्रारी केल्या पाहिजेत, अशी तरतुद आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हील अपील नं. 3551/2006 दि. महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी विरुध्द लोयडा स्टील इंडस्ट्रीजच्या न्याय निवाडया आधारे सदर तक्रार ही या न्याय मंचास ऐकण्याचा अधिकार नाही. म्हणून सदरील तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
न्याय निर्णयासाठी मुद्दे उत्तरे
1. सामनेवालेंनी चुकीचे देयक देवून तक्रारदारांना
दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब
तकारदाराने सिध्द केली काय ? नाही.
2. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
3. अंतिम आदेश ? निकालाप्रमाणे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवालेचा खुलासा, दाखल कागदपत्रे, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान अँड. एस. एस. देशमुख व सामनेवालेचे विद्वान अँड. ए. एस. पाटील यांचा युक्तिवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदाराने तारीख 24/8/2009 रोजी भरणा केलेले देयक हे सहायक अभियंता, म. रा. वि. वि. कंपनी (ग्रामीण) उपविभाग बीड यांच्या खात्यात भरल्यामुळे ते तक्रारदाराच्या पुढील देयकात थकबाकी म्हणून दर्शविण्यात आले. यासंदर्भात तारीख 25/02/10 रोजी सहायक अभियंता, (ग्रामीण) उपविभाग, म.रा.वि.वि. कं. बीड यांना उप कार्यकारी अभियंता, उप विभागीय कार्यालय, बीड यांनी पत्र दिलेले आहे, त्यावरुन सदरची बाब स्पष्ट होते. तक्रारदाराने चुकीच्या ठिकाणी देयक भरलेले असल्याने सदरचे देयक हे तक्रारदाराच्या खात्यावर जमा झालेले नाही व त्यामुळे तक्रारदारांना सदर देयकाची थकबाकी दर्शवून देयके देण्यात आलेली आहेत. सदरची रक्कम जमा न झाल्याने तक्रारदाराकडे चालू महिन्याच्या देयकात सदरची थकबाकी व व्याज आकारुन तक्रारदारांना प्रत्येक महिन्याचे देयक देण्यात आलेले आहे. तक्रारदाराने सदरची बाब सामनेवालेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सामनेवालेंनी तक्रारदारांना सदरची देयके हाताने दुरुस्ती करुन दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे व रक्कम भरावयास सांगितले. परंतू तक्रारदाराने त्याप्रमाणे कोणतीही रक्कम सामनेवालेकडे जमा केलेली नाही. तक्रारदारांना विज मापक वाचनाप्रमाणे देयके देण्यात येत नाही, अशी तक्रारदाराची तक्रार नाही. सदरची देयके चुकीची कशी देण्यात येतात याबाबत तक्रारदाराच्या तक्रारीत केवळ थकबाकी व व्याज यावर आक्षेप आहे. परंतू तक्रारदाराने भरलेली रक्कम ही चुकीच्या खात्यावर भरलेली असल्याने, ती रक्कम जमा होण्यास उशीर झाल्याने तक्रारदारांना सदरची देयके ही थकबाकी व व्याजासह देण्यात आलेली आहे.
तक्रार चालू असतांना सामनेवालेने तक्रारदाराचे देयक दुरुस्ती करुन दिलेले आहे व सदर देयकात तक्रारदाराची जमा असलेली देयकाची रक्कम वजा करुन दुरुस्ती देयक तक्रारदारांना देण्यात आलेले आहे, त्यामुळे सामनेवालेने सेवेत कसूर केल्याची बाब कोठेही स्पष्ट होत नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदाराच्या चुकीने तक्रारदारांना सदरचा मानस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सामनेवालेंना त्याबाबत दोष देणे उचित होणार नाही. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम देणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2. सामनेवालेच्या खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड