::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैदय) मा.कार्य. अध्यक्षा)
(पारीत दिनांक :-30/01/2017)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
अर्जदार ही चंद्रपूर येथे राहत असून तीचे पती श्री.अजय अॅगस्टीयन जॉन हे भद्रावती आयुध निर्माणी, चांदा येथे फिटर जनरल मेकॅनिक या पदावर कार्यरत होते. तक्रारकर्तीच्या पतीने हयात असतांना गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून बचत खाते उघडले होते. तसेच अर्जदार बाईच्या पतीने गैरअर्जदार क्र.1 च्या मार्फत पर्सनल अॅक्सीडेंट क्लेम इन्श्युरन्स पॉलिसी काढली होती. त्याकरीता त्याने गैरअर्जदार क्र.1 च्या कंपनीमध्ये 100/- रूपये किमतीचा प्रिमियम भरून दि.22/3/2013 ते 22/3/2014 या कालावधीकरीता पर्सनल अॅक्सिडेंट विमा काढला होता ज्याचा मास्टर पॉलिसी क्र.1373000000-00 हा आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचा अर्जदार ही ग्राहक आहे. अर्जदाराचा पती नामे अजय जॉन हयांना दिनांक 6/3/2014रोजी संडासमधून घसरून पडल्यामुळे डोक्याला मार लागल्याने नागपूर येथील श्युअरटेक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे दि.6/3/2014 रोजी भरती करण्यात आले. ते दि.6/3/2014 ते 18/3/2014 पर्यंत दवाखान्यात उपचार घेत होते मात्र दि.18/3/2014 रोजी त्यांचे निधन झाले. अर्जदाराच्या पतीच्या निधनानंतर गैरअर्जदार क्र.2 कडे पतीने काढलेल्या विमा पॉलीसीबद्दल चौकशी करण्यास पाठविले तेंव्हा त्यांनी क्लेम फॉर्म दिला व सर्व दस्तावेजांसह भरून आणण्यास सांगितले. अर्जदाराने सदर क्लेम फॉर्म भरून दस्तावेजांसह गैरअर्जदार क्र.1 कडे दिला. गैरअर्जदार क्र.1 यांनी शोकसंदेशासह 10 दस्तावेजांची पुर्तता करण्यांस अर्जदारांस दि.29/3/2014 रोजी पत्र दिले. अर्जदाराने तसे दस्तावेज गैरअर्जदार क्र.1 ला पाठविले. त्यानंतर पुन्हा दि.7/5/2014 रोजी गैरअर्जदार क्र.1 ने दस्तावेज मागितले. त्यानंतर गैरअर्जदार क्र.1 ने चंद्रपूर येथील एजंट नामे राजेश कश्यप यांना चौकशी व दस्तावेजांकरीता अर्जदाराकडे पाठविले. अर्जदाराने त्याला दस्तावेज दिले परंतु गैरअर्जदार क्र.1 हयांना ते मिळाले नाहीत. अर्जदाराला गैरअर्जदार क्र.1 कडून विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे त्यांनी दिनांक25/9/2014 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठविला. परंतु गैरअर्जदार क्र.1 नी 11/11/2014 रोजी नोटीसच्या उत्तराद्वारे क्लेम नामंजूर केला. सबब सदर तक्रार अर्जदाराने मंचात दाखल केली आहे.
अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारांसरक्कम रू.4,00,000/- (रूपये चार लाख), गैरअर्जदाराकडे मागणी केलेल्या तारखेपासून तिला मिळेपर्यंतच्या तारखेपर्यंत 18 टक्के व्याजासह देण्यात यावे. तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रू.1,00,000/- व तक्रारीचा खर्च रू.15,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्याचे आदेश व्हावे.
अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने हजर होवून नि. क्रं. 21 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. तसेच गैरअर्जदार क्र.2 ने हजर होवून नि. क्रं. 16 वर आपले लेखीउत्तर दाखल केले.
गैरअर्जदार क्र.1 ने आपल्या लेख्खीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत दिशाभूल करणारी माहिती दिलेली असून जोपर्यंत विमा पॉलिसीतील शर्ती व अटी जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत ती विवादीत राहील. अर्जदाराचे पतीने गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसी काढलेली आहे ही बाब गैरअर्जदार क्र.1 हयांना मान्य आहे. परंतु अर्जदराने मागितलेला क्लेम हा खोटा असून अमान्य आहे. अर्जदाराचा नवरा हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने मरण पावला म्हणजे विमाधारक अर्जदाराचे पती हे वैद्यकीय कारणामुळे मरण पावले अपघातामुळे नाही म्हणून सदर पॉलीसी मधील अटी व शर्ती लागू होत नाही. त्यामुळे दिनांक 18/6/2014 रोजी पत्रान्वये अर्जदाराला क्लेम नामंजूर केल्याचे कळविले, तसेच मृतकाचा शवविच्छेदन रिपोर्ट जाणून बुजून लपविण्यात आला. गैरअर्जदाराने वारंवार कागदपत्रांची मागणी केली.त्याबद्दलचे पत्र दि.19/3/2014, 15/4/2014, 30/4/2014, 7/5/2014 व25/5/2014 ही पत्रे अर्जदाराने दाखल केलेली आहेत. परंतु प्रत्येक वेळी कागदपत्रांची मागणी करूनही अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे दाखल केली नाहीत. त्यामुळे उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन करून दि.18/6/2014 चे पत्रान्वये क्लेम नामंजूर करण्यात आला. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार कायद्याच्या नजरेत योग्य नसून तक्रार दाखल करण्यांस कोणतेही कारण घडलेले नाही. तसेच अर्जदार हे सिध्द करण्यांस असमर्थ ठरले की गैरअर्जदारानी न्युनतापूर्ण सेवा अर्जदरांस दिली. सबब सदर अर्ज खर्चासहीत खारीज करण्यांत यावा.
गैरअर्जदार क्र.2 हयांनी त्यांच्या लेखी उत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 कडे बचत खाते उघडलेले होते ही बाब सोडता अर्जदाराशी काहीही संबंध नाही. गैरअर्जदार क्र.2 विरूध्द अर्जदाराने खोटी तक्रार दाखल केली त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 ला अर्जदाराने कोणतेही कारण नसतांना सदर प्रकरणांत गुंतवल्यामुळे अर्जदाराला रू.20,000/- दंड लावण्यांत यावा व अर्जदराचा अर्ज गैरअर्जदार क्र.2 विरूध्द खारिज करण्यांत यावा.
अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र व लेखी युक्तिवाद तसेच गैरअर्जदार क्र.1 चे लेखी उत्तर व नि.क्र. 27 वर दाखल केलेली पुरसीस व लेखी युक्तिवाद तसेच गैरअर्जदार क्र.2 चे उत्तर, लेखी युक्तिवाद, अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे काय ? होय
(2) अर्जदार गैरअर्जदार क्र.2 चा ग्राहक आहे काय ? होय
(3) गैरअर्जदारांनी अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय
तसेच अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? नाही
(4) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 व 2 बाबत ः-
अर्जदाराचे पती हयांनी गैरअर्जदार क्र.2 हयांचेकडे अकाउंट नं. 30595893490 हे बचत खाते उघडले होते ही बाब गैरअर्जदार क्र.2 ला मान्य आहे. तसेच अर्जदाराचे पतीने दि.22/3/2013 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडे बॅंकेमार्फत पर्सनल अॅक्सीडेंट क्लेम इन्श्युरन्स पॉलिसी काढली होती. त्याकरीता त्याने गैरअर्जदार क्र.1 च्या कंपनीमध्ये 100/- रूपये किमतीचा प्रिमियम भरून दि.22/3/2013 ते 22/3/2014 या कालावधीकरीता पर्सनल अॅक्सिडेंट विमा काढला होता. सदर पॉलिसीचे प्रमाणपत्र व गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदारांच्या पतीला दिलेले बॅंकेचे पासबूक नि.क्र.4 सह अनुक्रमे दस्त क्र.1 व 2 दाखल आहे. ही बाब दोन्ही गैरअर्जदारांना मान्य असल्यामुळे अर्जदार गैरअर्जदार क्र.1 व 2 चे ग्राहक आहे. सबब मुद्दा क्रं. 