( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या )
आदेश
( पारित दिनांक : 10 ऑगस्ट, 2011 )
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक सरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
यातील तक्रारदाराचे थोडक्यात निवेदन असे आहे की, तक्रारदाराने गैरअर्जदार यांचे सहारा सिटीहोम मौजा-गवसी, मानापुर,जि.नागपूर येथील गाळा क्रमांक अ-506, क्षेत्रफळ 66.25 चौरस मिटर चा एकुण मोबदला रुपये 13,19,251/- खरेदी करण्याचा दिनांक 23/12/2004 रोजी करार केला होता. सदर मोबदल्यापैकी तक्रारदाराने रुपये 9,45,468/- एवढी रक्कम गैरअर्जदारांना अदा केली. दिनांक 6/9/2010 रोजी तक्रारदाराने सदर कार्यस्थळाला भेट दिली व पाहणी केली असता तक्रारदाराचे सदर गाळयाचे बांधकाम अजुनही 95 टक्के बाकी आहे. वास्तविक गैरअर्जदाराचे पत्रानुसार सदर गाळयाचा ताबा 2009 मधे तक्रारदारास द्यावयास हवा होता. गैरअर्जदारांनी घेणे असलेल्या रक्कमेपैकी 70टक्के रक्कम घेऊन सुध्दा गाळयाचे बांधकाम पुर्ण केले नाही व तक्रारदाराला पुर्ण रक्कमेची मागणी करीत आहे व करारभंग करण्याची धमकी देतात.
तक्रारदार गैरअर्जदारास पुर्ण रक्कम गाळयाचा ताबा व विक्रीपत्र होणार त्याचदिवशी देण्यास तयार होता व आजही आहे. तक्रारदाराने तसे गैरअर्जदारांना लेखी कळविले आहे. तरी गैरअर्जदार तक्रारदाराला पुर्ण रक्कमेची मागणी करीत आहे व करार भंग करण्याची धमकी देत आहे. ही गैरअर्जदार यांचे सेवेतील कमतरता आहे म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने गाळयाचे बांधकाम त्वरीत पूर्ण करुन त्याचा ताबा व खरेदी करुन द्यावी व तक्रारदाराकडील उर्वरित रक्कम स्विकारावी. तसेच तक्रारदाराने घेतलेल्या कर्जावर बॅकेचे दराप्रमाणे व्याज गैरअर्जदाराकडुन मिळावे. तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व गैरसाईपोटी रुपये 50,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 25,000/- मिळावे अशी मागणी केली.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार एकुण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात गैरअर्जदारकडे जमा केलेल्या रक्कमेचा खातेउतारा, गाळा आरक्षीत झाल्याबाबतचे पत्र, गैरअर्जदाराने तक्रारदारास 38 हप्ते भरण्याचे पूर्ण विवरण पत्र, पेमेन्ट व पझेशन प्लान चे विवरण पत्र, व इतर कागदपत्रे दाखल केलीत. तक्रारदाराने प्रतिउत्तर दाखल केले.
यात गैरअर्जदार क्रं.1 ते 5 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार क्रं 1 ते 4 हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदार क्रं.5 यांना नोटीस तामील होऊन हजर न झाल्याने प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 29.11.2010 रोजी पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रं 1 ते 4 यांचे कथनानुसार सदर तक्रार खोटी आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराने नोदविलेल्या जागेचे बुकींग रद्द केल्याने व्यथीत होवून ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत विहीत अर्जाचा नमुना दाखल केला नाही. त्यात अटी व शर्ती नमुद केलेल्या आहे. त्या सर्व बाबी तक्रारदाराने लपवुन ठेवलल्या. वास्तविक करारप्रमाणे वाद निर्माण झाल्यास तो लवादाकडुन सोडविण्यात येईल अशी अट आहे.
