ग्राहक तक्रार क्र. 93/2013
अर्ज दाखल तारीख : 11/06/2013
अर्ज निकाल तारीख: 05/01/2015
कालावधी: 01 वर्षे 06 महिने 27 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) आशा रामलिंग तोडकरी,
8 वय-40 वर्षे, धंदा – घरकाम,
रा.जगताप नगर, येडशी, ता. जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) मा.व्यवस्थापक,
एस.जी. पाटकर,
भारतीय जीवन बिमा निगम लि.,
मंडळ कार्यालय, औरंगाबाद.
जीवन प्रकाश डिव्हीजनल ऑफीस अदालत रोड,
औरंगाबाद.
2) मा.शाखाधिकारी,
आर.एस.पारशेवार,
भारतीय जीवन बिमा निगम लि.
मंडळ कार्यालय शाखा उस्मानाबाद,
3) मा. तहसिलदार साहेब,
(अभिजीत पाटील)
तहसिल कार्यालय, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2)मा.श्रीमती विदयुलता जे. दलभंजन सदस्य.
3) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य,
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.बी.ए.बेलूरे.
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.डी.आर.कुलकर्णी.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : एकतर्फा.
निकालपत्र
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारकर्ती (तक) हिचे मयत पती रामलिंग दत्तात्रय तोडकरी हे आम आदमी योजनाधारक होते. त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने विप क्र.1 व 2 यांचेकडे विमा प्रिमीयम रक्कम भरलेली आहे. त्याचा विमा पॉलीसी क्र.29005000000000002811 आहे. रामलिंग दत्तात्रय तोडकरी हे दि.24/08/2012 रोजी आकस्मितपणे मयत झालेले आहे. म्हणुन दि.06/02/2013 रोजी विरुध्द पक्षकार (विप) क्र.3 कडे सर्व आवश्यक कागदपत्रासहीत विमा दावा दाखल केला. आम आदमी विमा धारकाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने आम आदमी योजनेअंतर्गत रु.30,000/- मिळणे गरजेचे आहे, असे तक्रारकर्तीचे मत आहे. मात्र विप क्र.1 व 2 यांनी देण्यास टाळाटाळ केली म्हणुन सदर तक्रार दाखल करणे भाग पडले. म्हणून रक्कम रु.30,000/- दि.06/02/2013 रोजीपासून 15 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासोपोटी रु.5,000/- व अर्जाच्या खर्चाबददल रु.3,000/- मिळावे अशी विनंती केली आहे.
तक्रारकर्तीने तक्रारीसोबत मृत्यू प्रमाणपत्र, पॉलीसी क्र.29005000000000002811, क्लेम मागणी अर्ज, पंचनामा इत्यादी कागदपत्रांच्या प्रती मंचाच्या अभिलेखावर दाखल केल्या आहेत.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.01/10/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले असून ते पुढीलप्रमाणे....
सदर पॉलिसी ही केंद्र शासनाच्या घोषणेनुसार राज्यातील भुमिहीन कुटूंबातील लोकांसाठी राबवण्यात आलेली योजना आहे. दि.16 ऑक्टोबर 2007 च्या शासनाच्या निर्णयानुसार व सदर पॉलिसीच्या अटी व शर्ती पाहता विमा दावा विप क्र.3 यांचे मार्फत विप क्र.1 व 2 यांचेकडे यायचा असतो मात्र अदयाप पावेतो तक्रारदाराचा विमा दावा विप क्र.1 व 2 यांना अप्राप्त आहे. म्हणून सदर क्लेमबाबत विप क्र.1 व 2 हे कोणतीही कार्यवाही करु शकत नाही. रामलिंग तोडकरी यांचे मृत्यूबाबत कोणतीही माहिती नाही. रामलिंग तोडकरी यांचेसाठी विप क्र.1 व 2 यांचेकडे पॉलीसी क्र.29005000000000002811 चे हप्ते भरलेले आहेत व विपने ते स्विकारलेले आहेत. असे नमूद केले आहे. म्हणून विपने सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नसून सदर तक्रार खर्चासह रदद व्हावी असे नमूद केले आहे.
3) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.3 यांना नोटीस बजावूनही त्यांनी हजर होऊन आपले म्हणणे दाखल न केल्याने त्यांच्या विरुध्द दि.05/05/2014 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक्रारदार नुकसान भरपाई रक्कम
मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाचे विवेचन
5) मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर:
तकने दि.16/10/2007 चे पॉलीसीची प्रत हजर केली असून त्याप्रमाणे रामलिंग दत्तात्रय तोडकरी यांचा विमा दि.01/03/2008 रोजी पासून उतरवला होता त्या दिवशी त्याचे वय 53 वर्षे लिहिले आहे. मृत्यूचा दाखला हे दर्शवितो की रामलिंगचा मृत्यू दि.24/08/2012 रोजी झाला म्हणजे त्यावेळी रामलिंग 58 वर्ष वयाचा होता. विमा मागणी अर्ज हे दर्शवितो की मागणी अर्ज विप क्र.3 ला दि.06/02/2013 रोजी मिळाला होता. विप क्र. 3 नोटीस मिळूनही मंचात हजर झालेला नाही.
6) विप क्र.1 व 2 यांनी दि.16/10/2007 रोजी चे योजनेचे माहीतीपत्रक हजर केलेले आहे त्याप्रमाणे नुकसानभरपाईचा अर्ज तहसीलदारांनी जिल्हाधिका-यामार्फत आयुर्विमा महमंडळीच्या पी. अॅन्ड जी. एस. युनिटकडे पाठविण्याचा होता. महामंडळातर्फे नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे होते ते तकने हजर केलेले आहे. योजनेचे लाभार्थी ग्रामीण भागातील भूमीहीन कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील रोजगार करणारा कुटुंब प्रमूख किंवा त्या कुटूंबातील एक मिळवती व्यक्ती असतो. विम्याचा वार्षीक हप्ता केंद्रशासन व राज्य शासन यांनी दयायचा होता येथे हप्ता रामलिंगने जरी दिला नसला तरी शासनाने दिला असल्याने लाभार्थी म्हणून रामलिंग हा विपचा ग्राहक होतो तर तक्रारकर्ता त्याची वारस असल्याने तिला तक्रार करता येते.
7) विप क्र. 1 व 2 यांचे म्हणणे आहे की विप क्र. 3 कडून त्यांचे कडे मागणी अर्ज न आल्यामुळे विमा रक्कम ते देऊ शकले नाही विप क्र.3 कडून मागणी अर्ज आल्यास छाननी करुन विमा रक्कम देण्यास ते तयार आहेत विप क्र.3 ने मागणी अर्ज पुढे पठवल्याचा कोणताही पुरावा नाही उलट विप क्र.3 ने गैरहजर राहणे पसंत केलेले आहे त्यामुळे विप क्र.3 ने प्रथमत: सेवेत त्रुटी केली हे उघड होते म्हणून आम्ही मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे हुकूम करतो.
आदेश.
1) तक्रारकर्तीची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करणेत येते.
2) विरुध्द पक्षकार क्र.3 ने तकला विमा रक्कम रु.30,000/- (रुपये तीस हजार फक्त) दयावी.
3) विरुध्द पक्षकार क्र.3 ने वरील रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9 दराने व्याज दयावे.
4) विरुध्द पक्षकार क्र.3 ला तक्रारकर्तीचा मागणी अर्ज विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 कडे पाठवून त्यांचेकडून विमा रक्कम मिळवणेचा हक्क राहील.
5) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता
विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत मंचात अर्ज
दयावा
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.