1 व 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदार क्र.1 हयांचेकडून गैरअर्जदार क्र.2 बॅंकेमार्फत दि.22/3/2013 रोजी पर्सनल अॅक्सीडेंट क्लेम इन्श्युरन्स पॉलिसी काढली व त्यांनी गैरअर्जदार क्र.1 च्या कंपनीमध्ये 100/- रूपये किमतीचा प्रिमियम भरून दि.22/3/2013 ते 22/3/2014 या कालावधीकरीता पर्सनल अॅक्सिडेंट विमा काढला होता ही बाब विवादीत नाही. अर्जदाराचा पती हे संडासमध्ये घसरून पडल्यामुळे नागपूर येथील शुअरटेक हॉस्पिटल रिसर्च सेंटर येथे दि.6/3/2014 रोजी भरती झाले. सदर दवाखान्यात त्याचा इलाज 6/3/2014 ते 18/3/2014 पर्यंत चालू होता व 18/3/2014 रोजी अर्जदाराचे पतीचे निधन झाले. अर्जदाराने तिच्या पतीचे अपघाती निधन झाले हया कारणास्तव क्लेम फॉर्म भरून गैरअर्जदार क्र.1 हयांचेकडे पाठविला. गैरअर्जदार क्र.1 हयांनी अर्जदार बाईचे पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु नाही असे कारण दाखवून तो नामंजूर केला. अर्जदार बाईने तक्रारीतील नि.क्र.5 सह दस्तावेज दाखल केलेले आहेत. त्या सर्व दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे दिसून आले की गैरअर्जदार क्र.2 हयांनी अर्जदाराने क्लेम दाखल अपघाताबाबतचे कागदपत्र, एफ.आय.आर.,तसेच पोस्ट मॉर्टम रिपोर्ट, तक्रारीत दाखल केलेले नाहीत किंवा गैरअर्जदार क्र.1 च्या मागणीनुसार ते पुरविले नाहीत. गैरअर्जदार क्र.1 यांनी वेळोवेळी पत्र पाठवून अर्जदाराला आवश्यक दस्तावेजांची मागणी केली. अर्जदाराने दाखल केलेले नि.क्र. 5 सह दस्त क्र.10 जे गैरअर्जदार क्र.1 ने दि.14 मे,2014 रोजी पत्र पाठविले त्यातही अर्जदाराला त्यांनी अर्जदाराने केलेल्या दि.28/3/2014 च्या क्लेम पुर्तता करण्यासाठी दस्तावेजांची मागणी केली त्यात एफ.आय.आर.,तसेच पोस्ट मॉर्टम रिपोर्ट व अर्जदाराच्या पतीचे हॉस्पीटलमध्ये असतांनाचे इनडोअर केस पेपरची मागणी केली होती. परंतु त्यानंतरही अर्जदाराने सदर दस्तावेज पाठविले नाही. अर्जदाराने तिच्या तक्रारीत तिच्या पतीचा मृत्यु हा संडासात पडल्यामुळे अपघाती मृत्यु झाला असे कथन केले आहे आणि हा अपघाती मृत्यु असल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने क्लेमदेण्यात यावा अशी मागणी केलेली आहे. परंतु अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्र. 5 सह दस्त क्र.4 नुसार श्युअरटेक हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर लि.नागपूर चे मृत्यु प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. त्याचे अवलोकन केले असता त्यात स्पष्ट असे लिहून आहे की अर्जदाराच्या पतीचा मृत्यु हा हृदय व फुफूस क्रिया बंद पडल्यामुळे झाला. त्यात असे कुठेही नमूद नाही की अर्जदाराच्या पतीला डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यु झाला. असाच मुद्दा मा. राज्य आयोगासमोर (2014 (4) सीपीआर 35 (एमएएच) राज्य आयोग, मुंबई, मे. बजाज अलायन्स जनरल इन्श्युरन्स लि. विरूध्द श्रिमती चंद्राबाई म. पाटील, एफ.ए. नं.11/723, आला असता, मा. आयोगाने दि.16/9/2014 राजी दिलेल्या निवाड्यात “A sudden death on account of attack can not be termed as unnatural or Accidental” असा निष्कर्ष काढलेला आहे.
प्रस्तुत प्रकरणातील अर्जदार हिने तिचा पती दिनांक 6/3/2014 रोजी संडासात घसरून पडला याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदाराचा पती संडासात घसरून पडला असे गृहीत जरी धरले तरी, त्याचे दिनांक 6/3/2014 रोजी संडासात घसरून पडणे आणि त्यानंतर दिनांक 18/3/2014 रोजी उपचारादरम्यान फुप्पूस व हृदयक्रिया बंद पडल्यामुळे झालेला मृत्यु यांच्यात परस्पर संबध असल्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नसल्यामुळे, अर्जदाराचे पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु असल्याचा तक्रारकर्तीचा दावा ग्राहय धरता येत नाही. परिणामतः गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमादावा योग्य कारणास्तव नाकारलेला असल्यामुळे गैरअर्जदारांनी अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही तसेच अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 3 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
8. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) दोन्ही पक्षांनी आापआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 30/01/2017