वास्तविक सदर परिसर प्रथम श्री पीसे यांनी खरेदी केला होता. नंतर श्री पीसे यांनी हस्तांरणाकरिता अर्ज केल्याचे कारणावरुन गैरअर्जदाराने सदर परिसर तक्रारदाराचे नावे नोंद करुन दिनांक 11.10.2007 रोजी आवंटन पत्र देण्यात आले. त्यात शेडयुल ऑफ पेमेंट/भुगतान विवरण समाविष्ट आहे. तक्रारदाराने सदर गाळा दिनांक 23.12.2004 रोजी विकत घेतला हे म्हणणे खोटे आहे. तक्रारदाराने कधीच सदर जागेची नोदणी गैरअर्जंदाराकडे केलेली आहे. विक्रीचा करारनामा केलेला नाही.
आजतागायत आक्टोबर- 2009 पर्यत तक्रारदाराने रुपये 9,45,468/- गैरअर्जदारांना अनियमितपणे अदा केलेले आहे. आवंटन पत्रातील भुगतान विवरणाप्रमाणे केलेले नाही. सदर पत्रातील शर्ती व अटी तक्रारदारास बंधनकारक आहे. कारण आक्टोबर-2009 पासुन करारातील पेमेंन्ट शेडयुलनुसार तक्रारदाराने भुगतान बंद केल्यामुळे करारातील अटी व शर्तीनुसार दिनांक 13/7/2009 रोजी तक्रारदाराय कायदेशीर नोटीस देण्यात आली होती परंतु तक्रारदार आला नाही व रक्कम जमा केली नाही. अशा परिस्थितीत अर्जातील अटी नुसार तक्रारदाराची नोंदणी / बुकींग आपोआपच रद्द झाले. वास्तविक 80 टक्के बांधकाम आधीच पुर्ण झाले आहे. गैरअर्जदार तक्रारदाराने जमा केलेली रक्कम , खर्च /चार्जेस वजावट करुन परत करण्यास तयार होते व आजही आहे. वरील सर्व बाबीवरुन गैरअर्जदारांनी आपले सेवेत कुठलीही कमतरता ठेवली नाही म्हणुन तक्रार खारीज करावी अशी मागणी केली आहे.
तक्रारदारातर्फे वकील श्री एस.एम.सावरे व गैरअर्जदार क्रं.1 ते 3 तर्फे
वकील के. के. नालमवार यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
#0#- कारणमिमांसा -#0#
दोन्ही पक्षाचे म्हणणे, दाखल दस्तऐवज, पुरावे बघता निर्वीवादपणे तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. करारात लवादाची अट असली तरी ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 3 चा विचार करता ही तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार आहे. कागदपत्र क्रं.8 वर तक्रारदाराने दाखल केलेले दिनांक 11.10.2007 चे पत्रावरुन तक्रारदाराने सहारा सिटीहोम मौजा-गवसी, मानापुर,जि.नागपूर येथील एक गाळा दिनांक 23/12/2004 रोजी एकुण रुपये 13,99,251/- एवढया किंमतीत खरेदी करण्यासाठी गैरअर्जदार यांचेकडे विहीत स्वरुपातील अर्ज केला होता. त्याला अनुसरुन दिनांक 12.10.2007 रोजी गैरअर्जदाराने सदर गाळयाचे तक्रारदाराचे नावे नोंदणी करुन तक्रारदारास तशी सुचना दिल्याचे दिसुन येते. तसेच कागदपत्र क्रं. 8 वरील आवंटन पत्रानुसार दिनांक 11.10.2007 रोजी तक्रारदाराचे नावे सदर गाळयाचे आवंटन केल्याचे दिसुन येते. तसेच सदर आवंटन पत्रानुसार आवंटन केल्यापासुन 38 महिन्याचे आत सदर गाळयाचा ताबा देण्याचे गैरअर्जदाराने कबुल केलेले होते. कागदपत्र क्रं 9 वरील पेमेन्ट शेडयुलनुसार तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांना मोबदला रक्कम प्रत्यक्ष अदा करावी असे ठरलेले होते.
