(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना. राणे, मा.अध्यक्ष)
-/// आ दे श ///-
(पारीत दिनांक – 17 नोव्हेंबर, 2011)
यातील तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
यातील तक्रारदार श्री विलास मनोहरराव जिरापूरे यांची गैरअर्जदार यांचेविरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदार यांचेसोबत, जे भुखंड विक्रीचा व्यवसाय करीतात, मौजा डोंगरगांव, ता.जि.नागपूर खसरा क्रमांक 14, भूखंड क्रमांक 15, क्षेत्रफळ 2031 चौ.फुट रुपये 6,09,000/- एवढ्या किंमतीत विकत घेण्याचा करार केला. सदर सौद्यापोटी म्हणुन दिनांक 11/6/2007 रोजी रुपये 1 लक्ष व दिनांक 16/6/2007 रोजी रुपये 74,000/- याप्रमाणे रकमा धनादेशाद्वारे दिल्या. पुढे वेळोवेळी मिळून रुपये 4,28,208/- एवढी रक्कम मोबदल्यापोटी गैरअर्जदारास दिली आणि उर्वरित रक्कम देण्यास तक्रारदार तयार आहेत. त्यांनी राहिलेली रक्कम स्विकारुन सदर भूखंडाचे विक्रीपत्र करुन द्या अशी गैरअर्जदाराकडे मागणी केली, मात्र गैरअर्जदाराने नेहमीच टाळाटाळ केली. पुढे तक्रारदाराने यासंदर्भात वेळोवळी पत्रव्यवहार केला, मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. दिनांक 6/5/2011 रोजी नोटीस पाठविली. सदर नोटीस गैरअर्जदार यांना प्राप्त होऊनही त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. म्हणुन शेवटी नाईलाजाने तक्रारदार श्री विलास जिरापूरे यांनी सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल करुन, तीद्वारे कराराप्रमाणे भूखंड क्रमांक 15 चे विक्रीपत्र करुन द्यावे, किंवा गैरअर्जदारास देण्यात आलेली मोबदल्याची रक्कम रुपये 4,28,208/- द.सा.द.शे. 18% व्याजासह परत द्यावी, त्यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 2 लक्ष आणि तक्रारीचे खर्चाबाबत रुपये 10,000/- मिळावेत अशा मागण्या केलेल्या आहेत.
यातील गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस बजाविण्यात आली, गैरअर्जदार यांना सदर नोटीस मिळाल्याची पोचपावती प्राप्त झाली. मात्र गैरअर्जदार मंचासमक्ष उपस्थित झाले नाहीत, वा आपला लेखी जबाब सुध्दा दाखल केलेला नाही, म्हणुन त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 01/10/2011 रोजी मंचाने पारीत केला.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, सोबत विक्रीचा करारनामा, उभय पक्षात झालेला पत्रव्यवहार, नोटीस, पोस्टाची पावती व पोचपावती आणि प्रतिउत्तरादाखल वेगळा प्रतिज्ञालेख इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत.
सदर प्रकरणात तक्रारदाराच्या वकीलांचा युक्तीवाद मंचाने ऐकला.
यातील तक्रारदाराने करारपत्र व पुढे वेळोवेळी गैरअर्जदार यांचेशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती मंचासमक्ष दाखल केलेल्या आहेत. त्यातील दिनांक 18/10/2010 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदाराकडून सदर सौद्याबाबत रुपये 4,28,208/- एवढी रक्कम मिळाल्याची बाब गैरअर्जदार यांनी मान्य केलेली आहे. यावरुन तक्रारदाराने गैरअर्जदारास रुपये 4,28,208/- एवढी रक्कम दिल्याची बाब मंचासमक्ष सिध्द होते. भूखंडाचे अकृषक रुपांतरण करुन देण्याची सर्वस्वी जबाबदारी ही गैरअर्जदार यांची आहे, मात्र गैरअर्जदार यांनी ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडलेली नाही व तक्रारदारास सदर भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिलेले नाही.
तक्रारदाराने दाखल केलेला प्रतिज्ञालेख आणि त्यासोबत दाखल करण्यात आलेले संपूर्ण दस्तऐवज यावरुन तक्रारदाराने सदर तक्रार गैरअर्जदाराविरुध्द सिध्द केली आहे. गैरअर्जदाराने या प्रकरणात उपस्थित होऊन आपला बचाव केलेला नाही आणि तक्रारदाराचे म्हणणे खोडून काढले नाही, त्यावरुन तसेच भूखंड विक्री करुन न दिल्यामुळे गैरअर्जदार यांचे सेवेत गंभीर त्रुटी आहे असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
-/// अं ती म आ दे श ///-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास रजीस्टर्ड पोस्टाने सूचना देऊन राहिलेल्या रकमेवी मागणी करावी व मोबदल्याची रक्कम स्विकारुन खसरा क्र. 14, मौजा डोंगरगाव, ता. जि. नागपूर येथील भूखंड क्रमांक 15 चे विक्रीपत्र करुन नोंदवून द्यावे व भूखंडाचा ताबा द्यावा.
किंवा
यासाठी काही कायदेशिर अडचणी असल्यास व तक्रारदार तयार असल्यास त्यांनी एकूण मोबदल्याची जमा केलेली रक्कम रुपये 4,28,208/- जेंव्हा—जेंव्हा रकमा दिल्या, त्या—त्या तारखेपासून द.सा.द.शे. 18% दराने व्याजासह मिळून येणारी रक्कम तक्रारदारास परत करावी.
3. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रुपये 3,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 1,000/- याप्रमाणे एकंदरीत रुपये 4,000/- (रुपये चार हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी.
गैरअर्जदार यांनी उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांका पासून एक महिन्याचे आत करावे.