तक्रार क्र. 144/2014.
तक्रार दाखल दि.29-09-2014.
तक्रार निकाली दि.29-02-2016.
सौ. सुरेखा बाळासाहेब पाटील,
रा.एफ-11,अशोका पार्क,सातारा,
ता.जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
एस.आर.ई.आय.इक्वीपमेंट फायनान्स,
वाई 10 ब्लॉक, ईपी सेक्टर-5, साल्टलेक सिटी,
कोलकत्ता 700 091 .... जाबदार.
.....तक्रारदारतर्फे- अँड.व्ही.एस.खामकर.
.....जाबदार तर्फे- अँड.ए.बी.जवळे.
न्यायनिर्णय
(मा.सौ.सविता भोसले,अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे. प्रस्तुत तक्रार अर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे सातारा येथील रहिवाशी आहेत. तक्रारदाराने जाबदार कंपनीकडून कर्ज घेऊन शेती कामासाठी जे.सी.बी. एम.एच.11 यू-6396 हा खरेदी केला होता. प्रस्तुत तक्रारदार यांचे शेती कामासाठी जे.सी.बी ची आवश्यकता असलेने गरजेपोटी खरेदी केला होता. प्रस्तुत जे.सी.बी. खरेदीसाठी मूलतः रक्कम रु.2,51,000/- (रुपये दोन लाख एक्कावन्न हजार मात्र) तक्रारदाराने जाबदारांकडे जमा केली होती व ऊर्वरीत रकमेच्या कर्जाची मागणी जाबदार कंपनीकडे तक्रारदाराने केली होती. आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर जाबदाराने प्रस्तुत तक्रारदार यांना कर्ज मंजूर केले. सदर कर्जाची परतफेड तक्रारदाराने मासीक हप्त्यामध्ये केलेली आहे. प्रस्तुत जाबदाराने तक्रारदाराला कर्जापोटी मासीक हप्ता रक्कम रु. 53,150/- असा ठरवून दिला होता व याप्रमाणे तक्रारदाराने कर्जापोटी जाबदाराकडे एकूण रक्कम रु.18,96,000/- (रुपये अठरा लाख शहान्नव हजार मात्र) कर्ज तक्रारदाराला उपलब्ध करुन दिले होते. अशारितीने तक्रारदार यांना सदरील जे.सी.बी. नं.एम.एच.11 यू. 6396 हा सप्टेंबर,2008 मध्ये एकूण रक्कम रु.21,47,000/- (रुपये एकवीस लाख सत्तेचाळीस हजार मात्र एवढया किंमतीला खरेदी केलेला होता. प्रस्तुत तक्रारदाराने कर्जापोटी जे.सी.बी च्या उत्पन्नातून येणा-या रकमेतून मासिक हप्ते दरमहा वेळोवेळी जाबदार कंपनीकडे जमा केले होते. अशारितीने दि.05/08/2013 पर्यंत देय असणारे सर्व मासीक हप्ते तक्रारदाराने जाबदार कंपनीत जमा करुन त्याबाबतच्या पावत्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर सदर जे.सी.बी. चे सर्व देय मासीक हप्ते भरलेनंतर रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट (आर.सी.बुकवर) असणारा एस.आर.ई.आय. इक्वीपमेंट फायनान्स लिमीटेड या नावाने तारण गहाणाचा बोजा जाबदार यांचेकडून कमी करुन मागीतला. सदर तक्रारदाराने जाबदार यांना देय असलेली सर्व रक्कम व्याजासह परतफेड केली असलेने तारण गहाणाचा बोजा जाबदार कंपनी कमी करुन देईल असे वाटत होते. तसेच तक्रारदाराने तारण गहाणाचा असणारा बोजा कमी करुन मागीतला असता अद्यापही जाबदाराने तो कमी करुन दिलेला नाही. प्रस्तुत बाबींमुळे तक्रारदार यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
जाबदाराने तक्रारदाराचे आर.सी.बुकवरील बोजा कमी करण्याऐवजी तक्रारदारकडून रक्कम उकळणेच्या हेतूने दि.9/6/2014 चे पत्राने तक्रारदार यांचेकडे एकूण रक्कम रु.6,30,433/- एवढया रकमेची बेकायदा मागणी केली. सदर पत्र मिळताच तक्रारदाराला प्रचंड मानसिक धक्का बसला तक्रारदाराने जाबदाराच संपूर्ण रक्कम परतफेड करुनही जाबदार तक्रारदारांकडे पुन्हा रक्कम मागणी करत आहेत. त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. जाबदाराने पुन्हा रकमेची मागणी केली व तक्रारदाराचे आर.सी.बुकवरील तारण गहाण बोजा कमी करुन दिला नाही. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा दिलेने तक्रारदाराने प्रस्तुत जाबदारांविरुध्द सदरचा तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून तक्रारदाराचे जे.सी.बी.नं. एम.एच.11 यु-6396 च्या आर.सी.टी.सी.बुकमधील असणारा तारण गहाणाचा एस.आर.ई.आय.फायनान्स लि., यांचा बोजा जाबदाराने कमी करुन देणेचा आदेश व्हावा, जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना मानसीकत्रास व नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.2,00,000/- वसूल होवून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे जे.सी.बी.मशीनचे आर.सी.बुकची झेरॉक्स प्रतीक्षा जाबदार यांनी तक्रारदार यांना करार नंबर 32473 बाबतची दिलेली नोटीस, नि. 16 कडे प्राथमिक मुद्दयाचे अर्जावर म्हणणे, नि.18 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.20 चे कागदयादीसोबत मौजे पिंपरी, सर्व्हे नं.111 चा 7/12 चा उतारा, नि.20/अ कडे पुरावा संपलेची पुरसिस, नि.24 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. जाबदार यांनी याकामी नि.12 कडे म्हणणे/कैफीयत, नि.13 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 14 कडे प्राथमिक मुद्दयासाठी अर्ज, नि. 23 कडे तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान झाले कराराची प्रत, नि.22 कडे पुरावा संपलेची पुरसिस, नि.25 कडे जाबदाराचा लेखी युक्तीवाद, नि.26 चे कागदयादीसोबत मे. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे वगैरे सर्व कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केले आहेत. जाबदार यांनी त्यांचे म्हणणे/कैफीयतमध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे. जाबदाराने पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविलेले आहेत.
i. तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथने मान्य व कबूल नाहीत.
ii. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीप्रमाणे ग्राहक या संज्ञेत मोडत नाहीत. तक्रारदाराने सदरचे जे.सी.बी. (अवजड वाहन मशिन) हे व्यावसायीक कारणाकरीता घेतले आहे. सदरच्या वाहनाची खरेदी ही पूर्णपणे व्यापारी कारणाकरीता झालेली आहे (Commercial Purpose) साठी झाली आहे. त्यातून जास्तीत जास्त नफा मिळविणे एवढाच उद्देश तक्रारदाराचा आहे. तसेच प्रस्तुत तक्रार दाखल करण्यास कारणही या मे मंचाच्या अधिकार क्षेत्रात घडलेले नाही. सबब प्राथमिक मुद्दा काढणेसाठी स्वतंत्र अर्ज दाखल करीत आहे.
iii. तक्रारदाराचे अर्जातील तक्रारदाराने त्याचे शेतीच्या कामासाठी जेसीबी मशीन खरेदी केले हा मजकूर पूर्णतः खोटा व लबाडीचा असून मान्य नाही. प्रस्तुत जेसीबी चा वापर तक्रारदाराने शेतीच्या कामासाठी केला हा मजकूर पूर्णतः खोटा असून मान्य नाही. तक्रारदाराने जाबदाराचे कर्जाचे हप्ते दरमहा वेळेवर न चूकता जमा केले हा मजकूर मान्य नाही.
iv. वास्तविक तक्रारदाराने प्रस्तुत जेसीबी हा पूर्णतः व्यावसायिक कारणाकरीता घेतलेला आहे. त्यातून नफा मिळविणे एवढाच त्यांचा उद्देश आहे. मूलतः जेसीबी हे वाहन शेतीसाठी वापरले जात नाही. जेसीबीचा वापर शेती कामासाठी होत नाही. तसेच जेसीबी हे व्यावसायिक वाहन असून ते बांधकाम अर्थ मुव्हींग व इतर तत्सम कामासाठी वापरले जाते. तक्रारदार यांना मोठी शेती नाही व त्या स्वतः शेतकरीही नाहीत. जेसीबी चालवणेसाठी वाहनावर ड्रायव्हर व हेल्पर नेमला आहे. त्यामुळे प्रस्तुत जेसीबी चे वापरातून मोठा नफा मिळविण्याचा तक्रारदाराला उद्देश दिसून येतो. त्यामुळे तक्रारदाराने जेसीबी हे वाहन व्यावसायीक कारणासाठी खरेदी केलेले आहे हे सिध्द होते. तक्रारदाराने जाबदारांकडून घेतलेल्या कर्जाची पूर्णतः परतफेड केलेली नाही. अद्यापही रक्कम रु.6,30,433/- ची थकबाकी तक्रारदाराने जाबदार यांना अदा केलेली नाही. त्यामुळे तारण गहाणाचा बोजा आर.सी.बुक वरुन उतरवून देणेचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रस्तुत बाब तक्रारदाराचे कर्ज खातेवरुन स्पष्ट होते.
v. प्रस्तुत तक्रार अर्जाचे कारण या मे मंचाचे अधिकारक्षेत्रात झालेले नाही. तसेच तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे गाहक या संज्ञेत मोडत नाहीत. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदाराने जेसीसबी हा व्यापारी हेतूसाठी खरेदी केला असलेने तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदाराने याकामी दिलेले आहे. जाबदाराने पुढीलप्रमाणे मे. वरिष्ठ न्यायमंचाचे न्यायनिवाडे याकामी दाखल केलेले आहेत.
1. 2015 NCJ 607 (NC)
jagrat Nahric & Anr. V/s. Cargo Motors Pvt. Ltd. & Anrs.
2. 2015 NCJ 272 (NC)
M/s. R. K. Handicraft V/s. M/s. Parmanand Ganda Singh & Co.,
5. वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदार व जाबदार यांनी मंचाकडे दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला.
मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (1)(डी) प्रमाणे
ग्राहक या संज्ञेत मोडतात काय?- नाही.
2. तक्रारदाराने वादातीत जे.सी.बी. हा व्यापारी हेतूसाठी
खरेदी केला आहे काय?- होय.
3. अंतिम आदेश काय?- खाली नमूद केले
आदेशाप्रमाणे विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदारकडून कर्जाऊ रक्कम घेऊन जेसीबी नं. एम.एच.11 यू. 6396 हा खरेदी केला आहे. तक्रारदाराचे कथनानुसार प्रस्तुत जे.सी.बी हा त्याने त्यांच्या स्वतःच्या शेतीचे कामासाठी खरेदी केलेचे म्हटलेले आहे. परंतू तक्रारदार यांनी दाखल केले 7/12 उतारे नि.20/1 व नि.20/2 पाहता तक्रारदाराचे हिश्श्यास येणारी जमीन ही फार मोठी नाही हे दिसून येते. तसेच त्यावरील पिकपाणी नोंदी पाहता ज्वारी व्यतिरिक्त कोणत्याही पिकाची नोंद नाही. तसेच तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे जर जे.सी.बी. हा स्वतःचे शेतीच्या कामासाठी खरेदी केला हे गृहीत धरले तर ते विश्वासार्ह वाटत नाही. कारण जेसीबी मशीन हे शेतीच्या मशागतीसाठी वापरले जात नाही तर अर्थ मुव्हींग सारखी कामे करणेसाठी प्रस्तुतचे जेसीबी ने किती तास काम केले याचे प्रमाण पाहून तासावर भाडे निश्चित केले जाते व भाडयाने दिले जाते. जेसीबी हे स्वतःच्या शेतीच्या कामासाठी खरेदी करणे ही बाब विश्वासार्ह नाही. सबब तक्रारदाराने जेसीबी हा व्यापारी कारण जास्तीत जास्त नफा मिळवणेसाठी खरेदी केलेला आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणजेच Commercial Purpose साठी सदर जे.सी.बी तक्रारदाराने खरेदी केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा 2 (1) (d) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत मोडत नाहीत. ग्राहक संरक्षण कायदा 2 (1) (d) प्रमाणे ग्राहक ‘Consumer’ ची definition खालीलप्रमाणे आहे.
‘Consumer’ means any person who
i. Buy’s any goods for consideration which has been paid or promised or partly paid & partly paid & partly promised or under any system of deferred payment and includes any user of such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person but does not includes a person who obtain such goods for resale or for any commercial purpose or
ii. (hire or avails of) any services for a consideration which has been paid or promised or partly paid & partly promised or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services for consideration paid or promised or partly paid and partly promised or under any system of deferred payment. When such services are availed of with the approval of the first mentioned person but does not include a person who avails of such service for any commercial purpose.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- प्रस्तुत तक्रारदाराने जेसीबी खरेदी केला आहे व शेती कामासाठी खरेदी केलेचे तक्रारदाराचे कथन हे विश्वासार्ह वाटत नाही. कारण स्वतःच्या शेतीच्या कामासाठी जेसीबीचा वापर व मर्यादितच होत असतो मशागत करणेसाठी जेसीबी वापरणेचे ऐकीवात नाही तसेच स्वतःची शेती काम करण्यासाठी जे.सी.बी खरेदी करणे ही बाब विश्वासार्ह वाटत नाही. जे.सी.बी हा भाडेतत्वावर तासीका भाडेतत्वावर दिला जातो तसेच तक्रारदाराने प्रस्तुत जे.सी.बी. हा कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी खरेदी केलेबाबत कोणताही उल्लेख तक्रार अर्जात व अँफीडेव्हीटमध्ये नमूद नाही त्यामुळे सदर जे.सी.बी हा भाडयाने देणेसाठी व जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठीच खरेदी केलेला आहे असे या मे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारदाराचा हा व्यापारी हेतू Commercial Purpose असलेचे स्पष्ट होते. याकामी तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(d) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत येत नाही. सबब मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे.
प्रस्तुत बाबतीत आम्ही जाबदाराने दाखल केले मे. वरिष्ठ न्यायालयांचे खालील न्यायनिवाडयांचा विचार केला आहे.
1. 2015 NCJ 607 (NC)
Jagrat Nagrik &Anrs. V/s. Cargo Motors Pvt. Ltd., & Anrs.
Consumer Protection Act,1986 – Sec. 2(1)(d) – Consumer means and scope-Held-‘Truck chassis’ was not purchased- exclusively for purpose of earning livelihood by way of self employment, Complainant is not consumer and no claim is maintainable under C. P. Act.
2. 2015 NCJ 272 (NC)
M/s. R.K. Handicraft V/s. M/s. Parmanand Ganda Singh & Co.
Consumer Protection Act 1986 - /sec. 2(1)(d)(ii) Consumer-scope- Held – subject thing is purchased for commercial purpose, the complainant is not said to be a consumer. Consumer Protection Act,1986 – Sec. 2 (1) (d)- Earning livelihood- means & scope- Held in order to avail benefit to explanation given in section 2 (1)(d) of C. P. Act, The Complainant is required to plead & prove that complainant purchased the thing exclusive for earning livelihood by way of self employment.
प्रस्तुत तक्रारदाराने जेसीबी वाहन हे स्वतःच्या शेतीच्या कामासाठीच व स्वतःचा उदरनिर्वाह करणेसाठी खरेदी केले होते ही बाब सिध्द केलेली नाही. सबब प्रस्तुत तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा,1986 कलम 2(1)(d) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत मोडत नाहीत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब तक्रारदाराने योग्य त्या कोर्टात दाद मागावी.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहेत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत येतो.
2. तक्रारदार याचा योग्य त्या कोर्टात दाद मागणेचा त्यांचा हक्क अबाधीत ठेवणेत येतो.
3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
4. प्रस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 29-02-2016.
सौ.सुरेखा हजारे श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.