मा. अध्यक्ष, श्री. विजयसिंह राणे यांचे कथनांन्वये.
-आदेश-
(पारित दिनांक : 26.09.2011)
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांना सन 2009-10 या शैक्षणिक सत्रात बी.ई. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा असल्याने ते गैरअर्जदारांकडे गेले व चौकशी अंती त्यांना गैरअर्जदारांनी असा सल्ला दिला की, रु.20,000/- प्रवेश फॉर्म न भरता फक्त मागिल गुणपत्रिकांच्या प्रती देऊन ठेवा, जर केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेनुसार, प्रवेश गैरअर्जदारांच्या कॉलेजमध्ये नाही मिळाला किंवा इतर पसंतीच्या कॉलेजमध्ये मिळाला तर प्रवेश रद्द करुन भरणा केलेली रक्कम परत मिळेल. म्हणून दि.17.05.2010 ला गैरअर्जदारांच्या कॉलेजमध्ये रु.20,000/- भरुन तक्रारकर्त्यांनी तात्पुरता प्रवेश घेतला. परंतू केंद्रीय प्रवेश पध्दतीनुसार तक्रारकर्त्याला प्रथम फेरीमध्ये पसंतीच्या कॉलेजमध्ये निवड झाल्याने, त्यांनी रु.20,000/- परत मागितले असता, ते देण्यास गैरअर्जदारांनी टाळाटाळ केली. वारंवार मागणी करुनही रक्कम परत न दिल्याने शेवटी कायदेशीर नोटीस दिला, तरीही गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला रक्कम परत केली नाही, म्हणून तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन सदर रक्कम व्याजासह परत मिळावी, मानसिक व शारिरीक त्रासापोटी भरपाई मिळावी, प्रकरणाचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारीसोबत तक्रारकर्त्यांनी एकूण 9 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला पाठविण्यात आली असता गैरअर्जदारांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले व नमूद केले की, त्यांनी तक्रारकर्त्याला कधीच प्रवेश घेण्याकरीता सांगितले नाही व भरलेली रक्कम प्रवेश घेतला नाहीतर परत मिळेल असे आश्वासनही दिले नाही. तसेच तक्रारकर्त्याला दुस-या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याबाबतही तक्रारकर्त्याने कळविलेले नाही. तक्रारकर्त्याची एक जागा रीकामी राहिल्याने त्यांना त्याचे रीक्त स्थानाचे नुकसान होते, त्यामुळे भरणा केलेली फी परत करण्यास ते बंधनकारक नाही. एकूण गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रारीतील अभिकथने नाकारलेली आहेत. तक्रारकर्त्याची तक्रार मंचाचे अधिकार क्षेत्राबाहेरची असून तक्रारकर्ता हा ग्राहक नाही. सदर तक्रार ही खर्चासह खारीज करण्याची मागणी गैरअर्जदारांनी लेखी उत्तरात केलेली आहे.
3. सदर तक्रार मंचासमोर युक्तीवादाकरीता आल्यानंतर मंचाने दोन्ही पक्षांचे वकिलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच त्यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. यातील गैरअर्जदारांनी आपल्या लेखी उत्तरासोबत कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाही, ज्यामुळे हे स्पष्ट होईल की, तक्रारकर्त्यास देऊ केलेली जागा रीकामी राहीली व त्यांच्यामध्ये झालेल्या कराराचे स्वरुप काय होते ? याउलट तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या गुणपत्रिकेवरुन दि.06.07.2010 रोजी त्याचा निकाल घोषित झाला हे स्पष्ट होते. जेव्हा की, गैरअर्जदारांनी त्यांचेजवळून रु.20,000/- या निकालाच्या पूर्वीच 17.05.2010 रोजी घेतले होते. याचाच अर्थ तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे हे स्पष्ट होते. गैरअर्जदारांनी रक्कम न देण्याची कोणतेही कारण दिसून येत नाही. त्यांनी रक्कम परत न करुन सेवेत त्रुटी केलेली आहे असे मंचाचे मत आहे. यास्तव खालील आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला रु.20,000/- परत करावी व त्यावर तक्रार दाखल दि.31.03.2011 पासून रकमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याज द्यावे.
3) मानसिक त्रासाच्या क्षतिपूर्तीबाबत गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.1,000/- द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावे, न पेक्षा द.सा.द.शे. 9 टक्केऐवजी 12 टक्के व्याज देय राहील.