Complaint Case No. CC/17/9 |
| | 1. Chandrashekhar Vinayakrao Deshmukh | R/o, B-13, Near Ram Mandir, Sudhir Colony, Akola | Akola | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Rupesh Patti Through SBI Insurance Company Ltd. Akola | R/o. Tower Branch S.B.I. Akola | Akola | Maharashtra | 2. Pravin Magar SBI Insurance Company Ltd. Akola | R/o, Blackberry Tower, First Floor, Ratanlal Plot Chwok Akola | Akola | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: आ दे श ::: ( पारीत दिनांक :24.03.2017 ) आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना मंचाने पाठविलेली नोटीस, सदर विरुध्दपक्ष यांनी घेतली, परंतु त्यावर रबरी शिक्का व दिनांकीत न करता फक्त नामांकित करुन दिले व मंचाच्या कर्मचा-याला अत्यंत उध्दटपणाची वागणुक दिली, तसा अहवाल संबंधीत कर्मचा-याने नोटीसीबरोबर दिला. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस प्राप्त होऊनही, ते मंचासमोर हजर झाले नसल्याने, ही तक्रार त्यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचे आदेश दि. 4/3/2017 रोजी पारीत करण्यात आले. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे सदर तक्रार निकाली काढण्यात आली. - तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन व दाखल दस्तांवरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा ग्राहक असल्याचे दिसून येते व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 मंचासमोर हजर न राहील्याने त्यांचे तर्फे या मुद्दयावर विरोधी विधान प्राप्त न झाल्याने, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येते.
- तक्रारकर्तीच्या तक्रारीनुसार, तक्रारकर्ते यांनी दि. 10/08/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्याकडे होंडाई इन्शुरंस पॉलिसी काढण्याकरिता फॉम भरुन दिला व सोबत रु. 12,410/- चा धनादेश दिला. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला दि. 10/8/2016 रोजी प्रिमियम पावती दिली. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना वारंवार पॉलिसी बद्दल विचारणा केली, परंतु विरुध्दपक्षांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व तक्रारकर्त्यास पॉलिसी दिली नाही. तक्रारकर्त्याला ट्राफिक पोलिसांनी विमा पॉलिसी नसल्यामुळे दंड सुध्दा केला आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 तक्रारकर्त्याच्या विमा पॉलिसी बद्दल कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे तक्रारकर्त्याने त्यांचे वकीलांमार्फत दोनही विरुध्दपक्षांना दि. 14/12/2016 रोजी कायदेशिर नोटीस पाठवून, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून काढलेली होंडाई इन्शुरंस पॉलिसी, नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसाचे आंत तक्रारकर्त्यास देण्याची विनंती केली. सदर नोटीस विरुध्दपक्षाला दि. 22/12/2016 रोजी प्राप्त होवूनही, विरुध्दपक्षाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारकर्त्याची कार खराब झाल्याने दि. 26/12/2016 रोजी तक्रारकर्त्याने अकोला नॅशनल गॅरेज येथे दुरुस्तीकरिता टाकली असता, सदर वाहनाची पॉलिसी नसल्यामुळे त्याचे दुरुस्तीकरिता येणारा खर्च रु. 8,500/- तक्रारकर्त्यास स्वतः द्यावा लागला. त्यामुळे तक्रारकर्त्याने ही तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून वैयक्तीकरित्या व संयुक्तपणे जबाबदार धरुन पॉलिसीची भरलेली रक्कम रु. 12,450/- दि. 10/8/2016 पासून रक्कम परत करे पर्यंत 18 टक्के द.सा.द.शे. प्रमाणे परत करण्याचा आदेश व्हावा. विकल्पे करुन पुढील कालावधीकरिता पॉलिसी काढून द्यावी. तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याची पॉलिसी काढून न दिल्यामुळे तक्रारकर्त्यास गाडीचे दुरुस्तीकरिता लागलेला खर्च रु. 8,500/-, विरुध्दपक्ष यांना पाठवाव्या लागलेल्या नोटीसचा खर्च रु. 2,000/-, तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 1,00,000/- देण्याचा आदेश व्हावा.
- दोनही विरुध्दपक्ष प्रकरणात गैरहजर असल्याने, त्यांचेतर्फे तक्रारकर्त्याच्या तक्रारी विरुध्द कुठलेही विरोधी विधान प्राप्त न झाल्याने तक्रारकर्ते यांची तक्रार ग्राह्य धरुन, तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते. सबब अंतीम आदेश येणे प्रमाणे...
-
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारकर्ते यांना होंडाई कार पॉलिसीची भरलेली रक्कम रु. 12,410/- ( रुपये बारा हजार चारशे दहा फक्त ) दि. 10/8/2016 पासुन ते प्रत्यक्ष अदाई पर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के व्याज दराने, व्याजासह परत करावी.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारकर्ते यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 2000/- ( रुपये दोन हजार फक्त ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 1000/- द्यावे.
- मंचाच्या कर्मचा-यास कर्तव्य बजावतांना उध्दटपणाची वागणुक दिल्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना प्रत्येकी रु. 500/- ( रुपये पांचशे फक्त ) दंड ठोठावण्यात येतो. सदर दंडाची रक्कम ग्राहक सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात यावी.
- सदर आदेशाचे पालन, निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत करावे.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या. | |