(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 27/02/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.14.03.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार ती गैरअर्जदार इन्स्टिटयुटमधे एम.बी.ए. ची भुतपूर्व विज्ञार्थीनी होती. सदर कोर्स करीत असतांना प्रथम सत्राच्या विज्ञार्थांना चायना येथे एम.डी.पी. इंटरनॅशनल ट्रीपकरीता जावे लागते, त्याकरीता गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीकडून रु.50,000/- घेतले होते. सदरची ट्रीप दि.06.02.2009 रोजी आयोजीत करण्यांत आली होती, परंतु तक्रारकर्ती फेब्रुवारी मधे 7 महिन्यांची गरोदर होती व तीला स्त्री प्रसुतीतज्ञने ट्रीपला न जाण्यास सांगितले, त्यामुळे तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना पत्र पाठवुन तिच्या अडचणी सांगून सदरची ट्रीपकरीता दिलेल्या पैशाची परत मिळण्याबाबत मागणी गैरअर्जदारांना केली असता त्यांनी सदरचे पैसे परत करता येणार नाही, परंतु पुढच्या वर्षी एम.डी.पी. 2009 मधे जाणा-या ट्रीपला जॉईन करता येईल आणि त्याकरीता अतिरिक्त रक्कम लागल्यास ती द्यावी लागेल असे लिहून दिले. त्यानंतर तक्रारकर्तीने सदर ट्रीपला जाण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु सदर ट्रीपकरीता फक्त 13 विद्यार्थी उपलब्ध असल्यामुळे ती पुढे वाढविण्यांत आली, असे सांगितले. परंतु मध्यंतरीच्या काळात तक्रारकर्तीने एम.बी.ए. चा कोर्स जून-2009 मधे पूर्ण केला, व तिला नोकरी लागल्यामुळे तीने ट्रीपला जाण्यास असमर्थता दर्शवुन ट्रीपचे पैसे रु.50,000/- परत मागितले. परंतु गैरअर्जदारांनी पैसे परत करण्यांस नकार दिला, वास्तविक सदर ट्रीपचा कोर्सकरीता काहीही फायदा नव्हता. कारण सदर एम.बी.ए. चा कोर्स एम.डी.पी. इंटरनॅशनल मधे उपस्थित न राहता पूर्ण केला होता, म्हणजेच सदर ट्रीपला जाणे आवश्यक नव्हते. केवळ गैरअर्जदारांनी ट्रीपच्या नावाखाली विद्यार्थांकडून रक्कम जमा करतात, जी वास्तविक खर्चापेक्षा जास्त असते, व विद्यार्थांची फसवणूक करतात. तक्रारकर्तीने सदर ट्रीपला न जाण्याचे तांत्रीक कारण असतांना देखिल गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस रक्कम परत केली नाही, ही त्यांचे सेवेतील कमतरता असल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
4. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 22 च्या छायांकीत प्रती पान क्र.7 ते 25 वर दाखल केलेल्या आहेत.
5. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात उपस्थित असुन त्यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे...
गैरअर्जदारांनी त्यांचे कथनानुसार सदरची तक्रार कालमर्यादेत नाही व ती खोटी आहे असे म्हटले आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्ती त्यांचे एम.बी.ए. कोर्सची विद्यार्थीनी असल्याचे तक्रारकर्तीचे म्हणणे मान्य केलेले असुन इतर म्हणणे अमान्य केलेले आहे. वास्तविक पाहता तक्रारकर्त्याने वेळोवेळी त्यांचेकडे जमा केलेल्या रकमेच्या पावत्या तिला देण्यांत आलेल्या आहेत. एम.बी.ए. च्या सिलॅबर्सनुसार प्रथम वर्षांच्या विद्यार्थांना एम.डी.पी. इंन्टरनॅशनलच्या ट्रीपला जाणे आवश्यक आहे. सदर ट्रीपला जाण्याकरता एखादा विद्यार्थी येत असेल आणि त्याकरीता रक्कम जमा केल्यानंतर तो स्वतःच्या वैयक्तिक कारणास्तव भरलेले पैसे परत मागू शकत नाही, याची जाणीव सुरवातीलाच करुन देण्यांत येते व तसे तक्रारकर्तीस देखिल सांगण्यांत आले होते. त्यानंतर तक्रारकर्तीने गैरअर्जदारांकडे तसा जाहीरनामा देखिल सादर केलेला आहे. वास्तविक तक्रारकर्तीने स्वतःचे वैयक्तिक कारणास्तव 2009 चे ट्रीपला येण्यास असमर्थता दर्शवुन दि.03.12.2008 ला गैरअर्जदारांना पत्राव्दारे पैसे परत मिळण्याबाबत विनंती केली होती. त्यास गैरअर्जदारांनी उत्तर देऊन पुढील ट्रीपमधे समाविष्ट करुन व त्यावेळी जास्त पैसे लागले तर ते तक्रारकर्तीस द्यावे लागतील, असे स्पष्टपणे नमुद केलेले होते.
6. तक्रारकर्तीस फेब्रुवारी-10 मधे जाणारी ट्रीप कमी विद्यार्थांमुळे रद्द झाल्याचे म्हणणे खोटे असुन वास्तविक सदरची ट्रीप फेब्रुवारी-2010 मधे न नेता नोव्हेंबर-2010 मध्ये नेण्यांत आली यावर देखिल तक्रारकर्तीने दि.25.11.2010 रोजीचे पत्राव्दारे नोकरी लागण्याचे कारणास्तव येण्यांस असमर्थता दर्शविली. अशाप्रकारे तक्रारकर्तीने दोनदा सदर ट्रीपला टाळले. वास्तविक सदर ट्रीप बाहेर देशातील असल्यामुळे त्याकरीता अतिरिक्त खर्च करावा लागतो त्यामुळे विद्यार्थांमार्फत घेतलेले ट्रीपचे वाजवी पैसे आधीच खर्च होतात त्यामुळे कमी पडल्यास गैरअर्जदारांना भर करावी लागते व ते पैसे परत मिळत नाही, त्यामुळे गैरअर्जदार तक्रारकर्तीस पैसे परत करण्यांस असमर्थ आहे, असे नमुद केलेले आहे.
7. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदारांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता नसल्यामुळे सदरची तक्रार खारिज करण्यांत यावी अशी गैरअर्जदारांनी मंचास विनंती केलेली आहे.
- // नि ष्क र्ष // -
8. सदरच्या प्रकरणातील वस्तुस्थिती पाहता निर्वीवादपणे तक्रारकर्तीने
गैरअर्जदारांच्या इन्स्टीटयुटमधे एम.बी.ए. करीता प्रवेश घेतला होता तसेच 6 फेब्रुवारी-2009 पासुन गैरअर्जदारांनी आयोजीत केलेल्या ट्रीपकरीता तक्रारकर्तीने रु.50,000/- अदा केले होते हे दस्तावेजांवरुन निदर्शनास येते. तसेच दस्तावेज क्र.15 वरील पत्रानुसार तक्रारकर्तीने ती 7 महिन्यांची गरोदर असल्याचे कारणास्तव ट्रीपला जाण्यास असमर्थता दर्शवुन ट्रीपकरीता दिलेल्या रकमेची मागणी केल्याचे दिसुन येते. स्त्री प्रसृति तज्ञ, डॉ. सकीना गिराणी यांनी दि.30.12.2008 रोजी दिलेल्या पत्रावरुन त्यांनी तक्रारकर्त्यास बेडरेस्ट सुचविली होती व दगदग टाळण्याचा सल्ला दिला होता, असे निदर्शनास येते. त्यामुळे सदर ट्रीपला आऊ शकत नसल्याच्या कारणास्तव तक्रारकर्तीने सदर ट्रीपचे पैसे मागितलेले दिसुन येते. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला पाठविलेल्या दि.30.12.2008 रोजीचे पत्रावरुन सदरचे पैसे परत मिळणार नाही, मात्र तक्रारकर्ती पुढील सन-2009 मध्ये जाणा-या ट्रीपला जॉईन करु शकेल असे तक्रारकर्तीस कळविलेले दिसुन येते. त्यानंतर सन-2009 मध्ये तक्रारकर्तीने ट्रीपला जाण्याची तयारी केली होती हे तक्रारीत दाखल दस्तावेजांवरुन दिसुन येते. तसेच तक्रारकर्तीचे शपथपत्र व गैरअर्जदारांचा जबाब पाहता सन-2009 ची ट्रीप काही कारणास्तव रद्द होऊन ती नोव्हेंबर-2010 मध्ये ठरल्याचे दिसुन येते. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांवरुन हे हि दिसुन येते की, मध्यंतरीचे कालावधीत तक्रारकर्त्याने एम.बी.ए.चा कोर्स पूर्ण केला होता व तिला नोकरी लागल्यामुळे तिने सदर ट्रीपला जाण्यास असमर्थता दर्शविली होती. गैरअर्जदारांच्या मते सदर ट्रीप ही एम.बी.ए. अभ्यासक्रमाचा एक भाग आहे, परंतु ज्याअर्थी तक्रारकर्तीने सदरचा कोर्स पूर्ण केला होता म्हणजेच तिला सदरची ट्रीप बंधनकारक नव्हती व तसे गैरअर्जदारांनीही आपल्या जबाबात मान्य केलेले आहे की, सदरची ट्रीप विद्यार्थांच्या इच्छेवर अवलंबून आहे.
9. तक्रारकर्तीने प्रकृतिचे कारणास्तव पहिल्या वेळेस ट्रीपला जाण्यास असमर्थता दर्शविली होती व दुस-या वेळेस गैरअर्जदारांच्या तांत्रीक कारणास्तव सदरची ट्रीप पूर्ण होऊ शकती नाही हे पाहता तसेच नैसर्गीक न्याय तत्वाचा विचार करता तक्रारकर्तीने मागणी केल्यावर गैरअर्जदारांना ट्रीपकरीता दिलेली रक्कम रु.50,000/- तक्रारकर्तीस परत करावयास हवे होते. गैरअर्जदारांच्या मते तक्रारकर्तीला पैसे परत मिळणार नाही असा जाहीरनामा तक्रारकर्तीने दिलेला होता तसेच सदरच्या रकमेपैकी काही रक्कम ही ट्रीपच्या पूर्व तयारीकरता खर्च होते. त्यामुळे सदरची रक्कम परत करणे शक्य नसते, परंतु दस्तावेजावरील जाहीरनामा पाहता केवळ फीच्या रकमे संबंधीचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामधे कुठेही ट्रीपकरीता दिलेल्या पैशांचा उल्लेख नाही. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीच्या पैशाचा बराचसा भाग ट्रीपच्या उपाय योजनांमधे खर्च झालेला होता, याबाबत कुठलाही पुरावा दाखल केला नाही. त्यामुळे गैरअर्जदारांचे सदरचे म्हणणे मंचास मान्य करता येणार नाही.
10. वरील सर्व परिस्थीती पाहता गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस ट्रीपचे पैसे परत करावयास हवे होते, ते न करुन निश्चितच गैरअर्जदारांनी सेवेत कमतरता दिलेली आहे, असे मंचाचे ठाम मत आहे.
करीता सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीस ट्रीपचे रु.50,000/- परत करावे.
3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावे.