तक्रारदार : प्रतिनीधी(वडील) यांचे मार्फत हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही शिक्षण अभ्यासक्रम पुरविणारी संस्था आहे. तक्रारदारांनी संगणक अभ्यासक्रम पूर्ण केला होता व त्यांना चित्रपट निर्मितीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा होता. तक्रारदारांनी चौकशी केली व सा.वाले यांचेकडे जुलै, 2008 मध्ये डिजीटल फील्म निर्मितीचा अभ्यासक्रम पूर्ण करणेकामी ( DFM-1) प्रवेश घेतला. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे नोंदणीकामी रु.12,000/- व रु.18,500/- जमा केले. त्यानंतर दिनांक 22.7.2008 रोजी रु.1,66,570/- शैक्षणिक शुल्क व 1,000 डॉलर प्रमाणपत्र शुल्क सा.वाले यांचेकडे जमा केले. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे अभ्यासक्रम पूर्ण केला व 81 टक्के मार्क मिळवून ते उत्तीर्ण झाले. तरी देखील सा.वाले यांनी तक्रारदारांना आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले SAE प्रमाणपत्र दिले नाही. त्यानंतर तक्रारदारांनी चौकशी केली असतांना असे दिसून आले की, सा.वाले यांच्या संस्थेला आंतरराष्ट्रीय मान्यता नाही. या प्रयकारे सा.वाले यांनी तक्रारदारांची फसवणूक केली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना नोंदणी शुल्क व शैक्षणिक शुल्क परत करावे अशी मागणी केली. परंतु सा.वाले यांनी तक्रारदारांचे मागणीस प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
2. सा.वाले क्र.1 ही SAE या मान्यताप्राप्त संस्थेची मुंबई येथे शाखा आहे तर सा.वाले क्र.2 प्रमाणपत्र देणेकामी अभ्यासक्रम देणारी संस्था आहे. दोन्ही सा.वाले यांना तक्रारीच्या वतीने नोटीसा पाठविण्यात आल्या व त्या बजावण्यात आल्या. तक्रारदारांनी नोटीसा बजावल्याचे शपथपत्र दाखल केले. तरी देखील सा.वाले गैरहजर असल्याने त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा करण्यात आले.
3. तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. प्रस्तुत मंचाने तक्रार, शपथपत्र, कागदपत्रे, यांचे वाचन केले.
4. तक्रारदारांनी तक्रारी सोबत सा.वाले क्र.2 यांनी जारी केलेल्या माहिती पत्रकाची प्रत दाखल केलेली आहे. त्याचे वाचन केले असतांना असे दिसून येते की, सा.वाले क्र.2 यांनी SAE इस्टीटयुटचा अभ्यासक्रम भारतामध्ये शिकविण्याची सुविधा पुरविण्यात आलेली आहे असे जाहीर केले होते. मुळ संस्था इंग्लंड मधील असून सा.वाले क्र.2 तो अभ्यासक्रम मुंबई येथे पुरविणार होते. अभ्यासक्रमाचा कालावधी 18 महिन्याचा होता. तक्रारदारांनी फील्म मेकींगचा अभ्यासक्रम पूर्ण करणेकामी DFM-1 या अभ्यासक्रमा करीता प्रवेश घेतला व नोंदणी शुल्क रु.12,000/- व रु.15,500/- सा.वाले क्र.2 यांचेकडे जमा केले. त्या बद्दलची पोच पावती तक्रारीचे पृष्ट क्र.24 वर दाखल आहे. त्यानंतर तक्रारदारांनी अभ्यासक्रमाचे शुल्क रु.55000/- अधिक रु.56,570/- असे जमा केल्याची पृष्ट क्र.25 वरील पावतीवरुन दिसून येते. त्यानंतर पृष्ट क्र.30 वरील पावती प्रमाणे यु.एस.1000 डॉलर सा.वाले क्र.1 यांचे नांवे धनादेश काढून जमा केल्याचे दिसून येते. वरील सर्व पुराव्यांवरुन तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे नोंदणी शुल्क रु.30,500/- व अभ्यासक्रम शुल्का बद्दल रु.1,11,570/- तसेच प्रमाणपत्र शुल्का बद्दल यु.एस.1000 डॉलर सा.वाले क्र.1 व 2 यांचेकडे जमा केल्याचे दिसून येते.
5. तक्रारदारांनी पृष्ट क्र.32 वर आपली गुण पत्रिका दाखल केलेली आहे. त्यामध्ये तक्रारदारांनी एकत्रितरीत्या 81 गुण मिळवून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे दिसून येते. अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र SAE कॉलेजकडून वेगळे देण्यात येईल असेही गुण पत्रिकेमध्ये नमुद आहे.
6. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना प्रमाणपत्र जारी केले नाही. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करुनही तक्रारदारांना त्याचा कुठलाही फायदा घेता आला नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांनी अन्य काही प्रशिक्षणार्थींना जारी केलेल्या प्रमाणपत्राची प्रती दाखल केलेल्या आहेत. त्यावर मुळ संस्थेचा शिक्का नसून ते वैध नाही असे तक्रारदारांचे कथन आहे.
7. सा.वाले यांनी प्रकरणामध्ये हजर होऊन कैफीयत दाखल केलेली नाही व तक्रारदारांचे कथनास नकार दिलेला नाही. तरी देखील सा.वाले यांनी तक्रारदारांना पूर्वीच अथवा दरम्यान प्रमाणपत्र जारी केले असल्यास त्रृटी राहू नये या उद्देशाने सा.वाले यांनी तक्रारदारांना SAE प्रमाणपत्र जारी करावे व ते शक्य नसेल तर अभ्यासक्रम शुल्क व्याजासह परत करावेत असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
8. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 232/2012 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना SAE अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्राचे
संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात
येते.
3. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तपणे तक्रारदारांना
DFM-1 अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल SAE प्रमाणपत्र न्याय निर्णयाची
प्रत मिळाल्यापासून दहा आठवडयाचे आत जारी करावी अन्यथा
अभ्यासक्रम शुल्क रु.1,11,570/- व 1000 यु.एस.डॉलर त्यावर तक्रार
दाखल तारखेपासून म्हणजे दिनांक 4.6.2012 पासून 9 टक्के
व्याजासह अदा करावेत असाही आदेश देण्यात येतो.
4. या व्यतिरिक्त सामनेवाले 1 व 2 यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या
खर्चाबद्दल रु.15,000/- अदा करावेत.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 14/08/2013