निकालपत्र :- (दि.24/08/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-यातील तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 एस.एस.कम्युनिकेशन कंपनी यांच्याकडून दि.26/08/2002 रोजी नोकिया एन-79 या मॉडेलचा मोबाईल हॅन्डसेट विकत घेतला होता. सामनेवाला क्र.3 हे मोबाईल उत्पादक असून सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.3 चे कोल्हापूर येथील अधिकृत केअर सेंटर आहे. सदर मोबाईल हॅन्डसेट विकत घेतल्यापासून महिनाभर वापरल्यानंतर त्यामध्ये वारंवार बिघाड होत गेले. बिघाड निर्माण झाल्यावर तक्रारदाराने आपला मोबाईल सामनेवाला क्र.2 कडे दुरुस्तीसाठी दिला. सामनेवाला क्र.2 यांनी दोन दिवसामध्ये हॅन्डसेट दुरुस्त झाला असलेचे सांगितले. परंतु सदरचा हॅन्डसेट दुरुस्त झालेला नव्हताच उलट त्यात आणखी बिघाड निर्माण झाले होते. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांचेकडे पुन्हा हॅन्डसेट दुरुस्तीसाठी दयावा लागला. 15 ते 20 दिवसांनी फोन दुरुस्त झालेचा सामनेवाला क्र.2 यांनी सांगितले परंतु सदर हॅन्डसेटमध्ये जो मुख्य बिघाड होता त्यात दुरुस्ती झालीच नव्हती. याबाबतीत तक्रारदारांनी नोकिया केअरला ई मेल देखील केला. परंतु नोकिया केअरने तक्रारदाराला चुकीचा ई मेल पाठवला त्यामध्ये त्यांनी तक्रारदारांना E-66 हा मोबाईल दुरुस्त झालाय असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात तक्रारदारांचा मोबाईल हॅन्डसेट हा N-79 या मॉडेलचा होता. तसेच तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडे हॅन्डसेट दुरुस्तीसाठी दिला असता त्यांनी सदर हॅन्डसेटचे काही भाग बदललेले होते. त्याबाबत सामनेवाला क्र.2 यांना विचारणा केली असता योग्य ती उत्तरे त्यांनी दिली नाहीत व तुमचा हॅन्डसेट पुणे येथे दुरुस्तीसाठी पाठवला आहे. तिथ दुरुस्त झाला तर झाला नाही तर नाही असे सांगण्यात आले. आणि त्यानंतर 10 ते 12 दिवसांनी हॅन्डसेट परत दिला. परंतु सदर मोबाईल हॅन्डसेटमध्ये बिघाड तसाच आहे. हॅन्डसेट दुरुस्तीसाठी सामनेवाला क्र.2 यांनी जवळजवळ तीन ते चार महिने घालवले तरीही हॅन्डसेट दुरुस्त झाला नाही. (2) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 व2 या दोघांनाही रितसर नोटीस देऊन त्यांना प्रस्तुतच्या सदोष मोबाईलमुळे येणा-या अडचणींची कल्पना दिली आहे. पंरतु त्यांनी त्याबाबतीत कोणतीच दाखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदाराला अतिशय मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल करुन पुढीलप्रमाणे मागण्या मान्य व्हाव्यात अशी विनंती प्रस्तुत मंचास केली आहे. सामनेवाला यांनी वैयक्तिकव संयुक्तिकरित्या तक्रारदारांना नवीन मोबाईल बदलून दयावा किंवा मोबाईलची किंमत रु.15,800/- परत दयावेत. मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व आर्थिक खर्चाबद्दल रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
(3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ मोबाईल हॅन्डसेट खरेदीचे बील, सामनेवाला क्र.2 यांचेकडून मिळालेली जॉबशिट, तक्रारदारांनी नोकिया कंपनीला ई मेल केल्यानंतर त्यांनी ई मेल व्दारे त्यास दिलेले उत्तर, तक्रारदाराने सामनेवाला क्र.यांना पाठविलेली नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) तक्रारदाराची प्रस्तुत तक्रार दाखल झाल्यावर सामनेवाला क्र. 1 ते 3 यांना नोटीस काढण्यात आल्या. सामनेवाला क्र.1 हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले म्हणणेही दाखल केले नाही. (5) सामनेवाला क्र.2 यांनी आपल्या म्हणण्यात तक्रारदाराच्या कथनाला जोरदार आक्षेप घेतला आहे. तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 चे ग्राहक नाहीत. त्यामुळे सामनेवाला क्र.2 विरुध्द कुठलीही दाद मागण्याचा तक्रारदाराला अधिकार नाही असे सामनेवाला क्र.2 चे कथन आहे. सामनेवाला क्र.2 आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराचे हॅन्डसेटवर कॉम्प्युटर सिस्टिमला जोडून डाटा फिड करणेचा प्रयत्न केला असता सदर फिडींग करणे न जमलेने सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला होता व ही चुक तक्रारदाराची आहे. प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर प्रॉब्लेम दुर करुन हॅन्डसेट दुरुस्त करुन तक्रारदारांना दिला होता. हॅन्डसेटमधील पार्ट बदलेले हे तक्रारदाराचे म्हणणे खोटे आहे. जर अशा प्रकारे पार्ट बदलले असते तर तक्रारदार हे पुन्हा प्रस्तुत सामनेवाला क्र.2 यांचेकडे आले नसते.