गैरअर्जदार यांचे कथनानुसार तक्रारदाराने रुपये 9,45,468/- एवढी रक्कम अनियमितपणे आक्टोबर-2009 पर्यत गैरअर्जदार यांना अदा केले. होते. आवंटन पत्रात नमुद केल्याप्रमाणे उर्वरित रक्कम दिली नाही म्हणुन तक्रारदाराला ठरलेल्या अटी व शर्तीनुसार दिनांक 13/7/2009 ला नोटीस दिली होती. तक्रारदार आला नाही व त्यांनी रक्कम जमा केली नाही अशा परिस्थिती अर्जाचे अटी व शर्तीनुसार सदर गाळयाची नोंदणी आपोआपच रद्द झाली.
वास्तविक तक्रारदाराची सदर गाळयाचे पैसे भरण्याची जशी जबाबदारी होती. त्याप्रमाणात बांधकामाची प्रगती व्हावयास हवी होती. या मंचाने सदर बांधकामाची प्रगती पाहण्याकरिता मंचाद्वारे कमिश्नरची नियुक्ती केली होती व कमिशनरचे अहवालानुसार बिल्डींग क्रं.अ-3 चे बाधकाम चालु असुन 8 व्या माळयापर्यत स्लॅबचे काम झाले असुन 9 व्या माळयावरील स्लॅब प्रोसेस मध्ये आहे. वरील बिल्डींग मध्ये 5 व्या माळयाचे (तक्रारदाराच्या ) विटा जुडाईचे काम झाले असुन प्लॅस्टरचे काम चालु आहे. (कागदपत्र क्रं.48-49 )
गैरअर्जदाराने ने तक्रारदाराला सदरची नोटीस पाठविली त्याबद्दल पुरावा सादर केला नाही. तसेच अशी सुचना न देता परस्पर आवंटन रद्द करण्याची गैरअर्जदाराची कृती योग्य नाही. एकीकडे तक्रारदाराच्या सदनिकेचे आवंटन रद्द केले म्हणायचे आणि दुसरीकडे तक्रारदाराकडुन स्विकारलेली रक्कम परत न करता स्वतःकडे ठेवली ही निश्चीतच गैरअर्जदाराची कृती अयोग्य आहे. भुखंडाचे योग्यप्रमाणात बांधकाम न करता योग्य सुचना न देता आवंटन आपोआप रद्द झाले आहे. असे म्हणणे ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदाराने तक्रारदाराकडुन मोबदल्यापोटी उर्वरित रक्कम घेऊन सदर गाळयाचे विक्रीपत्र व ताबा द्यावा असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
वरील सर्व वस्तुस्थिती पाहता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर.
2. गैरअर्जदाराने सहा महिन्याचे आत बांधकाम पुर्ण करुन विक्रीपत्राची तारीख रजिस्टर पोस्टाद्वारे तक्रारदारास कळवावी. त्यानंतर एक महिन्याचे आत तक्रारदाराने राहीलेली रक्कम तक्रारदाराने राहीलेली रक्कम (13,19,251-9,45,468)= 3,73,,783/- या मंचात जमा करावी व तशी सुचना गैरअर्जदारास द्यावी.
3. गैरअर्जदाराने तक्रारदारास सदर गाळा क्रमांक अ-506, क्षेत्रफळ 66.25 चौरस मिटर चे विक्रीपत्र करुन ताबा , रक्कम जमा केल्याची माहिती मिळाल्यापासुन एक महिन्याचे आत द्यावा. कराराप्रमाणे इतर शुल्क देण्याची जबाबदारी तक्रारदाराची राहील.
4. गैरअर्जदाराने तक्रारदारास दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/-(रुपये
दोन हजार केवळ) द्यावे.
5. सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन
सहा महिन्याचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |