न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे
तक्रारदार हे बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीस आहेत. एप्रिल 2013 पर्यंत तक्रारदार हे बँक ऑफ इंडिया शाखा गारगोटी (महाराष्ट्र) येथे काम करत होते. त्यानंतर तक्रारदारांनी तक्रारदारांची बदली बँक ऑफ इंडिया शाखा- फोरबेर गंज जि. आरिया (बिहार) येथे झाली. तक्रारदार हे गारगोटी येथे नोकरीत असताना मुरगुड, ता. कागल, जि. कोल्हापूर येथे त्यांच्या कुटूंबियासमवेत राहत होते. वर नमूद बदलीच्या कारणास्तव तक्रारदाराने शाखा- फोरबेसगंज जि. आरिया (बिहार) येथे राहणेस जाणेचा निर्णय घेतला. त्यामुळे तक्रारदाराने त्यांचे घरगुती साहित्य व वस्तु वि.प. सहारा मुव्हर्स अॅन्ड पॅकर्स या वाहतुक करणा-या कंपनीकडे तक्रारदाराने शाखा- फोरबेसगंज जि. आरिया (बिहार) येथे वाहतुक करुन नेणेसाठी दि. 19-05-2013 रोजी सोपविले. प्रस्तुत साहित्य वि.प. कंपनीकडे सोपवलेचा बुकींग दिवस 19-05-2013 होता तर कनसाईनमेंट नोट नं. 1041 असा होता. तसेच प्रस्तुत साहित्य वाहून नेणेसाठी वि.प. कंपनीत तक्रारदाराने रक्कम रु. 63,800/-(रुपये त्रेसष्ट हजार आठशे मात्र) अदा केले होते. त्याबाबतची पावती वि.प. ने तक्रारदाराला अदा केली आहे. सदर पावतीसोबत वाहतुकीसाठी तक्रारदाराने वि.प. कडे सोपविलेल्या घरगुती साहित्याची यादी जोडलेली आहे. प्रस्तुत सदर पावती साहित्याची यादी व्हेरीफाय करुन दाखल केली आहे. बुकींगचेवेळी वि.प. कंपनीने तक्रारदाराचे साहित्य हे कलवानिया रोडवेज यांचेकडील कडील स्वतंत्र कंटेनरमधून पाठवले जाईल व सदर साहित्य तक्रारदाराला बुकींगचे तारखेपासून 10 ते 12 दिवसात पोहोच होईल अशी वि.प. खात्री दिली होती. परंतु वि.प. ने ठरलेप्रमाणे वेळेत साहित्य पोहोच केले नाही. तसेच दि. 17-06-2013 रोजी बुकींग केलेल्या साहित्यातील काही साहित्य हे खराब झालेल्या स्थितीत मिळाले. वि.प.ने ठरले प्रमाणे साहित्य स्वतंत्र कंटेनरमधून पाठविले नाही. सदर खराब झाले साहित्यामध्ये मार्बलचे देऊळ (देव्हारा) किंमत रक्कम रु. 8,000/-, पुस्तकाचे कपाट रक्कम रु. 2400/-, पुस्तके रक्कम रु. 2000/- ची देव देवतांचे रक्कम रु. 600/- फोटो, रक्कम रु. 2050/- चा डिश अंटेना, तसेच रक्कम रु. 30,000/- चा गोदरेजचा बेड ज्याचे रक्कम रु. 8,000/- चे नुकसान झाले आहे. नवीन गोदरेज कपाट रक्कम रु. 15,000/- चे, रक्कम रु. 800/- चे प्लास्टिक टेबल, रक्कम रु. 2000/- चा वॉटर फिल्टर, रक्कम रु. 1000/- स्वयंपाक घरातील साहित्य, रक्कम रु. 2000/- चे करटेन, रक्कम रु. 600/- चे लॅपटॉप पॅड, व रक्कम रु. 11,800/- चेक इतर घरगुती वापराचे साहित्य, हे सर्व साहित्य वि.प.ने तक्रारदाराला खराब झालेले स्थितीत व न वापरण्याच्या स्थितीत दिले आहे. प्रस्तुत नुकसानीबाबत तक्रारदाराने वि.प. कंपनीस कळविले असता माल पोहोच केलेवर नुकसानीची भरपाई देऊ असे आश्वासन दिले होते. प्रस्तुत नुकसानीचा संक्षिप्त तपशील दि. 27-06-2013 चे पोहोच पावतीच्या पाठीमागे लिहिला आहे. ती याकामी दाखल आहे. वि.प. यांनी तक्रारदाराचे उर्वरीत साहित्य असलेली बॅग दि. 5-08-2013 रोजी पोहचली तर सदर साहित्यामधील बॅग ही बदल झाले पॅकींगमधील होती. तक्रारदाराने वि.प. ला विचारणा केली असता सुरक्षिततेसाठी बदल केलेचे सांगण्यात आले व ठरलेल्या बाबींची पूर्तता नंतर करु असे सांगितले व तक्रारदाराने बॅग उघडली असता सदर बॅगचे ओपनिंग नीप ही मोडलेल्या स्थितीत होती तसेच बॅगेतील महत्वाचे साहित्य म्हणजे रक्कम रु. 2175/- च्या नोटा व नाणी तसेच रक्कम रु. 15,000/- चे कपडे गहाळ झालेले होते. अशा प्रकारे वि.प.ने ठरलेप्रमाणे साहित्य वेळेवर पोहोच केले नाही. पोहोचवेलेले साहित्य हे अत्यंत खराब अवस्थेत वापरण्यायोग्य नसलेचे असे आहे. नुकसानीबाबत वि.प. यांना विचारणा केली असता त्यांनी नुकसान भरपाईबाबत खोटी आश्वासने दिली. यातील वि.प. यांनी नुकसान केलेल्या व गहाळ झालेल्या साहित्यांची एकूण किंमत रक्कम रु. 84,925/- इतकी होते. प्रस्तुत नुकसान झाले साहित्याचे फोटो याकामी दाखल केले आहेत. या प्रकारे वि.प.ने साहित्य वाहतुकीमध्ये निष्काळजीपणा व गैरव्यवहार केल्याने तक्रारदाराचे साहित्याचे प्रचंड नुकसान झालेने वि.प. ने तक्रारदाराला सेवेत त्रुटी केली आहे. व तक्रारदाराचे झाले नुकसानीस वि.प. हे जबाबदार आहेत. त्यामुळे वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईची मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने या मे. मंचात दाखल केला आहे.
2) प्रस्तुत कामी तक्रारदाराने वि.प.कडून झाले नुकसानीची भरपाई रक्कम रु. 84,925/- मानसिक त्रासाबाबत रक्कम रु. 25,000/- अशी एकूण रक्कम रु. 1,09,925/- द.सा.द.शे. 12 % व्याजासह मिळावी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- वि.प. कडून वसूल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
3) तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडेव्हीट, नि. 3 चे कागद यादीसोबत वि.प. ने तक्रारदाराला दिलेली पावती, वि.प. कंपनीकडे वाहतुकीसाठी सोपविले मालाची यादी, तक्रारदाराने वि.प. कंपनीस दिलेले पत्र, तक्रारदाराने वि.प. ला वकिलामार्फत दिलेली नोटीस, नोटीसीची पोहोच पावती, वि.प. ने पाठवलेले नोटीस उत्तर, साहित्याचे झाले नुकसानीचे फोटो, पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केले आहेत.
4) वि.प. ने प्रस्तुत कामी म्हणणे/कैफियत, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस व लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे वि.प. ने या कामी दाखल केली आहेत.
वि.प. ने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत, वि.प. ने तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढील आक्षेप नोंदवलेले आहेत.
(i) तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही.
(ii) तक्रारदाराने तक्रार अर्जात कथन केलेप्रमाणे आवश्यक पक्षकार केले नसलेने तक्रारीस नॉन जाईंडर ऑफ पार्टीज या तत्वाची बाधा येते.
(iii) तक्रारदाराने वि.प. कडे वाहतुकीने सर्व साहित्य मुरगुडहून फोरबेसगंज जि. आरिया (बिहार) येथे पाठवण्याचे होते. व तक्रारदार यांचे समोरच तक्रारदाराचे साहित्याची बांधणी वि.प. यांनी केली होती. तसेच तक्रारदाराचे बँगेचे झीप खराब झाली व त्यातील चलनी नोटा व नाणी रक्कम रु. 2175/- तसेच रक्कम रु. 15,000/- चे कपडे हरवले हे खोटे आहे. सदरची बाब तक्रारदाराने वि.प. यांना कळविलेली नव्हती व नाही. मुळातच कोणतीही कंपनी, कुरिअर सेवा, टपालसेवा, व तत्सम प्रकारचा कंपन्या रक्कम, नाणी, कपडे व मौल्यवान वस्तू कधीही व केव्हाही पाठवण्याची हमी घेत नाही. सदर वस्तू कोणतीही कंपनी पाठवत नाही याची माहिती वि.प. ने तक्रारदाराला दिली होती. असे असताना केवळ वि.प. यांना बदनाम करण्याचे हेतूने तथाकथीत कथने तक्रारदाराने तक्रार अर्जात केली आहेत. तक्रारदाराचे कथनाप्रमाणे हरवलेली बॅग ही ट्रॅफॉन कुरियर यांचेमार्फत सुस्थितीमध्ये तक्रारदार यांना मिळालेली असून सदर कुरियरमार्फत सुस्थितीत तक्रारदार यांना मिळालेली आहे व तक्रारदाराने ती स्विकारलेली आहे. प्रस्तुत बॅगेबाबत कोणतीही तक्रार तक्रारदाराने केलेली नव्हती व नाही. असे असता तक्रारदाराने मुद्दाम खोटा तक्रार अर्ज दाखल केला आहे तो नामंजूर करणेत यावा.
