::: आ दे श प त्र :::-
मा. अध्यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-
1. तक्रारकर्त्याने सदर अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सादर केला.
2. तक्रारकर्त्याने सन 2013 मध्ये विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचेकडून वॉक्सवॅगन, पोलो, रजि. नं. एमएच-27-7440 ही खरेदी केली होती. विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 3 हे वाहनाच्या विमा सुरक्षेचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्यानी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचेकडून प्रायव्हेट कार पॅकेज पॉलीसी खरेदी केली असून त्याचा पॉलीसी क्रमांक ओजी-15-2101-1801-00007498 हा असून तिची वैधता दिनांक 11-10-2014 ते 10-10-2015 पर्यंत होती. त्यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 चे ग्राहक आहेत.
3. तक्रारकर्ता दिनांक 5-2-2015 रोजी आपली वरील नमूद कार वॉक्सवॅगन, पोलोने अमरावतीहून यवतमाळला जात असतांना यवतमाळच्या अलीकडे घाटाच्या खाली अर्ध्या रस्त्याचे काम चालू होते. त्यामुळे रस्त्यावर गिट्टी व बोल्डर पडलेले होते. समोरुन वेगाने येणा-या वाहनाला साईड देण्यासाठी तक्रारकर्त्याने गाडी ही साईडला करत असतांना रस्त्यावरील दगड तक्रारकर्त्याच्या कारच्या चेंबरला जोराने लागला व त्यामुळे चेंबर फुटले. त्याचवेळी गाडीचे डाव्या बाजुचे टायर व त्याची रिंग हे दोन्ही क्षतीग्रस्त झाले. गाडीचा चेंबर फुटल्याने गाडीमध्ये इंडिकेटरचा लाल लाईट लागल्याने गाडी पुढे चालू शकत नव्हती, म्हणून गाडी ही रस्त्याचे काम करणा-या मजुरांकडून साईडला लावून घेतली व तक्रारकर्त्याने ताबडतोब हेल्पलाईन फोन केला व त्यानुसार दुस-या दिवशी दि. 6-2-2015 रोजी सातपुते नावाचा ड्रायव्हर हा टोईंग व्हॅन घेऊन आला व गाडी ही विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडे पोहचवून दिली. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने दिनांक 9-2-2015 रोजी वाहनाचे अंडर कॅरेज डॅमेजचा प्रोफॉर्मा इनव्हाईस दिला व त्यानुसार कारचा अपेक्षित खर्च रु. 2,91,199.47 येणार होता. त्यावेळी विरुध्दपक्ष क्रमांक 2 चे सर्व्हेअर हाडके यांनी कारचे फोटो काढून पुण्याच्या हेड ऑफीसला मंजुरीकरिता पाठवतो व हा खर्च विमा कंपनी देईल, असे सांगितल्याने तसेच पॉलीसी ही कॉम्प्रेहेन्सीव्ह असल्याने त्याची प्रतिपूर्ती ही विमा कंपनी देईल, हया विश्वासाने तक्रारकर्त्यांनी सदर खर्च केला व त्याचे देयक हे रु. 2,15,000/- विरुध्दपक्ष क्रमांक 2 ला दिनांक 19-03-2015 रोजी रु. 50,000/-, दिनांक 13-04-2015 रोजी रु. 50,000/- व दिनांक 17-04-2015 रोजी रु. 1,15,000/- असे देय केले. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने त्याचे रु.2,14,606/- टॅक्स इन्वॉईस दिनांक 23-04-2015 रोजी दिला.
4. तक्रारकर्त्याने वाहनाचा कॉम्प्रेहेन्सीव्ह विमा प्रायव्हेट कार पॅकेज पॉलीसीअंतर्गत उतरवलेला असल्याने विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचेकडे सदर 2,15,000/- देयकाची प्रतिपूर्तीची मागणी केली असता दिनांक 2-6-2015 रोजी रु. 23,529/- हे कंपनीच्या सर्व्हेअरच्या अहवालानुसार देय आहेत असे कळवले व सोबत फुल अॅन्ड फायनल सेटलमेंट म्हणून भरुन देण्यासाठी फॉर्म देखील पाठवला. परंतु, तक्रारकर्त्याला ही सेटलमेंट रक्कम मान्य नसल्याने त्यांनी ही रक्कम स्विकारली नाही. त्यानंतर, विरुध्द पक्ष क्रमांक 2 ने दिनांक 8-6-2015 रोजी स्मरणपत्र पाठवले. दिनांक 22-08-2015 रोजी सेटलमेंट रक्कम न स्विकारल्याने “ नो क्लेम ” असे कळवले.
