-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक-06 फेब्रुवारी, 2018)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड या पतसंस्थे मध्ये त्यांनी मुदती ठेवी मध्ये गुंतविलेल्या रक्कमा अंतिम परिपक्वता तिथी पासून व्याजासह परत मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी पतसंस्था असून, विरुध्दपक्ष क्रं-2) हे सदर पतसंस्थेचे अध्यक्ष असून, विरुध्दपक्ष क्रं-3) हे संस्थेचे सचिव आहेत तर विरुध्दपक्ष क्रं-4) हे पतसंस्थेचे प्रशासकीय अधिकारी आहेत.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड (नोंदणी क्रं-1152) या सहकारी पतसंस्थे मध्ये काही रक्कमा मुदतीठेवी मध्ये जमा केलेल्या आहेत.
तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार अशी आहे की, त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) सहकारी पतसंस्थे मध्ये मुदती ठेवीं मध्ये गुंतविलेल्या रकमा त्यातील देयलाभांसह परत मिळण्यासाठी वारंवार मागणी करुनही त्या रकमा परत करण्यात आल्या नाहीत. त्यांनी विरुध्दपक्षानां कायदेशीर नोटीस पाठवूनही प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारकर्त्याने कष्टातून मिळविलेले उत्पन्न विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये गुंतवले तसेच तो पोलीयो आजाराने ग्रस्त असून त्याचे मुलीचा सुध्दा अपघात झालेला असून तिच्या डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे वैद्दकीय उपचारास्तव त्याला रकमेची आवश्यकता होती.
तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, मुदतठेवी अंतर्गत अंतिम परिपक्वता तिथीस देय रक्कमा त्यावरील व्याजासह मिळण्यासाठी विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मागणी करुनही देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अशाप्रकारे विरुध्दपक्षानीं त्याला देय मुदतीठेवीची रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.
म्हणून शेवटी त्याने विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली व खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्था आणि तिचे तर्फे तिचे पदाधिकारी यांना आदेशीत करण्यात यावे की, तक्रारकर्त्याला दोन्ही मुदतीठेवीच्या परिपक्वता तिथी अनुक्रमे दिनांक-21/03/2015 आणि दिनांक-06/03/2016 रोजी देय होणा-या अनुक्रमे रकमा रुपये-33,479/- आणि रुपये-20,000/- उपरोक्त नमुद अंतिम परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो 12% व्याज यासह परत कराव्यात तसेच शारिरीक, मानसिक त्रास बद्दल रुपये-1,00,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-50,000/-विरुध्दपक्षानां देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) आणि तिचे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(2) ते (4) अनुक्रमे अध्यक्ष, सचिव आणि प्रशासकीय अधिकारी यांना अतिरिक्त ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविल्या असता त्या सर्व नोटीस “Not Claimed & Return to Sender” या पोस्टाचे शे-यासह परत आल्यात म्हणून विरुध्दपक्ष क्रं-(1) पतसंस्था आणि तिचे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(2) ते (4) विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दिनांक-28/09/2017 रोजी पारीत करण्यात आला.
04. तक्रारकर्त्याची सत्यापनावरील तक्रार, तसेच मुदतीठेव पावत्यांच्या प्रती, विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये दिनांक-16/10/2015 रोजी दिलेले विनंतीपत्र, मुलीचा सी.टी.स्कॅन रिपोर्ट आणि तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री सावजी यांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
05. विरुध्दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्था आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष सहकारी संस्थेत “परिशिष्ट-अ” मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदत ठेवी मध्ये रक्कम गुंतविल्या संबधाने पुराव्या दाखल मुदती ठेव पावतींच्या प्रती दाखल केल्यात त्यानुसार मुदती ठेवींचा तपशिल परिशिष्ट-अ प्रमाणे खालील प्रमाणे आहे-
“परिशिष्ट-अ”
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
1 | अस्पष्ट | 21/02/2012 | 25,000/- | 21/03/2015 | 11% | 33,479/- |
2 | 351 | 06/03/2011 | 10,000/- | 06/03/2016 | 11% | 20,000/- |
06. सदर मुदत ठेव पावत्यांच्या प्रती या विरुध्दपक्ष संस्थे तर्फे निर्गमित केलेले असून पावत्यांवर विरुध्दपक्ष सहकारी पत संस्था ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत असल्याचे त्यावरील संस्थेच्या नोंदणी क्रमांका वरुन सिध्द होते. तसेच परिशिष्ट- अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे तक्रारकर्त्याने त्याचे नावे दोन मुदती ठेवी मध्ये रक्कमा गुंतवणूक केल्याची बाब सुध्दा पुराव्या दाखल मुदती ठेव पावतींच्या प्रतीं वरुन सिध्द होते. तसेच तक्रारकर्त्याला दोन्ही मुदतीठेवींवर वार्षिक-11% दराने व्याज मिळणार होते. दोन्ही मुदती ठेवींच्या पावतीवर असा शिक्का मारलेला आहे की, मुदतीनंतर 14 दिवसाच्या आत नुतनीकरण करुन घ्यावे, अन्यथा व्याज मिळणार नाही परंतु ही अट तक्रारकर्त्याला लागू होत नाही कारण तक्रारकर्त्याने दिनांक-16/10/2015 रोजी विरुध्दपक्ष पतसंस्थेत लेखी अर्ज करुन त्याने गुंतवणूक केलेली रक्कम मुलीच्या डोक्याचे ऑपरेशनसाठी परत करण्याची विनंती केली, सदर पत्राची प्रत पुराव्यार्थ दाखल असून त्यावर ते पत्र विरुध्दपक्ष पतसंस्थेला मिळाल्याची पोच म्हणून सही व शिक्का सुध्दा आहे परंतु विरुध्दपक्ष पतसंस्थेनी त्या पत्रावर काहीही कार्यवाही केली नाही वा त्या पत्रावर उत्तर दिले नाही असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे, म्हणून ही तरतुद तक्रारकर्त्याला लागू होत नाही.
07. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचेवर तक्रारीतून केलेले आरोप विरुध्दपक्षांना संधी देऊनही खोडून काढले नाहीत, त्यांना अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात आलेल्या नोटीस त्यांनी न स्विकारता परत आल्याने त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. अशाप्रकारे विरुध्दपक्ष पतसंस्थेने मुदतीठेवीच्या अंतिम परिपक्वता दिनांकास देय रकमा तक्रारकर्त्याला परत न करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सुध्दा सिध्द होते. तक्रारकर्त्याला त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये गुंतवणूक केलेल्या रकमा त्याचे मुलीचे डोक्याचे ऑपरेशनचे वेळी वेळेवर न मिळाल्यामुळे साहजिकच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब प्रकर्षाने दिसून येते. विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये परिशिष्ट- अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदतीठेवीच्या रक्कमा, अंतिम परिपक्वता तिथीच्या देय दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याज यासह विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्यास पात्र आहे. तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- व तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-3000/- विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
08. या ठिकाणी आणखी एका महत्वाच्या बाबीचा उल्लेख करणे आवश्यक आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-4) म्हणून पतसंस्थेच्या प्रशासकीय अधिका-याला तक्रारीत प्रतिपक्ष केलेले आहे परंतु प्रशासकीय अधिकारी हे पद संस्थेचे पदाधिकारी या मध्ये मोडत नसून ते पगारी कर्मचा-याचे पद असल्याने त्याची या प्रकरणी कोणतीही जबाबदारी येत नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं-4) ला या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
09. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता श्री नारायण नामदेव सहारे यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-(1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही पतसंस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(2) अध्यक्ष आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) सचिव यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(4) प्रशासकीय अधिकारी, सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड हे पद पगारी कर्मचा-याचे पद असून ते पदाधिकारी मध्ये मोडत नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-4) याला या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
(03) विरुध्दपक्ष क्रं-(1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(2) व क्रं-(3) अनुक्रमे अध्यक्ष व सचिव यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्रातील “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे तक्रारकर्त्याने त्याचे नावे विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मुदत ठेवी मध्ये गुंतवणूक केलेल्या आणि अंतिम परिपक्वता तिथीस देय रकमा, अंतिम परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याज यासह येणा-या रक्कमा प्रस्तुत निकालाची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्त्याला परत कराव्यात.
(04) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) पतसंस्थे तर्फे तिचे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(2) व क्रं-(3) अनुक्रमे अध्यक्ष व सचिव यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) तक्रारकर्त्याला द्दावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(2) व क्रं-(3) अनुक्रमे अध्यक्ष व सचिव यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.