जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १९०/२०११
तक्रार दाखल दिनांक – १६/०९/२०११
तक्रार निकाली दिनांक – २६/०२/२०१४
श्री. राजेंद्र दौलत शिंदे
उ.वय -५२ वर्षे, धंदा – नोकरी
राहणार -२३-सि.,म. फुले कॉलनी
ता.जि. धुळे ................ तक्रारदार
विरुध्द
१) भारतीय स्टेट बॅंक, म.व्यवस्थापक सो.
कृष्ण कमल शॉपींग कॉम्प्लेक्स ता.जि.धुळे ............... सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदार तर्फे – अॅड.श्री.के.आर. लोहार)
(सामनेवाला तर्फे – अॅड.श्री.एम.एस. पाटील)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. बॅंक खात्यातील रक्कम एटीएम कार्डचा वापर करून न काढताही खात्यातून वजा दाखविण्यात आली, ती खात्यात पुन्हा जमा करण्यात यावी, यासाठी तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम १२ अन्वये सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे सामनेवाला बॅंकेत १११९४९९५९७७ क्रमांकाचे खाते आहे. या खात्यावर त्यांना एटीएम कार्ड मिळाले आहे. हे कार्ड तक्रारदार यांच्या ताब्यात असताना आणि त्याद्वारे त्यांनी पैसे काढलेले नसतांनाही त्यांच्या खात्यातून दि.१५/०६/२०१० ते दि.१२/०६/२०११ या कालावधीत रूपये ३८,६४०/- वजा करण्यात आले. याबाबत दि.१४/०६/२०११ रोजी लेखी तक्रार करण्यात आली. मात्र त्यानंतरही पैसे पुन्हा खात्यात जमा करण्यात आलेले नाहीत. म्हणून त्यांना मंचात सदरची तक्रार दाखल करावी लागली आहे. सामनेवाला यांनी आपल्या खात्यात रूपये ३८,६४०/- पुन्हा जमा करावेत, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रूपये २५,०००/- द्यावे, वरील रक्कमांवर द.सा.द.शे. १८ टक्के व्याज द्यावे आणि तक्रारीचा खर्च रूपये ५००० मिळावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ निशाणी ५ सोबत बॅंकेचा खाते उतारा, सामनेवाला यांना दि.१४/०६/२०११ रोजी दिलेले पत्र, तक्रारदाराचे ओळखपत्र दाखल केले आहे.
४. मंचाची नोटीस मिळाल्यानंतरही सामनेवाला हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरूध्द ‘एकतर्फा’ चा आदेश करण्यात आला होता. मात्र त्यानंतर सामनेवाला यांनी हजर होवून ‘सेट असाईड’ चा अर्ज दिला. तो मंचाने मंजूर केल्यानंतर त्यांनी आपला खुलासा दाखल केला. या खुलाशात सामनेवाला यांनी म्हटले आहे की, तक्रारदार आमचा ग्राहक होता हे बरोबर आहे. सध्या त्याने त्याचे खाते नाशिक येथे स्थलांतरीत करून घेतले आहे. तक्रारदारने प्रथम ६२२०१८०८२५४०००१६०७७ या क्रमांकाचे एटीएम कार्ड घेतले होते. ते त्याच्याच सांगण्यावरून दि.०९/०५/२००८ रोजी ब्लॉक करण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराला ६२२०१८०८२५४०००२५०७८ या क्रमांकाचे एटीएम कार्ड देण्यात आले. तेही तक्रारदाराच्या सांगण्यावरूनच दि.०८/०९/२०१० रोजी ब्लॉक करण्यात आले. त्यानंतर दि.२० नोव्हेंबर २०१० रोजी त्याला ६२२०१८०८२५४०००९५४०२ क्रमांकाचे नवीन एटीएम कार्ड देण्यात आले. आजही ते कार्ड तक्रारदाराजवळ आहे. ते कोठेही गहाळ झाले नाही किंवा कुणाला वापरायलाही दिलेले नाही. त्यामुळे त्याच्या खात्यातील एटीएमद्वारे केलेला व्यवहार त्याने स्वतःच केला असा अर्थ निघतो. दि.१५/०८/२०१० पासून दि.१४/०६/२०११ पर्यंत तक्रारदार त्याच्या खात्याचा वापर करीत होता. या कालावधीत त्याच्या खात्यातून कोणी बेकायदेशीर पैसे काढल्याची तक्रार त्याने केलेली नाही. त्यामुळे ही तक्रारच खोटी आहे. ती खर्चासह रदद करावी अशी मागणी सामनेवाला यांनी केली आहे.
५. सामनेवाला यांनी आपल्या खुलाशाच्या पुष्ट्यर्थ तक्रारदार यांचा चौकशी खाते क्रमांक, तक्रारदाराचा खाते उतारा दाखल केला आहे.
६. तक्रारदाराची तक्रार, सामनेवाला यांनी दाखल केलेला खुलासा, दोन्ही पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिल्यावर आणि दोन्ही बाजूच्या विद्वान वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यावर आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुददे उपस्थित होतात. त्यांची उत्तरेही आम्ही सकारण देत आहोत.
७. मुद्दे निष्कर्ष
अ. तक्रारदार हा सामनेवाले यांचा ग्राहक होता का ? होय
ब. सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली आहे,
हे तक्रारदार यांनी सिध्द केले आहे का ? नाही
क. एटीएम मधून नावे दिसणारी रक्कम पुन्हा
खात्यावर जमा होण्यास तक्रारदार पात्र आहेत का ? नाही
ड. सविस्तर आदेश ? खालीलप्रमाणे
विवेचन
८. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांचे सामनेवाला बॅंकेत खाते होते. त्याचा क्रमांक १११९४९९५९७७ असा होता. सध्या हे खाते तक्रारदार यांनी नाशिक येथे स्थलांतरीत करून घेतले आहे. ही बाब सामनेवाला यांनाही मान्य आहे. तक्रारदार यांनी त्यांचे खाते कधी स्थलांतरीत केले याचा उल्लेख तक्रारीत केलेला नाही. असे असले तरी तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होते, हे स्पष्ट होतेच. म्हणूनच मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा ‘ब’ – आपल्या खात्यातून एटीएमद्वारे रूपये ३८,६४०/- दि.१५/०६/२०१० ते दि.१२/०६/२०११ या कालावधीत विड्रॉल झाले अशी तक्रारदाराची तक्रार आहे. त्याबाबत तक्रार करूनही सामनेवाला यांनी वरील रक्कम पुन्हा खात्यावर जमा केलेली नाही, ही सेवेतील त्रुटी आहे, असेही तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरून त्यांच्या खात्यातून एटीएमद्वारे वरील रक्कम कशी विड्रॉल झाली ते स्पष्ट होत नाही. ज्या कालावधीत ही रक्कम नावे पडलेली दिसते त्या कालावधीत एटीएम कार्ड तक्रारदाराच्या ताब्यात होते. अन्य कुणी ते वापरल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे नाही. एटीएम कार्डचा पासवर्ड गोपनिय असतो. तो फक्त कार्डधारकालाच माहीत असतो. पासवर्ड असल्याशिवाय एटीएम मधून पैसे निघू शकत नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या ताब्यातील एटीएम कार्डचा आणि त्याच्या पासवर्डचा वापर झाल्याशिवाय तक्रारदाराच्या खात्यातून पैसे निघू शकत नाहीत, असे मंचाला वाटते. एटीएम कार्ड आणि त्याचा पासवर्ड न वापरता किंवा प्रत्यक्षात पैसे न काढता बॅंक खात्यातून पैसे नावे टाकले गेले, हे तक्रारदार सिद्ध करू शकलेले नाहीत. जे पैसे सामनेवाला यांनी परस्पर, स्वतःहून नावे टाकलेले नाहीत ते पैसे सामनेवाले यांनी पुन्हा जमा टाकणे नियमात बसणारे नाही. त्यामुळे ते पैसे त्यांनी तक्रारदार यांच्या खात्यात पुन्हा जमा केलेले नाहीत. ही त्यांच्या सेवेतील त्रुटी म्हणता येणार नाही, असे मंचाचे मत बनले आहे. म्हणूनच मुददा ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा ‘क’ – सामनेवाले यांनी दाखल केलेल्या खुलाशानुसार तक्रारदार यांच्या ताब्यातील एटीएम कार्डचा आणि त्याच्या पासवर्डचा वापर केल्याशिवाय तक्रारदार यांच्या खात्यातून पैसे विड्रॉल होवू शकत नाहीत. सामनेवाले यांनी कोणतीही माहीती न देता एटीएम कार्डचा प्रत्यक्ष वापर न होता किंवा एटीएम मधून प्रत्यक्ष पैसे न काढता खात्यातून पैसे नावे टाकण्यात आले, हे तक्रारदार सिद्ध करू शकलेले नाहीत. त्यामुळे जे पैसे परस्पर नावे टाकण्यात आले नाहीत, ते पुन्हा खात्यावर जमा दाखविता येणार नाही किंवा तक्रारदार यांना ते मागण्याचा अधिकारही पोहोचत नाही, असे मंचाचे मत बनले आहे. म्हणूनच मुददा ‘क’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
११. मुद्दा ‘ड’ - ज्या कालावधीत तक्रारदार यांच्या खात्यातून रक्कम नावे टाकण्यात आली त्या कालावधीत एटीएम कार्ड तक्रारदाराच्याच ताब्यात होते. त्याचा पासवर्डही फक्त त्यांनाच माहीत होता. एटीएमद्वारे पैसे न काढताही ते विड्रॉल दाखविण्यात आले, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. पण हे म्हणणे तक्रारदार यांनी सिद्ध केलेले नाही. जे पैसे सामनेवाले यांनी स्वतःहून नावे टाकलेले नाहीत. ते पैसे त्यांनी तक्रारदार यांच्या बॅंक खात्यावर पुन्हा जमा करण्याचे आदेश हे मंच देवू शकत नाही. याच कारणामुळे तक्रारदार यांची तक्रार मंजूर करणे योग्य होणार नाही असे मंचाला वाटते. म्हणूनच आम्ही पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत इतर कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
दि.२६/०२/२०१४
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.