निकालपत्र :- (दि.15/12/2010) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी नोटीस घेणेस नकार दिलेने नोटीसचा लखोटा शे-यानिशी परत आलेला आहे. तो कामात दाखल आहे. तक्रारदाराने स्वत: युक्तीवाद केलेला आहे. सदरची तक्रार तक्रारदाराचा सामनेवाला यांनी मोबाईल हॅन्डसेट बाबत विक्री पश्चात सेवा न दिलेने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदाराने दि.12/07/2010 रोजी सामनेवालांचे मोबाईल शॉपी मधून बियॉंड कंपनीचा बीवाय222 मोबाईल खरेदी केला. सदर मोबाईल खरेदी केलेपासून मेमरी कार्डमध्ये पिक्चर्स गाणी व जो डाटा भरला जाईल तो डिलीट होऊ लागला. सदर मोबाईल सामनेवाला यांनी दिलेल्या विश्वासावर आधारावर खरेदी केला होता. सदर मोबाईलला एक वर्षाची गॅरंटी आहे. तसेच रक्कम रु.300/- चे मेमरी कार्ड एक्स्ट्रा पैसे देऊन त्यांचेकडून घेतले होते. त्यांचेकडून ऑडीओ-व्हिडीओ मेमरीमध्ये भरुन देण्यात आले होते. दि.13/07/2010 रोजी मेमरी कार्ड चालू करुन त्यावर गाणी लावली असता मोबाईल हॅन्ग होऊन सर्व गाणी पुसली गेली व मेमरी कार्ड रिकामे झाले. मोबाईल प्रथम वारपत असलेने चुकीचे बटन दाबले गेलेने असे झाले असेल असे वाटले त्यामुळे पुन्हा दि.14/07/2010 रोजी महालक्ष्मी चेंबर्स येथे रक्कम रु.250/- देऊन मेमरी कार्ड भरुन आणले. गाणी चालू केली असता काही वेळातच ती पुसली गेली. वारंवार मेमरी कार्ड पुसले जात असलेने सामनेवालांकडे त्याबाबतची तक्रार सांगितली असता मोबाईलमध्ये व्हायरस आला असेल म्हणून कॉम्प्युटरवर व्हायरस स्कॅन करुन पुन्हा मेमरी कार्ड लोड करुन दिले. पुन्हा गाणी लावली असता मेमरी कार्डवरील ऑडीओ व्हिडीओ पुसले गेले. त्याबाबतची तक्रार घेऊन बील पावती व मोबाईल देऊन बदलून देणेची मागणी केली. त्यावेळी मोबाईल बदलून न देता त्यांनी सदर मोबाईल मोबाईल वर्ल्ड उर्मिला-सरस्वती टॉकीजसमोर ताराबाई रोड, बियॉन्ड सवर्हीस येथे दुरुस्तीसाठी पाठवून 2-4 दिवसांनी परत दिला. ब) सदर मोबाईलचे नादुरुसतीचे कारण विचारले असता मोबाईलच्या सर्कीटला बिघाड होता त्यामुळे मेमरी कार्डमधील ऑडीओ व्हिडीओ गाणी पुसली गेलेने याच दरम्यान मोबाईलचा चार्जर देखील बंद पडला तो नमुद सेंटरकडून वॉंरटी असलेने नवीन दिला. तदनंतरही मोबार्इलमध्ये तक्रारी सुरुच राहिल्याने त्यांचे दुकानाकडे सारखे जावे लागते. तक्रारदार अपंग असलेने त्याचा त्याला त्रास होतो त्यामुळे तक्रारदारास सदर मंचाकडे तक्रार करणे भाग पडले. क) नमुद मोबाईलमध्ये दुरुसतीनंतरही वांरवार तक्रारी उदभवलेने मोबाईल बदलून मागितला असता बदलून देणेस सामनेवालांनी नकार दिला आहे. नमुद विक्री केलेला मोबाईल 2-4 महिन्यात खराब होत असेल तर नमुद सामनेवालांनी तो जाणूनबुजून तो माझेकडे खपवून फसवणूक केलेली आहे. सदर मोबाईलला मेमरी कार्ड पूर्णपणे पुसले जाणेची तक्रार वरचेवर उदभवत असलेने सामनेवालांकडे गेलो असता बियॉन्ड सर्व्हीस सेंटरमध्ये दाखवून दुरुसत करुन घ्या असे सांगितले. तक्रारदार अंपग असलेने वारंवार दुरुसतीसाठी जाणे त्याला त्रासाचे होणार असलेने प्रस्तुतचा मोबार्इल बदलून नुकसानीसही दुस-या कंपनीचा मोबार्इल दयावा अशी विनंती केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टयर्थ नमुद मोबाईलच्या खरेदी बीलाची सत्यप्रत दाखल केलेली आहे. (04) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे व तक्रारदाराचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश ? ---शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- अ) तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सामनेवाला यांचे मोबाईल खरेदीच्या पावती क्र.862 चे अवलोकन केले असता सदरचा मोबाईल दि.12/07/2010 रोजी खरेदी केला असून मोबाईलचा मॉडेल क्र.BYOND 222 IMEI-357068030060525 o 357068030060533 Battery No.S/N BWY0912060001 Charger No.Byond Travel Charger Total Rs. 3250/- अशा नोंदी दिसून येतात. सदरचा मोबाईल खरेदी केलेल्या दुस-या दिवशी म्हणजे दि.13/07/2010 रोजी तक्रारदारने मेमरी कार्ड चालू करुन त्यावर गाणी लावली असता मोबाईल हॅन्ग होऊन सर्व गाणी पुसली गेली व मेमरी कार्ड रिकामे झाले. तक्रारदाराने सदरचे मेमरी कार्ड रक्कम रु.250/- इतक्या किंमतीला पुन्हा भरुन आणले व मेमरी कार्ड चालू केले असता पुन्हा सदर मेमरी कार्डवरील सर्व डाटा पुसला गेला. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे तक्रार केली असता सामनेवाला यांनी मोबाईलच्या मेमरी कार्डला व्हायरस आला असेल म्हणून कॉम्प्युटरवर व्हायरस स्कॅन करुन पुन्हा मेमरी कार्ड ऑडीओ व व्हिडीओ भरुन लोड करुन दिले. परंतु पुन्हा सदर गाणी लावली असता पुन्हा मेमरी कार्डवरील सर्व डाटा पुसला गेला. तक्रारदाराने सामनेवालांच्या निदर्शनास सदरची बाब आणून दिली व सदर खराब मोबाईल बदलून नवीन मोबाईल देणेस सांगितले असता सामनेवाला यांनी तक्रारदारास मोबाईल वर्ल्ड, उर्मिला-सरस्वती टॉकीजसमोर, ताराबाई रोड, बियॉन्ड सर्व्हीस सेंटर येथे दुरुस्तीसाठी जाणेस सांगितले. बियॉन्ड सर्व्हीस सेंटर येथून सदर मोबाईल दुरुस्त करुन दिला तेव्हा त्यांना मोबाईल नादुरुस्तीचे कारण तक्रारदाराने विचारले असता मोबाईलच्या सर्कीटला बिघाड होता असे सांगणेत आले. त्यानंतर एक महिन्यात सदर मोबार्इलच्या मेमरी कार्ड पुन्हा तोच प्रॉब्लेम आला व त्याच दरम्यान चार्जर देखील बंद पडला. चार्जर वॉरंटी कालावधीत असलेने तो बदलून नवीन दिला. परंतु खराब मोबाईल बदलून दिला नाही. सदर मोबाईलचा मेमरी डाटा वारंवार पुसला जातो. तसेच तक्रारदार हा अपंग आहेत तरी त्यांना सारखे मोबाईल कंपनीच्या सर्व्हीस सेंटरकडे पाठवले जाते. सामनेवाला हे सदर मोबार्इल हॅन्डसेट स्वत: कंपनीचे सर्व्हीस सेंटरकडे पाठवू शकतात. परंतु सामनेवालांनी तसे केले नाही. तसेच सामनेवालांनी नमुद मोबाईल हॅन्डसेटसाठी 12 महिन्यांची वॉरंटी दिलेली आहे. तक्रारदाराचा मोबाईल हॅन्डसेट 2 महिन्यात नादुरुस्त झालेला आहे. याचा विचार करता सामनेवालांनी तो हॅन्डसेट दुरुस्त करुन दयावयास हवा होता किंवा तो कंपनीकडे शिफारशीसह पाठवून देऊन नवीन मोबाईलबाबत प्रयत्न करावयास हवे होते तसेच न करुन सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे व सामनेवाला हे सदर बाबीस जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. ब) सामनेवाला यांना या मंचातर्फे नोटीस पाठवली असता सदरची नोटीस सामनेवालांनी लागू करुन घेतली नाही. तसेच सदर मंचासमोर हजर होऊन म्हणणेही दाखल केलेले नाही व युक्तीवादही केलेला नाही. म्हणजेच तक्रारदाराची तक्रार त्यांना मान्य आहे असेच म्हणावे लागेल. तसेच सामनेवाला कंपनीकडे मोबाईल दुरुस्ती व तपासणी करणारे तज्ञ असूनही नमुद मोबाईलमधील दोष गेलेला नाही. तसेच नमुद मोबाईल वारंवार नादुरुस्त होत असलेने तक्रारदाराचा सदर मोबाईल कंपनीवरचा विश्वास उडाला असलेचे तक्रारीत शपथेवर कथन केलेले आहे. सबब तक्रारदाराचा मोबाईल जमा करुन घेवून त्याच किंमतीत दुस-या कंपनीचा मोबाईल मिळणेस अथवा मोबाईलची घेतलेली रक्कम परत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रास झालेला असलेमुळे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारास त्याच किंमतीत दुस-या कंपनीचा नवीन व दोषरहीत मोबाईल हॅन्डसेट दयावा. अथवा तक्रारदाराकडून घेतलेली सदर मोबाईलची रक्कम रु.3,250/-तक्रारदारास परत दयावेत. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |