जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –43/2011 तक्रार दाखल तारीख –01/03/2011
सिद्यीकी असदुल्ला खयुम सिद्यीकी
वय 70 वर्षे,धंदा मजूरी ..तक्रारदार
रा.मंगळवारपेठ ता.अंबाजोगाई, जि.बीड
विरुध्द
1. एस.के.ठाकूर,
वाहक बॅच क्रमांक 6018
अंबाजोगाई आगार रा.प.महामंडळ,अंबाजोगाई
ता.अंबाजोगाई जि.बीड ...सामनेवाला
2. आगार प्रमुख
अंबाजोगाई आगार रा.प.महामंडळ,अंबाजोगाई
ता.अंबाजोगाई जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- स्वतः
सामनेवाले क्र.1 व 2 तर्फे :- अँड.जी.बी.कोल्हे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार अंबाजोगाई येथील रहिवासी असून दि.5.12.2010रोजी बीड बसस्थानकावरुन अंबाजोगाईस येण्याकरिता अंबाजोगाई डेपोची बस क्र.एम.एच.-20-डि-9618 औरंगाबाद अंबाजोगाई या बसमध्ये रात्री 9 वाजता बसला. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून त्यांचेकडे फेस्कॉम या सरकार मान्य व प्राधिकृत संघामार्फत महाराष्ट्र शासनाने तहसिलदार यांच्या स्वाक्षरीने ओळखपत्र क्रमांक ऐबीजे 83-382 दि.18.01.2005 अन्वये दिले आहे. ते ओळखपत्र तक्रारदाराने सामनेवाला यांना दाखवून सवलतीच्या तिकीटाची मागणी केली असता सामनेवाला यांनी हे पत्र तहसीलदाराचे सहीचे आहे ते आता बंद झाले आहे, निवडणूकीच्या कार्डाशिवाय कोणतेही कार्ड चालत नाही. ते असेल तर दाखवा नसता गाडीचे खाली उतरा, अशी अरेरावीची भाषा वापरुन तक्रारदारास अपमानास्पद वागणूक दिली व गाडीचे खाली उतरविण्याची धमकी दिल्यामुळे तक्रारदाराला नाईलाजाने पूर्ण तिकीट रु.99/- घेणे भाग पडले. तिकीट नंबर 009566 आहे.
तक्रारदाराने सामनेवाला यांस त्यांचे नांव व नंबर विचारला असता सामनेवाला यांनी ते दिले नाही. तिकीटावर सर्व काही आहे त्यावरुन तूम्हाला काय करावयाचे ते करा, माझे कोणीच काही वाकडे करु शकत नाही. वाटल्यास माझी तक्रार करा अशी धमकी दिली. बस वाहकाच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी दि.6.12.2010 रोजी आगार प्रमूख अंबाजोगाई यांचेकडे तक्रार दिली. पोहच तक्रारदाराना दि.8.12.2010 रोजी प्राप्त झाली.
सामनेवाला यांचे विरुध्द काहीच कार्यवाही न झाल्याने तक्रारदारांनी दि.29.12.2010 रोजी ग्राहक पंचायत अंबाजोगाई कडे अर्ज करुन सामनेवाला यांनी अपमानास्पद वागणूक दिल्या बाबत व तिकीटाचे आगाऊ पैसे घेतले आहेत ते व नूकसान भरपाई देण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी दि.3.1.2011 रोजी आगार प्रमुख अंबाजोगाई यांना त्यांचे पत्र नंबर 1/11 द्वारे नूकसान भरपाईची मागणी केली. त्यांचे उत्तर दि.14.1.2011 रोजी मिळाले.
एसटी प्रवाशांचे सेवेसाठी आहे. बहूजन सूखाय बहूजन हिताय हे एसटी चे मुख्य ध्येय असताना, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असताना त्यांना दिल्या जाणा-या सवलतीच्या दरापासून त्यांना वंचित ठेऊन त्यांना तिकीट घेण्यास भाग पाडले. तक्रारदारास अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे सामनेवालेकडून एकूण रु.10,000/- नूकसान भरपाई देण्या बाबत आदेश व्हावेत. तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळावा.
