न्या य नि र्ण य
(दि.21-02-2024)
व्दाराः- मा. श्री अरुण रा. गायकवाड, अध्यक्ष
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज सामनेवालाकडून वादातील मिळकतीचे अंतीम खरेदीखत (कव्हेअन्स डिड) करुन मिळणेसाठी दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार ही एक सहकार कायदयाअंतर्गत नोंदणीकृत असलेली सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. त्याचानोंदणी क्रमांक आर.टी.जी./सीपीएन/ (एच.एस.जी.) / (टीसी) / 2116 /सन2018 दि.25/04/2018 असा आहे. सामनेवाला क्र.2 यांचे मालकीची मौजे चिपळूण ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथील भूमापन क्र.58 उपविभाग 1ब क्षेत्र 0-14-25 आकार 2-42 ही जमीन मिळकतीवर “ सागर विहार ” या नावाने बांधलेल्या बहुमजली इमारतीकरिता सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांचे लाभात दि.11/04/1997 रोजीचे विकसन करारपत्र लिहून देऊन सदरची जमीन मिळकत विकसित करणेचे अधिकार दिले. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांना दि.15/04/1997 रोजी दुय्यम निबंधक चिपळूण चे कार्यालयात अ.क्र.584/1997 अन्वये मुखत्यारपत्र नोंदणी करुन दिलेले आहे. सदर सागर विहार या बहुमजली इमारतीमधील सदनिकांचे विक्रीचे व्यवहार सुध्दा योग्य तो मोबदला घेऊन विविध सदनिकाधारकांचे नांवे सामनेवाला क्र.1 यांनी नोंदणीकृत दस्तावेज लिहून दिलेले आहेत. मात्र सामनेवाला क्र.1 यांनी वादातील मिळकतीतील बहुमजली इमारतीचे बांधकाम पूर्ण केले नंतर इमारतीतील सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था करुन देणेची आवश्यकता असतानाही सामनेवाला क्र.1 यांनी ती करुन देणेची टाळाटाळ केलेने सदनिकाधारकांनाच पुढाकार घेऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन तीची नोंदणी करुन घ्यावी लागली. वस्तुत: महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ॲक्टचे तरतुदींचे प्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन त्या संस्थेच्या नांवे कन्व्हेअन्स डीड (अंतिम खरेदीखत) करुन देणेचे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे कायदेशीर दायित्व असूनही सामनेवालांनी तसे करणेस कसूर केलेली आहे. कायदेशीर तरतुदींचे नुसार सर्व सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करणे, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लाभात बहुमजली इमारत व तदनुषंगिक हक्कअधिकार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नांवे वर्ग करणेचे संदर्भातील कन्व्हेअन्स डीड (अंतिम खरेदीखत) लिहून देणेचे कायदेशीर बंधन सामनेवाला क्र.1 व 2 यांचे वर असून त्यांनी हेतुत: टाळाटाळ केलेली आहे. तक्रारदार सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झालेनंतरसुध्दा सामनेवाला क्र.1 यांचेशी अनेकवेळा संपर्क साधून तक्रारदार संस्थेच्या नांवे कन्व्हेअन्स डीड करुन देणेबाबत विनंती करुनसुध्दा त्याकडे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार संस्थेच्या वतीने दि.01/01/2021 रोजीची नोटीस रजि.पोष्टाने सामनेवाला क्र.1 व 2 यांना पाठविण्यात आली. सामनेवाला क्र.1 ची नोटीस परत आली व सामनेवाला क्र.2 यांनी नोटीस स्विकारली व नोटीसीतील मागणीची पूर्तता करुन देतो असे सांगितले परंतु चालढकल करणेत आली. परंतु सामनेवाला क्र.2 यांनी जमीन मालक या नात्याने श्री तुकाराम धोंडिबा मुसळे यांचे नांवे दि.26/07/2012 रोजीचे खरेदीखत अनुक्रमांक चपल/03037/2012करुन दिलेले आहे. सदरचे खरेदीखतामध्ये सामनेवाला क्र.1 विकासक हे अचानक निघून गेलेने सामनेवाला क्र.2 यांनी सदरहू जमीन मिळकतीच्या मालक या नात्याने दि.26/07/0212 रोजीचे खरेदीखत लिहून दिलेले आहे. त्याकारणाने सामनेवाला क्र.1 हे जरी विकसक असले तरी त्यांचे अनुपस्थितीत सामनेवाला क्र.2 यांना जमीन मालक या नात्याने तक्रारदार संस्थेच्या लाभांत कन्व्हेअन्स डीड करुन देण्याचे पूर्ण अधिकार आहेत. सबब सामनेवाला यांचेकडून करारपत्राप्रमाणे तक्रारदार संस्थेच्या नांवे अंतिम खरेदीखत करुन देणेचे कामी सेवेतील त्रूटी घडलेली आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार संस्थेच्या नांवे अंतीम खरेदीखत (कन्व्हेअन्स डीड) करुन देणेबाबतचा आदेश व्हावा. तसेच तक्रारदारास मानसिक, आर्थिक त्रासांपोटी सामनेवालाकडून रक्कम रु.1,00,000/- नुकसान भरपाई मिळाणेबाबत आदेश व्हावा तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.20,000/- दयावेत अशी विनंती अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी तक्रारीसोबत अॅफिडेव्हीट दाखल केले असून नि.6 कडे एकूण 12 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये नि.6/1कडे तक्रारदार संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, नि.6/2 कडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी यांचे दि.16/03/2018 रोजी पारीत केलेल्या आदेशाची प्रत, नि.6/3 कडे वाद मिळकतीचा 7/12 उतारा, नि.6/4 कडे तक्रारदार संस्थेच्या कार्यकारणी समितीचे सभेतील ठराव क्र.1 ची प्रत, नि.6/5 कडे सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांना लिहून दिलेले दि.11/04/1997 रोजीचे विकसन करारपत्राची प्रत, नि.6/6 कडे सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांना लिहून दिलेले दि.15/04/1997 रोजीचे मुखत्यारपत्र, नि.6/7 कडे सामनेवाला क्र.2 यांनी श्री तुकाराम मुसळे यांना लिहून दिलेले साठेकरारपत्र दि.15/12/1999 अनुक्रमांक चपल/2028/1999 ची प्रत, नि.6/8 कडे सामनेवाला क्र.2 यांनी श्री तुकाराम धोंडीबा मुसळे यांना लिहून दिलेले खरेदीपत्र दि.26/07/2012 अनुक्रमांक चपल/3037/2012 ची प्रत, नि.6/9 कडे सदानंद जोगळे यांचे नांवे मानाजी आयरे यांनी दि.17/07/2006 रोजी नोंद करुन दिलेले खरेदीखत अनुक्रमांक चपल/2189/2006 ची प्रत, नि.6/10 कडे तक्रारदाराने सामनेवालास वकीलांमार्फत पाठविलेली नोटीसची प्रत, नि.6/11 कडे सामनेवाला क्र.1 यांची नोटीस परत आलेची प्रत, नि6/12 कडे सामनेवाला क्र.2 यांना नोटीस पोहोचलेची पोष्टाची पोचपावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.13 कडे साक्षीदार सचिव, सदानंद नारायण जोगळे यांचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले. नि.15 व 23 कडे साक्षीदाराचे प्रतिज्ञापत्र हाच तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद वाचण्यात यावा अशी पुरसिस दाखल केली आहे.
3. सदर कामी तक्रारदार यांनी नि.12 कडे दिवाणी प्रक्रिया संहिता,1908 चे क्रम 6 नियम 17 आणि क्रम 22 नियम 4 (1) अन्वये सामनेवाला क्र.1 यांना प्रस्तुत प्रकरणातून कमी करण्याबाबतचा अर्ज दिला. सदर अर्जामध्ये तक्रारदार यांनी कथन केले आहे की, सामनेवाला क्र.1 यांना सदर कामी नोटीस पाठविली असता सामनेवाला क्र.1 यांच्या नोटीसचा लखोटा परत आलेला असून त्यावर Deceased(मयत) असा शेरा असून सामनेवाला क्र.1 चे वारसांबाबत तक्रारदार यांना कोणतीही माहिती नाही. सदरचा लखोटा नि.9 कडे दाखल आहे. सबब सामनेवाला क्र.1 यांना प्रस्तुत प्रकरणातून कमी करण्याची परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे. सदर अर्ज मंजूर करण्यात येऊन सामनेवाला क्र.1 हे मयत असलेने त्यांना या प्रकरणातून कमी करण्यात आले.
4. प्रस्तुत कामी सामनेवाला क्र.2 यांना नोटीस लागू होऊन सामनेवाला क्र.2 हे वकीलांमार्फत सदर कामी हजर झाले. नि.8 कडे पोष्टाची पोचपावती दाखल आहे. सामनेवाला क्र.2 यांना दि.21/02/2022 रोजी नोटीस लागू होऊनही त्यांना सदर कामी ब-याच संधी देऊनही त्यांनी वेळेत लेखी म्हणणे दाखल केले नसलेने सामनेवाला क्र.2 विरुध्द दि.19/05/2022 रोजी म्हणणे नाही आदेश पारीत करण्यात आला. तसेच सामनेवाला क्र.2 यांना अनेक मुदती देऊनही सदर कामी कोणताही पुरावा दाखल केला नाही त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द दि.06/07/2022 रोजी पुरावा नाही असा आदेश पारीत करण्यात आला. सामनेवाला क्र.2 यांनी नि.22 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले तक्रार अर्ज व सर्व कागदपत्रांचे तसेच सामनेवाला क्र.2 यांचे लेखी युक्तीवादाचे अवलोकन करुन मे. आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार संस्था व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सदरची तक्रार मुदतीत आहे काय ? | होय. |
3 | सामनेवाला 2 यांनी तक्रारदार संस्थेला नोंद खरेदीखत न करुन देऊन सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
4 | तक्रारदार संस्था सामनेवाला क्र. 2 यांचेकडून नोंद खरेदीखत करुन मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न –
6. मुददा क्र.1 :- सामनेवाला क्र.2 यांचे मालकीची मौजे चिपळूण ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथील भूमापन क्र.58 उपविभाग 1ब क्षेत्र 0-14-25 आकार 2-42 या जमीन मिळकतीवर सामनेवाला क्र.1 यांनी “ सागर विहार ” या नावाने बांधलेल्या बहुमजली इमारतीतील सदनिकाधारकांनी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन तीची नोंदणी करुन घेतली. त्याचा नोंदणी क्रमांक आर.टी.जी./सीपीएन/ (एच.एस.जी.) /(टीसी)/2116/सन2018 दि.25/04/2018 असा असलेचे तक्रारदार यांनी नि.6/1 कडे प्रमाणपत्र दाखल केले आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.6/10कडे सदर गृहनिर्माण संस्थेचे कन्व्हेन्स डीड करुन देणेबाबत वकीलांमार्फत पाठविलेली कायदेशीर नोटीस पाहता तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे सिध्द होते. तसेच तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असलेचे स्पष्ट होते. सबब मुद्रदा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
7. मुददा क्र.2 :- सामनेवाला यांनी तक्रारदार यांना आजअखेर प्रस्तुत वादमिळकतीचे नोंदणीकृत अंतिम खरेदीखत करुन दिलेले नाही. तक्रारदाराने वारंवार सामनेवालाकडे अंतिम नोंद खरेदीखत करुन देणेची विनंती करुनही सामनेवाला यांनी अदयाप वादातील मिळकतीचे नोंद खरेदीखत करुन तक्रारदाराला करुन दिलेले नाही. सबब सदर तक्रार अर्जास कारण हे सातत्याने घडणारे (Continuous cause of action) असल्याने सदरच्या तक्रार अर्जास मुदतीची बाधा येत नसून तक्रारदाराचा तक्रार अर्ज मुदतीत आहे असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
8. मुददा क्र.3 :- सामनेवाला क्र.2 यांचे मालकीची मौजे चिपळूण ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथील भूमापन क्र.58 उपविभाग 1ब क्षेत्र 0-14-25 आकार 2-42 ही जमीन मिळकती सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांचे लाभात दि.11/04/1997 रोजीचे विकसन करारपत्र लिहून देऊन सदरची जमीन मिळकत विकसित करणेचे अधिकार दिले. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांना दि.15/04/1997 रोजी दुय्यम निबंधक चिपळूण चे कार्यालयात अ.