Final Order / Judgement | :::नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये,सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक ०३/०५/२०२३) - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,२०१९ चे कलम ३५ सह ३८ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ता हा मयत संगिता विश्वनाथ जमकातन हिचे पती आहे. तक्रारकर्त्याची मयत पत्नी ही वस्तु व विक्रीकर विभागात कर सहायक म्हणून नोकरी करीत होती व तिचे कार्यालयीन रेकॉर्डवर लग्नापूर्वी संगिता विश्वनाथ जमकातन हे नाव असल्यामुळे तिने त्याच पूर्वाश्रमीच्या नावानेच विरुध्द पक्ष कंपनीकडून दिनांक २८/१२/२०२० रोजी क्रमांक ५१५१०४९३८०४ ची विमा पॉलिसी घेतली व त्या विमा प्रिमियम रकमेची कपात तिचे वेतनातून परस्पर करुन घेण्याकरिता तिने विरुध्द पक्षाला आवश्यक ते सर्व दस्तावेज सही करुन दिले होते त्यामुळे तिचे पगारातून परस्पर विमा प्रिमियम रक्कम वळती करुन घेण्याची जबाबदारी ही विरुध्द पक्ष कार्यालयाची होती व आहे. विरुध्द पक्ष यांनी मयत संगिताला विमा पॉलिसी घरपोच पाठविली. स्वर्गीय संगिताला मे २०२१ मध्ये कोरोना झाल्याने तिला दिनांक २६/०५/२०२१ रोजी गडचिरोली येथील सरकारी रुग्णालयात भरती करावे लागले व त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने तिला मेडिकल कॉलेज, चंद्रपूर येथे स्थानांतरित करावे लागले परंतु दिनांक १३/०६/२०२१ रोजी तिचा कोरोनामुळे मृत्यु झाला. दरम्यानच्या काळात उपरोक्त विमा पॉलिसीचा प्रिमियम दिनांक २८/०५/२०२१ रोजी देय होता व तो विरुध्द पक्ष यांनी स्वर्गीय संगिताच्या पगारातून परस्पर कपात करणे आवश्यक होते परंतु विरुध्द पक्ष यांनी प्रिमियम वळती करण्याची कारवाई न केल्यामुळे व स्वर्गीय संगिता ही कोरोनामुळे दवाखान्यात भरती असल्याने विमा प्रिमियमचा भरणा करु शकली नाही. नियमानुसार १५ दिवसांचा ग्रेस पिरेड बाकी होता. तक्रारकर्त्याने पत्नी संगिताच्या मृत्युनंतर उपरोक्त विमा पॉलिसी अंतर्गत विमा दावा रक्कम मिळण्याकरिता विरुध्द पक्षाच्या सूचनेनुसार मुळ विमा पॉलिसीसह विरुध्द पक्षाकडे अर्ज दाखल केला. तक्रारकर्त्यास कोणतीही संधी व मुळ विमा पॉलिसी परत न देता विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा अर्ज खोट्या कारणास्तव फेटाळल्याचे दिनांक १२/०६/२०२१ रोजी मेलव्दारे तक्रारकर्त्यास कळविले. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना विमा दाव्यासोबत दिलेली विमा पॉलिसीची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक ३१/०५/२०२२ रोजी विरुध्द पक्ष यांना अधिवक्ता श्री अभय कुल्लरवार यांचे मार्फत नोटीस पाठवून मुळ विमा पॉलिसीची मागणी केली परंतु नोटीस प्राप्त होऊनसुध्दा विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला मुळ पॉलिसी दिली नाही. विरुध्द पक्ष यांनी दिनांक १४/०६/२०२१ रोजी तक्रारकर्त्यास मेलवर Letter of discontinuance पाठविले. स्वर्गीय संगिताचा दिनांक १३/०६/२०२१ रोजी मृत्यु झाला व तिच्या मृत्युनंतर विरुध्द पक्ष यांनी पॉलिसी Discontinue केली. विमा पॉलिसी अस्तित्वात असतांनाच दिनांक १३/०६/२०२१ रोजी संगिताचा मृत्यु झाला. विरुध्द पक्ष यांनी पाठविलेल्या दिनांक १४/०६/२०२१ रोजीचे Letter of discontinuation वरुन हे दिसून येते की, विरुध्द पक्ष विमा कंपनी तक्रारकर्त्यास पॉलिसीला ५ वर्षे पूर्ण होऊन ६ वे वर्ष सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी पॉलिसीची फंन्ड व्हॅल्यु देणार आहे परंतु त्यासोबत तक्रारकर्त्याला मुळ विमा पॉलिसीची मुळ प्रत व डिस्चार्ज फॉर्म देणे बंधनकारक आहे व विमा कंपनीने तक्रारकर्त्याकडून विमा दाव्यासोबतच मुळ पॉलिसी घेतली आहे व त्यांना ती विमा पॉलिसीची फंन्ड व्हॅल्यु परत द्यायची नाही म्हणून ते तक्रारकर्त्यास मुळ पॉलिसीचे दस्त परत करत नाही.
