द्वारा मा. श्री. श्रीकांत. म. कुंभार, सदस्य
** निकालपत्र **
(21/03/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे जाबदेणारांविरुद्ध दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे.
1] सिटी सर्व्हे नं. 325/1ए, शनिवार पेठ, पुणे हे मिळकत श्री अशोक दिनकर आरडे, श्री. संजय ज्ञानेश्वर आरडे, (प्रस्तुतच्या तक्रारीतील तक्रारदार क्र. 2), श्री. सागर संजय आरडे, श्रीमती विद्या सुधीर आरडे व श्री. सुम्र सुधीर आरडे यांच्या मालकीची आहे. वरील सर्व घरमालकांनी जाबदेणार यांच्या नावाने दि. 4/7/2005 रोजी विकसन करारनामा आणि मुखत्यारपत्र लिहून दिले. या करारनाम्याद्वारे प्राप्त झालेल्या अधिकाराअन्वये जाबदेणारांनी वर नमुद केलेल्या मिळकतीवर “शांताई” नावाच्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील फ्लॅट क्र. 9, तसेच इमारतीच्या लोअर ग्राऊंड फ्लोअर वरील पार्किंग लॉट नं. 8 ते 12 आणि नवीन इमारतीच्या वरील गच्चीचा (टॉप टेरेस) काही भाग तक्रारदार यांना मालकी हक्काने विकत देण्याचे कबूल करुन त्यांच्या नावाने दि. 11/9/2007 रोजी रितसर करारनामा लिहून दिला. सदरचा करारनामा सब रजिस्ट्रार हवेली क्र. 1, पुणे यांच्या कार्यालयामध्ये अ. क्र. 7149 ला दि. 11/9/2007 रोजी नोंदविण्यात आला. तक्रारदारांच्या कथनानुसार, त्यांनी जाबदेणार यांना सदनिकेची संपूर्ण खरेदी रक्कम वेळोवेळी अदा केली. त्यानंतर जाबदेणारांनी तक्रारदारांना सदनिकेचा ताबा घेण्याची विनंती केली, परंतु तक्रारदारांना द्यावयाच्या सदनिका/टेरेस/पार्किंग लॉटमधील बरीच कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने तक्रारदारांनी सदनिकेचा ताबा घेण्यास नकार दिला. यावर जाबदेणारांनी दि. 30/10/2008 पर्यंत सदनिकेसंदर्भातील सर्व कामे पूर्ण करुन देऊ असे आश्वासन दिल्यामुळे तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सदनिका/टेरेस/पार्किंगचा ताबा घेतला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, दि. 11/9/2007 रोजीच्या करारातील अटी व शर्तींनुसार जाबदेणार यांनी नवीन इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील सदनिका क्र. 9 चा बिल्ट अप एरिया 530 चौ. फु. म्हणजे 49.26 चौ. मी.
देण्याचे कबूल केले होते, परंतु प्रत्यक्षात सदरच्या सदनिकेचा बिल्ट अप एरिया 465 चौ. फु. इतकाच आहे, त्यामुळे जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सुमारे 65 चौ. फुटाने बिल्ट अप एरिया कमी दिलेला आहे. सदरच्या रहिवासी सदनिकेचा बाजारभाव प्रति चौरस फुटास 5500/- इतका आहे, त्यामुळे या दरानुसार जाबदेणार तक्रारदारांना 65 चौ. फुटाचे रक्कम रु. 3,57,000/- देणे लागतात, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 725 चौ. फु. चे टॉप टेरेस दि. 11/9/2007 रोजीच्या करारनाम्याअन्वये खरेदी केलेला आहे, सदरचे टॉप टेरेस हे संपूर्ण टेरेसच्या क्षेत्रातून वेगळे करण्यासाठी मंजूर नकाशाप्रमाणे पार्टीशन वॉल बांधण्याचे जाबदेणारांनी कबुल केले होते, परंतु जाबदेणारांनी पार्टीशन भिंत बांधलेली नाही. सदरच्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर जिन्याच्या समोर तक्रारदारांच्या सदनिकेमध्ये जाणारा अंतर्गत पॅसेज आहे, जाबदेणारांनी वर नमुद केलेल्या करारामध्ये जिन्याचा लॅंडींग पॅसेज आणि तक्रारदारांची सदनिका क्र. 9 यामध्ये दरवाजा बांधून देण्याचे कबुल केले होते, परंतु जाबदेणारांनी सदरचा दरवाजा बांधून दिलेला नाही. इमारतीवर बसविलेली पाण्याची टाकी ही सदोषरित्या बदविलेली आहे, त्यामुळे तक्रारदारांना योग्य पद्धतीने पाणीपुरवठा होत नाही. तक्रारदारांच्या सदनिकेमध्ये बसविलेल्या स्लायडिंग खिडक्यांच्या चौकटी योग्य पद्धतीने बसविलेल्या नाहीत. सदनिकेच्या संडास व बाथरुमला लोखंडी ग्रील बसविलेले नाही. इमारतीच्या बाहेरील भिंतींना बाहेरील बाजूस जे प्लास्टर केलेले आहे, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे, त्यामुळे वारंवार सदनिकेच्या भिंतीच्या अंतर्गत भागावर ओल येते, त्यामुळे भिंतीच्या रंगाचे आणि प्लास्टरचे नुकसान होते, इमारतीचे मुख्य प्रवेशद्वारावर लोखंडी गेट बसविलेले नाही. इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीतून ओव्हरहेड टाकीमध्ये पाणी चढविण्यासाठी योग्य एच.पी. ची मोटार बसविलेली नाही. त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी सदनिकेचे/इमारतीचे भोगवटा पत्र दिलेले नही. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी त्यांच्याकडून वेगवेगळ्या खर्चापोटी रक्कम रु. 25,000/- घेतलेली आहे, परंतु जाबदेणार यांनी त्यापैकी वीजमीटरसाठी फक्त रु. 1,051/- खर्च केलेले आहे, त्यामुळे जाबदेरांनी उर्वरीत रक्कम रु. 23,949/- परत करावी. जाबदेणारांनी तक्रारदारांना नोटीसने न कळविता महाराष्ट्र अपार्टमेंट अॅक्टच्या तरतुदीनुसार दि. 24/10/2008 रोजी डीड ऑफ डिक्लरेशन नोंदविलेले आहे, त्यातील पान नं. 10 वर कलम 13 मध्ये सदनिका क्र. 9 चे धारक म्हणून जाबदेणार यांनी ‘साज एंटरप्रायजेस’ असे नमुद केले आहे, जेव्हा की सदरील सदनिका क्र. 9 ही दि. 11/7/2007 रोजीच्या करारनाम्याअन्वये तक्रारदार यांना तबदील करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदरच्या डीड ऑफ डिक्लरेशनमध्ये नमुद केलेले ‘साज एंटरप्रायजेस’ हे नाव काढून त्याजागी तक्रारदारांचे नाव नमुद करण्यात यावे याकरीता मूळ डीड ऑफ डिक्लरेशनमध्ये दुरुस्ती जाबदेणारांनी त्यांच्या खर्चाने करावी, अशी मागणी तक्रारदार करतात. जाबदेणारांनी सदनिका क्र. 9 च्या अंतीम हस्तांतरणाचा योग्य तो दस्त जाबदेणारांनी नोंदवून दिलेला नाही. जाबदेणारांनी ठरल्याप्रमाणे आणि नियमानुसार इमारतीचे बांधकाम न करता निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेले आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी दि. 30/10/2008 पर्यंत वर नमुद केलेल्या सर्व त्रुटी दूर करुन देऊ असे कबुल करुन आज अखेर करुन दिलेल्या नाहीत, त्यामुळे जाबदेणारांनी सदोष सेवा देऊन सेवेमध्ये कमतरता केलेली आहे. यासाठी तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. यातील तक्रारदार, जाबदेणार यांच्याकडून कमी क्षेत्रफळापोटी रक्कम रु. 3,57,500/-, वर नमुद केलेल्या सर्व त्रुटी, दोष दूर करुन व अपूर्ण बांधकाम पूर्ण करुन मागतात, तसेच इमारतीचे
भोगवटा पत्र, जास्तीचे दिलेली रक्कम रु. 23,949/- परत, सदनिका क्र, 9, टेरेस आणि पार्किंगच्या एरियाचे अंतीम हस्तांतरणाचा योग्य दस्त करुन मागतात. त्याचप्रमाणे शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,00,000/- द्यावेत व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावा अशी मागणी करतात.
2] सदर प्रकरणातील जाबदेणार नोटीस बजावूनही गैरहजर राहिले, त्याचप्रमाणे त्यांनी वकीलांची नियुक्ती करुन त्यांचे म्हणणे दाखल केले नाही, म्हणून त्यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारित केला. प्रस्तूतच्या प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रे, त्याचप्रमाणे तक्रारदारांनी केलेल्या युक्तीवादाचा विचार करुन गुणवत्तेवर निर्णय देण्यात येत आहे.
3] तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील कथने, कागदपत्रे व युक्तीवादाचा विचार करता खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदर मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे-
मुद्ये निष्कर्ष
[अ] जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कबुल :
केल्याप्रमाणे सदनिकेसोबत अनुषंगिक सेवा :
न देऊन सदोष सेवा दिलेली आहे का ? : होय
[ब] जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान :
भरपाई व मागणी केल्या प्रमाणे सेवा :
देण्यास जबाबदार आहेत का ? : होय
[क] अंतिम आदेश काय ? : तक्रार अंशत: मंजूर
कारणे :-
4] प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार यांनी जाबदेणार व तक्रारदार यांच्यातील नोंदणीकृत करारनामा, डिझायनर्स कोलॅबोरटीव्ह तर्फे श्री. डी. टी. पुंडे यांचे दि. 12/9/2009 रोजीचे पत्र, सदनिकेचा नकाशा, टेरेसचा नकाशा व फोटोग्राफ्स इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदारांनी त्यांचे मालकीहक्काची घरजागा विकसित करण्यासाठी जाबदेणार यांच्या नावाने दि. 4/7/2005 रोजी विकसन करारनामा आणि मुखत्यारपत्र लिहून दिले. या करारनाम्याद्वारे प्राप्त झालेल्या अधिकाराअन्वये जाबदेणारांनी वर नमुद केलेल्या मिळकतीवर “शांताई” नावाच्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील फ्लॅट क्र. 9, तसेच इमारतीच्या लोअर ग्राऊंड फ्लोअर वरील पार्किंग लॉट नं. 8 ते 12 आणि नवीन इमारतीच्या वरील गच्चीचा (टॉप टेरेस) काही भाग तक्रारदार यांना मालकी हक्काने विकत देण्याचे कबूल करुन त्यांच्या नावाने दि. 11/9/2007 रोजी रितसर करारनामा लिहून दिला व सदरचा करारनामा नोंदणीकृत करण्यात आला. सदर इमारतीचे व तक्रारदारांच्या सदनिकेचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे तक्रारदारांनी सदनिकेचा ताबा घेण्यास नकार दिला होता परंतु, जाबदेणारांनी दि. 30/10/2008 पर्यंत सदनिकेसंदर्भातील सर्व कामे पूर्ण करुन देऊ असे आश्वासन दिल्यामुळे तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सदनिका/टेरेस/पार्किंगचा ताबा घेतला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, दि. 11/9/2007 रोजीच्या करारातील अटी व शर्तींनुसार जाबदेणार यांनी नवीन इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील सदनिका क्र. 9 चा बिल्ट अप एरिया 530 चौ. फु. म्हणजे 49.26 चौ. मी. देण्याचे कबूल केले होते, परंतु प्रत्यक्षात जाबदेणार यांनी सदरच्या सदनिकेचा बिल्ट अप एरिया 465 चौ.फु. इतकाच दिला. तक्रारदारांनी त्यांच्या या कथनाच्या पुष्ठ्यर्थ डिझायनर्स कोलॅबोरटीव्ह तर्फे श्री. डी. टी. पुंडे, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट, इंटेरिअर डिझायनर यांचे दि. 12/9/2009 रोजीचा अहवाल व त्यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सदरच्या अहवालामध्ये तक्रारदार यांच्या सदनिका क्र. 9 चे बिल्ट अप क्षेत्रफळ 464.36 इतके नमुद केलेले आहे. सदरचा अहवाल व श्री. डी. टी. पुंडे यांचे शपथपत्र जाबदेणार यांनी मंचामध्ये उपस्थित राहून नाकारलेले नाही, त्यामुळे मंच, जाबदेणारांनी तक्रारदारांना कबुल केल्याप्रमाणे क्षेत्रफळ न देता 65 चौ. फुटाने बिल्ट कमी दिलेले आहे, हे तक्रारदारांचे कथन मान्य करते. तक्रारदारांनी कमी क्षेत्रफळापोटी प्रति चौ. फुटास रक्कम रु. 5500/- प्रमाणे एकुण रक्कम 65 चौ. फुटाचे रक्कम रु. 3,57,000/- मागणी केलेली आहे. तक्रारदारांनी सदनिकेच्या एरियामध्ये प्रति. चौ. फु. रु. 5500/- बाजारभाव आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही. परंतु तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये दि. 11/9/2007 रोजी झालेल्या नोंदणीकृत करारनाम्यातील पान क्र. 18 मधील शेड्युल 2 मध्ये प्रति चौ. मी. 22,000/- असा बाजारभाव नमुद केलेला आहे. त्यामुळे 65 चौ. फु. म्हणजेच 6 चौ. मी. या कमी क्षेत्रफळापोटी, म्हणजे रक्कम रु. 1,32,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत, असे मंचाचे मत आहे.
