-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक-13 डिसेंबर, 2017)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड या पतसंस्थे मध्ये त्याने मुदती ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम अंतिम परिपक्वता तिथी पासून व्याजासह परत मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी पतसंस्था असून, अध्यक्ष/सचिव/व्यवस्थापक हे सदर पतसंस्थेचे काम पाहतात. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड (नोंदणी क्रं-1152)या सहकारी पतसंस्थे मध्ये काही रक्कम मुदतीठेवी मध्ये जमा केली होती.
तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार अशी आहे की, त्याने विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे मध्ये मुदती ठेवी मध्ये गुंतविलेली आणि अंतिम परिपक्वता तिथी-18/05/2015 रोजी देय असलेली रक्कम रुपये-1,25,700/- परत मिळण्यासाठी दिनांक-25/05/2015 रोजी विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये अर्ज केला, त्यानंतरही सन-2015 मध्ये वारंवार मागणी करुनही रक्कम परत करण्यात आली नाही. त्याने विरुध्दपक्षानां दिनांक-28/11/2016 रोजीची कायदेशीर नोटीस पाठवूनही प्रतिसाद मिळाला नाही.
तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, मुदतठेवी अंतर्गत अंतिम परिपक्वता तिथीस देय रक्कम त्यावरील व्याजासह मिळण्यासाठी विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मागणी करुनही देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अशाप्रकारे विरुध्दपक्षानीं त्याला देय मुदतीठेवीची रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.
म्हणून शेवटी त्याने विरुध्दपक्ष संस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली व खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्था आणि तिचे तर्फे तिचे पदाधिकारी यांना आदेशीत करण्यात यावे की, अंतिम परिपक्वता तिथी-18/05/2015 रोजी देय रक्कम रुपये-1,25,700/- अंतिम परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो वार्षिक-12% व्याज यासह येणारी रक्कम तसेच शारिरीक, मानसिक त्रास बद्दल प्रत्येकी रुपये-25,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/-विरुध्दपक्षानां देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) आणि तिचे तर्फे अध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापक यांनी एकत्रित लेखी उत्तर मंचा समक्ष सादर केले. त्यांचे लेखी उत्तरा नुसार ते सन-2015 मध्ये नव्याने पतसंस्थे मध्ये पदाधिकारी म्हणून निवडून आलेत व त्यांना पतसंस्थेच्या आर्थिक क्षमते संबधी पुरेशी माहिती नाही परंतु जेंव्हा त्यांचे लक्षात आले की, पतसंस्था ही डबघाईस आलेली आहे तेंव्हा ताबडतोब त्यांनी थकीत कर्जदारांच्या विरुध्द वसुलीचे दावे सहकारी संस्थेच्या अधिनियमा अंतर्गत कलम-91 आणि 101 दाखल केलेत. सहकारी संस्थेच्या कलम-101अंतर्गत वसुलीचे आदेश प्राप्त झालेले असून त्यानुसार कर्ज थकबाकीदारां कडून वसुलीची करवाई सुरु आहे. विरुध्दपक्ष हे आजही नियमा नुसार गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यास तयार आहेत. त्यांनी असाही आक्षेप घेतला की, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष पतसंस्थेचा सभासद असून, सहकारी संस्था व तिचे सभासदां मधील वाद सोडविण्याचे अधिकार हे सहकारी न्यायालयासच आहेत त्यामुळे ग्राहक मंचाला तक्रार चालविण्या संबधी अधिकार क्षेत्र येत नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षा तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखा वरील तक्रार, तसेच मुदतीठेव पावतीची प्रत, कायदेशीर नोटीस व नोटीस रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून नोटीस मिळाल्या बाबत पोचच्या प्रती, शपथपत्र तसेच विरुध्दपक्षांचे लेखी उत्तर आणि उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
05. विरुध्दपक्ष (“विरुध्दपक्ष” म्हणजे सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी अध्यक्ष व सचिव असे समजण्यात यावे) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्था आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेत “परिशिष्ट-अ” मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदत ठेवी मध्ये रक्कम गुंतविल्या संबधाने पुराव्या दाखल मुदती ठेव पावतीची प्रत दाखल केली, त्यानुसार मुदती ठेवीचा तपशिल परिशिष्ट-अ प्रमाणे खालील प्रमाणे आहे-
“परिशिष्ट-अ”
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
1 | 434 | 18/11/2014 | 1,20,000/- | 18/05/2015 | 9.50% | 1,25,700/- |
06. सदर मुदत ठेव पावतीची प्रत विरुध्दपक्ष संस्थे तर्फे निर्गमित केलेले असून पावतीवर विरुध्दपक्ष सहकारी पत संस्था ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत असल्याचे त्यावरील संस्थेच्या नोंदणी क्रमांका वरुन सिध्द होते. तसेच परिशिष्ट- अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे तक्रारकर्त्याने त्याचे नावे रक्कम गुंतवणूक केल्याची बाब सुध्दा पुराव्या दाखल मुदती ठेव पावतीचे प्रती वरुन सिध्द होते. मुदतठेव गुंतवणूक कालावधीतील व्याज दर हा 9.50 टक्के एवढा त्यावर नमुद आहे, त्यामुळे मुदती ठेवीवर नमुद केलेल्या व्याजदराने अंतिम परिपक्वता तिथी पर्यंत आणि तेथून प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो मंचा तर्फे आदेशित व्याज यासह रक्कम परत मिळण्यास तक्रारकर्ता हा पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे.
07 तक्रारकर्त्याने मुदतठेव मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळण्यासाठी दिनांक-28/11/2016 रोजीची कायदेशीर नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविल्या बाबत पुराव्या दाखल नोटीस प्रत, रजिस्टर पोच पुराव्या दाखल सादर केलेल्या आहेत. यावरुन असे सिध्द होते की, तक्रारकर्त्यानेग मागणी करुनही त्याच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह विरुध्दपक्ष पतसंस्थेनी परत केलेली नाही, त्यामुळे विरुध्दपक्षांचा बचाव की ते तक्रारकर्त्याला मुदती ठेवीची रक्कम परत करण्यास तयार होते व आहेत यात कोणतेही तथ्य ग्राहक मंचास दिसून येत नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष पतसंस्थेने मुदतीठेवीचे अंतिम परिपक्वता दिनांकास देय रक्कम तक्रारकर्त्याला परत न करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सुध्दा सिध्द होते. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मुदतीठेव मध्ये गुंतविलेली देय रक्कम वेळेवर न मिळाल्यामुळे साहजिकच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब प्रकर्षाने दिसून येते. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये परिशिष्ट- अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदतठेवीची रक्कम अंतिम परिपक्वता तिथीच्या देय दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याज यासह विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्यास पात्र आहे. तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-2500/- व तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-3000/- विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
08. या ठिकाणी आणखी एका महत्वाच्या बाबीचा उल्लेख करणे आवश्यक आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे अध्यक्ष/सचिव/व्यवस्थापक असे पदनाम तक्रारीत प्रतिपक्ष केलेले आहे परंतु व्यवस्थापक हे पद संस्थेचे पदाधिकारी या संवर्गा मधून भरले असा कोणताही पुरावा आमचे समोर आलेला नाही, त्यामुळे आमचे मते व्यवस्थापक हे पगारी कर्मचा-याचे पदात मोडत असल्याने त्यांची या प्रकरणी कोणतीही जबाबदारी येत नाही म्हणून विरुध्दपक्ष म्हणून आम्ही पतसंस्था आणि तिचे तर्फे तिचे अध्यक्ष आणि सचिव यांना या प्रकरणात जबाबदार धरीत आहोत.
09. विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे तर्फे दाखल उत्तरा मध्ये असाही आक्षेप घेण्यात आला की, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष संस्थेचे सभासद आहे आणि सहकारी संस्था व तिचे सभासदां मधील वाद सोडविण्याचे अधिकार हे सहकारी न्यायालयासच आहेत त्यामुळे ग्राहक मंचाला तक्रार चालविण्या संबधी अधिकार क्षेत्र येत नाही. या आक्षेपा संदर्भात ग्राहक मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थेच्या मुदती ठेव मध्ये रक्कम गुंतविलेली असल्याने तो विरुध्दपक्ष पतसंस्थेचे “ग्राहक” होतो आणि विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेनी त्याला देय असलेली रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे आणि त्यामुळे ग्राहक न्यायमंचाला प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येते अशा आशयाचे अनेक निकालपत्र मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग, न्यु दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले असल्याने विरुध्दपक्षाचे सदर आक्षेपात ग्राहक मंचास कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
10. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता श्री अशोक पंढरीनाथ तलमले यांची तक्रार, विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी अध्यक्ष व सचिव यांचे विरुध्द (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष व्यवस्थापक, सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड हे पद संस्थेचे पदाधिकारी या संवर्गा मधून भरले असा कोणताही पुरावा आमचे समोर आलेला नाही, त्यामुळे व्यवस्थापक हे पगारी कर्मचा-याचे संवर्गात मोडत असल्याने त्यांना या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
(03) विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी अध्यक्ष व सचिव यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्रातील “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे तक्रारकर्त्याचे नावे विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मुदत ठेव मध्ये गुंतवणूक केलेली आणि अंतिम परिपक्वता तिथीस देय असलेली रक्कम अंतिम परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह येणारी रक्कम प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्त्याला परत करावी.
(04) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-2500/- प्रमाणे (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे तिचे पदाधिकारी अध्यक्ष व सचिव यांनी तक्रारकर्त्याला द्दावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी अध्यक्ष व सचिव यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.