5. तक्रारकर्त्यांनी सदर वाहनाचा विमा हा कॉम्प्रेहेन्सीव्ह प्रायव्हेट कार पॅकेज पॉलीसी अंतर्गत काढला होता. परंतु, विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने तक्रारकर्त्याचा योग्य व न्याय असा क्लेम नाकारुन केवळ 23,529/- रुपयाचा क्लेम दिनांक 02-06-2015 व दिनांक 08-06-2015 रोजी सेटल केला व तो फुल अॅन्ड फायनल म्हणून स्विकारला नाही, म्हणून कोणताही क्लेम राहिलेला नाही असे दिनांक 22-06-2015 रोजी कळवून सेवेमध्ये त्रुटी व न्युनता केली आहे व आपल्या कंपनीचा फायदा केला आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने दि. 9-2-2015 पासून 23-4-2015 पर्यंत वाहन दुरुस्तीच्या नावाखाली ताब्यात ठेवले. त्यामुळे तक्रारकर्त्याला वाहनाचा उपयोग घेता आला नाही. म्हणून तक्रारदार हे विरुध्दपक्षाकडून झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाकरिता क्षतीपूर्तीकरिता जबाबदार आहेत.
6. तक्रारकर्ता हे गायक असून ते त्यांच्या गायनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी करतात व त्यांचेसोबत त्यांचे सहकलाकार असतात. सदर गाडी ही तक्रारकर्त्याला 2 महिने वापरायला मिळाली नाही, म्हणून त्यांना वाहन दरवेळी भाडयाने घ्यावे लागले. त्याच्या खर्चाचा भूर्दंड उगाचच तक्रारकर्त्यावर बसलेला आहे. अशाप्रकारे, विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी सेवेत त्रुटी व न्युनता केली आहे म्हणून विरुध्दपक्ष क्रमांक 2 हयाकरिता नुकसान भरपाई तक्रारकर्त्यास देण्यास जबाबदार आहेत.
7. सबब, तक्रारकर्त्याची विनंती की, 1) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदार यांना दोषपूर्ण सेवा दिली आहे व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे असे घोषित करावे. 2) विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी वाहनाच्या दुरुस्तीकरिता आलेला खर्च रु. 2,15,000/- यांची प्रतिपूर्ती तक्रारदार यांना देण्याचे आदेश व्हावे. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारदार यांचे वाहन दिनांक 9-2-2015 ते 23-4-2015 पर्यंत दुरुस्तीच्या नावाखाली ताब्यात ठेवले, त्यामुळे भाडयाने वाहन घ्यावे लागले, याचा खर्च रु. 1,000/- प्रति दिवस या हिशोबाने विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचेकडून वसूल करण्यात यावे. 3) तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाकरिता रु. 25,000/- व तक्रारीच्या खर्चाकरिता रु. 10,000/- विरुध्दपक्ष यांनी देण्याचे आदेश विदयमान मंचाने पारीत करावे, अशी विनंती तक्रारकर्त्याने तक्रारीत केली आहे.
8. सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 23 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 चा लेखी जवाब
9. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी जवाब दाखल केला असून त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबूल करीत लेखी जवाबात असे नमूद केले आहे की, प्रारंभी येथे नम्रपणे असे नमूद करावे वाटते की, विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 3 यांचेविरुध्द तक्रारकर्त्याचा क्लेम रु. 2,15,000/- बद्दल दिनांक 2-6-15 आणि 8-6-15 रोजी कळविले असून विरुध्दपक्ष क्रमांक 1 येथे असे नमूद करतो की, वाहनाचे अपघाताचे दुसरे दिवशी म्हणजे दि. 6-2-2015 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी त्यांचे व्यवस्थापक यांचेमार्फत ड्रायव्हर सोबत टोईंग व्हॅन पाठवून विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे वर्कशॉप मध्ये तक्रारकर्त्याचे वाहन आणण्यात आले.
10. सदर वाहनाचे निरीक्षण केल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे इंजिनियर यांनी तक्रारकर्त्याला सूचित केले की, कारचे चेंबरचे गंभीररित्या नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे उजव्या बाजुचे टायरची डिस्क ला सुध्दा नुकसान झालेले आहे. नुकसानीचे अंदाजपत्रक रु. 2,91,199.47 एवढे असून रु. 2,14,606/- हे जमा केले आहे आणि या संदर्भात तक्रारकर्त्याचे वाहन समाधानकारक पणे दुरुस्त करुन तक्रारकर्त्याला दिले.
11. विमा कंपनीने सदर वाहनाबद्दलचा तक्रारकर्त्याचा क्लेम नाकारला. विरुध्दपक्ष क्रमांक 1 कंपनीला अनावश्यक पक्षकार करण्यात आलेले आहे त्यामुळे सदरची तक्रार विरुध्दपक्ष क्रमांक 1 विरुध्दची दंडात्मक खर्चासह खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 3 चा लेखी जवाब :-
12. विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 3 यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी जवाब दाखल केला असून त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबूल करीत लेखी जवाबात असे नमूद केले आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक 2 चे कार्यालय अमरावती येथे नाही. तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्रमांक 2 चे कार्यालय खापर्डे बगीचा, अमरावती असे दाखवून विरुध्दपक्ष क्रमांक 3 म्हणून पार्टी बनवलेले आहे. बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीचे कार्यालय अमरावती येथे नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 3 म्हणून कंपनीला पार्टी बनविणे हे चुकीचे झाले आहे. तक्रारदाराने ही जाणुनबुजून चुक केलेली आहे. जेणेकरुन त्यांना या ग्राहक मंचाला ही तक्रार चालविण्याचा अधिकार आहे, असे दाखविता येईल. वास्तविक पाहता अमरावती येथे बजाज अलायन्स जनरल विमा कंपनीचे कार्यालय नसल्यामुळे विदयमान मंचास ही तक्रार चालविण्याचा अधिकार नाही.
13. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारदार यांना दोषपूर्ण सेवा दिली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला हे म्हणणे मान्य नाही तसेच वाहनाच्या दुरुस्तीकरिता रु. 2,15,000/- खर्च आला हे म्हणणे मान्य नाही. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाकरिता रु. 25,000/- व तक्रारीच्या खर्चाकरिता रु. 10,000/- ची मागणी मान्य नाही. तक्रारदाराची तक्रार ही बेकायदेशीर असल्यामुळे रद्द करण्यात यावी.
14. विरुध्दपक्ष क्रमांक 2 च्या सर्व्हेअर श्री. हाडके यांनी दिलेल्या सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे कार क्र. एमएच-27-अेआर-7440 रु. 23,529/- क्षती पोहचलेली आहे व त्यासाठी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्यास ही रक्कम देण्यास तयारी दर्शविली असतांना सुध्दा त्यांनी ती घेतली नाही. त्यामुळे, विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी त्यांचा क्लेम “ नो क्लेम ” म्हणून केला आहे. त्यात कोणत्याही प्रकारची सेवेमध्ये त्रुटी झालेली नाही. तसेच तक्रारदाराने एमएच-27-एआर-7740 च्या नुकसानीचा क्लेम केला असल्यामुळे ही गाडी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचेकडे विमाकृत नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार रद्द करावी.
15. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी कोणत्याही प्रकारे सेवेमध्ये त्रुटी केलेली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी.
:: कारणे व निष्कर्ष ::
16. तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रमांक 1 चा स्वतंत्र लेखी जवाब, विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 3 चा संयुक्त लेखी जवाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्ताऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर व उभयपक्षाचा लेखी युक्तीवाद व तक्रारकर्ते यांनी दाखल केलेला न्यायनिवडा यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन पारित केला.