क्र. 584/ 1997 अन्वये मुखत्यारपत्र नोंदणी करुन दिलेले आहे. सदर वादातील मिळकतीवर “सागर विहार” या नावाने सामनेवाला क्र.1 यांनी बांधलेल्या बहुमजली इमारतीतील सर्व सदनिकाधारकांचे नांवे सामनेवाला क्र.1 यांनी नोंदणीकृत दस्तावेज लिहून दिलेले आहेत. मात्र सामनेवाला क्र.1 यांनी वादातील मिळकतीतील बहुमजली इमारतीचे बांधकाम पूर्ण केले नंतर इमारतीतील सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था करुन देणेची आवश्यकता असतानाही सामनेवाला क्र.1 यांनी ती करुन देणेची टाळाटाळ केलेने सदनिकाधारकांनाच पुढाकार घेऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन तीची नोंदणी करुन घ्यावी लागली. त्याचा नोंदणी क्रमांक आर.टी.जी./सीपीएन/ (एच.एस.जी.)/(टीसी)/2116/सन2018 दि.25/04/2018 असा आहे. महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ॲक्टचे तरतुदीं प्रमाणे कायदेशीर तरतुदींनुसार सर्व सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करणे, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लाभात बहुमजली इमारत व तदनुषंगिक हक्कअधिकार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नांवे वर्ग करणेचे संदर्भातील कन्व्हेअन्स डीड (अंतिम खरेदीखत) लिहून देणेचे कायदेशीर बंधन सामनेवाला क्र.1 व 2 यांचे वर असून त्यांनी हेतुत: टाळाटाळ केलेली आहे. तक्रारदार सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झालेनंतरसुध्दा सामनेवाला क्र.1 यांचेशी अनेकवेळा संपर्क साधून तक्रारदार संस्थेच्या नांवे कन्व्हेअन्स डीड करुन देणेबाबत विनंती करुनसुध्दा त्याकडे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार संस्थेच्या वतीने दि.01/01/2021 रोजीची नोटीस रजि.पोष्टाने सामनेवाला क्र.1 व 2 यांना पाठविण्यात आली. सामनेवाला क्र.1 ची नोटीस परत आली व सामनेवाला क्र.2 यांनी नोटीस स्विकारली व नोटीसीतील मागणीची पूर्तता करुन देतो असे सांगितले परंतु चालढकल करणेत आली. सबब सामनेवाला यांचेकडून करारपत्राप्रमाणे तक्रारदार संस्थेच्या नांवे अंतिम खरेदीखत करुन देणेचे कामी सेवेतील त्रूटी घडलेली आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने दाखल केलेली असून सामनेवाला यांनी तक्रारदार संस्थेच्या नांवे अंतीम खरेदीखत (कन्व्हेअन्स डीड) करुन देणेबाबतचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
9. सामनेवाला क्र.2 यांना संधी देऊनही त्यांनी मुदतीत म्हणणे दाखल केलेले नाही तसेच वारंवार संधी देऊनही त्यांनी पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द म्हणणे नाही व पुरावा बंद चा आदेश करण्यात आला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी नि.22 कडे लेखी युक्तीवाद दाखल केलेला असून त्यामध्ये तक्रारदाराची तक्रारीतील सर्व कथने खोटी व खोडसाळ असलेचे कथन केले आहे. तसेच तक्रारदारास अंतिम खरेदीखत करुन देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांची आहे कारण सामनेवाला क्र.1 व 2 यांचेमध्ये दि.11/4/1997 रोजीचे विकसन करारपत्र व दि.15/04/1997 रोजीच मुखत्यारपत्र आजतागायत रद्द झालेले नाहीत. तसेच तक्रारदार संस्था ही त्यांचे अंतिम खरेदीखत हे सामनेवाला क्र.2 यांचेशिवाय ही (Deemed Conveyance) चे अंतर्गत पूर्ण करु शकते. त्याबाबत महाराष्ट्र शासनाचा दि.25/02/2011 चा शासन निर्णय क्र.माहस2008/प्र.क्र.24/भाग-2/दुवपु-2 मंत्रालय मुंबई 400032 चे परिपत्रक व दि.12/04/2012 चे नोंदणी महानिरिक्षक व
मुद्रांक-नियंत्रक, पुणे महाराष्ट्र यांचे संदर्भीय पत्र क्र.क.का.5/मुद्रांक-12/प्र.क्र.44/ 11/501/12 नुसार विकासकाच्या अनुपस्थितीमध्ये तक्रारदार संस्था ही Deemed Conveyance म्हणजेच मानीव खरेदीखताच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका अधिनियम 1963 चे कलम 11(3) अन्वये तक्रारदार संस्था अंतिम खरेदीखत करुन घेऊ शकते. तसेच सामनेवाला क्र.2 यांचे वय 67 वर्षे असून प्रकृतीबाबत वारंवार तक्रारी चालू असलेने सदर सामनेवाला क्र.2 यांना अंतिम खरेदीखत करुन देण्याकरिता धावपळ करणे खुप दगदगीचे व जिकीरीचे होणार आहे असे कथन केले आहे.
10. परंतु सदर कामी सामनेवाला क्र.1 हे मयत असलेने तक्रारदाराने नि.12 कडे अर्ज देऊन सदर सामनेवाला क्र.1 यांना प्रस्तुत कामातून कमी करण्याचा अर्ज दिला होता. सदर अर्ज मंजूर करण्यात आलेला असून त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना याकामी कमी करण्यात आलेले आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.2 हे जागा मालक असलेने तक्रारदार संस्थेस अंतिम खरेदीखत (कन्व्हेअन्स डीड) करुन देणेची जबाबदार येते असे या आयोगाचे मत आहे.
11. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी जमीन मालक या नात्याने श्री तुकाराम धोंडिबा मुसळे यांचे नांवे दि.26/07/2012 रोजीचे खरेदीखत अनुक्रमांक चपल/3037/2012 करुन दिलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सदरहू जमीन मिळकतीच्या मालक या नात्याने दि.26/07/0212 रोजीचे खरेदीखत लिहून दिलेले आहे. सदरचे खरेदीखत नि.6/8 कडे दाखल आहे. सदर तुकाराम धेांडीबा मुसळे यांना सामनेवाला क्र.2 श्रीमती जयश्री वसंत पवार यांनी लिहून दिलेल्या साठेखताआधारे खरेदीखत मध्ये सदर मिळकत विकसित करणारे लिहून देणार यांचे मुखत्यार श्री सनगे अ.करीम अ. कादीर हे अचानक कोठेतरी निघुन गेल्याने साठेखतामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सदरच्या मिळकतीचे खरेदीखत लिहून देणार हे करुन देत आहेत असे नमुद केले आहे. त्याकारणाने सामनेवाला क्र.1 हे जरी विकसक असले तरी त्यांचे अनुपस्थितीत सामनेवाला क्र.2 यांना जमीन मालक या नात्याने तक्रारदार संस्थेच्या लाभांत कन्व्हेअन्स डीड करुन देण्याचे पूर्ण अधिकार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
12. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथने, तक्रारदाराने दाखल केलेली सर्व कागदपत्रे व सामनेवाला यांचा लेखी युक्तीवाद विचारात घेता, तक्रारदार संस्थेस सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वाद मिळकतीचे अंतिम खरेदीपत्र नोंद करुन दिले नाही ही बाब स्पष्ट होते. त्यासाठी तक्रारदार यांनी मा.राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई महाराष्ट्र राज्य यांचेकडील खालील न्यायनिवाडा दाखल केला आहे.
2014 (4) ALL MR (JOURNAL)23 CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, MAHARASHTRA STATE, MUMBAI-
Mr. Amratlal Chganlal Mistry V/s Kasturi Tower Co-operative Housing Society Ltd.-
Consumer Protection Act (1986), s.2-Maharashtra Ownership Flats (Regulation of Promotion of Construction, Sale, Management and Transfer Act (1963), S.11-Deficiency in service- Alleged against opponent builder for not executing conveyance in favour of complainant building as per agreement and handed over possession of flats- Held, as per MOF Act, to execute conveyance is statutory obligation of opponent which he failed to comply with-Hence opponent is deficient in service.
सदरची बाब विचारात घेता, सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदार संस्थेला वादमिळकतीचे अंतिम नोंद खरेदीपत्र (कन्व्हेअन्स डीड) करुन दिलेले नाही. सबब, सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराला अंतिम नोंद खरेदीखत (कन्व्हेअन्स डीड) न करुन देऊन सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
13. सबब, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 हे मयत असलेने व त्यांना प्रस्तुत कामातून कमी केलेले असलेने सामनेवाला क्र.2 यांचेकडून वादमिळकतीचे अंतिम नोंद खरेदीपत्र (कन्व्हेअन्स डीड) करुन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- अशी रक्कम सामनेवाला क्र. 2 यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग मंच येत आहे.
14. मुददा क्र.4 :- सबब, प्रस्तुत कामी हे आयोग पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येते.
2) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार संस्थेस मिळकत तुकडी व जिल्हा रत्नागिरी पोटतुकडी ता.चिपळूण पैकी मौजे चिपळूण येथील चिपळूण नगरी परिषदेचे हद्दीतील स.नं.58 हि.नं.1-ब व क्षेत्र (हे.आर.पॅा.) 00-14-25 या मिळकतीवर विकसित झालेल्या सागर विहार या बहुमजली इमारतीचे अंतीम खरेदीखत (कन्व्हेअन्स डीड) करुन दयावे.
3) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-(रक्कम रुपये दहा हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/-उ (रक्कम रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमुद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला क्र.2 यांनी आदेशाची प्रत मिळालेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 71 व 72 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाची सत्यप्रती उभयपक्षकारांना विनामुल्य दयाव्यात.