(iv) तक्रारदाराला सर्व वस्तु वि.प. कडून मिळालेल्या आहेत. तरीही जाणीवपूर्वक वि.प. यांचेकडून रक्कम वसुल करणेसाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे तो फेटाळणेत यावा.
(v) तक्रारदार तर्फे वकिलांनी पाठवले नोटीसला वि.प. ने अॅड. मोकाशी यांचेतर्फे समर्पक उत्तर दिलेले आहे. वि.प. ने कोणतीही अनुचित प्रथा अवलंबिली नाही व तक्रारदाराला सदोष सेवा दिली नाही. त्यामुळे वि.प. ने तक्रारदाराला रक्कम रु. 1,09,925/- कध्ंभ्ही देणे लागत नाहीत.
(vi) तक्रारदाराच्या घरगुती वस्तु मुरगुड, ता. कागल मधून फोरबेसगंज जि. आरिया (बिहार) येथे योग्यप्रकारे पॅकींग करुन नेमक्या ठिकाणी पाठविणेबाबत तक्रारदार व वि.प. यांचेत ठरलेनंतर तक्रारदाराच्या मौल्यवान वस्तू रक्कम व कपडे व तत्सम मौल्यवान वस्तू सोडून इतर वस्तू पाठवून देणेचे वि.प. ने मान्य केले होते. व त्यासाठी रक्कम रु. 63,800/- भाडे ठरले होते. तसेच वाहतुकीदरम्यान जर नुकसान झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही वि.प. यांची नसून तक्रारदार यांचीच आहे. याची स्पष्ट कल्पना तक्रारदाराला होती. तसेच ज्यावेळी पॅक केलेल्या वस्तू वाहनामध्ये ठेवल्या त्यावेळीही वि.प.ने तक्रारदाराला यामध्ये काही मौल्यवान व किंमती वस्तु आहेत काय ? काचेच्या वस्तु आहेत का ? असे विचारले होते त्यावेळी वि.प. ला तक्रारदाराने अशा कोणत्याही वस्तु यामध्ये नाहीत असे वि.प. ला सांगितले. प्रस्तुत सर्व वस्तुत तक्रारदाराने दि. 17-06-2016 रोजी स्विकारल्या आहेत.
(vii) तक्रारदार हे बँकेमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून नोकरीस आहेत. त्यांना बदली झालेनंतर साहित्य नेणेसाठी झालेला खर्च त्यांची बँक पावती पाहून देत असते. वि.प. चे माहितीप्रमाणे सदर बँकेचे नोंदणीकृत यादीवर असलेल्या पॅकर्स अॅन्ड मुव्हर्स कडूनच वाहतुक केलेल्या खर्चाची रक्कम परत मिळत असते. मात्र वि.प. यांचे नांव तक्रारदार नोकरीस असले बँकेच्या यादीमध्ये नव्हते व नाही याची स्पष्ट कल्पना तक्रारदाराला वि.प. ने दिली होती व त्याप्रमाणेच वि.प.ने तक्रारदाराला कनसाईन नोट दिली होती. प्रस्तुत कनसाईन नोटमध्ये एकूण 44 वस्तू समाविष्ठ होत्या. व त्याची यादी तक्रारदाराने सही करुन वि.प. कडे दिलेली आहे.
(viii) तक्रारदार यांनी वि.प. यांना बँकेकडून संपूर्ण रक्कम मिळणेसाठी दुस-या कंपनीचे नोट देणेची विनंती केली असता वि.प. यांनी धुडकावून लावली. तक्रारदाराने परस्पर कळवालीया रोडलाईन्स यांचेकडुन 43 वस्तू वाहतुक केली व त्याचा खर्च रु. 76,800/- इतका लावला व तशी पावती तयार करुन वि.प. कडे दिली व वि.प. यांना त्यावर तक्रारदाराने व कुटूंबियांनी भावनीक आव्हान करुन सही करायला भाग पाडले. त्यामुळे वि.प. ने त्यावर सही केली. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता सदर बीलामध्ये 48 टन असे वजन पावतीत खाडाखोड करुन केले आहे. तसेच रक्कमेची खाडाखोड करुन रक्कम रु. 76,800/- असे नमूद करुन तक्रारदाराने त्यांचे बँकेकडून वाहतुकीचा खर्च वसूल केला आहे. वि.प. ने सदर बँकेस झाले फसवणुकीची कल्पना देवू नये म्हणून वि.प. विरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. सबब, वि.प. ला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तक्रारदार याचेकडूनच वि.प. यांना कॉम्पेनसेटरी कॉस्ट रक्कम रु. 50,000/- वसुल होऊन मिळावेत असे म्हणणे/कैफियत वि.प. ने दाखल केली आहे.
5) वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प. ने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प. यांचेकडून नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि वे च न –
मुद्दा क्र. 1 ते 3 –
5) वर नमूद मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण तक्रारदाराने वि.प. कंपनीमार्फत त्याच्या वस्तू/सामान मुरगुड, ता. कागल ते फोरबेसगंज जि. आरिया (बिहार) इथे बदलीच्या ठिकाणी पोहोच करणेबाबत ठरले होते व उभयतांमध्ये ठरलेप्रमाणे रक्कम रु. 63,800/- (रक्कम रु. त्रेसष्ट हजार आठशे मात्र) वि.प. यांना तक्रारदारकडून मिळालेली आहे हे तक्रारदाराने दाखल केले पावतीवरुन स्पष्ट होते तसेच वि.प. ने सदरची बाब मान्य केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकरार्थी दिले आहे. तसेच वि.प. ने प्रस्तुत कामी दाखल केले म्हणणे/कैफियतीमध्ये कथन केलेले बचावात्मक मुद्दे सिध्द करणेसाठी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तसेच वि.प. च्या मते तक्रारदाराने दाखल केले पावतीवर खाडाखोड आहे परंतु सदरची तक्रारदाराने दाखल केलेली पावतीचे अवलोकन करता त्यावर कोणतीही खाडाखोड दिसून येत नाही व तक्रारदारकडून रक्कम रु. 63,800/- मिळालेबाबत वि.प. ची सही आहे. तसेच एकूण 44 वस्तू नमूद आहेत. त्याची लिस्टही सोबत जोडली आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराने सदर वाहतुकीदरम्यान खराब झाले वस्तुंचे फोटो तक्रार अर्जासोबत याकामी दाखल केले आहेत. त्या फोटोबाबत वि.प. ने काहीच मत व्यक्त केलेले नाही. किंवा सदरचे फोटो खोटे असलेचे मत व्यक्तही केलेले नाही. तक्रारदाराने वस्तु खराब झालेबाबत वि.प. ला नोटीस पाठवली आहे ती याकामी दाखल आहे. तसेच इ-मेल सुध्दा पाठविलेला आहे ती याकामी दाखल आहे. सबब, तक्रारदाराचे वस्तुंचे वाहतुकीदरम्यान नुकसान झालेले आहे हे स्पष्ट होते. मात्र प्रस्तुत वस्तुंचे किती किंमतीचे नुकसान झाले आहे याबाबत कोणत्याही तज्ञ व्हॅल्युएटरचे रिपोर्ट किंवा प्रतिज्ञापत्र नाही त्यामुळे तक्रारदाराचे झालेले नुकसान हे सर्वसाधारणप्रकारे पकडणे न्यायोचित होणार आहे.
मे. मंचाने त्यांना असले अधिकारानुसार दाखल सर्व कागदपत्रावरुन नमूद तक्रारदारचे वस्तुचे झालेले नुकसान हे पूर्णपणे झालेले नसून अंशत: झाले आहे व ते नुकसान सर्वसाधारण दराने पकडता एकूण रक्कम रु. 30,000/- झालेले आहे. या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. कारण तक्रारदाराचे वस्तुचे नुकसान झालेलेच नाही हे सिध्द करणेसाठी वि.प. यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा या कामी दाखल केलेला नाही त्यामुळे वि.प. यांनी वाहतुकी दरम्यान तक्रारदाराचे सामानास नुकसान पोहोच होईल अशा पध्दतीने निष्काळाजीपणाने वाहतुक केली व साहित्य नेताना निष्काळाजीपणा केला ही बाब म्हणजे सेवेतील त्रुटीच आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब, प्रस्तुत कामी वि.प. यांचेकडून साहित्यांची वाहतुकीदरम्यान झाले नुकसानीपोटी रक्कम रु. 30,000/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/- वि.प. यांचेकडून तक्रारदार यांना मिळणे न्यायोचित होणार आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदार यांना सामानाचे वाहतुकी दरम्यान झाले नुकसानीपोटी रक्कम रु. 30,000/- (अक्षरी रक्कम रुपये तीस हजार मात्र) अदा करावेत.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच मात्र) वि. प. ने तक्रारदाराला अदा करावी.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. नं. 2 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत वि.प. यांनी मे. मंचाचे आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. नं. 2 विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.