17. सदर प्रकरणात उभयपक्षांना हे मान्य आहे की, तक्रारकर्ते यांचे वाहन क्रमांक एमएच-27 7440 हे विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे विमाकृत केलेले होते. विमा कालावधीबाबत उभयपक्षात वाद नाही. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी हे मान्य केले आहे की, तक्रारकर्ते यांच्या वाहनाचा दिनांक 05-02-2015 रोजी अपघात झाला होता व ही बाब तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना कळविल्यामुळे त्यांनी सदर वाहन, त्यांच्या वर्कशॉप मध्ये टोईंग व्हॅन द्वारे दुरुस्तीकरिता आणले होते. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी हे देखील कबूल केले की, सदर वाहन दुरुस्ती करण्यास, रु. 2,91,199.47 ईतका अपेक्षित खर्च देयक त्यांनी तक्रारकर्त्यास दिले होते. त्यापैकी, रु. 2,14,606/- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडे जमा केले व विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी सदर वाहन दुरुस्त करुन त्यानंतर त्याचा ताबा तक्रारकर्त्याला दिला. उभयपक्षात वरीलप्रमाणे मान्य असलेल्या बाबींवरुन तक्रारकर्ते हे विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 चे ग्राहक होतात, असा निष्कर्ष मंचाने काढला आहे.
18. तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, सदर अपघातात त्यांचे वाहन जबर क्षतीग्रस्त झाले होते व विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने सदर वाहन दुरुस्त करुन देवून त्यापोटीची रक्कम रु. 2,15,000/- तक्रारकर्त्याकडून दुरुस्तीपोटी घेऊन तसे देयक दिले आहे. त्यामुळे, सदर देयकाच्या प्रतिपूर्तीची मागणी विमा कंपनी विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे केली असता, त्यांनी फक्त रु. 23,529/- सर्व्हेअर अहवालानुसार देय आहेत असे कळवून त्यासोबत फुल अॅन्ड फायनल सेटलमेंटचा फॉर्म पाठविला. परंतु, तक्रारकर्ते यांना ही रक्कम मान्य नाही, त्यामुळे, त्यांनी सदर रक्कम स्विकारली नाही. परंतु, त्यानंतर, विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी दिनांक 22-08-2015 रोजी तक्रारकर्ते यांचा विमा दावा “ नो क्लेम ” असे कळवून फेटाळला हे योग्य नाही. तसेच, विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी सदर वाहन रिपेअरच्या नावाखाली बरेच दिवस स्वतःच्या ताब्यात ठेवले. त्यामुळे, तक्रारकर्त्यास आर्थिक त्रास सोसावा लागला. म्हणून प्रार्थनेनुसार तक्रार मंजूर करावी.
19. यावर विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी वर नमूद केलेल्या काही बाबी जरी कबूल केल्या तरी तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी त्यांचे वाहन दिनांक 09-02-2015 ते 23-04-2015 पर्यंत रिपेअरिंगच्या नावाखाली ताब्यात ठेवले. त्यामुळे भाडयाने वाहन घ्यावे लागले म्हणून खर्च रु. 1,000/- प्रति दिवस या हिशोबाने ते विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून वसूल करुन दयावे, हया कथनावर आक्षेप घेत नाकबूल केले आहे.
20. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचा आक्षेप असा आहे की, तक्रारकर्ते यांनी अपघाताची माहिती तात्काळ विरुध्दपक्ष क्रमांक 2 ला दिली नाही. विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने त्यांच्या सर्व्हेअर मार्फत वाहनाच्या क्षतीसंबंधी माहिती मागवली व सर्व्हेअरने ती केवळ रु. 23,529/- ईतकी ठरवल्यामुळे ती देण्याची तयारी पत्र पाठवून दर्शविली. तक्रारकर्त्याने पोलीस एफ.आय.आर., पंचनामा सादर केला नाही, त्यामुळे आपघात झाला कां? हे संशयास्पद आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रमांक 3 चे कार्यालय अमरावती येथे नाही त्यामुळे अमरावती ग्राहक मंचास तक्रार चालविण्याचे अधिकार नाही. तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 3 ला अर्ज करुन या तक्रारीतून वगळले आहे. अशाप्रकारे, उभयपक्षांचा युक्तीवाद व त्याबद्दलचे सर्व दस्त तपासल्यानंतर मंचाचे मत असे आहे की, तक्रारदाराने सदर वाहनाची पॉलीसी काढतांना, विरुध्दपक्ष क्रमांक 3 चे कार्यालय हे अमरावती येथे होते व पॉलीसी काढतांना सदर वाहन इंडियन ओव्हरसीज बॅंक, अमरावती यांचेकडे तारण होते. वाहनाच्या अपघातानंतर, त्यास आलेल्या खर्चाचे देयक, तक्रारदाराने अमरावती येथून दिले होते, असे दाखल कागदपत्रांवरुन दिसते म्हणून तक्रारीस अंशतः कारण हे अमरावती ग्राहक मंचाच्या कार्यक्षेत्रात घडले आहे, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे या ग्राहक मंचाला तक्रार तपासण्याचे अधिकार आहे. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या दस्तांवरुन असा बोध होतो की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे विरुध्दपक्ष क्रमांक 2 शी टायअप होते व क्लेम प्रोसीजर नुसार अपघात झाल्यानंतर त्याबद्दलची माहिती व दस्त विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना देणे भाग होती व त्याप्रमाणे तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 ला ताबडतोब कळविले होते असे विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने देखील जवाबात कबूल केले आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याकडून पॉलीसी अटींचा भंग झाला असे दिसत नाही. तक्रारकर्ते यांच्या या अपघाताला दुसरे कोणतेही वाहन जबाबदार नसल्यामुळे तक्रारकर्त्याने पोलिसांना माहिती दिली नसावी. परंतु, विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी सदर वाहनाचा अपघात झाला होता व त्यात वाहनाचे चेंबर फुटून, डाव्या बाजुचा टायर व त्याची रिंग हे दोन्ही क्षतीग्रस्त झाले व ही बाब मेजर दुरुस्तीची होती तसेच त्यामुळेच विरुध्दपक्ष क्रमांक 1 ला सदर वाहन टोईंग व्हॅन द्वारे त्यांच्या वर्कशॉपला दुरुस्तीला आणावे लागले हया बाबी कबूल केल्यामुळे, तक्रारकर्त्याच्या कथनाला पुष्ठी मिळते व वाहनाचा अपघातच झाला होता ही बाब स्पष्ट होते. विरुध्दपक्ष क्रमांक 2 हयांनी दाखल केलेला सर्व्हे रिपोर्ट संदिग्ध आहे, त्यात विस्तृत माहिती नाही, क्षतीग्रस्त भागांचे वर्णन नाही. त्यावर सर्व्हेअरचे नाव नाही, ज्यांनी हा सर्वे केला त्यांचे शपथपत्र रेकॉर्डवर दाखल नाही. शिवाय तक्रारकर्त्याने सदर वाहन दुरुस्तीस जी रक्कम दिली, ती कशी अयोग्य आहे, याबद्दलचे स्पष्टीकरण विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी मंचासमोर कागदोपत्री पुराव्याद्वारे दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारकर्ते विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून सदर विमाकृत वाहनाच्या दुरुस्तीकरिता आलेला खर्च रु. 2,15,000/-, ईतर नुकसान भरपाई व प्रकरणाच्या न्यायिक खर्चासह मिळण्यास पात्र आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. मात्र, तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रमांक 1 विरुध्द पुराव्याअभावी खारीज करण्यात येते. सबब, अंतिम आदेश पारीत केला तो येणेप्रमाणे.
- अंतिम आदेश -
1) तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्ते यांना दोषपूर्ण सेवा देऊन, अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे, असे घोषित करण्यात येते.
3) विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्ते यांना सदर विमाकृत वाहनाच्या दुरुस्तीकरिता आलेला खर्च रु. 2,15,000/- ( अक्षरी रुपये दोन लाख पंधरा हजार फक्त ) दयावा. तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई पोटी रु. 5,000/- ( अक्षरी रुपये पाच हजार फक्त ) व प्रकरणाचा न्यायिक खर्च रु. 3,000/- ( अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) दयावा.
4) वरील आदेशाचे पालन हे आदेशाच्या दिनांकापासून 45 दिवसाचे आत करावे अन्यथा नुकसान भरपाई रकमेवर दर साल दर शेकडा 9 टक्के व्याज हे आदेश दिनांकापासून देय राहील किंवा तक्रारकर्ता वसूल करण्यास पात्र राहील.
5) उभयपक्षकारांना सदर आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्या.