सामनेवाले क्र.1 व 2 यांनी त्यांचा खुलासा नि.10 दि.7.5.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. सदरील तक्रारदाराने दि.6.12.2010 रोजी आगार प्रमुख अंबाजोगाई कडे अर्ज दिला.त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे उत्तर दि.8.12.2010 रोजी दिले. सामनेवाला यांनी तक्रारदारांना कोणतीही गैरवर्तणूक दिली नाही. तक्रारदाराकडून सामनेवाला क्र.1 ने कोणतेही आगाऊ पैसे घेतलेले नाही. अध्यक्ष ग्राहक पंचायत अंबाजोगाई यांनी दि.3.1.2011 रोजी आगार प्रमुख यांना त्यांचे पत्र क्र.1/11 द्वारे अर्ज दिला. त्यांचे उत्तर दि.14.1.2011 रोजी दिलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास अपमानास्पद वागणूक दिली नाही. अथवा जास्तीचे पैसे देऊन तिकीट घेतलेले नाही. कोणताही मानसिक त्रास दिलेला नाही.
तक्रारदारांनी तहसीलदार अंबाजोगाई येथून ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र काढलेले आहे. त्या पत्रात तक्रारदाराची जन्म तारीख नमूद केलेले नाही. तक्रारदारांनी स्वतःचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रावर 65 वर्ष अशी दूरुस्ती केलेली आहे. त्यावर तहसीलदार यांची सही दिसून येत नाही. दि.5.12.2010 रोजी तक्रारदार प्रवास करीत असताना तक्रारदारांनी वरील ओळखपत्र दाखवल्यानंतर ज्येष्ठ नागरिक ओळखपत्राशिवाय भारतीय निवडणूक ओळखपत्राची मागणी केली असता ते तक्रारदाराकडे मिळून आले नाही. सामनेवाला क्र.1 एसटी मंडळाचे नियमाप्रमाणे पूर्ण तिकीट घेतले. तक्रारदारांनी खोटा दावा एसटी महामंडळ लातूर विरुध्द नूकसान भरपाईचा दावा क्र.44/11 दाखल केला असून तो प्रलंबित आहे. तक्रारदार हा आजपर्यत खोटया ओळखपत्राआधारे एसटी महामंडळाची फसवणूक करुन प्रवास करीत होता.खोटया तक्रारी दाखल करण्याची तक्रारदारांना सवयी असल्याने तक्रारदारास कोणतीही नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार नाहीत.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, तक्रारदाराचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांचा खुलासा, सामनेवाले यांचे आगार प्रमुख अशोकराव सोपानराव सोठ महाराष्ट्र राज्य अंबाजोगाई यांचे शपथपत्र, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. सामनेवाले यांचे वकील श्री.कोल्हे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्र पाहता तक्रारदारा जवळ तहसीलदार यांचे स्वाक्षरीचे ओळखपत्र ऐबीजे 83-382 दि.18.1.2005 चे आहे. सदर ओळखपत्रावर तक्रारदाराचे जन्म तारीखेच्या कलमात वय 65 वर्ष नमूद केलेले आहे.
दि.5.12.2010 रोजी तक्रारदार बीड बसस्थानकावरुन औरंगाबाद अबाजोगाई या बसमध्ये रात्री 9 वाजता बसला. त्यांनी त्यांचे ज्येष्ठ नागरिकाचे ओळखपत्र कंडक्टरला दाखवून सवलतीच्या तिकीटाची मागणी केली. सामनेवाला क्र.1 यांनी सदरचे ओळखपत्रावर जन्म तारीख नमूद नाही, त्याठिकाणी वय वर्ष 65 हाताने लिहीलेले असल्याने व त्यावर तहसीलदार यांची सही नसल्याने तक्रारदार ओळखपत्राआधारे तक्रारदारांना ज्येष्ठ नागरिक सवलत देण्याचे नाकारले. तसेच तक्रारदाराशी अरेरावीची भाषा केली. तिकीट पूर्ण घ्या नाही तर खाली उतरा अशी धमकी सामनेवाला क्र.1 ने दिली. अशी प्रमुख तक्रार तक्रारदाराची आहे.
या बाबत तक्रारीत दाखल असलेल्या कागदपत्रावरुन असे दिसते की, तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 आगार प्रमुख यांचेकडे वरील घटनेचे संदर्भात तक्रार केली असता त्यांनी सदर अर्जाचे संदर्भात काहीही कार्यवाही केलेली नाही.
तक्रारदारांनी ग्राहक पंचायत अंबाजोगाई यांचेकडे या संदर्भात तक्रार दिली. त्यावेळी आगार प्रमुखांनी दि.14.1.2011 रोजी ग्राहक पंचायत अंबाजोगाई यांना पत्र देऊन कळवले की, संबंधीत तक्रारदाराच्या तक्रारी बाबत त्यांनी तक्रारदारांना झालेल्या त्रासाबददल दिलगीरी व्यक्त केली व संबंधीत वाहकावर करण्यात आलेली कार्यवाही त्यांना वरिष्ठ कार्यालयामार्फत प्रकरण निकाली निघाल्यावर कळविण्यात येईल असे कळवलेले आहे.
तक्रारदाराचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र पाहता ते ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र तहसिलदाराचे सहीने देण्यात आलेले आहे. त्यावर जन्म तारखेच्या कलमात 65 वर्षाचे वय नमूद आहे, जन्म दिनांक नमूद नाही. फेस्कॉम संस्थेचा त्यावर शिक्का आहे. तहसिल अंबाजोगाई यांची त्यावर सही शिक्का आहे.
या संदर्भात महामंडळाने तहसिलदार यांचे सहीचे प्रमाणपत्र चालणार नाही या बाबतचा कोणताही आदेश किंवा परिपत्रक काढलेले नाही. तथापि, काही गांवामधून तहसिलदार यांचे बनावट सहीचे ओळखपत्र उघडकीस आल्याने ओळखपत्राची खात्री करुन व संबंधीत ओळखपत्रावरचे वय जाणून घेण्याबाबतच्या सुचना मंडळानें दिलेल्या आहेत. या संदर्भात तक्रारदारांनी श्री. मूंकूद धस मूख्य जनसंपर्क अधिकारी एसटी मंडळ यांनी जाहीर केलेले पत्र सकाळ औरंगाबाद दि.2.12.2010 रोजीचे पेपरचे कात्रण दाखल केलेले आहे. तसेच यां संदर्भात दि.1.10.2010 रोजीचे ज्येष्ठ नागरिकाचे बनावट पासेस बाब महाव्यवस्थापक वाहतूक यांचे पत्रही दाखल केलेले आहे. दि.30.03.2011 रोजीचे विभाग नियंत्रक एसटी महामंडळ यांचे तक्रारदारांना आलेले पत्र पाहता त्यात खात्यामार्फत चौकशी करण्यात येऊन संबंधीत वाहकाने प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तन न केल्याने सदरची तक्रार उदभवल्याचे दिसून येते.सदर तक्रारदारास सामनेवाला क्र.1 यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांचे विरुध्द खात्यामार्फत दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. झालेल्या गैरसोयीबददल व त्रासाबददल या कार्यालयातर्फे दिलगिरी व्यक्त केली आहे.
दि.11.5.2011 रोजीचे ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई यांचे पत्रानुसार तक्रारदाराचे सदरचे ओळखपत्र हे सत्य आहे त्यात कोणत्याही प्रकारची दूरुस्ती करण्यात आलेली नाही.या सर्व कागदपत्रावरुन तक्रारदाराचे ओळखपत्र खरे असूनही वाहकाने तक्रारदारावर सदर ओळखपत्राआधारे जेष्ठता अंतर्गत मिळणारी सवलत न देऊन दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते. सदर वाहका विरुध्द कार्यालयीन दंडात्मक कार्यवाही करण्यात आल्याचे दिसते परंतु सदरची दंडात्मक कार्यवाही काय झाली यांचा स्पष्ट उल्लेख सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्यांचे पत्रात केलेला नाही. तसेच सदरच्या बाबी या त्यांनी त्यांचे खुलाशातही नमूद केलेल्या नाहीत किंवा शपथपत्राही नमूद केलेल्या नाहीत किंवा कार्यवाही संदर्भात कागदपत्रे दाखल केली नाही. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट झाल्याने सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 चे सेवेत असल्याने व सामनेवाला क्र.1 चे विरुध्द दंडात्मक कार्यवाही सामनेवाला क्र.2 यांनी योग्य त-हेने स्पष्ट न केल्याने सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 च्या चूकी बाबत दंड म्हणून रु.100/-, मानसिक त्रासाचे रु.500/- व तक्रार खर्चाचे रु.500/- तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. सामनेवाला क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदाराला दंडाची रक्कम रु.100/- ( अक्षरी रुपये शंभर फक्त ) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसाचे आंत अदा करावेत.
3. सामनेवाला क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची रक्कम रु.500/-( अक्षरी रुपये पाचशे फक्त ) व तक्रारीचा खर्च रु.500/-( अक्षरी रुपये पाचशे फक्त ) तक्रारदारांना आदेश प्राप्तीपासून 30 दिवसाचे आंत दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3)प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड