(पारीत व्दारा सौ.वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक– 22 ऑगस्ट, 2019)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द विमाकृत वाहन क्षतीग्रस्त झाल्याने नुकसान भरपाई दाखल विम्याची रक्कम मिळावी म्हणून प्रस्तुत ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा उपरोक्त नमुद पत्त्यावर राहतो. तक्रारकर्त्याचे मालकीची टाटा मोटर्स निर्मित इंडीका विस्टा कार असून सदर वाहनाचा नोंदणी क्रं-MH-31/DC-3827 असा आहे. तक्रारकर्त्याने सदर वाहनाचा विमा विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून काढला असून विमा पॉलिसीचा क्रमांक-01655627 असून सदर विमा हा दिनांक-21.03.2014 ते दिनांक-20.03.2015 या कालावधी करीता वैध होता.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याचा वाहनचालक आतीश युवराज थोटे हा विमाकृत वाहनाने भंडारा येथून कामे आटोपून शहापूर राष्ट्रीय महामार्गाने शहापूर येथे येत असताना मनोहरभाई पटेल इंजिनिअरींग समोर दिनांक-16.02.2015 रोजी रात्री-10.00 वाजता विरुध्दबाजूच्या वाहनाच्या इंडीकेटरचे लाईट हे वाहनचालकाच्या डोळयावर पडल्याने त्याचे विमाकृत कार वरील नियंत्रण सुटले आणि कार बाजूचे खड्डया मध्ये दोनदा उलटून पडली. सदर घटने मध्ये विमाकृत कार मोठया प्रमाणावर क्षतीग्रस्त होऊन नुकसान झाले. सदर अपघाती घटनेची तक्रार पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे नोंदविण्यात आली व पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा व इतर कार्यवाही केली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात अपघाताची सुचना दिली असता विरुध्दपक्ष विमा कंपनीचे अधिकारी यांनी तक्रारकर्त्याचे बयान नोंदवून क्षतीग्रस्त विमाकृत वाहनाची पाहणी केली. तक्रारकर्त्याने विमा दाव्या संबधात आवश्यक दस्तऐवज विरुध्दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात सादर केले. त्याच प्रमाणे विमाकृत कारचे वाहनचालकाचे बयान सुध्दा नोंदविले. विमाकृत वाहनाची मोडतोड झाली असल्याने वाहनाचे इंजिन गॅरेजमध्ये ठेवले व वाहन हे रस्त्याच्या बाजूला उभे केले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिनांक-16.12.2015 रोजी नोटीस पाठविली असता विमा कंपनीने नोटीसला दिनांक-25.01.2016 रोजी चुकीचे उत्तर दिले याचे कारण असे आहे की, तक्रारकर्त्याने कधीही त्याचा वाहनचालक श्री आतिश युवराज थोटे यास विमाकृत वाहनाची विक्री केलेली नाही व आर.टी.ओ.रेकॉर्डला सुध्दा वाहन मालक म्हणून तक्रारकर्त्याचे नावाची नोंद असून श्री आतिष थोटे याचे नावाची मालक म्हणून नोंद नाही. अपघाती घटनेच्या दिवशी तक्रारकर्त्याकडे वाहन चालक म्हणून श्री आतिश युवराज थोटे कार्यरत होता व तो घटनेचे वेळी तक्रारकर्त्याची विमाकृत कार चालवित होता त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणणे की, तक्रारकर्त्याने श्री आतिश थोटे यास विमाकृत कार जानेवारी-2015 मध्ये विकली होती हे विधान संपूर्णपणे खोटे व चुकीचे आहे. मोटर वाहन कायद्यातील तरतुदी प्रमाणे जो पर्यंत मूळ वाहन मालकाचे नाव कमी होऊन नविन विकत घेणा-या व्यक्तीचे नाव आरटीओ अभिलेखात दर्ज होत नाही तो पर्यंत वाहनाचे कायदेशीर हस्तांतरण होऊ शकत नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे चुकीचे माहितीचा आधार घेऊन त्यास विमा रक्कम न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याचे नमुद केले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, सदर अपघातामध्ये विमाकृत कारचे संपूर्णपणे नुकसान होऊन कारची तुटफूट झाली ज्यामध्ये कारचे इंजिन, चेसीस, शिट, दरवाजे इत्यादीची तुटफूट झाली व कार संपूर्णपणे निकामी झाली परंतु विमाकृत कारचे नेमके किती नुकसान झाले हे तक्रारकर्त्याला सांगता येणार नसल्याने तो क्षतीग्रस्त विमाकृत कारची संपूर्ण घोषीत विमा रकमेची मागणी करीत असून त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्ष विमा कंपनीला आदेशित करण्यात यावे की, विमाकृत कारच्या झालेल्या नुकसानीपोटी विमा पॉलिसी प्रमाणे घोषीत रक्कम रुपये-3,00,000/- विमाकृत कारचा अपघात घडल्याचा दिनांक-16.02.2015 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्त्याला देण्यात यावी.
