ORDER | (आदेश पारित व्दारा - श्री शेखर पी मुळे , मा. अध्यक्ष) - आदेश - ( पारित दिनांक – 18 सप्टेंबर 2015 ) - तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 खाली दाखल केली आहे.
- ही तक्रार मयत हिरभाऊ देवासे यांचे अज्ञान मुलाने त्यांची पालनकर्ती आई शोभा देवासे मार्फत दाखल केली असुन त्याव्दारे त्यांचे मयत वडीलांच्या (विमा धारकाने) जीवन विमा दावाची रक्कम रुपये 4,00,000/- ची मागणी केली आहे.
- तक्रारकर्त्याचे थोडक्यात कथन असे आहे की , तक्रारकर्त्याचे वडील हरिभाऊ देवासे हे वाडी येथे पेट्रोल पंपावर कार्यरत होते. त्यांनी स्वतःचा रुपये 4,00,000/-जिवन विमा दावा काढलेला होता ज्याचा कालावधी दिनांक 13/3/2013 ते 12/3/2014 असा होता. मयत हिरभाऊ देवासे यांचा दिनांक 18/3/2013 रोजी मृत्यु झाला. त्याचे मृत शरीर श्रीमती अनुसया माणिकराव डोंगरे रा. नागपूर हिला दिसून आल्याने त्यांनी गिट्टीखदान पोलीस स्टेशनला त्याबद्दलची माहिती दिली त्यावरुन पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मर्ग नं.23/2013 दाखल केला व फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 174 नुसार आकस्मिक मृत्युची नोंद करुन चौकशी सुरु केली. मृतकाचे शरीर मेयो हॉस्पिटल, नागपूर येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार विष बाधा झाली असल्याचे प्रारंभिक मत देण्यात आले. परंतु मृत्युचे नेमके कारण कळण्याकरिता मृतकाचा व्हिसेरा प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आला. पोलीस चौकशी अंती मयत इसमास दारु पिण्याची खुप सवय होती व त्यामुळे त्याची प्रकृति खराब झाली होती आणि त्याने दारुचे नशेत विष पिऊन आत्महत्या केली असावी असा अभिप्राय देण्यात आला. परंतु प्रयोगशाळेत मयताचे व्हिसेराची तपासणी केल्यानतर असे आढळुन आले की, मयताचे व्हिसेरामधे कुठल्याही प्रकारचे विष आढळून आले नाही.
- तक्रारकर्त्याने दिनांक 20/5/2014 रोजी मयताचे जिवन विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता विरुध्द पक्षाकडे दावा सादर केला. विरुध्द पक्षाकडुन मागण्यात आलेले कागदपत्रे वेळोवेळी त्यांना देण्यात आली. परंतु विरुध्द पक्षाने मयताचा मृत्यु नैसर्गिक मृत्यु नसुन आत्महत्या होती तसेच त्याला दारु पिण्याची अत्यंत सवय होती.या कारणास्तव त्यांचा विमा दावा फेटाळ्यात आला. तक्रारकर्त्याची मागणी विरुध्द पक्षाने अमान्य केल्याने तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन त्यांनी जिवन विमा पॉलीसी रक्कम रुपये 4,00,000/-, 21 टक्के व्याजासह मिळावे अशी विनंती केली. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 25,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
- विरुध्द पक्ष क्रं.1 ते 2 ला मंचामार्फत नोटीस देण्यात आली व नोटीस मिळुन विरुध्द पक्ष वकीला मार्फेत हजर झाले व आपला लेखी जवाब नि.7 प्रमाणे दाखल केला.
- या तक्रारीत विरुध्द पक्षाने काही प्राथमिक आक्षेप घेतले आहे की, तक्रारकर्ता स्वच्छ हाताने मंचासमोर आलेली नाही व त्यांनी काही महत्वाच्या बाबी मंचापासून लपवून ठेवल्या आहेत. तसेच मयत इसमाची जिवन विमा पॉलीसी काढतांना विमा प्रपत्रात काही महत्वाच्या बाबी लपवून ठेवल्या. या कारणास्तव तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली आहे.
- तक्रारीतील मजकूराविषयी विरुध्द पक्षाने असे कथन केले आहे की, मयताने विष पिऊन आत्महत्या केली होती म्हणुन त्याचा विमा दावा नाकारण्यात आला. तसेच विरुध्द पक्षाने वेळोवेळी तक्रारकर्त्याकडुन मयताच्या मृत्युसंबंधीचे कागदपत्रे,जसे शवविच्छेदन अहवाल,मर्ग समरीचा अहवाल, व्हिसेरा तपासणीचा अहवाल, इत्यादी कागदपत्रांची मागणी केली. परंतु तक्रारकर्त्याने त्याची पुर्तता केली नाही. परंतु पोलीसांनी या प्रकरणात मयताचे आकस्मिक मृत्यु संबंधीची चौकशी केली त्यात असे निष्पन्न झाले की मयाताला दारु पिण्याची सवय होती व त्यामुळे त्याची प्रकृती खराब झाली होती त्याच कारणामुळे त्याचा मृत्यु झाला असावा. हा अहवाल पोलीसांकडुन अंतीम अहवाल म्हणुन देण्यात आला. विमा दाव्यातील अटी व शर्ती नुसार जर मयत इसम दारुचे नशेत असेल किंवा दारु सेवनाने त्याचा मृत्यु झाला असेल तर त्याला विम्याची रक्कम मिळत नाही. तसेच तक्रारकर्त्याने विमा दावा विरुध्द पक्षाकडे 14 महिन्यांनंतर दाखल केला व झालेल्या विलंबाबद्दल तक्रारकर्त्या तर्फे कुठलेही कारण देण्यात आले नाही. या सर्व कारणमुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दावा फेटाळून लावला व आपल्या सेवेत कुठलीही त्रुटी ठेवली नाही. या सर्व कारणास्तव त्यांनी तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
- दोन्ही पक्षाकडुन काही दस्तऐवज दाखल करण्यात आले. तक्रारकर्त्याचे वकीलांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारकर्त्याचा लेखी युक्तीवाद व दस्तऐवजांचे अवलोकन करता व दोन्ही पक्षाचे वकीलांचा युक्तीवाद एैकण्यात आल्यावर मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
- या प्रकरणात विमा धारकाची जिवन विमा पॉलीसीची प्रत दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे त्या पॉलीसी मधे कोणत्या अटी व शर्ती होत्या व कोणत्या परिस्थितीत विम्याची रक्कम मिळण्यास विमा धारकाचे अथवा मयताचे नातेवाईक पात्र किंवा अपात्र राहतील या संबंधीची माहिती मंचाला मिळु शकली नाही. परंतु याबद्दल दोन्ही पक्षात वाद नाही की त्या जिवन विमा पॉलीसी व्दारा जर व्यक्तीचा अपघाती किंवा नैसगिक मृत्यु झाला तर त्याचे विमा दाव्याची रक्कम त्याचे नातेवाईकांना मिळते.
- या प्रकरणात सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की, मयत विमा धारकाचा मृत्यु कोणत्या कारणामुळे झाला.विमा धारकाचे शरीर हे खुल्या मैदानात मिळुन आले होते.पोलीसांच्या मर्ग अहवालानुसार मृत्यु हा दारुचे अतिसेवनामुळे झाला होता. शवविच्छेदन अहवालानुसार डॉक्टरांकडुन प्राथमिक अहवाल विष पिऊन झाला असा दिला होता. परंतु व्हिसेरा अहवालामधे विष आढळलेले नाही. यावरुन एक गोष्ट सिध्द होते की, ज्याअर्थी मृतकाचे शरीरात विष आढळून आले नव्हते व त्याचे शरिरावर कुठलीही जखम नव्हती, त्याअर्थी तो अपघाती मृत्यु किंवा आत्महत्या नव्हती.तक्रारकर्त्याचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, ज्या अर्थी विमा धारकाचा मृत्यु अपघाती नव्हता किंवा आत्महत्या नव्हती तेव्हा त्याचा मृत्यु नैसर्गिक मृत्यु होता हे ग्राह्य धरावे लागेल. याविरुध्द विरुध्द पक्षाने असा युक्तीवाद केला की, जरी मयताने विष पिऊन आत्महत्या केल्याचे पुरावे आढळले नाही तरी त्याचा मृत्यु नैसर्गिक होता हे दाखविणारा कुठलाही कागदोपत्री पुरावा तक्रारकर्त्याने सादर केला नाही. वकीलांनी पुढे असा युक्तीवाद केला की ज्यावेळी आकस्मिक मृत्यु बद्दल पोलीस चौकशी झाली त्यावेळी असे आढळून आले की, मयत याला दारुचे व्यसन होते व त्यामुळे त्यांची प्रकृती खराब राहत होती. यावरुन असे म्हणता येईल की, दारुच्या अती सेवनामुळे विमा धारकाचा मृत्यु झाला असेल. अशा परिस्थीती विम्याची रक्कम मयताचे कुटुंबाला मिळु शकत नाही.
- या प्रकरणात जरी मृत्युचे नेमके कारण समोर आले नसले तरी विमा धारकाचा मृत्यु हा केवळ दारुचे अतिसेवनामुळे झाला हे दाखविण्यास पोलीसांचा मर्ग समरी शिवाय इतर कुठलाही पुरावा नाही. दुसरे असे की, ज्यावेळी शवविच्छेदन करण्यात आले त्यावेळी पण मृतकाचे शरीरात दारुचे अंश मिळुन आले नव्हते. पोलीसांनी कोणत्या आधारावर आपला अहवाल दिला की, मयताला दारुचे अत्यंत व्यसन होते व त्यामुळे तो मरण पावला हे दाखविण्यास मंचासमोर काहीच पूरावा नाही. विरुध्द पक्षाने ज्याने पोलीस मर्ग अहवाल सादर केला त्याला तपासले नाही. तसेच या प्रकरणात असा कुठलाही पुरावा नाही की मरतेवेळी किंवा त्यापूर्वी मयताने दारुचे सेवन केले होते. जर दारुच्या सेवेनामुळे मृत्यु झाला होता तर मयताच्या रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत पाठविण्यास हवा होता. केवळ पोलीसांच्या मर्ग अहवालाचे आधारे विरुध्द पक्षाला मयताची जिवन विमा पॉलीसीची रक्कम नाकारणे चुकीचे होते.
- या ठिकाणी मा. राज्य आयोगाने एका प्रकरणात दिलेला निवाडयाचा उल्लेख करणे जरुरी ठरेल. Execitve Engineer, IPH Division Vs. Sushmadevi 2015(2) CPR 316 (NC) या प्रकरणात मयताचा अपघाती मृत्यु झाला होता. परंतु त्याचा जिवन विमा दावा रक्कम या कारणास्तव नाकारली होती की, त्यांनी मरणापुर्वी दारुचे सेवन केले होते. मा. राष्ट्रीय आयोगाने तक्रारकर्त्याचा दावा मंजूर करतांना असे नमुद केले होते की, केवळ प्रयोगशाळेतील व्हिसेरा अहवालावरुन तक्रारकर्त्याला त्याचा देय असलेला विमा दावा रक्कम नाकारणे म्हणजे सेवेतील त्रुटी आहे. त्या प्रकरणात वैद्यकीय प्रयोगशाळेच्या डॉक्टरांनी आपल्या उलट तपासणीत असे सांगीतले होते की, मयताच्या रक्ताचे नमुन्यात कुठलेही रक्षणशील (preservative) टाकले नव्हते आणि जर रक्षणशील रक्ताच्या नमुन्यात टाकले नसेल तर काही वेळाने त्यामधे अल्कोहोल तयार होते. अशा परिस्थीती वैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल ग्राह्य धरण्यात आला नव्हता. तसेच पोलीसांनी केलेला चौकशीचा अहवाल सुध्दा या कारणास्तव ग्राहय धरण्यात आला नाही कारण पोलीसांनी कोणत्या आधारावर मयत दारु पिऊन होता या बद्दलचा पुरावा सादर केला नाही. तसेच विमा कंपनीने त्याबद्दल कुठलाही साक्षीदार तपासला नाही. त्याप्रकरणातील बहुतांश वस्तुस्थिती हाती असलेल्या प्रकरणाशी मिळतीजुळती असल्याकारणाने त्या निवाडयाचा आधारे या प्रकरणात असे म्हणता येईल की, विमा धारकाचा मृत्यु दारुचे अतिसेवनाने झाला असल्याबद्दलचा सबळ पुरावा नसल्याकारणाने असे गृहित धरावे लागेल की, त्याचा मृत्यु नैसर्गिक होता.
- वरील कारणास्तव विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारुन चुक केली आहे. विरुध्द पक्षाने जो प्राथमिक आक्षेप घेतला आहे त्याबद्दल स्पष्टपणे कुठेही खुलासा केलेला नाही. विमा धारकाने कुठली माहिती विरुध्द पक्षाकडुन विमा दावा काढताना लपवून ठेवली किंवा तक्रारकर्त्याने मंचापासुन लपवून ठेवली याबद्दल कुठेही खुलासा केलेला नाही. विमा दाव्याची प्रत विरुध्द पक्ष विमा कंपनी दाखल करु शकले असते परंतु ते न करण्याचे कारण त्यांनी दिले नाही. त्यामुळे विमा धारकाचा मृत्यु झाल्यानंतर कीती दिवसात विमा दावा दाखल करणे जरुरी आहे यासंबंधीची माहिती मंचासमक्ष विरुध्द पक्षाने दाखविली नाही. त्यामुळे विमा दावा दाखल करण्यास विलंब झाला असे म्हणता येणार नाही.
- वरील कारणास्तव तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर होण्यास पात्र आहे.सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
14.-अं ती म आ दे श - - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षा ने मयत विमा धारकाचे जिवन विमा दाव्यापोटी मिळणारी रक्कम रुपये 4,00,000/-, त्याचे मृत्यु दिनांक 18/3/2013 पासून 9 टक्के द.सा.द.शे. दराने प्रत्यक्ष अदायगी पावतो मिळुन येणारी रक्कम, तक्रारकर्त्यास अदा करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 5000/-(रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/-(रुपये दोन हजार फक्त) असे एकुण 7000/-रुपये (एकुण रुपये 7000/- फक्त) तक्रारकर्त्यास अदा करावे.
- वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने आदेश पारित झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.
- आदेशाच्या प्रती उभयपक्षकरांना नि:शुल्क पाठविण्यात याव्या.
| |