त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी प्रस्तुतच्या तक्रारीद्वारे त्यांनी जाबदेणारांना दिलेली रक्कम रु. 25,000/- पैकी रक्कम रु. 23,949/- परत मागतात. दि. 11/9/2007 रोजीच्या करारातील कलम क्र. 14 मध्ये सदरची रक्कम जाबदेणारांनी तक्रारदारांकडून कायदेशिर खर्चापोटी, शेअर रक्कम, अर्ज प्रवेश फी, सोसायटी स्थापन करण्यासाठी, कर, म.रा.वि.म. डिपॉजिट व ट्रान्सफॉर्मरचे केबल वायल ओढणेसाठी आणि एस.एल.सी. साठी घेतल्याचे नमुद केलेले आहे. तक्रारदारांनी प्रस्तुतच्या तक्रारीकामी फक्त वीजमंडळाची दि. 25/8/2008 रोजीची पावती सादर केलेली आहे, परंतु जाबदेणारांनी वर नमुद केलेल्या बाबींसाठी रक्कम खर्च केलेली नाही या करीत कोणताही स्वतंत्र पुरावा जोडलेला नाही, त्यामुळे तक्रारदार ही रक्कम मिळण्यास पात्र नाहीत, असे मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र. 4 मध्ये जाबदेणारांनी बांधकामामध्ये ठेवलेल्या त्रुटी नमुद केलेल्या आहेत, त्यामध्ये टेरेसवर पार्टीशन भिंत बांधलेली नाही, इमारतीच्या जिन्याचा लॅंडिंग पॅसेज आणि तक्रारदारांची सदनिका यामध्ये दरवाजा बांधलेला नाही, टाकी सदोषरित्या बसविलेली आहे, स्लायडिंग खिडक्यांच्या चौकटी योग्य रितीने बसविलेल्या नाहीत, टॉयलेट आणि बाथरुमला लोखंडी ग्रील बसवून दिलेले नाहीतसदंकेच्या भिंतीच्या अंतर्गत भागावर ओल आल्यामुळे रंग आणि प्लास्टरचे नुकसान झालेले आहे, मुख्य प्रवेशद्वारास लोखंडी गेट बसविलेले नाही, पाण्याच्या टाकीवर कमी शक्तीची मोटार बसविलेली आहे, या त्रुटींचा समावेश होते. वरील सर्व बाबी करुन देणे ही जाबदेणारांची कायदेशिर जबाबदारी आहे. जाबदेणारांनी त्यांची कायदेशिर जबाबदारी योग्य रितीने पार न पाडून तक्रारदारांना सदोष व दोषपूर्ण सेवा देऊन सेवेमध्ये कमतरता केलेली आहे. त्यामुळे सेवा दोषरहित करुन देण्यास जाबदेणार जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे जाबदेणारांनी तक्रारदारांना त्यांच्या सदनिकेचे/इमारतीचे भोगवटा पत्र दिलेले नाही. तक्रारदारांना भोगवटा पत्र देणे ही जाबदेणारांची कायदेशिर जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे जाबदेणारांनी जे डीड ऑफ डिक्लरेशन केलेले आहे, त्यामधील पान क्र. 10 वरील कलम क्र. 13 मध्ये सदनिका क्र. 9 च्या धारकाच्या नावासमोर ‘साज एंटरप्रायजेस’ चे नाव नमुद केलेले आहे. दि. 11/9/2007 रोजीच्या नोंदणीकृत करारनाम्याअन्वये तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये सदनिका क्र. 9 च्या खरेदी-विक्रीचा व्यवहार झालेला असतानाही जाबदेणारांनी डीड ऑफ डिक्लरेशनमध्ये सदनिका क्र. 9 च्या धारकाच्या नावासमोर ‘साज एंटरप्रायजेस’ चे नाव नमुद केलेले आहे, हे अयोग्य व चुकीचे आहे, त्यामुळे जाबदेणारांनी स्वखर्चाने सदरच्या डीड ऑफ डिक्लरेशनमध्ये दुरुस्ती करुन त्याबाबतचा नोंदणीकृत दस्त करणे आवश्यक आहे. तसेच सदनिका क्र. 9 चा अंतीम हस्तांतरणाचा योग्य तो दस्त करुन देणे ही जाबदेणारांची कायदेशिर जबाबदारी आहे. परंतु तक्रारदारांनी सदनिकेपोटी जाबदेणारांना संपूर्ण मोबदला दिलेला असतानाही जाबदेणारांनी आजतागायत तक्रारदारांना कबुल केल्याप्रमाणे अनुषंगिक सेवा दिलेल्या नाहीत.
5] तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारीतील कथने व शपथपत्र, जाबदेणार यांनी मंचामध्ये हजर राहून नाकारलेली नाहीत. कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी केलेल्या मागण्या या योग्य व कायदेशिर आहेत. त्यामुळे या प्रकरणातील कथने व कागदपत्रांचा विचार करता तक्रारदार हे जाबदेणार वर नमुद केलेल्या त्रुटी दुरुस्त करुन, तसेच करारामध्ये नमुद केलेल्या सोयी सुविधा मिळण्यास, त्याचप्रमाणे मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च 3,000/- मिळण्यास पात्र आहेत. सबब खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
:- आदेश :-
1] तक्रारदारांची तक्रार ही अंशत: मंजूर करण्यात येते.
2] असे जाहिर करण्यात येते की, जाबदेणार यांनी तक्रारदार
यांना कबूल करुनही सदनिका दिल्यानंतर वर नमुद
केल्याप्रमाणे व नोंदणीकृत करारनाम्याप्रमाणे अनुषंगिक सेवा
न देऊन सेवेत कमतरता केलेली आहे.
3] यातील जाबदेणार यांना असे आदेश देण्यात येतात की,
त्यांनी तक्रारदारांना कमी क्षेत्रफळापोटी रक्कम रु. 1,32,000/-
(रु. एक लाख बत्तीस हजार फक्त) द.सा.द.शे. 9% व्याजदराने
तक्रार दाखल करण्याच्या तारखेपासून ते रक्कम अदा करेपर्यंत,
त्यांना या आदेशाची प्रत मिळाल्या पासून सहा आठवड्यांच्या
आत द्यावे.
4] यातील जाबदेणार यांना असे आदेश देण्यात येतात की,
त्यांनी दि. 24/10/2008 रोजीच्या डीड ऑफ डिक्लरेशन
मध्ये सदनिका क्र. 9 च्या धारकाचे नाव ‘साज एंटरप्रायजेस’
हे रद्द करुन त्याजागी तक्रारदारांचे नाव नमुद करावे व त्याचा
योग्य नोंदणीकृत दस्त करुन, त्याचप्रमाणे सदनिका क्र. 9 च्या
अंतीम हस्तांतरणाचा योग्य तो दस्त करुन आणि इमारतीचे/
सदनिकेचे भोगवटा पत्र तक्रारदारांना या आदेशाची प्रत मिळाल्या
पासून सहा आठवड्यांच्या आत द्यावी.
5] यातील जाबदेणार यांना असेही आदेश देण्यात येतात की त्यांनी
तक्रारदारांना या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या
आंत, वर नमुद केलेल्या बांधकामातील सर्व त्रुटी म्हणजे, टेरेसवर
पार्टीशन भिंत, इमारतीच्या जिन्याचा लॅंडिंग पॅसेज आणि तक्रारदारांची
सदनिका यामध्ये दरवाजा बांधून द्यावी. तसेच सदोषरित्या बसविलेली
टाकी योग्य रितीने बसवावी, सदनिकेच्या स्लायडिंग खिडक्यांच्या
चौकटी योग्य रितीने बसवाव्यात, टॉयलेट आणि बाथरुमला लोखंडी
ग्रील बसवून द्यावे, मुख्य प्रवेशद्वारास लोखंडी गेट बसवून द्यावे,
इमारतीवरील टाकीस योग्य एच.पी. ची मोटार बसवावी आणि
तक्रारदारांच्या सदनिकेस प्लास्टर व रंगकाम करुन द्यावे.
6] यातील जाबदेणार यांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी
तक्रारदारांना रक्कम रु. 10,000/- (रु. दहा हजार फक्त)
मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून
व रक्कम रु. 3,000/- (रु. तीन हजार फक्त) तक्रारीच्या
खर्चापोटी त्यांना या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा
आठवड्यांच्या आत द्यावी.
7] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.