- विरुध्द पक्ष यांनी दिनांक १४/०६/२०२१ रोजी Policy Discontinuanc तिला उपरोक्त पॉलिसीची विमाकृत रक्कम रुपये ६,००,०००/- व इतर सर्व फायदे तक्रारकर्त्यास देण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष यांची आहे परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा फेटाळला तसेच नोटीसची सुध्दा दखल घेतली नाही असे करुन तक्रारकर्त्याप्रती अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करुन न्युनतापूर्ण सेवा दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास रक्कम रुपये ६,००,०००/- व इतर फायदे आणि त्यावर दिनांक १३/०६/२०२१ पासून तक्रारकर्त्यास रक्कम प्राप्त होईपर्यंत द.सा.द.शे. १८ टक्के दराने नुकसान भरपाई तसेच विमा पॉलिसीची मुळ प्रत व तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये १,००,०००/- व तक्रार खर्च रक्कम रुपये २५,०००/- द्यावे अशी प्रार्थना केली आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांना नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष प्रकरणात दिनांक ०३/०८/२०२२ रोजी हजर झाले परंतु त्यांनी ४५ दिवसाचे आत प्रकरणात लेखी उत्तर दाखल न केल्यामुळे आयोगाने त्यांचे लेखी उत्तराशिवाय प्रकरण चालविण्याचा आदेश दिनांक ११/१०/२०२२ रोजी निशानी क्रमांक १ वर पारित केला.
- तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपञ यातील मजकुरालाच तक्रारकर्त्याचा लेखी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल आणि तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रार निकालीकामी खालील मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले आणि त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे - तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे कायॽ होय
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ होय
३. काय आदेश ॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्त्याची मयत पत्नी संगिता विश्वनाथ जमकातन हिने विरुध्द पक्षाकडून ५१५१०४९३८०४ क्रमांकाची एस.बी.आय. लाईफ स्मार्ट स्कॉलर-३-आर.पी. पॉलिसी घेतली होती व त्या पॉलिसीची आरंभ तिथी ही २८/१२/२०२० असून कालावधी हा २३ वर्षे होता हे तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेल्या पॉलिसीच्या नुतनीकरण प्रिमियम नोटीस वरुन स्पष्ट होते, यावरुन मयत संगिताने विरुध्द पक्षाकडून उपरोक्त पॉलिसी घेतल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्ता हा मयत संगिताचा पती असून कायदेशीर वारस आहे व तिचे मृत्युनंतर विमा पॉलिसीचा लाभार्थी असल्याने विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - तक्रारीत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, मयत संगिता ही उपरोक्त पॉलिसीचा विमा प्रिमियम हा मासिक/दरमहा द्यायची व तिने दिनांक २८/०४/२०२१ पर्यंत विमा प्रिमियम विरुध्द पक्षाला दिला होता व दिनांक २८/०५/२०२१ रोजी विमा प्रिमियम देय होता आणि तिला कोरोना झाल्यामुळे दिनांक २६/०५/२०२१ रोजी सरकारी रुग्णालय, गडचिरोली येथे उपचाराकरिता भरती केले होते व त्यानंतर तिचा दिनांक १३/०६/२०२१ रोजी उपचारादरम्यान मेडिकल कॉलेज, चंद्रपूर येथे मृत्यु झाला. मयत संगिताने दिनांक २८/०५/२०२१ पर्यंतचा देय विमा प्रिमियमचा भरणा विरुध्द पक्षाकडे केलेला नव्हता आणि तिचा दिनांक १३/०६/२०२१ रोजी कोरोनामुळे मृत्यु झाला. तिचे मृत्युनंतर विरुध्द पक्ष यांनी दिनांक १४/०६/२०२१ रोजी उपरोक्त विमा पॉलिसी Discontinue (खंडित) केल्याबाबतचे पञ तक्रारकर्त्यास पाठविले परंतु संगिता जिवंत असतांना पॉलिसी अस्तित्वात होती व सदर पॉलिसी प्रिमीयमचा भरणा केला नाही, या कारणास्तव विरुध्द पक्षाने रद्द केलीली नव्हती आणि विरुध्द पक्ष यांनी मयत संगिताने विमा प्रिमियमचा भरणा न केल्यामुळे पॉलिसी बंद केल्याबाबतचे पञ हे तिच्या मृत्युनंतर पाठविले म्हणजे ती जिवंत असतांना उपरोक्त पॉलिसी विरुध्द पक्षाने रद्द न केल्याने अस्तित्वात होती व त्यामुळे संगिताच्या मृत्युनंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे उपरोक्त विमा पॉलिसी अंतर्गत मिळणारा विमा दावारक्कम रुपये ६,००,०००/- व इतर फायदे मिळण्याबाबत अर्ज केला परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा अर्ज पॉलिसी lapsed (खंडित) झाली, या कारणास्तव नामंजूर केला आणि विरुध्द पक्ष यांची ही कृती तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दर्शविते, या निࠀष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष यांचेकडून उपरोक्त पॉलिसीनुसार मिळणारी विमा दावा रक्कम रुपये ६,००,०००/- व त्यामधून विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास पॉलिसीच्या फंन्ड व्हॅल्युची दिली असलेली रक्कम रुपये २३,६५७/- वजा करता उर्वरित रक्कम रुपये ५,७६,३४३/- व पॉलिसीचे इतर फायदे तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम व तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेचनावरुन आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्रमांक १९४/२०२२ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास मयत संगिताचे मृत्युनंतर तिचे उपरोक्त विमा पॉलिसी क्रमांक ५१५१०४९३८०४ अंतर्गत मिळणारी विमा दावा रक्कम रुपये ६,००,०००/- मधून तक्रारकर्त्यास दिलेली फंन्ड व्हॅल्युची रक्कम रुपये २३,६५७/- वजा करुन उर्वरित रक्कम रुपये ५,७६,३४३/- व पॉलिसी अंतर्गत असलेले इतर फायदे द्यावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- द्यावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |