-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक-23 ऑगस्ट, 2017)
01. तक्रारकर्तीने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड या पतसंस्थे मध्ये तिने मुदती ठेव तसेच आर.डी. खात्या मध्ये गुंतविलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्था असून विरुध्दपक्ष क्रं-2) हे संस्थेचे अध्यक्ष तर विरुध्दपक्ष क्रं-3) हे संस्थेचे सचिव आहेत आणि विरुध्दपक्ष क्रं-4) हे संस्थेचे व्यवस्थापक आहेत. तक्रारकर्तीने तिचे नावे विरुध्दपक्ष क्रं-1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड (नोंदणी क्रं-1152)या सहकारी पतसंस्थे मध्ये काही रक्कम मुदत ठेवी मध्ये आणि काही रक्कम आर.डी.खात्यात विरुध्दपक्ष जमा केलेली आहे.
तक्रारकर्तीची मुख्य तक्रार अशी आहे की, तिने विरुध्दपक्ष क्रं-1) सहकारी पतसंस्थे मध्ये मुदतठेव व आर.डी.खात्या मध्ये गुंतविलेल्या रकमा त्यातील देयलाभांसह परत मिळण्यासाठी वारंवार मागणी करुनही त्या रकमा परत करण्यात आल्या नाहीत. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, तिने मुदतठेवी अंतर्गत दिनांक-13/12/2015 नंतर देय रक्कम रुपये-1,00,000/- त्यावरील व्याजासह मिळण्यासाठी विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मागणी केली असता ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली तसेच तक्रारकर्तीची दिनांक-05/12/2014 पर्यंत आर.डी. खात्यात रुपये-12,120/- एवढी रक्कम शिल्लक म्हणून जमा आहे परंतु आज पर्यंत एकही पैसा मिळालेला नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षानीं तिला देय मुदतीठेवीची देय रक्कम तसेच आर.डी.खात्यात शिल्लक असलेली जमा रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.
म्हणून शेवटी तिने विरुध्दपक्ष संस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली व खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्था आणि तिचे तर्फे तिचे पदाधिकारी यांना आदेशीत करण्यात यावे की, तिने मुदतीठेव मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम अंतिम परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-24% दराने व्याजासह परत करावी तसेच आर.डी.खात्यात जमा असलेली शिल्लक रक्कम रुपये-12,120/- व्याजासह परत करण्यात यावी. तसेच शारिरीक, मानसिक त्रास बद्दल रुपये-50,000/- विरुध्दपक्षानां देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) आणि तिचे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(2) ते (4) अनुक्रमे अध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापक यांनी एकत्रित लेखी उत्तर मंचा समक्ष सादर केले. त्यांचे लेखी उत्तरा नुसार त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष संस्थेची सभासद आहे आणि सहकारी संस्था व तिचे सभासदां मधील वाद सोडविण्याचे अधिकार हे सहकारी न्यायालयासच आहेत त्यामुळे ग्राहक मंचाला तक्रार चालविण्या संबधी अधिकार क्षेत्र येत नाही. ते तक्रारकर्तीची मुदतीठेव व आर.डी. खात्या मधील रक्कम देण्यास तयार आहेत परंतु काही कर्ज प्रकरणांमध्ये रकमेची वसुली होणे बाकी आहे, कर्ज रकमेची वसुली संबधाने प्रक्रिया सुरु आहे, सक्षम यंत्रणे कडून काही कर्ज प्रकरणां मध्ये अवॉर्ड सुध्दा पास झालेला आहे. कर्ज रकमेची वसुली झाल्या नंतर ते मुदतीठेवीची रक्कम संस्थेच्या नियमा नुसार परत करण्यास तयार आहेत परंतु तक्रारकर्तीने विनाकारण त्यांचे विरुध्द ही तक्रार दाखल केलेली आहे. तिला या संबधीची त्यांनी कल्पना दिलेली आहे, सबब त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज व्हावी, अशी विनंती केली.
04. तक्रारकर्तीची सत्यापनावरील तक्रार, तसेच तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये रक्कम परत मिळण्या संबधी दिलेले निवेदन, मुदतीठेव आर.डी. पासबुक इत्यादी दस्तऐवजाच्या प्रती तसेच विरुध्दपक्षांचे लेखी उत्तर आणि लेखी युक्तीवाद आणि उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
05. विरुध्दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्था आहे. तक्रारकर्तीने तिचे नावे विरुध्दपक्ष सहकारी संस्थेत “परिशिष्ट-अ” तसेच “परिशिष्ट-ब” मध्ये नमुद केल्या प्रमाणे अनुक्रमे मुदत ठेवी मध्ये रक्कम गुंतविल्या संबधाने पुराव्या दाखल मुदत ठेव पावती प्रत तसेच आर.डी. खात्याची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने तिचे नावे मुदत ठेव आणि आर.डी.पासबुक मध्ये गुंतविलेल्या रकमेचा तपशिल परिशिष्ट-अ आणि परिशिष्ट-ब मध्ये नमुद केल्या नुसार खालील प्रमाणे आहे-
“परिशिष्ट-अ”
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
1 | 151 | 13/12/2010 | 50,000/- | 13/12/2015 | 11% | 1,00,000/- |
“परिशिष्ट-ब”
या व्यतिरिक्त तक्रारकर्तीने तिचे नावे विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये आर.डी.खाते उघडलेले असून पासबुकाच्या प्रतीवरुन त्या खात्याचा क्रमांक-804 असा असून रक्कम जमा करण्याचा कालावधी हा दिनांक-15/11/2014 ते दिनांक-05/12/2014 असा असल्याचे दिसून येत असून तिची दिनांक-05/12/2014 पर्यंत तिचे आर.डी.खात्यात शिल्लक रक्कम रुपये-12,120/- (अक्षरी रुपये बारा हजार एकशे विस फक्त) जमा असल्याचे दिसून येते. सदर आर.डी. खात्यावर किती टक्के व्याजाची रक्कम विरुध्दपक्ष पतसंस्था देणार होती याचा उल्लेख पासबुका मध्ये केलेला नाही.
