तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. त.क.च्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारकर्त्याने दि. 4.12.2013 ला आर्शिवाद बेकरी, वर्धा व दि. 30.12.2013 ला मुन्नाजी मिठाईयॉं एवं फरसान महादुला बस स्टॉप, छिंदवाडा रोड, कोराडी, त.जि. नागपूर येथून पेप्सीको कंपनीच्या मिरिंडा या शितपेयाच्या दोन-दोन बॉटल्स खरेदीवर रु.20/- चे मोफत मोबाईल रिचार्ज कुपन देण्यात आलेले होते. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याकडे एकूण रु.80/-चे रिचार्ज कुपन जमा झाले.
सदर कुपन तक्रारकर्ता याने कंपनीच्या वेबसाईटवर रिचार्ज केले असता त्या कुपनवर कोणत्याही प्रकारची कुठलीही रक्कम त्याला मिळाली नाही. म्हणून त.क. हे पेप्सीको कंपनीचे सेल्स ऑफिस मधील श्री. नंदनवार यांना भेटले असता, त्यांनी कुपन रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर कुपन रिचार्ज झाले नाही. म्हणून त.क. ने दि. 16.12.2013 रोजी वि.प. चे फ्रेन्चायसी मॅनेजर, श्री. मंगेश मसुरकर यांना पत्राद्वारे तक्रार केली असता वि.प. यांनी त.क. ला कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही व त.क. च्या तक्रारीचे निरासन केलेले नाही. म्हणून त.क. ने मंचासमक्ष सदर तक्रार दाखल केलेली आहे. सदर तक्रारीत त.क. ने नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/- व्याजासह मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रु.25,000/-, तक्रारीचा खर्च रु.10,000/- व सदर प्रक्रियेचा खर्च रु.5000/- वि.प.कडून मिळण्यासाठी सदर तक्रार अर्जात विनंती केलेली आहे.
सदर प्रकरणात मंचाद्वारे वि.प. यांना नोटीस बजावण्यात आलेली असून ती प्राप्त होवूनही वि.प. हे विद्यमान मंचासमक्ष हजर झाले नाही व आपले म्हणणे सादर केलेले नाही. करिता सदर प्रकरण मंचाच्या आदेशानुसार वि.प. यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्यात आले.
सदर प्रकरणात त.क. यांने केलेले कथन, दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपत्र तसेच त.क.चा युक्तिवाद इत्यांदीचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत पोहचले.
-: कारणे व निष्कर्ष :-
तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे त्याने पेप्सीको कंपनी अंतर्गत मिरिंडा या शितपेयाच्या बॉटल्स आर्शिवाद बेकरी वर्धा व मुन्नाजी मिठाईयॉं एवं फरसान महादुला बस स्टॉप, छिंदवाडा रोड, कोराडी, त.जि. नागपूर येथून खरेदी केल्या. त्या पृष्ठार्थ त.क. यांनी नि.क्रं. 3/2 व नि.क्रं. 3/3 नुसार सदर मिरिंडा शितपेय खरेदी केल्याबाबतच्या पावत्या प्रकरणात दाखल केलेल्या आहे. सदर दस्ताऐवजांचे अवलोकन केले असता त.क. यांनी वि.प. यांच्या कंपनीचे मिरिंडा हे शितपेय खरेदी केल्याचे सुस्पष्ट होते. त्यामुळे त.क. हा वि.प. यांचा ग्राहक ठरतो.
सदर प्रकरणामध्ये वि.प. यांना मंचाद्वारे नोटीस पाठविण्यात आला असता सदर नोटीस वि.प. यांना दि. 4.2.2014 रोजी प्राप्त झाल्याचे प्रकरणातील दस्ताऐवजावरुन दिसून येते. सदर प्रकरणाचा नोटीस प्राप्त होवूनही वि.प. हे मंचासमक्ष हजर झाले नाही व आपले म्हणणे सादर केलेले नाही. म्हणून वि.प. विरुध्द दि. 21.03.2014 रोजी प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश मंचाने पारित केला.
त.क. यांनी सदर तक्रार ही प्रतिज्ञालेखावर दाखल केली आहे. तसेच तक्रारकर्त्याने प्रकरणात नि.क्रं. 3/1 नुसार वि.प. यांना त.क. ने नुकसान भरपाई मागितल्याबाबतचा नोटीसची प्रत दाखल केलेली आहे. सदर नोटीस वि.प. यांना प्राप्त झाल्याची पोच पावती देखील नि.क्रं. 3/4नुसार प्रकरणात दाखल आहे. सदर दस्ताऐवजावरुन असे स्पष्ट होते की, त.क. यांनी वि.प. यांचेकडे त्यांची मागणी केलेली होती. परंतु सदर नोटीसची पूर्तता केली असल्याबाबत तसेच नोटीसला उत्तर दिल्याबाबतचा कुठलाही पुरावा मंचासमक्ष उपस्थित होवून सादर करण्याची तसदी वि.प. यांनी घेतलेली नाही व त.क. यांचे कथन खोडून काढलेले नाही.
प्रकरणातील कथन व दस्ताऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे असे मत आहे की, वि.प. यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे त.क. हा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. त.क. ने सदर तक्रारीत नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/- व्याजासह, मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रु.25,000/-, तक्रारीचा खर्च रु.10,000/- प्रक्रियेचा खर्च रु.5000/- याप्रमाणे मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव असून त.क. हा नुकसान भरपाईकरिता रु.1500/-. तसेच मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल आणि तक्रारीचा खर्च मिळून रु.1000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
आदेश
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास, नुकसान भरपाई म्हणून रु.1500/- आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावे.
3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना तक्रारीचा खर्च म्हणून रु.1000/- आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावे.
4) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून
जाव्यात.
5) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित
कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.