तसेच हॅन्डसेटमध्ये आणखी बिघाड निर्माण झाला हे तक्रारदारचे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे. तक्रारदारांचा हॅन्डसेट दुरुस्त होऊनही तक्रारदारांचे समाधान झज्ञले नव्हते. तक्रारदारांना हॅन्डसेट दुरुस्त झाला आहे घेऊन जावा असे कळविले. परंतुत तक्रारदारांना हॅन्डसेट पसंत नव्हता त्याकरिता त्यांना हॅन्डसेटची किंमत परत पाहिजे होती त्यामुळे ते वारंवार सदर हॅन्डसेटच्या तक्रारी करीत होते. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारांना ई मेल करुन हॅन्डसेट दुरुस्त झालेचे कळवले होते. (6) सामनेवाला क्र.2 आपल्या लेखी म्हणणेत पुढे असे सांगतात, प्रस्तुत सामनेवाला हे सामनेवाला क्र.3 चे सव्हींसींग सेंटर म्हणून सामनेवाला क्र.3 करिता काम करते. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडून कोणतीही सेवा विकत घेतलेली नाही. तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांचे ग्राहकही नाहीत. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द केलेली तक्रार चालणेस पात्र नाही. तसेच तक्रारदाराने केलेल्या सर्व तक्रारी पूर्णत: खोटया आहेत. तक्रारदारांनी सदर मोबाईलवर काही डाटा/सॉफ्टवेअर डाऊनलोड करणेचा प्रयत्न केलेमुळे सदर हॅन्डसेटमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला होता तो सामनेवाला यांनी दुर करुन दिला आहे व प्रत्येकवेळी तक्रारदारांच्या तक्रारीचे समाधान करणेचा प्रयत्न केला आहे. तक्रारदाराने हॅन्डसेट सदोष आहे त्यामध्ये उत्पादित दोष आहे हे शाबीत करण्यासाठी कुठलाही पुरावा किंवा तज्ञांचा रिपोर्ट आणला नाही. तक्रारदाराचा हॅन्डसेट सुस्थितीत सुरु आहे व तक्रारदार तो हॅन्डसेट वापरतही आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या कलम 8 मधील मजकूर पूर्णत: चुकीचा रचनात्मक व खोटा आहे. तक्रारदाराने केलेली मागणीची रक्कमही पूर्णत: चुकीची आहे व अशी कुठलीही मागणी करण्याचा तक्रारदारांना अधिकारही नाही. सबब प्रसतुतची तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी अशी मागणी सामनेवाला क्र.2 यांनी सदर मंचास केली आहे. (7) सामनेवाला क्र.2 यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (8) सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदाराच्या कथनावर तीव्र आक्षेप घेतले आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदारांना विकलेला हॅन्डसेट सदोष आहे, बनावट दर्जाचा आहे त्यामुळे त्याची दुरुस्ती सामनेवाला क्र.2 कडे होऊ शकत नाही असे बेछूट व बिनबुडाचे आरोप तक्रारदाराने केले आहेत व ते सामनेवाला यांना अजिबात मान्य नाही. तक्रारदाराने हॅन्डसेट दि.26/08/2009 रोजी विकत घेतला आणि प्रहिल्या प्रथम दि.02/12/2009 रोजी तो दुरुस्तीसाठी आणण्यात आला. जर उत्पादित दोष असता तर सुरुवातीच्या तीन महिन्यातच तो तक्रारदाराच्या लक्षात आला असता. त्यामुळे हॅन्डसेट सदोष होता हे तक्रारदाराचे म्हणणे विपर्यास्त आहे. तक्रारदाराच्या तक्रारीतील पॅरा क्र. 5 व6 मध्ये कथन केलेल्या तक्रारीबाबत सामनेवाला क्र.3 यांना काही कल्पना नाही. हॅन्डसेट सदोष असल्याबद्दल तक्रारदाराने कुठलाच पुरावा मंचासमोर आणला नाही. त्यामुळे सदरची तक्रार खोटी, रचनात्मक व बनावट आहे. सबब सदरची तक्रार खर्चासह काढून टाकावी अशी मागणी सामनेवाला क्र.3 यांनी सदर मंचास केली आहे. (9) सामनेवाला क्र.3 यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (10) या मंचाने तक्रारदारचे वकील व सामनेवाला क्र. 2 व3 चे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्रही तपासले. (11) तक्रारदाराने खरेदी केलेल्या हॅन्डसेटचे सामनेवाला क्र.1 यांचेकडील बील दाखल केले आहे. सामनेवाला यांनीही ते अमान्य केले नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत यात संदेह नाही. यामध्ये सामनेवाला क्र.2 सर्व्हीस सेंटरचा भाग हा केवळ त्यांच्याकडे आलेल्या हॅन्डसेटची दुरुसती करुन दोष काढून देणे एवढा असतो. त्याबद्दल वॉरंटी काळात असलेल्या हॅन्डसेटबद्दल दुरुस्ती चार्जही त्यांनी घेतलेला नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या जॉबशिटवरुन सामनेवाला क्र.2 ने वेळोवेळी तक्रारदाराचा हॅन्डसेट दुरुस्त करुन देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. त्यामुळे सदरहू तक्रारीत सामनेवाला क्र.2 यांना जबाबदार धरता येणार नाही हे सामनेवाला क्र.2 यांचे कथन हे मंच ग्राहय धरत आहे. (12) तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दि.26/08/2009 रोजी खरेदी केलेल्या हॅन्डसेट प्रथम दि.02/12/2009 नंतर दि.18/12/2009 व त्यानंतर दि.25/01/2010 रोजी सामनेवाला क्र.2 यांचेकडे दुरुस्तीसाठी न्यावा लागला. प्रत्येक वेळी सामनेवाला क्र.2 यांनी आपल्या जॉबशिटवर बॅटरीबद्दल व्हायब्रा इश्युबद्दल तसेच डिस्प्लेबद्दल तक्रारी असल्याचे नमुद केले आहे. हॅन्डसेट घेतल्यावर अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीत त्यामध्ये वेगवेगळे(उपरनिर्दिष्ट) दोष निघत असतील तर तो हॅन्डसेट सदोष आहे हे तक्रारदाराचे म्हणणे हे मंच ग्राहय धरत आहे. (13) सामनेवाला क्र.3 यांनी सदर बाबतीत मा.राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या B.H.Kerudi Vs MDS Mitra (2002) चा हवाला देऊन कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे सदर हॅन्डसेट सदोष असल्याचे ग्राहय मानता येत नाही किंवा त्याची तज्ञांकडून तपासणी न झाल्यामुळेही तक्रारदाराची तक्रार बिनबुडाची आहे असे कथन केले आहे. परंतु सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.3 उत्पादक कंपनीचे सर्व्हीस सेंटर आहे. तिथे हॅन्डसेटच्या देखभाली व दुरुसतीविषय प्रशिक्षण घेतलेले तज्ञ नोकर असतात. त्यांनीही जॉबशीटवर सदर हॅन्डसेट वॉरंटी कालावधीमध्ये महिन्याभरात तीन वेळा तीन वेगवेगळया कारणांनी दुरुस्तीला आल्याचे नमुद केले आहे. त्यावरुन सदर हॅन्डसेटमध्ये दोष आहे हे तक्रारदाराचे कथन हे मंच ग्राहय धरत आहे. त्यासाठी हे मंच मा.राष्ट्रीय आयोगाने Vipro Limited Vs Toppers Multi Media Ltd.(2010) मध्ये दिलेल्या निकालाचा पूर्वाधार घेत आहोत. सदर निवाडयामध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने असे स्पष्ट केले आहे की, “ Repeated failure of key components frequeat visits of engineers to ractify/replace defective components proved. Therefore manufacturer and dealer jointly and severally held liable for replacement/refund of cost.” प्रस्तुत तक्रारीमध्ये सामनेवाला क्र.1 डिलरने हजर राहून आपले कथनही दिले नाही. एकदा वस्तु विकल्यानंतर विक्री पश्चात सेवा देण्याचीही जबाबदारी विक्रेत्याची असते. ती अशी बेपर्वाइने झटकून टाकण्याची विक्रेत्याची वृत्ती निश्चितच सेवेतील त्रुटी आहे अशा निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र. 1 व 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास त्यांने घेतलेल्या मॉडेलचा व किंमतीचा मोबाईल हॅन्डसेट वॉरंटीसह दयावा. अथवा उपरोक्त हॅन्डसेटची किंमत रु.15,800/- दि.23/02/2010 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह दयावी. (3) सामनेवाला क्र. 1 व 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.1,000/- दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |