(मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैद्य), मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 03.12.2014)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार हे आपल्या आरामशिनच्या व्यवसायाचा कोणत्याही नुकसानापासून संरक्षण व्हावे या हेतुने दरवर्षी विमा काढतो. गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराचे बॅंक खाते क्र.10866275909 मधून प्रिमीयम रुपये 2452/- कपले व व्यवसायाचा रुपये 7,00,000/- चा गैरअर्जदार क्र.1 कडे विमा उतरविला. दि.1.6.2012 ला पहाटे अर्जदाराच्या ‘आरामशीन’ ला आग लागली व तेथील मशीन,लाकुड, रॉ मटेरियल, कार्यालय, सामान जळून भस्मसात झाले. आग लागून नुकसान झाल्यामुळे विमा कंपनीला कळविण्यासाठीअर्जदाराने दि.1.6.2012 ला गैरअर्जदार क्र.2 ला पञ दिले. त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 व 2 चे अधिकारी मोक्यावर येवून निरिक्षण केले, फोटो काढले व लवकरात लवकर विम्याची रक्कम अदा करण्यात येईल असे कळविणारे पञ दि.6.6.2012 ला अर्जदाराला दिले. त्यानंतर अर्जदाराने झालेले नुकसान व होत असलेल्या नुकसानासाठी वारंवार गैरअर्जदार क्र.2 कडे विनंती केली. गैरअर्जदार क्र.2 ने दि.6.7.2012 ला अर्जदाराला पञ दिले की, गैरअर्जदार क्र.1 कडे प्रस्ताव दि.4.6.2012 आणि 19.6.2012 ला पाठविला आहे, त्यावर येत्या 15-20 दिवसात तुमचा क्लेम देण्यात येईल. परंतु, त्या 20 दिवसात अर्जदाराला विम्याची रक्कम मीळाली नाही म्हणून दि.27.7.2012, 17.11.2012 ला गैरअर्जदाराला पञ दिले. गैरअर्जदार क्र.1 ने दि.5.12.2012 नोटीस पाठवून पॉलिसी संदर्भातले कागदपञ दाखविण्याची मागणी केली. त्याप्रमाणे अर्जदाराचे वकीलांनी दि.15.12.2012ला नोटीस पाठवून कागदपञाच्या झेरॉक्स गैरअर्जदार क्र.1 ला पाठविले. गैरअर्जदारा क्र.1 ने खोट्या आशयाचे उत्तर नोटीस पाठवून अर्जदाराचा विमा क्लेम खारीज केला. गैरअर्जदार क्र.1 हे अर्जदारास नाहक शारीरिक, मानसिक व आर्थिक ञास देत आहे. त्यामुळे अर्जदाराचे विमा क्लेम दि.1.6.12 ते 22.2.2013 पर्यंत द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह, तसेच मानसिक शारीरिक व आर्थिक ञासापोटी नुकसान भरपाई, तक्रार खर्च, नोटीसचा खर्च असे एकूण रुपये 8,33,375/- ची मागणी केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.5 नुसार 16 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.17 नुसार लेखीउत्तर प्राथमीक आक्षेपासह दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.14 नुसार लेखीउत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.17 नुसार प्राथमीक आक्षेपासह दाखल केलेल्या लेखीउत्तरात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून त्यांना नाकबूल आहे. अर्जदाराकडून गैरअर्जदार क्र.2 चे मार्फत जमा केलेली प्रिमीयमची रक्कम रुपये 2452/- अर्जदाराला परत करण्यात आली होती व अर्जदाराचा कोणताही विमा काढण्यात आलेला नव्हता. अर्जदाराने दिलेला नोटीसचे सविस्तर उत्तर अर्जदाराला देण्यात आलेले होते. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांचेमध्ये विमा बद्दल कोणताही करार किंवा पॉलिसी नसल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 नी अर्जदाराप्रती कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही व गैरअर्जदार क्र.1 चे कंपनी कराराच्या अभावामुळे अर्जदाराचे कोणतेही विमा क्लेमची रक्कम देणे लागत नाही. सबब, सदर तक्रार खर्चासहीत खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.14 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात अर्जदाराची तक्रार अमान्य केली आहे. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी उत्तरात पुढे नमूद केले की, दि.1.6.2012 अर्जदाराच्या सॉ मीलला आग लागली व गैरअर्जदार क्र.2 कड विमा कंपनीला कळविण्याकरीता दि.2.6.2012 ला पञ दिले. त्यानंतर अर्जदारास दि.6.6.2012 ला पञ देवून त्याबाबत सुचना दिली. गैरअर्जदार क्र.2 ने पुन्हा दि.6.7.2012 ला अर्जदाराला पञ देवून कळविले की, तुमचे प्रकरण गैरअर्जदार क्र.1 कडे पाठविले आहे. गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदारास कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही व त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 हे अर्जदारास कोणतीही रक्कम देण्यास पाञ नाही. अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्र.2 विरुध्द खारीज करण्यात यावी.
5. अर्जदाराने नि.क्र.18 नुसार शपथपञ, नि.क्र.26 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.1ने नि.क्र.23 नुसार शपथपञ व नि.क्र.25 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने 20 नुसार पुरसीस दाखल केली. तसेच नि.क्र.24 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयाण, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे : होय.
काय ?
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा : होय.
अवलंब केला आहे काय ?
(4) अंतिम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
6. अर्जदार हे आपल्या आरामशिनच्या (सॉ मील) व्यवसायाचा कोणतेही नुकसानापासून संरक्षण व्हावे या हेतुने दरवर्षी विमा काढतो. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 चे विनंतीवर गैरअर्जदार क्र.1 कडून विमा काढण्यासाठी सहमती दिली व त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराचे बॅंक खाते क्र.10866275909 मधून प्रिमीयम रुपये 2452/- कापले व व्यवसायाचा रुपये 7,00,000/- चा गैरअर्जदार क्र.1 कडे विमा उतरविला आहे, अशी माहिती अर्जदाराला दिली. गैरअर्जदार क्र.1 ला अर्जदाराचे विमा काढण्याकरीता रुपये 2452/- प्रिमीयम म्हणून प्राप्त झाले होते, ही बाब गैरअर्जदार क्र.1 ने त्याचे उत्तरात कबूल केली आहे. सबब ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2 (डी)(ii) प्रमाणे अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे असे सिध्द होत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
7. अर्जदाराने दाखल नि.क्र.5 वर दस्त क्र.अ-4 व अ-5 ची पडताळणी करतांना असे दिसले की, गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराचे विमा क्लेमबाबत माहिती गैरअर्जदार क्र.1 ला दिली होती. तसेच अर्जदाराचा विमा क्लेम लवकर निकाली काढण्यात येईल अशी माहिती अर्जदाराला सुध्दा दिली. गैरअर्जदार क्र.1 चे जबाबात असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे विमा पॉलिसी काढण्यात आली नव्हती व अर्जदारापासून प्राप्त प्रिमीयमचे रुपये अर्जदाराला परत देण्यात आले होते याबाबत गैरअर्जदार क्र.1 ने कोणताही साक्षी पुरावा किंवा दस्ताऐवज मंचासमक्ष दाखल केलेला नाही. तसेच, गैरअर्जदार क्र.1 हे सिध्द करु शकले नाही की, अर्जदारापासून प्राप्त विमाक्लेम रक्कम अर्जदाराच्या खात्यात परत जमा झाली. गैरअर्जदार क्र.2 ने सुध्दा अर्जदारापासून प्रिमीयम रक्कम कापल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 कडे पाठविल्यानंतर अर्जदाराची विमा पॉलिसी निघाली किंवा नाही यासंदर्भात कोणतीही चौकशी केलेली नाही असे दिसून येते व अर्जदाराला त्याबाबत माहिती किंवा पॉलिसी प्रत मिळाली किंवा नाही याबबतही प्रकरणात कोणताही खुलासा गैरअर्जदारानी केलेला दिसून येत नाही. सबब, मंचाच्या मताप्रमाणे असे सिध्द होते की, गैरअर्जदार क्र.2 नी अर्जदाराच्या खात्यामधून विमा पॉलिसीची रक्कम गैरअर्जदार क्र.1 कडे दिली व त्यानंतर सदर पॉलिसी निघाली किंवा नाही यावर कोणतेही लक्ष देण्यात आले नाही तसेच गैरअर्जदार क्र.2 ने सुध्दा अर्जदाराचे प्रिमीयम पॉलिसीची रक्कम अर्जदारास मिळाली किंवा नाही यावर दुर्लक्ष केलेले आहे. सबब, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी संयुक्त रितीने अर्जदाराचे प्रती न्युनतापूर्ण सेवा दर्शवून अनुचीत व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन अंतिम आदेश पारीत करण्ण्यात येत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्त किंवा वैयक्तीक रितीने अर्जदारास झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी रुपये 7,00,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी संयुक्त किंवा वैयक्तीक रितीने अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 10,000/- व तक्रार खर्च रुपये 5,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(4) आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 3.12.2014