(02) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/-अशा रकमा विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर पान क्रं-29 ते 34 वर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे प्राथमिक आक्षेप घेण्यात आला की, तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये सत्य वस्तुस्थिती दडवून दुषीत हेतूने खोटी व चुकीची तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केली असून तो ग्राहक मंचा समोर स्वच्छ हाताने आलेला नसल्याने तक्रार खारीज करण्यात यावी. त्यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्ता हा घटनेचे वेळी विमाकृतकारचा मालक होता ही बाब स्पष्टपणे नामंजूर केली. विमाकृत वाहनाचे विमा पॉलिसीचा क्रमांक-01655627 आणि विमा कालावधी हा दिनांक-21.03.2014 ते दिनांक-20.03.2015 असा होता या बाबी मान्य केल्यात. तसेच विमा पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार तसेच घसारा इत्यादी विचारात घेऊन वाहनाची घोषीत रक्कम (Insured Declared Value-I.D.V.) रुपये-3,00,000/- असल्याची बाब मान्य केली. वाहनाचे अपघाती घटनेचे वेळी तक्रारकर्त्याचा वाहनचालक श्री आतिश युवराज थोटे हा विमाकृत कार चालवित होता आणि विमाकृत वाहनास झालेल्या अपघाताची कारणे या बाबी नामंजूर केल्यात. विमाकृत कारला झालेला अपघात आणि त्यानंतर पोलीस मध्ये केलेला रिपोर्ट हा एक अभिलेखाचा भाग असल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याने विहित मुदतीत विरुध्दपक्ष विमा कंपनीला अपघाता बाबत सुचित केले आणि आवश्यक दस्तऐवज सादर केलेत या बाबी सुध्दा नामंजूर केल्यात. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी वाहनचालक श्री आतिष युवराज थोटे याचे बयान नोंदविले हा एक अभिलेखाचा भाग असल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याचे नोटीसला विरुध्दपक्ष विमा कंपनीने उत्तर दिल्याचे मान्य केले. तक्रारकर्त्याने श्री आशिष युवराज थोटे याला विमाकृत वाहन विकले नव्हते आणि अपघाताचे वेळी विमाकृत वाहन हे वाहनचालक श्री आशिष युवराज थोटे चालविता होता या बाबी नामंजूर केल्यात. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी केलेल्या सर्व्हे अहवालाची प्रत तक्रारकर्त्याला देण्यात आली नाही हे म्हणणे सुध्दा नामंजूर केले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द तक्रारीतून केलेली संपूर्ण विधाने नामंजूर केलीत. विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द तक्रारीतून केलेल्या संपूर्ण मागण्या नाकबुल केल्यात. जिल्हा ग्राहक मंच भंडारा यांना प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येत नसल्याचे नमुद केले. विमा कंपनी आणि विमाधारक यांच्या मध्ये विम्या संबधी झालेला एक करार असतो आणि विम्याचे अटी व शर्तीचा भंग झाल्यास विमा कंपनी ही कोणतीही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नसते. विमा पॉलिसीतील अटी व शर्ती प्रमाणे त्यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केला यासाठी मा.ग्राहक मंचाने विम्याचे अटी व शर्तीचे अवलोकन करावे. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याने पान क्रं 11 वरील दस्तऐवज यादी नुसार अक्रं 01 ते 08 प्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने वाहनाची विमा पॉलिसी प्रत, विरुध्दपक्ष विमा कंपनीचे विमा दावा नामंजूरीचे पत्र, विरुध्दपक्ष विमा कंपनीने नोटीसला दिलेले उत्तर, वाहनाचे आरटीओ कार्यालयातील पर्टीकयुलर, घटनास्थळ पंचनामा, तक्रारकर्त्याने रजि.पोस्टाने पाठविलेली नोटीस, रजि. पावती व पोच अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने पान क्रं 38 व 39 वर आतिश युवराज थोटे याचे शपथपत्र दाखल केले. तर पान क्रं 40 ते 42 वर त्याचे स्वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 44 व 45 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. पान क्रं 49 वरील यादी प्रमाणे वाहन नोंदणी प्रमाणपत्राची प्रत दाखल केली.
05. विरुध्दपक्ष विमा कंपनीने पान क्रं 29 ते 35 वर लेखी उत्तर दाखल केले. अन्य दस्तऐवज दाखल केले नाहीत.
06 तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री कैलास रामटेके यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे कोणीही मौखीक युक्तीवादाचे वेळी उपस्थित नव्हते.
07. तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल केलेली शपथपत्रे, लेखी युक्तीवाद आणि दसतऐवज तसेच विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर इत्यादीचे अवलोकन ग्राहकमंचाव्दारे करण्यात आले, त्यावरुन ग्राहक मंचा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्ये उपस्थित होतात-
अक्रं | मुद्या | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होतो काय? | -होय- |
2 | विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय ? | -होय- |
3 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: कारण मिमांसा ::
मुद्दा क्रं 1 व 2 -
08. सदर प्रकरणात टाटा मोटर्स निर्मित कार, कारचा नोंदणी क्रं-MH-31/DC-3827, तक्रारकर्त्याने सदर कारचा विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून काढलेला विमा, त्यानुसार विमा पॉलिसीचा क्रमांक-01655627 आणि विम्याचा कालावधी दिनांक-21.03.2014 ते दिनांक-20.03.2015 तसेच विमा पॉलिसी नुसार वाहनाची घोषीत रक्कम (Insured Declared Value-I.D.V.) रुपये-3,00,000/- या बाबीं बद्यल उभय पक्षांमध्ये विवाद नाही व त्या बाबी प्रकरणात दाखल दस्तऐवजी पुराव्यां वरुन सिध्द होतात.
09. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे दाखल केलेल्या लेखी उत्तरात केवळ तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार खोटी, चुकीची असल्याचे नमुद करुन तक्रारीतील मागण्या नामंजूर केल्यात परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याची तक्रार कशी काय चुकीची व खोटी आहे? या संबधी आपले लेखी उत्तरात कोणतेही विस्तृत विवेचन केलेले नाही तसेच कोणताही सबळ दस्तऐवजी पुरावा ग्राहक मंचा समोर दाखल केलेला नाही, केवळ तक्रार खारीज करण्यात यावी असे नमुद केले. तसेच विमाकृत कारला दिनांक-16.02.2015 रोजी रात्री-10.00 वाजता अपघात झाला आणि सदर अपघाती घटनेची तक्रार पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे नोंदविण्यात आली व पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा व इतर कार्यवाही केली हा तक्रारीतील मजकूर हा एक अभिलेखाचा भाग असल्याचे विरुध्दपक्ष विमा कंपनीने आपल्या उत्तरात नमुद केले.
10. विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला त्याचा विमा दावा नामंजूर केल्या बाबत जे दिनांक-08.09.2015 रोजीचे पत्र दिले त्याची प्रत पान क्रं 16 वर तक्रारकर्त्याने दाखल केली. त्या पत्रामध्ये विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे असे नमुद करण्यात आलेले आहे की, सर्व्हेअरचा अहवाल, दाखल केलेले दस्तऐवज, बयान इत्यादीचे आधारावर असा निष्कर्ष निघतो की, तक्रारकर्त्याने त्याची विमाकृत कार श्री आतिष थोटे याला जानेवारी, 2015 मध्ये विक्री केलेली असल्याने विमा पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे तक्रारकर्त्याला क्षतीग्रस्त विमाकृत कारचे नुकसानी संबधात कोणतीही विमाराशी देय नसल्याचे नमुद आहे. परंतु या संदर्भात विरुध्दपक्ष विमा कंपनीने कोणताही दस्तऐवजी पुरावा ज्यामध्ये विमाकृत कारचे हस्तांतरणा बाबत आरटीओ कार्यालयातील नोंदीचे दस्तऐवज, विमाकृत कार विकल्या बाबतची पावती, अपघात घडल्या नंतर विमा कंपनी तर्फे करण्यात आलेल्या चौकशीत कार विकत घेतल्या बाबत श्री आतिष युवराज थोटे याने दिलेले बयान, सर्व्हेअरचा अहवाल इत्यादी दस्तऐवजी पुरावा ग्राहक मंचा समोर दाखल केलेला नाही.
11. याउलट तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने विमाकृत वाहन श्री आतिष युवराज थोटे याला विक्री केलेच नव्हते आणि अपघाती घटनेचे वेळी श्री आतिष थोटे हा त्याचे वाहनावर वाहनचालक म्हणून कार्यरत होता. आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ तक्रारकर्त्याचे वकीलांनी मोटर वाहन कायद्या-1988 चे कलम-50 प्रमाणे (“Transfer of ownership”) वाहन हस्तांतरण तरतुदीवर आपली भिस्त ठेवली.
12. या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याने श्री आतिष युवराज थोटे याचे पुराव्या दाखल शपथपत्र ग्राहक मंचा समोर पान क्रं 38 व 39 वर दाखल केले, त्यामध्ये श्री आतिष युवराज थोटे याने असे नमुद केले की, सन-2015 मध्ये तो तक्रारकर्त्या कडे त्याचे कारवर वाहनचालक म्हणून काम करीत होता आणि तक्रारकर्त्याची इंडीका कार क्रं MH-31/DC-3827 चालवित होता. त्याने शपथपत्रात पुढे असे नमुद केले की, सदर विमाकृत कारला दिनांक-16.02.2015 रोजी जो अपघात झाला होता, त्यावेळी तो स्वतः रात्रीचे वेळी कार चालवित होता आणि त्याचे डोळयावर नागपूर ते भंडारा कडे येणा-या वाहनाचे इंडीकेटरचा लाईट आल्याने त्याचे विमाकृत कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन त्यामध्ये मोठया प्रमाणावर कारचे नुकसान झाले व त्याने सदर घटनेचा रिपोर्ट पोलीस स्टेशन मध्ये केला. अपघाता नंतर विरुध्दपक्ष विमा कंपनीचे अधिकारी यांनी चौकशी केली त्यावेळी त्याने तो तक्रारकर्त्या कडे वाहन चालक म्हणून काम करीत होता असे सांगितले होते असे सुध्दा शपथपत्रात नमुद केले. त्याच बरोबर तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीचे समर्थनार्थ त्याचा शपथेवरील पुरावा पान क्रं 40 ते 42 वर ग्राहक मंचा समक्ष दाखल केला.
13. तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीचे समर्थनार्थ उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे दस्तऐवजी पुरावे दाखल केलेत परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीने आपले उत्तराचे समर्थनार्थ कोणताही दस्तऐवजी पुरावा ग्राहक मंचा समोर दाखल केलेला नाही. इतकेच नव्हे तर, अपघाती घटनेचे वेळी विमाकृत कार ही तक्रारकर्त्याचे नावे नव्हती तर ती कार श्री आतीष युवराज थोटे याचे मालकीची होती आणि अपघाती घटनेचे वेळी सदर विमाकृत कारचे हस्तांतरण आरटीओ कार्यालयाचे अभिलेखात श्री आतिष युवराज थोटे याचे नावाने झाल्या बाबत कोणताही दस्तऐवजी पुरावा दाखल केलेला नाही तसेच श्री आतिष युवराज थोटे याने सदर विमाकृत वाहन तक्रारकर्त्या कडून विकत घेतले होते आणि अपघाती घटनेचे वेळी श्री आतिष युवराज थोटे हा सदर वाहनाचा मालक होता अशा आशयाचे श्री आतिश युवराज थोटे याचे लेखी बयान पुराव्या दाखल विरुध्दपक्ष विमा कंपनीने ग्राहक मंचा समोर दाखल केलेले नाही. विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमाकृत वाहनाचा सर्व्हे केल्याची बाब विमा कंपनीचे दिनांक-08.09.2015 रोजीचे दावा नामंजूरीचे पत्रात मान्य केल्याचे मजकूरावरुन सिध्द होते परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीने सर्व्हे अहवाल सुध्दा या प्रकरणात दाखल केलेला नाही.
14. उपरोक्त नमुद केलेली वस्तुस्थिती, तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले पुराव्या दाखल दस्तऐवज, तक्रारकर्त्याने पुराव्या दाखल सादर केलेली शपथपत्रे इत्यादी पाहता तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष विमा कपंनी विरुध्द मंजूर होण्यास पात्र असल्याचे ग्राहक मंचाचे मत आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हाच विमाकृत कारचा अपघाताचे वेळी मालक होता व त्याने कारची विमा पॉलिसी बद्यल विमा कंपनी मध्ये विमा हप्ता भरलेला असल्याने तो विरुध्दपक्ष कंपनीचा ग्राहक असल्याची बाब सिध्द होते. विरुध्दपक्ष विमा कंपनीने कोणताही सबळ पुरावा नसताना तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर करुन तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते. त्यामुळे आम्ही मुद्या क्रं 1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं 3 -
15. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे अपघातामध्ये विमाकृत वाहनाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने विमाकृत वाहन संपूर्णतः निकामी झाले. विरुध्दपक्ष विमा कंपनीने स्वतः मान्य केलेले आहे की, त्यांनी क्षतीग्रस्त विमाकृत कारची पाहणी सर्व्हेअर कडून केली परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीने या प्रकरणात सर्व्हेअरचा सर्व्हे अहवाल दाखल नसल्याने नेमके कारचे किती नुकसान झाले ही माहिती ग्राहक मंचा समोर आलेली नाही. या उलट तक्रारकर्त्याने शपथेवरील पुरावा दाखल केलेला असल्याने अशापरिस्थितीत तक्रारकर्ता विमाकृत कारचे नुकसानी बाबत (In case of a total loss of a vehicle, the overall cost of repair and retrieval of the vehicle exceeds 75% of the Insured Declared Value (IDV) of the vehicle)विमा पॉलिसीव्दारे घोषीत विमा रक्कम रुपये-3,00,000/- Insured Declared Value (IDV) of the vehicle) च्या 75 टक्के म्हणजे रुपये-2,25,000/- एवढी रक्कम विमा पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई म्हणून मिळण्यास पात्र आहे आणि सदर रकमेवर विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा नाकारल्याचा दिनांक-08.09.2015 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे त्याच बरोबर विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बाबत रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे.
16. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला विमाकृत कारचे नुकसानी बाबत विमा पॉलिसी प्रमाणे टोटल लॉस बेसीसचे आधारा नुसार आयडीव्हीच्या 75 टक्के रक्कम म्हणजे रुपये-2,25,000/-(अक्षरी रुपये दोन लक्ष पंचविस हजार फक्त) द्यावी आणि सदर रकमेवर विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा नाकारल्याचा दिनांक-08.09.2015 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्याला द्यावे. त.क.ला प्रस्तुत अंतिम आदेशा नुसार विमा रक्कम व्याजासह मिळाल्या बरोबर त्याने कारचे सॉल्व्हेज (Car Salvage) विरुध्दपक्षाकडे जमा करावे.
- तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अशा रकमा विरुध्दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई यांनी तक्रारकर्त्याला द्याव्यात.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई यांनी प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रमाणित उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.