06. सदर मुदत ठेव पावती व आर.डी.पासबुक हे विरुध्दपक्ष संस्थे तर्फे निर्गमित केलेले असून पावत्यांवर विरुध्दपक्ष सहकारी पत संस्था ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत असल्याचे त्यावरील संस्थेच्या नोंदणी क्रमांका वरुन सिध्द होते. तसेच परिशिष्ट- अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदतठेव तसेच परिशिष्ट- ब मध्ये नमुद केल्या प्रमाणे आर.डी खात्यात तक्रारकर्ती हिचे नावे रक्कम गुंतवणूक केल्याची बाब सुध्दा पुराव्या दाखल मुदती ठेव पावती प्रत तसेच आर.डी.पासबुकाची प्रत या वरुन सिध्द होते.
07. तक्ररकर्तीने तिची गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळण्यासाठी दिनांक-08/08/2016 रोजी विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये लेखी पत्र दिले होते, त्या प्रतीवर ते मिळाल्या बाबत विरुध्दपक्ष पतसंस्थेचा शिक्का व सही आहे. विरुध्दपक्ष पतसंस्थेने मुदतीठेवीच्या देय दिनांकास देय रक्कम तसेच आर.डी.खात्यातील जमा रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सुध्दा सिध्द होते. तक्रारकर्तीला तिने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये गुंतवणूक केलेल्या देय रकमा वेळेवर न मिळाल्यामुळे साहजिकच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब प्रकर्षाने दिसून येते. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती हि तिने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये परिशिष्ट- अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदतीठेवीची रक्कम अंतिम परिपक्वता तिथीच्या देय दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याजासह विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्यास पात्र आहे. त्याच बरोबर आर.डी.खात्यात दिनांक-05/12/2014 पर्यंत जमा असलेली शिल्लक रक्कम रुपये-12,120/- दिनांक-05/12/2014 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 9% दराने व्याजासह तसेच शारिरीक व मानसिक त्रास व तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/- विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
08. या ठिकाणी आणखी एका महत्वाच्या बाबीचा उल्लेख करणे आवश्यक आहे की, यातील तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं-4) म्हणून पतसंस्थेच्या व्यवस्थापकानां तक्रारीत प्रतिपक्ष केलेले आहे परंतु व्यवस्थापक हे पद संस्थेचे पदाधिकारी या मध्ये मोडत नसून ते पगारी कर्मचा-याचे पद असल्याने त्याची या प्रकरणी कोणतीही जबाबदारी येत नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं-4) ला या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
09. विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे तर्फे दाखल उत्तरा मध्ये असाही प्राथमिक आक्षेप घेण्यात आला की, तक्रारकर्ते हे विरुध्दपक्ष संस्थेचे सभासद आहेत आणि सहकारी संस्था व तिचे सभासदां मधील वाद सोडविण्याचे अधिकार हे सहकारी न्यायालयासच आहेत त्यामुळे ग्राहक मंचाला तक्रार चालविण्या संबधी अधिकार क्षेत्र येत नाही. या आक्षेपा संदर्भात ग्राहक मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, तक्रारकर्त्यानीं विरुध्दपक्ष पतसंस्थेच्या मुदती ठेवी मध्ये रकमा गुंतविलेल्या असल्याने ते विरुध्दपक्ष पतसंस्थेचे “ग्राहक” होतात आणि विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेनी त्यांना देय असलेल्या रकमा परत न करुन दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ग्राहक होतात आणि त्यामुळे ग्राहक न्यायमंचाला प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येते अशा आशयाचे अनेक निकालपत्र मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग, न्यु दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले असल्याने विरुध्दपक्षाचे सदर आक्षेपात ग्राहक मंचास कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
10. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ती श्रीमती रागेश्री श्रीधर खोंड यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-2) अध्यक्ष व विरुध्दपक्ष क्रं-3) सचिव यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(4) व्यवस्थापक, सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड हे पद पगारी कर्मचा-याचे पद असून ते पदाधिकारी मध्ये मोडत नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-4) याला या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
(03) विरुध्दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) अनुक्रमे अध्यक्ष व सचिव यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्रातील “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे तक्रारकर्ती हिचे नावे विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मुदत ठेव मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम अंतिम देय परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह येणारी रक्कम प्रस्तुत निकालाची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्त्याला परत करावी.
(04) विरुध्दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) अनुक्रमे अध्यक्ष व सचिव यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्रातील “परिशिष्ट-ब” मध्ये दर्शविल्या प्रमाणे तक्रारकर्ती हिचे नावे विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये आर.डी. खात्यात शिल्लक असलेली जमा रक्कम रुपये-12,120/-(अक्षरी रुपये बारा हजार एकशे विस फक्त) दिनांक-05/12/2014 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह येणारी रक्कम प्रस्तुत निकालाची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्तीला परत करावी.
(05) तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रास तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं (1) पतसंस्थे तर्फे तिचे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(2) व क्रं-(3) अनुक्रमे अध्यक्ष व सचिव यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) तक्रारकर्त्याला द्दावेत.
(06) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(2) व क्रं-(3) अनुक्रमे अध्यक्ष व सचिव यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
(07) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.