न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. यातील जाबदार हे बिल्डर व डेव्हलपर असून वेगवेगळया शहरांमध्ये राहणेसाठी अपार्टमेंट बांधून विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. यातील जाबदार यांनी तक्रारदार रहात असलेल्या शेजारी रि.स.नं. 261/1, ई वॉर्ड, लिशा हॉटेल शेजारी, “सिल्व्हर ग्लेडस” या नावाने बांधणेत आलेल्या बी विंग मधील फ्लॅट नं.403 हा खरेदी घेणेचे तोंडी कराराने बुकींग केले व प्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाचा सेव्हिंग्ज खातेवरील चेक क्र. 198568 चे रक्कम रु.1,00,000/- चेकने अदा केले. तदनंतर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील सेव्हिंग्ज खातेवरील चेक क्र. 198570 चे रक्कम रु.2,00,000/- चेकने अदा केले. तथापि जाबदार यांनी प्रथमतः सांगितलेप्रमाणे सदर प्रोजेक्टला चारचाकी वाहन येणे-जाणेकरिता 30 फूटी अॅप्रोच रोड मिळत नसलेने तक्रारदाराने सदरचा तोंडी करार रद्द करुन बुकींगची भरलेली सर्व रक्कम परत मागूनही जाबदार देत नसलेने सदरचा तक्रारअर्ज तक्रारदाराने दाखल केला आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे अस्थिरोग तज्ञ असून ते डॉक्टरी व्यवसाय करतात. यातील जाबदार क्र.1 व 2 हे बिल्डर व डेव्हलपर असून वेगवेगळया शहरांमध्ये राहणेसाठी अपार्टमेंट बांधून विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. यातील जाबदार यांनी तक्रारदार रहात असलेल्या शेजारी रि.स.नं. 261/1, ई वॉर्ड, लिशा हॉटेल शेजारी, “सिल्व्हर ग्लेडस” या नावाने अपार्टमेंट बांधण्याचे ठरविले. सदर अपार्टमेंटमधील बी विंग मधील फ्लॅट नं.403 हा खरेदी घेणेचे तक्रारदाराने ठरविले व त्याप्रमाणे जाबदार यांचेकडे तोंडी कराराने बुकींग केले. तक्रारदारांनी सदर प्रोजेक्ट शेजारी रहात असलेल्या फ्लॅटधारकांना चारचाकी वाहन जाणे-येणेसाठी अॅप्रोच रोड बाबतचा प्रश्न जाबदार यांचेकडे उपस्थित केला. त्यावर जाबदार यांनी दक्षिणेकडील बाजूस असणा-या पश्चिम-पूर्व मोठया रस्त्यास आम्ही उत्तर-दक्षिण असा 30 फूट अॅप्रोच रोड देणार आहोत, तुम्ही टोकन रक्कम अदा करा अशी खात्री दिली. तदनंतर तक्रारदाराने प्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाचा सेव्हिंग्ज खातेवरील चेक क्र. 198568 ने रक्कम रु.1,00,000/- अदा केले. तदनंतर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील सेव्हिंग्ज खातेवरील चेक क्र. 198570 ने रक्कम रु.2,00,000/- अदा केली. तदनंतर तक्रारदाराने रजि. संचकारपत्र करणेबाबत जाबदार यांना विनंती केली असता जाबदार यांनी अद्याप अॅप्रोच रोडचे काम झालेले नाही, सदरचे काम झालेनंतर संचकारपत्राची पूर्तता करुन देत आहे असे सांगितले. तदनंतर अनेक वेळा तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे याबाबत संपर्क साधला असताना त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तदनंतर तक्रारदार यांनी चौकशी केली असता सदरची अॅप्रोच जागा ही दुस-याच्या मालकीची असल्याने सदर प्रोजेक्टला अॅप्रोच रोड करता येत नाही याची खात्री झाली. तदनंतर तक्रारदारांनी रक्कम रु.3,00,000/- ची पावती व संचकारपत्र करुन देणेची मागणी जाबदारांकडे केली असता त्यांनी तसे करण्यास नकार दिला. म्हणून तक्रारदारांनी दि.3/4/17 रोजी जाबदारांना वकीलामार्फत नोटीस पाठविली असता त्यांनी सदर नोटीसीस प्रतिसाद दिला नाही. सबब, तक्रारदारांनी जाबदार यांना दिलेली रक्कम रु.3 लाख व्याजासह परत मिळावी, नुकसान भरपाईपोटी रु.50,000/-, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रु.20,000/- मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत स्टेट बँकेतील बचत खात्याचा उतारा, वकीलामार्फत जाबदार यांना पाठविलेली नोटीस, नोटीसची पोचपावती, इ. एकूण 4 कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.
4. जाबदार क्र.1 व 2 यांना नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर न झालेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेचे दिसून येते. सदरचे आदेश दि.31/1/18 रोजी झाले. तदनंतर जाबदार क्र.1 व 2 तर्फे दि. 24/05/18 रोजी त्यांचे विधिज्ञ हजर होवून वकीलपत्र घालण्याकरिता व म्हणणे देणेकरिता मुदत मागणीचा अर्ज केला व तो मंचाने मंजूर केला. तथापि तदनंतरही जाबदार क्र.1 व 2 हे मंचासमोर हजरही नाहीत व त्यांनी आपले म्हणणेही दाखल दिले नाही.
8. तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
9. तक्रारदाराने तक्रारदार हे रहात असलेल्या शेजारी रि.स.नं. 261/1, ई वॉर्ड, लिशा हॉटेल शेजारी, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांचेकडून मंजूर करुन घेतलेल्या अंतिम रेखांकनाप्रमाणे 4217 चौ.मी. प्लॉट मिळकतीवर सिल्व्हर ग्लेड्स या नावाने आर.सी.सी. अपार्टमेंट बांधणेचा बोर्ड लावला. तथापि जाबदार क्र.2 या कंपनीचे संचालक श्री अमोल वडीयार हे ओळखीचे असलेने जाबदार क्र.1 भागिदारी फर्म व जाबदार क्र.2 कंपनी एकत्रितरित्या मालक, बिल्डर व डेव्हलपर या नात्याने बांधत असलेल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेणेसाठी विनंती केली व तदनंतर दि.19/6/14 रोजी सदरचे प्रोजेक्टमधील बी विंगमधील फ्लॅट नं.403 हा खरेदी घेणेचे तोंडी कराराने ठरवून बुकींग केले व स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील सेव्हिंग्ज खातेवरील चेक क्र. 190568 चे रक्कम रु.1,00,000/- व तदनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचा चेक क्र.198570 हा रक्कम रु. 2,00,000/- चा चेक दिला व सदरचा चेक हा जाबदार क्र.1 यांचे नावे दिला आहे. सदरचे आर.व्ही.के.बिल्डकॉनची लेजर अकाऊंटची कॉपी तक्रारदार यांनी दाखल केली आहे. सबब, तक्रारदार व जाबदार क्र.1 यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार हे नाते प्रस्थापित झालेची बाब स्वयंस्पष्ट आहे. सबब, तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) खाली ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
10. तक्रारदाराने तक्रारदार हे रहात असलेल्या शेजारी रि.स.नं. 261/1, ई वॉर्ड, लिशा हॉटेल शेजारी, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांचेकडून मंजूर करुन घेतलेल्या अंतिम रेखांकनाप्रमाणे 4217 चौ.मी. प्लॉट मिळकतीवर “सिल्व्हर ग्लेड्स” या नावाने आर.सी.सी. अपार्टमेंट बांधणेचा बोर्ड लावला. तथापि जाबदार क्र.2 या कंपनीचे संचालक श्री अमोल वडीयार हे ओळखीचे असलेने जाबदार क्र.1 भागिदारी फर्म व जाबदार क्र.2 कंपनी एकत्रितरित्या मालक, बिल्डर व डेव्हलपर या नात्याने बांधत असलेल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेणेसाठी तक्रारदार यांना विनंती केली व तदनंतर दि.19/6/14 रोजी सदरचे प्रोजेक्टमधील बी विंगमधील फ्लॅट नं.403 हा खरेदी घेणेचे तोंडी कराराने ठरवून बुकींग केले व स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील सेव्हिंग्ज खातेवरील चेक क्र. 190568 चे रक्कम रु.1,00,000/- व तदनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचा चेक क्र.198570 हा रक्कम रु. 2,00,000/- चा चेक दिला व सदरचा चेक हा जाबदार क्र.1 यांचे नावे दिला व सदरचे आर.व्ही.के.बिल्डकॉनची लेजर अकाऊंटची कॉपी तक्रारदार यांनी दाखल केली आहे.
तक्रारदार हे जाबदार क्र.1 व 2 बांधत असलेल्या प्रोजेक्टशेजारी रहात असलेने त्यांनी फ्लॅट धारकांना चारचाकी वाहन घेवून जाणे-येणेकरिता अॅप्रोच रोड बाबत प्रश्न उपस्थित केला असता जाबदार क्र.2 यांनी दक्षिणेकडील बाजूस असणा-या पश्चिम-पूर्व मोठया रस्त्यास आम्ही उत्तर-दक्षिण असा 30 फूट अॅप्रोच रोड देणार आहोत असे कथन केले व रोड मंजूरीनंतर रजि. संचकारपत्र करुन देत असलेबाबत हमी व खात्री दिली. जाबदार यांनी तक्रारदार यांना सांगितलेप्रमाणे माहे जानेवारी 2015 मध्ये तक्रारदार हे जाबदार यांचे ऑफिसमध्ये सदरचे अॅप्रोच रोडबाबतची व संचकारपत्राबाबतची विचारणा करणेस गेले असता जाबदार क्र.2 हे काम झालेनंतर निरोप देतील असे सांगितले. तदनंतर पुन्हा मे 2015 मध्ये विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही व चौकशीअंती सदरची मिळकत ही दुस-याचे मालकीची असलेबाबत कळून आले. सबब, अॅप्रोच रोड होत नसलेची खात्री झालेने सदरचे रजि. करारपत्र (संचकारपत्र) करुन देणेची विनंती केली असता त्यास जाबदार यांनी नकार दिला व तदनंतर तक्रारदाराने सदरची मिळकत खरेदी घेणेचे रद्द केले.
जाबदार यांना नोटीस मिळूनही त्यांनी मंचासमोर हजर होवून आपले म्हणणे दाखल केलेले नाही तथापि, उभय पक्षांमधला करार हा जरी तोंडी झाला असला तरीसुध्दा तक्रारदाराने आर.व्ही.के. बिल्डकॉन यांचे लेजर अकाऊंटची प्रत दाखल केली आहे. यावरुन तक्रारदाराने दि 19/6/14 रोजी एस.बी.आय. खाते क्र. 11194489279 चा रक्कम रु. 1,00,000/- आर.व्ही.के. बिल्डकॉन यांचे नावाने डेबीट झालेची नोंद दिसून येते. तसेच दि. 9/7/14 ची त्याच खातेवरुन जाबदार क्र.1 यांचे नांवे रक्कम रु. 2,00,000/- ची डेबीट झालेची नोंद दिसून येते. यावरुन जरी करार तोंडी झाला असला तरीसुध्दा या नोंदीवरुन तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांना पैसे दिलेची बाब ही स्वयंस्पष्टच आहे व तक्रारदाराने दि. 3/4/17 रोजी जाबदार क्र.1 व 2 यांना पाठविलेची नोटीसची पोचही याकामी दाखल आहे. तथापि, या नोटीसीस उत्तरही तक्रारदाराने दिले नाही अथवा मंचाचे नोटीस लागू होवूनही आपले म्हणणे मांडले नसलेने तक्रारदाराने केलेली तक्रारअर्जातील सर्व कथने जाबदार क्र.1 व 2 यांना मान्य आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारअर्जास छेद देणारा असा कोणताही पुरावा जाबदार यांनी मंचासमोर दाखल केलेला नाही. सबब, तक्रारदाराने मागितलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार निश्चितच पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब, तक्रारदारास पैसे देणेपूर्वी जाबदार यांनी 60 फूटी अॅप्रोच रोड देणेविषयी कथन करुन त्याची पूर्तता न करुन निश्चितच सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, तक्रारदारास त्याची चारचाकी गाडी निश्चितच नेता येणे अशक्य असलेने तक्रारदारास सदरचा जाबदार यांचेबरोबर झालेला तोंडी करार रद्द करणे क्रमप्राप्त आहे. सबब, तक्रारदाराने त्यापोटी भरलेली रक्कम रु.3,00,000/- ही तक्रारदारास द.सा.द.शे. 6 टक्के दराने सदर रक्कम भरलेपासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत देणेचे आदेश करणेत येतात. तसेच तक्रारदाराने नुकसान भरपाईपोटी मागितलेली रक्कम रु.50,000/- व अर्जाचे खर्चपोटी मागितलेली रक्कम रु.20,000/- ही या मंचास संयुक्तिक वाटत नसलेने नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदरचे आदेश हे जाबदार क्र.1 व 2 या दोहोंवरही बंधनकारक आहेत. सबब, हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना त्यांनी अर्जात नमूद सदनिका खरेदी करणेसाठी दिलेली रक्कम रु.3,00,000/- ही रक्कम दिले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने देणेचे आदेश करणेत येतात.
3. जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा हजार फक्त) देणेचे आदेश करणेत येतात.
4. जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार फक्त) देणेचे आदेश करणेत येतात.
5. वर नमूद आदेशामधील रकमेपैकी काही रक्कम जाबदार यांनी तक्रारदार यांना अदा केली असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरीत रक्कम अदा करावी.
6. वर नमूद आदेशांची पूर्तता जाबदार क्र. 1 व 2 यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
7. विहीत मुदतीत जाबदार यांनी आदेशाची पूर्तता न केलेस तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 खाली दाद मागणेची मुभा राहिल.
8. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.